भारताचा खरा हास्यसम्राट एकेकाळी पोट भरण्यासाठी रस्त्यावर उभा राहून चकना विकायचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लोकांना हसवणं हे सध्या सर्वात अवघड काम आहे, किंबहुना हे काम कधीच सोपं नव्हतं. आपल्या समस्यांना विसरून हसवण्यासाठी आता विनोदाचा दर्जा खूप उच्च असावा लागतो. काही वर्षांपासून विनोदी कलाकारांना भेटण्यासाठी आपल्याला सिनेमाची वाट बघण्याची गरज राहिली नाहीये.
छोट्या पडद्यावरील ‘कॉमेडी सर्कस’, ‘लाफ्टर चॅलेंज’ या शो मधून आलेले ‘स्टॅन्ड-अप कॉमेडियन’ आज लोकांचं भरपूर मनोरंजन करत आहेत. या शो मधून आलेला प्रत्येक हास्यवीर हा बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करत असतो.
जे यशस्वी होतात कपिल शर्मा बनतात आणि जे प्रयत्न करून थकतात ते दुसरं काम करायचं ठरवतात.
एक काळ होता जेव्हा लोकांना गोविंदाच्या सिनेमांनी लोकांना खूप हसवलं. राजबाबू, साजन चले ससुराल, दुल्हेराजा सारखे विनोदी सिनेमे हे आता पुन्हा होणे नाही. आजच्या सिनेमांमध्ये विनोद हा आपल्याला तुकड्यांमध्ये दिसतो.
अर्थात, यामध्ये ‘गोलमाल’, ‘धमाल’ सारखे काही विनोदी सिरीजचे अपवाद आहेत ज्या सिनेमांमध्ये लोकांना आजही हसवण्याची क्षमता आहे. स्क्रिप्टपेक्षा ही विनोद हा प्रेक्षकांना कलाकाराच्या अभिनयातून कळत असतो.
===
हे ही वाचा – प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!
===
गोलमाल मधील जॉनी लिव्हर यांचं “भुला…” हा संवाद आपण विसरुच शकत नाही. आपल्या सादरीकरणात नेहमीच नावीन्य अपेक्षित असलेल्या या विनोदी कलाकारांच्या गर्दीत जॉनी लिव्हर हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे की मागच्या ३९ वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.
ऑर्केस्ट्रामध्ये कलाकारांच्या आवाजाची नक्कल करून करिअर सुरू करणाऱ्या या कलाकाराचा प्रवास हा सुद्धा एखाद्या सिनेमा सारखाच आहे.
दारूच्या दुकानाबाहेर शेंगदाणा विकणारा हा मजदूर भारताचा कॉमेडी किंग कसा बनला? जाणून घेऊयात.
१४ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबई मध्ये जन्म झालेल्या जॉनी लिव्हर यांचं खरं नाव ‘जॉन राव’ आहे. जॉनचे वडील प्रकाश राव हे हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड या कंपनीत काम करायचे आणि हे कुटुंब मुंबईतील एका चाळीत रहायचे.
वडिलांवर आलेल्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना काही वर्षांनी धारावीच्या झोपडपट्टीत रहायला जावं लागलं होतं. आंध्रा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिकत असतांना जॉन शाळेच्या वेळेनंतर घरी आर्थिक मदत करण्यासाठी मिळेल ते काम करायचे.
वडिलांना असलेल्या दारू पिण्याच्या सवयीमुळे कुटुंबाची हलाखीची परिस्थिती झाली होती. दारू पिऊन जॉनचे वडील त्याला नेहमीच मारहाण करायचे.
एक दिवस निराश होऊन जॉनी लिव्हर हे वयाच्या १३ व्या वर्षी रेल्वे रुळावर जीव देण्यासाठी गेले होते. कुटुंबातील इतर लोकांनी खूप प्रयत्न करून त्यांना वाचवलं आणि तिथून घरी घेऊन आणलं होतं.
सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जॉनी लिव्हर यांनी शाळेला जाणं सोडून दिलं. वयाच्या १० व्या वर्षी जॉन रावने पैसे कमावण्यासाठी दारूच्या दुकानाबाहेर उभं राहून शेंगदाणे विकायला सुरुवात केली होती.
सिने कलाकारांच्या नकला करायला सुरुवात करून लोकांना हसवायचं काम सुरू केलं. स्वतःच्या आयुष्यात काहीच समाधान नसणारा हा अवलिया लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत होता.
धारावीच्या झोपडपट्टी जवळच असलेल्या सिंधी कॅम्प मध्ये त्याला लोक केवळ हसवण्यासाठी घेऊन जायचे आणि बदल्यात २ रुपये द्यायचे. सिंधी कॅम्पमध्ये जॉन ला एका व्यक्तीने पेन विकण्याचा सल्ला दिला.
आजचा कॉमेडी किंग जॉनी लिव्हर ने कित्येक दिवस मुंबईच्या रस्त्यांवर बसून पेन विकले होते हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल. पेन विकतांना जॉनी हे वेगवेगळ्या स्टार्सच्या आवाजात लोकांशी बोलायचे आणि लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करायचे.
वयाच्या १८ व्या वर्षी जॉनी यांना वडिलांनी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत साबण तयार करण्याच्या खात्यामध्ये ‘झाडू मारण्याच्या’ कामाला लावले. आपलं काम करतांना जॉनी त्यांच्या स्टेज शोचे संवाद म्हणायचे.
कंपनी आणि आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात जॉनीला बोलावलं जाऊ लागलं आणि तिथून एका ‘स्टॅन्ड अप कॉमेडियन’चा जन्म झाला.
जॉन हे एकदा शण्मुखानंद हॉलमध्ये आपली कला सादर करत होते तेव्हा त्याचे वडील प्रकाश राव त्याला शोधत तिथे आले होते. जॉन ला मारण्यासाठी ते एक पाईप चा तुकडा घेऊन आले होते. शण्मुखानंद हॉल मध्ये ३००० प्रेक्षक होते आणि ते जॉन च्या विनोदांना उत्स्फूर्त दाद देत होते.
जॉन ने प्रेक्षकांमध्ये आपल्या वडिलांना बघितलं होतं. तरीही कोणता संकोच न बाळगता त्यांनी आपली कला सादर केली. आपल्या वडिलांच्या डोळ्यातील आनंद जॉन ला सुखावून गेला.
कार्यक्रम संपल्यावर जॉनचे वडिल त्याला न भेटताच घरी निघून गेले होते. “हे आपलं क्षेत्र नाही” हे त्यावेळच्या कित्येक वडिलांनी आपल्या डोक्यात फिट करून ठेवलं होतं. जॉन चे वडील त्यांच्यातलेच एक होते.
===
हे ही वाचा – स्वत:ची संपत्ती मृत्युनंतर सत्कारणी लागावी यासाठी एक कठोर निर्णय घेणारा फिल्मस्टार!
===
‘जॉनी लिव्हर’ हे नाव कसं पडलं?
हिंदुस्तान लिव्हर कंपनीमध्ये एका कार्यक्रमात आपली कला सादर करण्यासाठी जॉनला संधी मिळाली होती. कोणाचंही नाव न घेता जॉनने कंपनीतील सर्व वरिष्ठ लोकांच्या बोलण्याची हुबेहूब नक्कल केली होती. सर्व कामगारांना हा कार्यक्रम खूप आवडला.
कार्यक्रमानंतर युनियन लीडर सुरेश राव यांनी व्यासपीठावर येऊन जॉनचा सत्कार केला आणि ते म्हणाले, “आज तुझ्यामुळे पूर्ण शहर हे हिंदुस्तान लिव्हरमय झालं आहे. आजपासून तुझं नाव जॉनी लिव्हर हे असेल.”
या कार्यक्रमानंतर कंपनीमध्ये सगळेच जण जॉन राव ला ‘जॉनी लिव्हर’ या नावाने ओळखू लागले. ६ वर्ष काम करून जॉनी लिव्हरने हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा निरोप घेतला.
सेलिब्रिटी होण्याची सुरुवात:
कंपनीमध्ये काम केलयानंतर जॉनी लिव्हर यांनी गायकांच्या कार्यक्रमात, ऑर्केस्ट्रा मध्ये पाच ते दहा मिनिटाचं सादरीकरण करायला सुरुवात केली.
कल्याणजी – आनंदजी या संगीतकार जोडीने जॉनी लिव्हरला सर्वात पहिल्यांदा संधी दिली. शत्रूघन सिन्हा यांचा आवाज जॉनी लिव्हर इतक्या हुबेहूब काढायचे की, एकदा फक्त ते ऐकण्यासाठी शत्रूघन सिन्हा स्वतः प्रेक्षकांमध्ये येऊन बसले होते.
१९८२ मध्ये सुरू असलेल्या अश्याच एका कार्यक्रमात सुनील दत्त आले होते. त्यांनासुद्धा जॉनी लिव्हरचं विनोदाचं टायमिंग खूप आवडलं होतं.
सुनील दत्त तेव्हा ‘दर्द का रिश्ता’ ह्या सिनेमासाठी विनोदी कलाकार शोधत होते. जॉनी लिव्हर यांना बघितल्यावर त्यांचा शोध पूर्ण झाला होता. जॉनी लिव्हरला आपला पहिला हिंदी सिनेमा मिळाला.
‘तेजाब’, ‘चालबाज’, ‘खिलाडी’ सारख्या सिनेमांमध्ये काम केल्यानंतरसुद्धा जॉनी लिव्हरच्या कामाची निर्माते तितकी दखल घेत नव्हते.
जॉनी लिव्हर यांच्या कामाची सर्वात पहिल्यांदा दखल घेतली ती १९९३ मध्ये रिलीज झालेल्या ‘बाजीगर’ मधील त्यांच्या कामामुळे. भिंतीवर खिळा ठोकतांना चुका करणारा ‘बाबूलाल’ हे पात्र तेव्हा प्रचंड लोकप्रिय झालं.
दिनेश हिंगु या कलाकारासोबत असलेला चहा न देता तशी नक्कल करण्याचा सीन सुद्धा लोकांना खूप आवडला होता.
कोणतीही गोष्ट लगेच विसरणाऱ्या बाबूलालसारखे विनोदी पात्र हे त्यानंतर सिनेमांची गरज झाली होती. महत्वाचं म्हणजे हे सर्व विनोदी पात्र, त्यांचे सीन्स जॉनी लिव्हर यांनी स्वतः लिहिले होते.
जुदाई मधील “अब्बा, चब्बा, डब्बा” असो किंवा बाजीगर मधील “मुझें तो कभी पोलीसपर भी शक होता है” असो, प्रत्येकवेळी जॉनी लिव्हरने प्रेक्षकांना आपल्या विनोदाच्या टायमिंग ने प्रभावित केलं.
व्यक्तिगत आयुष्यातील आव्हान :
आपल्या बालपणी इतका संघर्ष बघितलेल्या जॉनीचा स्वतः वडील झाल्यावरसुद्धा संघर्ष संपला नव्हता. त्यांची मुलगी जेसीच्या घशात ट्युमर झाला होता. मुंबईत त्याची शस्त्रक्रिया शक्य होती. पण, तेव्हा जॉनी यांनी नकार दिला. ट्युमरचा आकार वाढत गेला आणि त्या शस्त्रक्रियेसाठी जॉनी यांना जेसीला घेऊन अमेरिकेला जावं लागलं.
न्यूयॉर्कच्या हॉस्पिटलला हा ट्युमर काढून टाकण्यात यश आलं. यादरम्यान, जॉनी लिव्हर यांना ख्रिश्चन धर्मियांनी गरिबांची सेवा करून देवाकडे जेसीच्या प्रकृती साठी प्रार्थना केली होती.
हे कार्य जॉनी लिव्हरला इतकं भारावून गेलं की, त्यांनी काही काळ स्वतः या सेवाकार्यात पूर्ण वेळ सहभाग नोंदवला आणि काही काळासाठी सिनेमा मध्ये काम करणं सुद्धा कमी केलं.
मुलगा जेमी आणि मुलगी जेसी या दोघांनाही इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी पाठवल्यानंतर जॉनी काही काळासाठी परत अस्वस्थ झाले होते. जेमीला व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण, लंडन मध्ये एक स्टॅन्ड अप कॉमेडी कार्यक्रम बघून जेमीने सुद्धा विनोदवीराची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचं त्याने ठरवलं.
आपला संघर्ष आठवून यावेळी जॉनी लिव्हरचा त्याला विरोध होता. मुलाची कला बघण्यासाठी जॉनी लिव्हरने लंडनमधील स्वतःच्या एका कार्यक्रमात मुलाला आपली कला सादर करण्यासाठी १० मिनिटं दिली.
जॉनी लिव्हरमध्ये असलेला कलेचा वारसा मुलाने सार्थपणे घेतला होता. १० मिनिटांच्या कार्यक्रमानंतर लोकांनी जेमीला उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली. जॉनी लिव्हरने आपला विरोध मागे घेतला. आज जेमी टीव्ही, सिनेमा आणि डिजिटल माध्यमांमध्ये लोकांना हसवण्याचं काम करत आहे.
आज वयाच्या ६४ व्या वर्षी सुद्धा जॉनी लिव्हर तितक्याच ऊर्जेने काम करत आहेत. ‘हाऊसफुल ४’ आणि नव्या ‘कुली नंबर १’ मध्ये त्यांनी लोकांना हसवण्याचं आपलं काम परत एकदा चोखपणे केलं.
आपल्या फिटनेसचं श्रेय जॉनी लिव्हर हे विनोद आणि संतुलित आहाराला देतात. ३५० सिनेमांमध्ये काम करूनसुद्धा जॉनी लिव्हर यांचा प्रत्येक नवीन रोलसाठी आजही तितकाच उत्साह असतो.
आपल्या कारकिर्दीत जॉनी लिव्हर यांना १३ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आज जॉनी लिव्हर हे आर्टिस्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत तर मिमिक्री आर्टिस्ट असोसिएश चे ते अध्यक्ष आहेत.
===
हे ही वाचा – अनाथ मुलगा ते लोकप्रिय नट, प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असा अर्शद वारसी चा प्रवास! वाचा.
===
स्वतःच्या आयुष्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या जॉनी लिव्हरने लोकांना हसवून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
सध्याच्या कठीण काळात जॉनी लिव्हरचे जुने विनोदी सीन हे आपल्याला प्रसन्न ठेवण्यात नक्कीच मदत करू शकतात. हसत रहा, आनंदी रहा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.