जेव्हा स्त्री सैन्य शिवरायांच्या मावळ्यांना भिडतं, इतिहासातील एक अपरिचित लढाई
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं, किंवा खरंतर अवघ्या भारतवर्षाचं दैवत… एक अत्यंत थोर आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आजही शिवरायांना मान दिला जातो.
कुणी शिवरायांना जाणता राजा म्हणावं, तर कुणी मॅनेजमेंट गुरू, कुणी महाराज म्हणून त्यांना मानाचा मुजरा करावा, तर कुणी ते माणूस म्हणूनही कसे देवता आहेत याविषयी चर्चा करावी.
मराठा स्वराज्याचे संस्थापक आणि एक उत्तम प्रशासक असणाऱ्या शिवरायांकडे जसं एक आदर्श म्हणून पाहता येतं तसेच ते एक अतिशय आदर्श माणूसदेखील ठरतात. आई जिजाऊ यांचे संस्कार हेच याचं कारण असल्याचं नेहमीच म्हटलं जातं.
कल्याणमधील सुभेदाराच्या सुनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग सगळ्यांनाच माहीत असतो. ‘अशीच आमुची आई असती…’ असं म्हणत एका स्त्रीचा महाराजांनी केलेला सन्मान, तिला दिलेला योग्य तो मान, या गोष्टी आज ४०० वर्षं उलटून गेली तरीही चर्चेचा विषय ठरतात. एक उत्तम प्रशासक आणि उत्तम व्यक्ती कशी असावी, याचं सर्वोत्तम उदाहरण ठरतात.
अशीच काहीशी घटना आणि अशाच एका प्रसंगाचा उल्लेख इतिहासात आणखी एका ठिकाणी आढळतो. हा प्रसंग घडला, तो छत्रपती शिवाजी महाराज आणि बेलवडीची राणी मल्लम्मा या दोघांमध्ये…
===
हे ही वाचा – …म्हणून ‘मोहम्मद कुली खान’ याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मात घेतलं!
===
कोण होती राणी मल्लम्मा?
सतराव्या शतकात ब्रिटिशांनी त्यांचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली होती. ब्रिटिशांशी दोन हात करण्याची तयारी सुद्धा भारतातील अनेकांनी ठेवली होती. यांच्यापैकीच एक होत्या राणी मल्लम्मा. त्यांना सावित्रीबाई या नावाने सुद्धा ओळखलं जात असे.
सतराव्या शतकात संपूर्णपणे स्त्रियांची फौज त्यांनी उभी केली होती. ब्रिटिशांशी युद्धाचा प्रसंग आलाच, तर त्याला तोंड देण्यासाठी ही फौज सज्ज होती. उत्तम प्रशिक्षण देऊन या स्त्रियांना युद्धासाठी तयार करण्यात आलं होतं.
राणी मल्लम्मा म्हणजेच सावित्रीबाई, या उत्तर कर्नाटकातील राजा सोदे मधुलिंग नायक यांची कन्या होत्या. कर्नाटकातील बेळवडी आणि आसपासच्या १०-१५ गावांची जहागिरी असणारे येसाजी प्रभुदेसाई हे त्यांचे पती होते.
असं काय घडलं, की त्यांनी शिवरायांशी केले दोन हात…
दक्षिणेची मोहीम फत्ते करून महाराज आणि त्यांचे सैन्य स्वराज्याकडे परतत होते, तेव्हाच हा प्रसंग. येसाजी आणि सावित्रीबाई शिवरायांचा आदर करत असत. त्यामुळेच बेळवडीजवळ महाराज वास्तव्याला आहेत, हे कळल्यावर त्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं. एवढंच नाही तर त्यांच्या स्वागताची तयारी सुद्धा सुरु झाली.
याच दरम्यान असा प्रसंग घडला, की स्वागताची तयारी थांबवून थेट, महाराजांच्या सैन्यावर हल्ला करण्याचा निर्णय येसाजींनी घेतला.
महाराजांच्या सैन्याला दूध हवं होतं, मात्र बेळवडीतील व्यापाऱ्यांनी ते विकण्यास मनाई केली. या घटनेची प्रतिक्रिया म्हणून शिवरायांच्या मावळ्यांनी रात्री गावात घुसून अनेक गाईंचं दूध चोरलं.
या घटनेचा जाब विचारण्यासाठी येसाजींनी सिद्धगौंड पाटील यांना सखोजी गायकवाडांकडे धाडलं. पाटील आणि सखोजी हे दोघेही रागीट स्वभावाचे असल्याने, त्यांच्यात बाचाबाची झाली आणि संबंध अधिक बिघडले.
येसाजीच्या सैन्याने महाराजांच्या गोटातील बैल चोरले आणि परिस्थिती अधिकच गंभीर झाली. शिवरायांच्या मावळ्यांनी गाई सुद्धा चोरल्या असल्याची अफवा उठवण्यात आली. महाराजांच्या स्वागताची तयारी थांबवून युद्धाची तयारी सुरु झाली.
नाईलाजाने शिवरायांनी सुद्धा प्रतिकार सुरु केला आणि युद्धाला सुरुवात झाली. स्वराज्य हे हिंदूंचं आहे, आणि प्रत्येक हिंदूचा मान राखला गेला पाहिजे असं महाराजांना वाटत असे.
बालपणातील काही वर्षं कर्नाटकात घालवली असल्याने, महाराजांना कन्नड जनतेबद्दल अधिक आत्मीयता होती. युद्ध सुरु झालं तरीही मनुष्यहानी कमीत कमी व्हावी असं महाराजांना वाटतं होतं. तोफा, दारुगोळा यांचा वापर न करण्याचे आदेश महाराजांनी दिले होते.
===
हे ही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकचे? वाचा यामागचा खरा इतिहास!
===
सावित्रीबाईंचा प्रतिकार
दुर्दैवाने येसाजी या लढाईत मारले गेले. मात्र तरीही लढा थांबला नाही. त्यांच्या पत्नी राणी मल्लम्मा अर्थातच, सावित्रीबाई यांनी सैन्याची सूत्रं त्यांच्या हाती घेतली.
त्या मुळातच लढवय्या होत्या. त्यांनी हार मानली नाही. अखेर नाईलाजाने शिवरायांनी तोफगोळा वापरण्याची परवानगी दिली. गडाची तटबंदी पाडण्यात आली. गडावर महाराजांच्या मावळ्यांनी ताबा मिळवला होता. मात्र, सावित्रीबाई तिथून निसटला होत्या.
सखोजी यांच्यासह महाराजांचे सैन्य त्यांच्या मागावर गेले. स्त्रियांच्या सैन्याला हाताशी धरून मल्लम्मा देवी यांनी मोठा प्रतिकार केला.त्या प्राणपणाने लढल्या. मराठा सैन्याला स्त्रियांच्या सैन्याने खऱ्या अर्थाने झुंजवलं. अखेर त्यांच्या घोड्याचा पाय कापण्यात आला आणि त्या मावळ्यांच्या हाती लागल्या.
त्यांना बंदी बनवून महाराजांसमोर पेश केलं गेलं. एका नारीला बेड्या ठोकणं महाराजांच्या नियमात बसत नव्हतं. याशिवाय, सखोजी यांनी राणी मल्लम्मा यांच्यासह सैन्यातील इतर स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला होता. ही चूक छत्रपती शिवाजी महाराजांनी खपवून घेतली नाही. सखोजी यांना कथित शासन करण्यात आलं.
याशिवाय सावित्रीबाई यांना त्यांचं राज्य मोठ्या सन्मानाने परत करण्यात आलं. महाराज सत्याच्या बाजूने नेहमीच उभे राहत असत. प्रत्येक स्त्री ही मातेसमान, देवतेसमान आहे ही शिकवण त्यांनी नेहमीच जपली हे यावरून लक्षात येतं. त्यांनी नेहमीच स्त्रियांचा सन्मान केला.
छत्रपती शिवाजी महाराजांप्रती राणी मल्लम्मा देवी यांना असलेला आदर या घटनेमुळे अधिकच वाढला.
महाराजांचं शिल्प
त्यांनी शिवाजी महाराजांची काही शिल्पं कोरून घेतली आहेत. या शिल्पांमधून शिवाजी महाराजांनी स्त्रियांविषयी दाखवलेला आदर त्यांचा केलेला सन्मान या गोष्टी आपल्या लक्षात येतात.
याशिवाय महाराजांचं मंदिर सुद्धा सावित्रीबाई यांनी बांधून घेतलं होतं असं म्हटलं जातं. ‘सावित्री शिवाजी समारोत्सव’ अशा नावाचा एक ग्रंथ कानडी भाषेत त्यांनी लिहून घेतला आहे.
राणी मल्लम्मा देवी यांचा लढाऊबाणा, शिवरायांचे उत्तम संस्कार आणि विचार, महाराजांप्रती इतरांना असणारा आदर या सगळ्याच गोष्टी या प्रसंगातून पाहायला मिळतात.
===
हे ही वाचा – बिझनेसमन किंवा नोकरदार: छ. शिवाजी महाराजांचे हे १५ गुण अंगी नक्की बाळगा
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.