तरुण मुलं अचानक गेल्यानंतर आजी नातवासाठी उभी राहीली अन अख्ख्या मुंबईचा आधार बनली!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय हा अनेक गृहिणींसाठी वरदान ठरला आहे. ज्यांचं शिक्षण कमी आहे, ज्या घर सोडून किंवा घरापासून दूर राहू शकत नाहीत किंवा इतर काही कारणं असतील तर अशा गृहिणींसाठी घरगुती पदार्थांचा व्यवसाय उत्तम आहे.
तुमच्या हाताची चव ग्राहकांना आवडली आणि तुमची सेवा उत्तम असली की या व्यवसायात भरभराट असते. कष्टही आहेतच पण त्याचा परतावाही योग्य मिळतो. लॉकडाऊनमधे अनेकांनी या व्यवसायात उडी मारलेली दिसून येते.
मात्र मुंबईतल्या गुज्जूबेन नाष्टाची गोष्ट इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. याचं कारण म्हणजे हा व्यवसाय चालविणारी महिला ७७ वर्षांची आहे.
उर्मिला जमनादास अशर ही गुजराती महिला अनेकांच्या चर्चेचा विषय बनण्याचं कारण तिचा ‘गुज्जू बेन ना नाष्टा’ हेच एकमेव नाही तर उर्मिलाबेनची आयुष्याची गोष्टच प्रचंड प्रेरणादायी आहे.
===
हे ही वाचा – या टिप्स वापरल्या तर प्रत्येक गृहिणी आपल्या छंदांमधून अवाढव्य व्यवसाय उभा करू शकेल!
===
आयुष्यात काहीही होवो न थकता, न थांबता चालत रहाणं उर्मिला बेनकडून शिकण्यासारखं आहे. आजच्या काळात एवढ्या तेवढ्या अपयशांनी खचून आत्महत्या करणारी मुलं पाहिली की उर्मिलाबेन सारख्यांच्या संघर्षाचा अभिमान वाटतो.
उर्मिलाबेनना लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती त्यामुळे त्या खूप लहान वयात स्वयंपाक करू लागल्या. इतरांच्या घरीही जाऊन गरज पडली तर त्या स्वयंपाक करत असत. त्यांच्या हाताला चव असल्यानं त्यांना स्वयंपाकासाठी बोलवणी येत असत.
कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं असं त्या म्हणतात आणि कष्टानं पैसे मिळवण्यात कसली आलीय लाज? असा प्रश्न विचारतात. कष्ट करा पैसे कमवा इतका साधा नियम त्या आयुष्यभर पाळत आल्या आहेत.
त्या आपल्या मदतनीसांना, नातींना, सुनांना, आजूबाजूच्या महिला मुलींना सतत हेच सांगत आल्या आहेत की बाईचं काम खाऊ घालण्याचं आहे ते तिनं मनापासून केलं पाहिजे.
तुम्ही मनापासून एखादा पदार्थ बनवला की त्याची चव कधीच बिघडत नाही आणि दुसरा महत्वाचा संस्कार जो आजच्या काळात अगदी सोन्यासारखा मोलाचा आहे, तो म्हणजे, जे कोणी अडचणीत आहे त्याला मदतीचा हात द्यायचा.
आपल्याकडून होईल ती मदत करायला मागे पुढे पहायचं नाही. आपलं कुटुंब आपण प्रत्येकानं असा मदतीचा हात देत बांधून ठेवलं तर बाहेरच्या कोणाच्या मदतीची गरजच उरणार नाही.
उर्मिलाबेन यांना तीन अपत्यं. यापैकी एक मुलगी अगदी लहानपणीच इमारतीवरून खाली पडून अपघातात गेली. मोठा मुलगा ब्रेन ट्युमरनं गेला, तर धाकटा मुलगा ह्र्दविकाराचा झटका आला आणि गेला.
उर्मिलाबेननी सतत अशा कठीण परिक्षा देतही कुटुंब कणखरपणे सावरून ठेवलं. त्या नेहमी दु:ख पचवून पुन्हा उभ्या राहिल्या. काहीही झालं तरीही जगण्याची उमेद हरवायची नाही, आशा सोडायाची नाही हे कुटुंबियाना सांगत राहिल्या. नुसत्याच सांगत राहिल्या असं नाही तर स्वत: वेळप्रसंगी उभ्या राहिल्या.
आजही वयाच्या ७७ व्या वर्षी नातवंडं, पतवंडात खेळायच्या वयात, देव देव करत बसल्याजागी जगायच्या वयात त्या कुटूंबाची उमेद बनल्या आहेत.
पूर्वीपासूनच त्यांचा टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय होता. त्यांच्या मदतीला त्यांचा मुलगाही होता जो नंतर हार्टफेलनं गेला. याच मुलाचा मुलगा म्हणजे हर्ष. उर्मिला बेनचा मुलगा गेला तेंव्हा नातू हर्ष शिकत होता. घर कसं चालतंय वगैरे त्याला काहीच पत्ता नव्हता.
उर्मिला बेननी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. कुटुंबाला कधीच झळ बसू दिली नाही. अडचणी पाठ सोडायला तयार नव्हत्या. हर्षच्या बाईकला अपघात झाला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याची जीभ अक्षरश: तुटून पडली होती.
त्यातल्या त्यात नशिबाची गोष्ट अशी की घराजवळच अपघात झाल्यानं चाळीतली मुलं धावत अपघाताच्या जागी गेली त्यांनी ती तुटकी जीभ अक्षरश: प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून धावतपळत हॉस्पिटल गाठलं.
इथे त्याच्यावर शस्त्रक्रिया चालू होती. ओठाला प्लॅस्टिक सर्जरी करून ओठ शिवला, जीभ शिवली आणि उर्मिला बेननी नशिबानं घातलेला आणखीन एक कठीण पेपर उत्तम मार्कानी सोडवला. मात्र तिसाव्या वर्षी चेहरा विद्रुप दिसू लागलाच पण अपघातानं रोजी रोटी काढून घेतली आणि हर्ष नैराश्यात गेला.
हर्षची आई खचली मात्र उर्मिलाबेन आपल्या नातवाची, हर्षची उमेद बनल्या. ओठच तर फाटलाय बाकी हात पाय धडधाकट आहेत नां? असा सवाल विचारून त्याच्या बरोबरीनं उभ्या राहिल्या. मात्र लॉकडाऊननं पुन्हा एक झटका दिला. आर्थिक परिस्थिती उताराकडे चाललेली दिसू लागली.
हर्षनं आजीच्या चाळीस वर्षांच्या स्वयंपाक कौशल्याचा वापर करून घ्यायचं ठरवलं आणि ७७ वर्षांची ही आज्जीही आनंदानं, उत्साहानं तयार झाली आणि जन्म झाला गुज्जूबेन ना नाष्टाचा.
सुरवात लोणच्यापासून झाली. केवळ पंधरा वीस दिवसात या दोघांनी पाचशे किलोचं लोणच्याच्या ऑर्डर बनविल्या. त्यानंतर त्यांनी नाष्ट्याची सुरवात केली. त्यांच्या मदतीला हर्षचे मित्र आणि मैत्रिणी धावून आले.
हर्षसाठी त्यानी गुज्जूबेन ना नाष्टा हा व्यवसाय सुरू केला. त्या स्वत: उत्तमोत्तम पदार्थ बनवतात. लोकांना घरपोच सेवा देण्याचा व्यवसाय त्यांनी हर्षसोबत चालू केला.
===
हे ही वाचा – ‘ह्या’ महिलेची कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल
===
सकाळी ७ ला त्यांचा दिवस चालू होतो ते रात्री ९ ला संपतो. संपूर्ण दिवस त्या स्वयंपाकघरात काम करतात तेही न थकता. आठवड्यातून ८० तास त्या अव्याहत काम करतात.
दोन स्वयंपाकघरातील मदतनीस, दोन डिलिव्हरी मदतनीस यांच्या मदतीनं हा व्यवसाय उत्तमपणे चालू आहे. हर्ष आर्थिक बाजू आणि हिशोब बघतो.
या व्यवसायातून त्या स्वत:साठी काहीही करत नाहीत सगळे कष्ट केवळ नातवासाठी आहेत. व्यवसाय सुरू केल्या दिवसापासून त्या कधीही हिशोबात लक्ष घालत नाहीत.
फक्त आपण कष्टाच्या तुलनेत योग्य तो नफा मिळवतोय नं आणि आपल्या पदार्थांची चव ग्राहकांना आवडतीये नं? या दोनच गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. बाकी कमाई किती होते? त्याचं पुढे काय होतं? काय खर्च होतात? या कशातही त्या लक्ष घालत नाहीत.
ग्राहकांना चव आवडली की एखादा पुरस्कार मिळाल्यासारखा आनंद त्यांना होतो. दिवसभर बसून काय करायचं? त्यापेक्षा हाताला काम असलं की चांगलंच आहे की असं उर्मिलाबेन ज्या निरासगतेनं सांगतात ते बघून भल्याभल्या तरूणांनाही भारावून जायला होतं.
मिठास वाणी, कष्टांची तयारी, दर्जातलं सातत्य या मॅनेजमेंटमधे लाखो रूपये फी घेऊन शिकवल्या जाणार्या गोष्टी उर्मिलाबेनच्या रक्तातच आहेत आणि म्हणूनच ८० तास कमी पडतील इतकं काम आजच्या घडीला त्यांच्याकडे आहे.
वयाच्या ७७ व्या वर्षीही जर उर्मिलाबेन नव्या उमेदिनं व्यवसायात उतरून तो यशस्वी करत असतील तर त्यांच्याकडून ही प्रेरणा तरुणांनी घेण्यासारखीच आहे.
===
हे ही वाचा – ७००० रुपयांच्या बळावर भारतीय महिलांना ‘स्टायलिश’ बनवणाऱ्या उद्योजिकेची यशोगाथा
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.