अवघ्या २००० मावळ्यांनी जेव्हा हजारो मुघलांना पळवून लावलं होतं…!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“पेडगावचे शहाणे” ही म्हण कशावरून पडली हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सन १६७६ मधल्या पेडगावला जावं लागेल. अहमदनगर जवळच्या या पेडगावमध्ये एक भुईकोट किल्ला आहे. ज्याचं नावच पूर्वी ‘पेडगावचा भुईकोट किल्ला’ असं होतं.
त्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि मुघलांचं महत्त्वाचं लष्करी ठिकाण अशी मान्यता या किल्ल्याला होती. मुघलांच्या दृष्टिकोनातून हा किल्ला खूप महत्त्वाचा होता.
अशा या महत्त्वपूर्ण किल्ल्याची जबाबदारी औरंगजेबाने त्याचा मावसभाऊ बहादुरखान याच्याकडे दिली होती. त्याला ‘कोकलताश’ अशी पदवीसुद्धा देण्यात आली होती.
हा बहादूरखान कोकलताश स्वतःला दक्षिणेचा बादशहा समजायचा. पेडगावच्या किल्ल्यात शस्त्रास्त्र, उंची जातीचे अरबी घोडे आणि दक्षिणेतून जमा झालेल्या कराचा शाही खजिना होता.
त्यावेळी बहादूरखानाकडे त्याच्याकडे जवळ-जवळ एक कोटी होन जमा झाले होते, जे त्याने दक्षिणेतील लोकांकडून जबरदस्तीने आणले होते.
त्याच्या या खजिन्याची आणि घोड्यांबद्दलची माहिती शिवाजी महाराजांच्या हेरांनी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ मध्ये झाला होता. त्यासाठी बराच पैसा खर्च झाला होता. तो खर्च भरुन काढणे गरजेचे झाले होते. आणि बहादुरखानामुळे शिवाजी महाराजांना ही संधी मिळाली.
===
हे ही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : स्वराज्याच्या इतिहासातील एक दुर्लक्षित घटना
===
महाराजांनी असं ठरवलं की हा खजिना लुटायचा. त्यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणेच त्यांच्या गनिमीकाव्याचा उपयोग केला. तो खजिना लुटण्याची मोहीम सेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडे सोपवण्यात आली.
लढाई नेमकी कशी झाली?
त्यावेळेस बहादूर खानाकडे किल्ल्यामध्ये २५००० शस्त्रधारी सैनिक होते. तर शिवाजी महाराजांनी या मोहिमेसाठी फक्त ९००० मावळ्यांची फौज पाठवली आणि त्याचे नेतृत्व हंबीरावांकडे सोपवले.
मोहिमेतील ठरलेल्या योजनेनुसार काम सुरू झाले. हंबीररावांनी ९००० मावळ्यांच्या दोन तुकड्या केल्या. एक ७००० मावळ्यांची आणि दुसरी २००० मावळ्यांची.
बहादूरखानापर्यंत मुद्दाम माहिती पोहोचवण्यात आली की मराठे त्यांच्यावर चाल करून येणार आहेत. त्यामुळे बहादूरखान सावध होता.
आत्तापर्यंत शिवाजीमहाराजांच्या मोहिमा या रात्रीच्या काळोखामध्ये अचानक हल्ला करून पार पाडल्या जायच्या. पण या मोहिमेसाठी मात्र भर दुपारची वेळ निवडण्यात आली. त्याचेही खास कारण होते.
बहादूरखानाचे जेवण झाले होते, तो सुस्तीत होता, त्याच वेळेस त्याच्या सैनिकाने त्याला वर्दी दिली, की मराठे चाल करून येत आहेत. दुपारची वामकुक्षी घेण्याच्या तयारीत असलेला बहादूरखान चरफडत उठला. आतापर्यंतचा मराठ्यांचा पराक्रम आठवून बहादूरखानाने आपल्या सर्व सैनिकांना लढाईसाठी तयार केले.
मात्र मराठ्यांचे केवळ दोन हजार सैनिकच लढाईसाठी येत आहेत ही बातमी त्याला मिळाली. मराठ्यांचं जवळ आलेलं सैन्य बघून त्याला कळेना, की इतक्या कमी सैन्यासह ते कसा हल्ला करतील?
‘जे असेल ते असो’ या सगळ्या मराठ्यांना आपण ठार मारायचं, असं त्याने सैनिकांना सांगितलं. ‘मराठ्यांना किल्ल्यामध्ये येऊ द्या मग आपण त्यांच्यावर तुटून पडू, एकही सैनिक जिवंत जाता कामा नये’ अशा सूचना त्याने दिल्या.
जेव्हा मराठे किल्ल्याजवळ आले आणि त्यांनी किल्ल्यामध्ये बाणांचा वर्षाव सुरू केला. तिथले दगड घेऊन मारायला सुरुवात केली. काही केल्या मराठे किल्ल्यामध्ये जात नव्हते.
मराठे किल्ल्याच्या बाहेरूनच हल्ला करत होते हा सगळा प्रकार जवळजवळ दोन तास झाला पण मराठे काही किल्ल्यात घुसले नाहीत.
शेवटी कंटाळून बहादूरखानाने आपल्या सैन्याला हुकूम केला, की बाहेर जाऊन मराठ्यांवर हल्ला करा. त्यानुसार बहादूरखानचे सगळे सैनिक जसे किल्ल्याबाहेर येऊ लागले तसे हे २००० मराठे पळत सुटले. मराठ्यांना पळताना पाहून बहादूर खानाला अजुनच चेव चढला आणि तो आपल्या सैन्याला त्यांचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहित करू लागला.
मराठे पुढे आणि बहादूरखान आणि त्याचे सैन्य मागे असा पाठलाग सुरू झाला. पण हे शिवाजी राजांचे मावळे होते त्यांना त्या भागातील खाचखळग्यांची, डोंगर रांगांची पूर्ण माहिती होती. आणि पळण्यात मावळे इतके चपळ होते की बघता बघता दिसेनासे व्हायचे.
थोडं पुढं पळून गेल्यानंतर मराठ्यांमधील काही सैनिक चोर वाटेने दुसरीकडे जायचे. उरलेले तसेच पुढे जायचे, बहादूर खानाचं सैन्य पाठलाग करत राहायचं. असंच करत करत त्या सैन्याला २७ मैलापर्यंत मराठ्यांनी हुलकावणी दिली. त्यानंतर सगळे मराठे दिसेनासे झाले.
तसा बहादुरखानाला प्रश्न पडला की मराठे नक्की काय करायला आले होते. कारण तोदेखील आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होता. मराठ्यांना हरवलं हे त्याला औरंगजेबाला दाखवून द्यायचं होतं. त्याला घाबरूनच मराठे पळून गेले म्हणजे नक्कीच औरंगजेब आता आपल्याला मोठी बक्षिशी देईल या खुशीत तो होता. आणि तो माघारी पेडगावच्या किल्ल्याकडे निघाला.
किल्ल्यात आल्यानंतर मात्र त्याला आपण मराठ्यांच्या मागे गेलो याचा त्याला पश्चाताप झाला. कारण तिथलं दृश्य भयानक होतं. तिथली भांडी कुंडी, कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
बहादुरखान किल्ला सोडून मराठ्यांचा पाठलाग करू लागला. त्यावेळी किल्ल्यावर केवळ शंभर-दीडशे सैनिक उरले होते आणि इतर १००० निशस्त्र लोक किल्ल्याची देखभाल करत होते. आणि याच संधीचा फायदा ७००० मावळ्यांच्या दुसऱ्या तुकडीने घेतला.
बहादूरखान आपल्या सैन्यासह बाहेर पडला आणि किल्ल्याच्या दुसऱ्या दाराने हे ७००० मराठे आत घुसले. त्यांनी किल्ल्यातील शाही खजिना ताब्यात घेतला. तसेच अरबी घोडे देखील आपल्यासोबत घेऊन गेले.
किल्ल्यात प्रतिकार करायला कुणीच उरलं नव्हतं त्यामुळे मराठ्यांना हे काम एकदम सोपं गेलं. या युद्धात एकही मराठा सैनिक मृत्युमुखी पडला नाही.
===
हे ही वाचा – जेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनिमाला कापून काढतात…!
===
बहादूरखान परत येईपर्यंत मराठे तिथूनही पळाले होते. म्हणजे बहादूरखानाला शेवटी हातावर हात चोळत बसावं लागलं. कोणतीही व्यवस्था न करता किल्ला मोकळा सोडून बहादूरखान गेला म्हणूनच त्याला ‘पेडगावचा शहाणा’ असं म्हटलं गेलं असावं.
बहादूरगड नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘पेडगावच्या किल्ल्याचा’ इतिहास:
पेडगावचा हा भुईकोट किल्ला तेराव्या शतकात यादवांनी बांधला. भीमा नदीला समांतर असा हा आयताकृती किल्ला आहे. आता या किल्ल्याची सध्या दुरावस्था झाली आहे.
किल्ल्यामध्ये एकूण पाच मंदिरे आहेत. त्यापैकी लक्ष्मीनारायण मंदिर हे जरा बऱ्या स्थितीत आहे. पूर्वीपासूनच हा किल्ला नेहमीच महत्त्वाचं केंद्र ठरला आहे.
यादवांनंतर त्या किल्ल्यावर मुघलांनी ताबा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही हा किल्ला मुघलांच्याच ताब्यात होता.
औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांना पकडले तेव्हा त्यांना याच किल्ल्यावर आणण्यात आलं होतं. ४० दिवस संभाजी राजांचा झालेला अपमान आणि अनन्वित छळ याचा साक्षीदार आहे हा किल्ला… अर्थातच संभाजी महाराजांचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि निर्धार देखील किल्ल्याने पाहिला आहे.
औरंगजेबाने त्यांची इथे धिंड काढली. कातडी सोलून काढली त्यावर तिखटमीठही चोळलं. स्वराज्य देण्यासाठी त्यांचा छळ केला, धर्मांतराचा दबाव टाकला. इस्लामचा स्वीकार केल्यास, त्यांची सगळ्या बंधनातून मुक्तता होणार होती. त्यांना सरदारकी मिळणार होती, औरंगजेबाच्या मुलीशी लग्न होणार होतं. पण हा राजा त्याच्या अशा कोणत्याच गोष्टीला बधला नाही.
त्यावेळेस संभाजी राजांसोबत कवी कलश देखील होते. त्यावेळेस कवी कलश यांनी एक काव्य लिहिलं.
यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग |
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग ||
जो रवी छबी लखतही खद्योत होत बदरंग |
त्यो तूव तेज निहार के तखत त्येजो अवरंग ||
( कवितेचा अर्थ: रावणाच्या सभेत ज्या प्रमाणे हनुमंताला बांधून आणले, त्या प्रमाणे संभाजी राजास औरंगजेबापुढे उपस्थित केले गेले. हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्ध करून रक्ताने माखलेले तुझे अंग, हे राजन तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे हे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिंहासनाचा त्याग करून गुडघे टेकले आहेत.)
औरंगजेबाच्या या छावणीत पहिल्यांदा कवी कलश यांचा छळ व्हायचा आणि तसाच छळ संभाजी राजांचाही व्हायचा. त्यानंतर कवी कलश यांची जीभ छाटली गेली, नंतर संभाजीराजांची. संभाजी राजांची भेदक नजर ही औरंगजेबाला सहन व्हायची नाही.
===
हे ही वाचा – छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व नाकारणाऱ्यांना ‘हे’ सत्य दिसत नाही की मान्य नाही?
===
त्याने त्यांच्या डोळ्यात तापवलेली सळई खुपसली तरीही हा राजा आपल्या निश्चयावर अचल होता. कुठल्याही शिक्षेला, अमिषाला हा राजा बधत नाही हे पाहून शेवटी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी कवी कलश आणि संभाजी महाराज या दोघांचीही हत्या करण्यात आली.
संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपला प्राणत्याग केला पण औरंगजेबाचा इस्लाम धर्म स्वीकारला नाही. ना ते त्याच्यासमोर झुकले. त्यांनी अत्यंत हाल अपेष्टा सहन केल्या पण धर्मरक्षण केलं.
पुढेही ते मराठ्यांचे, भारतीयांचे प्रेरणास्थान बनले. म्हणूनच आता या किल्ल्याला धर्मवीरगड असं म्हटलं जातं.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.