पाकिस्तानी लोकांना लागलंय ‘मुंबई पावभाजी’चं वेड…!! का नि कसं?? वाचा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मुंबई का डॉन कौन? याचं उत्तर खवय्यांना विचारलं, तर ते डोळे झाकून ते उत्तर देतील पावभाजी. मुंबईत प्रत्येक हॉटेलमधे, चौपाटीवर मिळणारी पावभाजी अनेकांची आवडती आहे.
परदेशी पर्यटकही मुंबईत आल्यावर पावभाजीची चव चाखतात. असा हा खवय्येगिरीतला डॉन चक्क पाकिस्तानात जाऊन पोहोचला आहे आणि नुसताच गेलेला नाही तर तमाम पाकिस्तानी खवय्यांना त्याने वेड लावलं आहे. संगीताला, सुरांना जशा सीमा नसतात तशाच त्या जीभेच्या चोचल्यांनाही नसतातच…
मुंबईची ओळख जशी इथल्या लोकल आहेत, पावसात होणारी तुंबई आहे, उंचच उंच इमारती आणि देशभरातल्यांसाठी रोजी रोटीचं शहर आहे, तशीच आणखी एक ओळख म्हणजे इथल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि गाड्यांवर विकली जाणारी पावभाजी.
हा पदार्थ मुंबईत जन्माला आला आणि देशभरात, जगभरात पसरला. माफक पैशात पोटभरीचा असा हा पदार्थ अनेकांसाठी पोट भरण्याचा पर्याय आणि चवीचं, खमंग टमंग खाणार्यांसाठी मजेचा आहे.
मऊ लुसलुशीत पावाला बटरमधे यथेच्छ घोळवून भाजायचं, सोबत डिशमधे खमंग अशी भाजी, तिच्यावर कधी जास्तीचं बटर तर कधी किसलेल्या चीजचा डोंगर आणि चवीला म्हणून लाल, हिरवी, पिवळी चटणी आणि कांदा.
===
हे ही वाचा – जगाला वेड लावलेल्या एका चटपटीत पदार्थाचा शोध “अशा” घटनेमुळे लागलाय हे वाचून हसूच येतं
===
स्वर्गीय सुखाची व्याख्या असणारी पावभाजी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बच्चे कंपनीची बड्डे पार्टी असो की मोठ्यांची पार्टी, पावभाजी हा सर्वसमावेशक मेन्यू आहे.
अशी ही जगात भारी पावभाजी आता थेट पाकिस्तानात जाऊन पोहोचली आहे आणि तिथल्या जनतेला तिनं खुळावून सोडलं आहे.
पावभाजीसोबतच मुंबईची ओळख असणारा आणखिन एक पदार्थ म्हणजे वडापव. पावभाजी जशी जसा पोटभरीची तसाच वडापवही पोटभरीचा म्हणूनच अनेकांचा लाडका. हे दोन्ही पदार्थ पाकिस्तानातल्या मुंबईत, म्हणजेच कराचीत सध्या धुमाकूळ घालत आहेत.
मुंबईच्या सुप्रसिध्द वडापाव आणि पावभाजीचा कराचीतला नवा पत्ता आहे, मुहम्मद अली जिना यांच्या जन्मस्थानाजवळच असणार्या जुन्या कराचीमधली खरदार ही एक चिंचोळी गल्ली.
या गल्लीत गेलात तर तुम्हाला (अर्थात सध्या असं काही जाता येणार नाही हा भाग निराळा) परिचित खमंग सुवासाने मुंबईतल्या खाऊ गल्लीत आल्यासारखं वाटेल.
या ठिकाणी ‘मुंबई पावभाजी’ या नावाचं एक छोटेखानी ठिकाण आहे. मुंबईच्या हाजी अली आणि गेट वे ऑफ इंडियाचे फोटो इथल्या भिंतींवर दिसतील. याचं कारण म्हणजे हे पदार्थ ज्या शहराची ओळख आहेत त्या शहराचा सन्मान म्हणून रिझवाननं छोटेखानी फूड जॉईंवर फोटोंच्या माध्यमातून मुंबई आणली आहे.
===
हे ही वाचा – सोन्याच्या रक्षणासाठी रात्रभर हादडणारी अशी ही धमाल गल्ली!
===
अगदी अल्पावधीतच या दोन्ही पदार्थांना खवय्यांचा इतका धमाकेदार प्रतिसाद लाभला, की आता रिझवानकडे ग्राहक जास्त आणि कामाचे हात कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. लोक दूर दूरवरून केवळ मुंबई पावभाजी आणि वडापाव खाण्यासाठी येतात.
कराचीत रहाणार्या मोहम्मद रिझवान शाह या तरूणानं कराचीत मागच्या लॉकडाऊन दरम्यान वडापाव आणि पावभाजी विकण्याचा निर्णय घेतला.
सगळं जग अचानक ठप्प झालेला तो काळ होता. अनेकांच्या नोकर्या गेल्या आणि बरेचजणांनी फूड इंड्स्ट्रीत हातपाय हलवायला सुरुवात केली. भारतातही अनेक तरूणांनी या काळात खाद्य पदार्थ करून विकून उत्तम कमाई केली. काहींना तर इतकं यश मिळालं की त्यांनी कायम स्वरूपी आणि मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय चालू केलाय.
खरंतर पाकिस्तानी लोक पट्टीचे मांसाहारी! त्यांना हा शाकाहारी पदार्थ आवडेल का? असा प्रश्न रिझवानला पडलाच नाही, याचं कारण म्हणजे जेव्हा त्याने पहिल्यांदा हे पदार्थ खाल्ले तेव्हा तोदेखील त्या चवीच्या प्रेमात पडला होता.
दुसरं म्हणजे पाकिस्तानमधे खाऊ गल्ल्यांत सिंधी स्टॉलवर हे शाकाहारी पदार्थ खाण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते. त्यामुळे हा नवा पदार्थ पाकिस्तानी खवय्यांना नक्कीच आवडेल याची त्याला खात्री होती.
काही वर्षांपूर्वी दुबईमधे पहिल्यांदाच त्याने हे पदार्थ खाल्ले होते. त्याच्या एका भारतीय मित्राचं हॉटेल दुबईत आहे तिथे त्याने पावभाजी खाल्ली आणि हा नवा वेगळा पदार्थ त्याला जाम आवडला.
त्याने मित्राला रेसिपी विचारली आणि मित्रानेही दिलदारपणे त्याला ती सांगितली. पाकिस्तानात परतल्यावरही त्याने विशेष कधी हा पदार्थ करण्याचा वगैरे प्रयत्न केला नव्हता.
मागच्या वर्षी लॉकडाऊनमधे मात्र आपल्या फ़ूड जॉईंटवर काहीतरी नवीन पदार्थ चालू करण्याचा जेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला, तेव्हा त्याने मुंबईची पावभाजी आणि वडापाव आपल्या मेन्युत आणले.
तसं पहायला गेलं तर पाकिस्तानी लोकांना पावभाजी तशी अगदीच नवखी नाही. काही फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेन्यूत पावभाजीचा समावेश होता, मात्र तिला फारसा प्रतिसाद लाभला नाही. याचं कारण असं, की पावभाजी हा एक स्ट्रीट फूडचा प्रकार असल्याने तिला फार अदबीने पेश केलं की तिची मजा जाते.
===
हे ही वाचा – कच्छपासून जगभर असा झाला दाबेलीचा प्रवास! चविष्ट पदार्थाचा तितकाच चविष्ट इतिहास
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.