भल्याभल्या कलाकारांची पोलखोल करणारे हे ७ TV shows अजिबात चुकवू नका
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“करिनाच्या मुलाचं नाव काय ठेवलं?”, “विरुष्काच्या वामिकाचा अजूनही चेहरा दिसला नाही”, “बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यनला खरंच छळलं जातंय का?”, “रणबीर आलियाचं शुभमंगल यंदा तरी होणार का?”…आपल्याच घरातील एखादा गंभीर प्रश्न असावा अशा अविर्भावात सुरु असलेल्या चर्चा तुम्ही कधी ऐकल्या आहेत का?
बॉलिवूड गॉसिप म्हटलं की वय, आवड, जात-पात सारं काही विसरून प्रत्येकजण या चर्चेत सहभागी होतो. सेलिब्रिटींच्या घरात किंबहूना खाजगी आयुष्यात काय घडतंय? कोणाचं ब्रेकअप झालं? कोणती जोडी हिट ठरली? पडद्यामागील बॉलिवूडमध्ये नक्की काय शिजतंय? याची उत्सुकता प्रत्येकाल असतेच. मग ही सगळी माहिती मिळवण्यासाठी कुणी पेपरमधील ‘पेज थ्री’ ला पसंती देतं तर कुणी ऑनलाईन वेबसाईट्सना!
मात्र सेलिब्रिटींबाबतची खरीखुरी माहिती, धमाल गॉसिप आणि याव्यतिरिक्त बरंच काही जाणून घ्यायचं असेल तर ‘टॉक शो’ चुकवून चालणार नाही हे अगदी खरं.
सेलिब्रिटींना कार्यक्रमात बोलवून त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा, थोडी मजामस्ती, किस्से-कहाण्या आणि प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांची खरी उत्तरं असं स्वरुप असलेल्या या टॉक शोच्या इतिहास खूप जुना आहे.
एरव्ही मेकअप, कॅमेऱ्याचा झगमगाट यांमध्ये मुखवटे धारण केलेल्या सिलिब्रिटींचाही होणारा क्लिनबोल्ड किंवा गप्पांच्या ओघात मुलाखतकाराने दिलेल्या कानपिचक्या हे या शोचं वैशिष्ठ्य प्रेक्षकांना नेहमीच भावतं. इतरवेळी कॅमेऱ्यासमोर बिनधास्त वावरणारे कलाकार अशा शोमध्ये बोलताना मात्र चाचपडतात, चुकतात आणि अनेकदा प्रेक्षकांना ठाऊक नसलेलं असं काहीतरी सांगूनही जातात.
जाणून घेऊयात, मनोरंजनासह प्रबोधनाची सांगड घालणा-या आणि टिव्ही विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करणा-या काही खास टॉक शोज विषयी…
१. आप की अदालत
अभिनेते, राजकारणी किंवा क्रिकेटर, या शोमध्ये हजेरी लावली नाही असा सेलिब्रिटी क्वचितच सापडेल. आपल्या विशेष शैलीत, अभ्यासपुर्ण प्रश्नांसह बेधडक वृत्तीचे ‘रजत शर्मा’ प्रश्न विचारायला सरसावले की भल्याभल्यांना धडकी भरायची हे काही उगीच नाही.
१९९३ साली झी टिव्ही वाहिनीवर या शोचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. सेलिब्रिटींशी गप्पा या प्राथमिक उद्देशाने सुरु झालेल्या या शोने यशाची अनेक शिखरं सर केल्याने मनोरंजन ही चौकट तर कधीच मोडली गेली.
या शोमध्ये येण्यासाठी अनेक कलाकार, राजकारणी मंडळी उत्सुक असतात मात्र त्याचवेळी या शोमध्ये येण्याची अनेकांना भितीही वाटते. मनोरंजनासह राजकारण, समाजकारण, अर्थशास्ज्ञ, क्रिडा अशा अनेक विषयांवर होणा-या चर्चांना कधी वादाचे रुप येते तर कधी या शोमधील वक्तव्यांची थेट ब्रेकिंग न्युजही बनते.
२. कॉफी विथ करण
दिग्दर्शक करण जोहर आणि गॉसिप यांचं नातं नवं नाही. स्टारकिडला दिलं जाणारं प्रोत्साहन असो सुशांत सिंग राजपुत प्रकरण, करण जोहरचं नाव प्रत्येक प्रकरणात हमखास सापडतंच. ‘बॉलिवूड हम चलाते है’ अशा अविर्भावात वावरणाऱ्या करणची अनेक बड्या सेलिब्रिटींशी दोस्ती आहे, आपल्या याच मित्रांसह गप्पा मारण्याचा प्लॅन करणने आखला आणि त्याचा कॉफी विथ करण हा शो सुपरहिट ठरला.
करणच्या या कॅफेत बॉलिवुडमधील बड्या कलाकारांची नेहमीच वदर्ळ असते. मग काही वेळा रणवीर-दिपीका सारखी जोडपी येतात तर कधी शाहरुख-सलमानसारखे जुने मित्र दाखल होतात. वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये येणाऱ्या कलाकारांच्या जोड्यांनी कायमच धमाल केली आहे.
सुरवातीला गप्पा, मग गॉसिप, कधी जुन्या आठवणी आणि त्यासह रॅपिड फायर या खास फेरीत प्रत्येक मिनीटाला कलाकारांची होणारी पोलखोल प्रेक्षकांना कायमच बघायला आवडते. म्हणूनच इंटरनेटवर या शोचे जुने एपिसोड्सही पुन्हा पुन्हा पाहिले जातात.
–
हे ही वाचा – अंत्यसंस्काराला जाताना सुचली नव्या शो ची कल्पना, करण जोहरची विकृत मानसिकता
–
३. कॉमेडी नाईट्स विथ कपिल
सध्याच्या मनोरंजन क्षेत्रातील एक विनोदवीर म्हणजे कपील शर्मा. अभिनेता म्हणून नशिब आजमवायला आलेल्या कपिलला विनोदाची वाट सापडली शिवाय सोनी सारख्या वाहिनीनेही मदतीचा हात दिल्याने त्याने कॉमेडी नाईट्स विथ कपील हा शो सुरु केला.
हिंदी चित्रपटाचं प्रमोशन अर्थात प्रसिद्धी करण्याचा उद्देश असलेल्या या शोमध्ये बडे कलाकार, दिग्दर्शक येण्यास उत्सुक असतात. मात्र कपिलसह गुत्थी अर्थात सुनिल ग्रोवर, अभिनेता क्रिष्णा यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज असल्याने येणा-या कलाकारांसह प्रेक्षकांचंही निखळ मनोरंजन होतं.
विनोदातून कोपरखळी हे या कार्यक्रमाचं वैशिष्ठ्य असल्याने कधी कोणत्या कलाकाराची पोलखोल होईल तर कधी कोण निरुत्तर होईल हे सांगणही कठीण आहे.
४. मुव्हर्स अण्ड शेखर्स
शेखर सुमन आणि गप्पा यांचं समीकरण जुनं आहे. आपल्या लाडीक शैलीत मात्र अभ्यासपुर्ण विचारांनी समोरच्यांना प्राभावित करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहेच मात्र त्यांच्या याच कौशल्याचा वापर करत हा टॉक शो सुरु करण्यात आला होता.
१९९७ साली या शोचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर टॉक शो या सदरात नवा इतिहास रचला गेला. वर्षानुवर्ष सुरु असलेल्या या शोमध्ये तत्कालीन कलाकारांनी हजेरी लावली नाही तरच नवल. गप्पा मारताना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग, किस्से यांपासून थेट बॉलिवूडमधील राजकारण, वाद अशा ज्वलंत विषयांवरही चर्चा रंगायची.
५ खुपते तिथे गुप्ते
दिग्दर्शक, गायक, संगीतकार अशा विविध भुमिका निभावणारा अवधुत गुप्ते त्याच्या जिंदादिल व्यक्तीमत्वासाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे तसाच त्याच्या कलाकार मित्रमंडळींमध्येही. त्याच्या याच गप्पिष्ट स्वभावामुळे झी वाहिनीवर खुपते तिथे गुप्ते या शोची सुरुवात झाली.
गुप्त्यांच्या दरबारी जात मनात खुपणाऱ्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी मराठमोळे कलाकार उत्सुक असायचे. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांपासून तरुण, नवख्या कलाकारांनीही गुप्तेंच्या शाळेत हजेरी लावली आहे.
गप्पा, मजामस्करी यांसह वेगवेगळ्या स्पर्धा यांच्यासह गुप्तेंच्या खास प्रश्नांना उत्तर देताना कलाकारांची दमछाक व्हायची मात्र प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी असायची.
–
हे ही वाचा – बाळासाहेबांनी एक फोन केला आणि मुंबई सोडून गेलेल्या अवधूतचा जीव भांड्यात पडला!
–
६. चला हवा येऊ द्या
निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे अशा दमदार कलाकारांची फळी आणि विनोदाची आतिषबाजी, कलाकारांच्या हास्याची कारंजी… चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीत मनोरंजनाची दिवाळी रोजच साजरी होते.
झी च्या लय भारी या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केला गेलेला हा एक भागांचा प्रयोग सध्या हजारो भागांचा टप्पा पुर्ण करत आहे यातच त्याची यशोगाथा सांगितली जाते.
मराठी चित्रपट, मालिका यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी पेलणा-या या कार्यक्रमात येण्याचा मोह किंग खान, अक्षय कुमार, सलमान खान, अनुष्कार शर्मा, प्रियंका चोप्रा अशा बॉलिवूड कलाकारांनाही आवरता आला नाही.
वेगवेगळी पात्र रंगवणाऱ्या या टिमकडून नेमकी कोणत्या पाहुण्या कलाकारवर कोटी केली जाईल याचा नेम नसल्याने येणारा प्रत्येक कलाकार सावध असतो.
७. कानाला खडा
अभिनेता संजय मोने यांचा कानाला खडा हे शोचं नाव जितकं अतरंगी तितकाच त्याचा ढंगही निराळा. येणाऱ्या कलाकारांना टाकलेली गुगली आणि त्यातून उडणारा गोंधळ हे पाहणं प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी असायची.
मुळातच विनोदी शैली आणि हजरजबाबी असलेल्या संजय मोने यांच्या निवेदनाचंही कौतुक करण्यात आलं. केवळ कलाकारच नव्हे तर राजकारणी, खेळाडू, उद्योजक यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
रटाळ मालिका किंवा भडक कार्यक्रम यांपेक्षा निखळ मनोरंजन आणि पडद्यामागील गोष्टींचा खजिना पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतात, त्यांच्यासाठी अशा प्रकारचे टॉक शो हा उत्तम पर्याय ठरतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.