' तत्कालीन समाजाने वेडा ठरवलेल्या धुरंदर मराठी माणसाचे आज पुण्यस्मरण, त्यानिमित्त! – InMarathi

तत्कालीन समाजाने वेडा ठरवलेल्या धुरंदर मराठी माणसाचे आज पुण्यस्मरण, त्यानिमित्त!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ज्या वेळी भारत पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळी एका व्यक्तीने दूरदृष्टीने काळाच्या फार पुढचा विचार केला व अनन्वित कष्ट करून एका अशा व्यवसायाचे बी पेरले ज्याचा आज महावृक्ष झाला आहे. ह्या व्यवसायाने हजारो, लाखो लोकांना रोजगार दिला, ओळख दिली आणि मुख्य म्हणजे लोकांना अभिव्यक्ती जगापुढे मांडण्याचे एक फार मोठे माध्यम उपलब्ध करून दिले.

ही वाट चालत असताना समाजाने त्यांना वेडे ठरवले, त्यांच्या सोबत असणाऱ्यांनी त्यांची टिंगल टवाळी केली.

परंतु आपल्या पत्नीच्या दृढ विश्वासाच्या सोबत त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवली व भारताला एका व्यवसाय क्षेत्राची ओळख करून देण्यासोबतच भारतीय लोकांना मनोरंजनाचे एक मोठे साधन उपलब्ध करून दिले.

त्यांनी त्या काळी फार पुढचा विचार करून भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णभविष्याचा पाया रचला म्हणूनच आज आपण दर शुक्रवारी प्रदर्शित होणारे हजारो चित्रपट बघू शकतो. हो! तुम्ही बरोबर ओळखलत! आम्ही बोलतोय भारताच्या चित्रपटसृष्टीचे जनक स्व. दादासाहेब फाळके ह्यांच्याविषयी!

 

dadasaheb-phalke-marathipizza01
alchetron.com

त्यांनी त्या काळी अगणित कष्ट करून भारतात उपलब्ध नसलेली चित्रपट निर्मितीची साधने शिकून, ती परदेशातून मागवून भारताचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ निर्माण केला होता आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला होता. आज आपण ह्या ऋषितुल्य व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत.

धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके ह्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला होता.

त्यांनी त्यांचे शिक्षण मुंबईच्या प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे घेतले होते. जे.जे. मधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराजा सयाजीराव युनिवर्सिटी ऑफ बडोदा येथे प्रवेश घेतला. तिथे ते फोटोग्राफी, मूर्तीकला व चित्रकला शिकले. त्यांच्या कामाची सुरुवात त्यांनी एक फोटोग्राफर म्हणून केली. त्यानंतर त्यांनी स्वतःची प्रिंटींग प्रेस काढली. ह्या काळात त्यांनी राजा रवी वर्मा ह्यांच्या बरोबर सुद्धा काम केले.

 

dadasaheb-phalke-marathipizza02
thefamouspeople.com

चित्रपट सृष्टीत काम सुरु करण्याआधी दादासाहेबांनी चित्रपटांचा अगदी गहन अभ्यास केला होता. ५ पौंड मध्ये त्यांनी कॅमेरा खरेदी केला व रोज २० तासांपेक्षाही जास्त वेळ त्यावर अभ्यास केला.

ज्यावेळी त्यांना चित्रपट निर्माण करण्याच्या ध्यासाने झपाटले होते त्या काळी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांना ह्या गोष्टीसाठी समाजाचा कट्टर विरोध होता. तरीही त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई ह्यांनी त्यांना ह्या कार्यात भक्कम साथ दिली.

१९१२ साली चित्रपटनिर्मितीचे काम शिकण्यासाठी दादासाहेब इंग्लंडला गेले व सेसिल हेपवर्थ ह्यांच्याकडे त्यांनी चित्रपट निर्मितीमधील बारीकसारीक तपशील सुद्धा शिकून घेतले.

१९१३ साली जेव्हा त्यांना चित्रपट निर्माण करायचा होता तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशा वेळी त्यांना त्यांच्या पत्नीने साथ दिली. सरस्वतीबाईंनी ह्या वेळी आपले दागिने गहाण ठेवून आपल्या पतीसाठी पैश्यांची व्यवस्था केली. अखेर दादासाहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे शनिवार ३ मे १९१३ रोजी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार झाला.

 

raja-harischandra-marathipizza
ndtv.com

ह्या चित्रपटाचे लेखन, फोटोग्राफी, संपादन हे सर्व दादासाहेबांनी केले होते. त्या काळी लोकांची दृष्टी चित्रपटांविषयी चांगली नव्हती. म्हणूनच दादासाहेबांनी त्यांच्या परिवाराच्या मदतीने हा चित्रपट तयार केला ज्यात रोहीदासाची भूमिका त्यांच्या ज्येष्ठ पुत्राने म्हणजेच भालचंद्र फाळके ह्यांनी केली होती.  २

१ एप्रिल १९१३ रोजी हा चित्रपट ओलम्पिया सिनेमा हॉल मध्ये प्रदर्शित करण्यात आला. तेव्हा त्या काळच्या प्रसारमाध्यमांनी व इंग्रजांनी ह्या चित्रपटाला वाईट संबोधून त्यावर बहिष्कार टाकला. पण लोककथेचा विषय असलेला हा चित्रपट सामान्य जनतेला भावला व आवडला.

ह्यानंतर दादासाहेबांनी मागे वळून पहिले नाही व आपल्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल ९५ चित्रपट व २६ लघुपट निर्माण केले.

१९३८ साली त्यांनी चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतला. त्यांचा अखेरचा चित्रपट म्हणजे ‘गंगावतरण’ होय. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे व देशात एक नवा अध्याय लिहिणारे दादासाहेब फाळके ह्यांनी १६ फेब्रुवारी १९४४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी ह्या जगाचा निरोप घेतला.

 

dadasaheb-phalke-marathipizza04
india.com

आजची चित्रपटसृष्टी व आपण सगळेच दादासाहेबांचे ऋणी आहोत. त्यांच्या ह्या दूरदृष्टीमुळेच आज भारतीय चित्रपटसृष्टी दिमाखात उभी आहे व दर वर्षी हजारो चित्रपट निर्माण होऊन कित्येक कोटींची उलाढाल होऊ शकते. म्हणूनच आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांच्या नावे दिला जातो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?