भारतात “इकोसिस्टिम” कुणीच उभारू शकत नाही का? राष्ट्रवादी, भाजप, RSS सुद्धा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक : प्रसाद देशपांडे
===
इनमराठीवर श्री प्रसाद राऊत ह्यांनी लिहिलेला शरद पवार आणि त्यांची ‘इकोसिस्टम’ हा लेख (लिंक) आणि मित्रवर्य ओंकार दाभाडकरने ‘इकोसिस्टम’ विषयाला अनुसरून गुणात्मकरित्या लिहिलेला लेख (लिंक) हे दोन्ही लेख वाचले. त्याला अनुसरून प्रतिसादात्मक लिखाण ह्या अंगाने लिहतोय. त्याला ‘प्रतिवाद’ मी म्हणणार नाही, हा पण वाचक त्याला ‘इकोसिस्टम’ ह्या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्याचं डिक्रिप्शन नक्कीच म्हणू शकतात.
मुळात आपण ‘इकोसिस्टम’ as in ‘इकोसिस्टम’ ज्या व्यवस्थेला म्हणतोय ती मुळात इकोसिस्टम आहे का ह्याचा सर्वांगाने आपण विचार केलाय का?? नेमकं ‘इकोसिस्टम’ म्हणजे काय हे आपण जाणतो का?? आणि त्याचबरोबर –
शरद पवार ह्यांची तब्बल सहा दशकांची राजकीय कारकीर्दीची जडणघडण ह्याची ‘इकोसिस्टम’ ह्या संज्ञेशी किती नाळ जुळली ह्या सगळ्यांचा उहापोह केला तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडेल.
तर राजकीय ‘इकोसिस्टम’ म्हणजे काय??
सोप्या शब्दात सांगायचं तर एका विशिष्ट विचारधारेशी प्रामाणिक होऊन ती विचारधारा राबविण्यास तत्पर असलेल्या संलग्न संस्था, टोळी, कार्यकर्ते, एनजीओ, माध्यमं, एक्टिव्हिस्ट अशा समाजातील प्रत्येक अंगाला स्पर्श करतील अशी सर्वव्यापी यंत्रणा म्हणजे राजकीय ‘इकोसिस्टम’!!
बरं ही ‘इकोसिस्टम’ ही राजकीयच असते का?? नाही?? ती सामाजिक, जैविक अगदी तांत्रिक देखील असते. जैविक इकोसिस्टम सगळ्यांना माहितीय, ज्यात पृथ्वीवरील सर्व जीव येतात. तांत्रिक म्हणजे कशी तर तुम्ही ऍप्पल आयफोन वापरत असाल तर ऍप्पलची स्वतःची व्यवस्थाच अशी आहे की त्याची इतर उत्पादनं एकमेकांशी इतके एकरूप असतात की तुम्हाला ती उत्पादनं वापरतांना थेट ‘स्वर्गीय अनुभूती’ मिळते. तीच उत्पादनं गुगल अँड्रॉइडवर चालत नाहीत का?? चालतात. पण तो ‘स्वर्गीय अनुभव’ मिळत नाही. आणि एकदा का तो ‘स्वर्गीय अनुभव’ मिळाला की त्या ‘इकोसिस्टम’ मधून सहसा कुणी बाहेर पडत नाही.
राजकीय इकोसिस्टम देखील अशीच असते.
त्याचे नियम, चाकोरीबद्धता, बंधनं हे सगळं पाळुन सुद्धा त्या इकोसिस्टममधील लोकं कितीही त्रास झाला तरी बाहेर पडत नाही, पडू शकत नाही. राजकीय इकोसिस्टमला मी ‘ब्लॅक होल’ म्हणजे ‘कृष्णविवर’ म्हणतो. म्हणजे एकदा का ह्या ‘इकोसिस्टमचा’ ‘इव्हेन्ट होरायझन’ (जिथून परत येण्याचे मार्ग बंद होतात) क्रॉस केला की त्या इकोसिस्टम मधुन वापस येणे अशक्य असते.
अशी राजकीय ‘इकोसिस्टम’ उभी करायला दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी लागतात
१: भक्कम वैचारिक पाया
२: भक्कम आर्थिक पाया
ह्या दोन गोष्टींची सांगड घातल्याशिवाय कुठलीही ‘इकोसिस्टम’ तयार होऊ शकत नाही. कारण कुठलाही विचार समाज किंवा राजकीय पटलावर राबवायचा असेल तर मुळात त्या विचाराला बौद्धिक किंवा संस्कारिक अधिष्ठान लागतं, म्हणजे विचारसरणीला भक्कम पाया लागतो. आणि मग त्या भक्कम विचारसरणीला प्रत्यक्षात जमिनीवर राबवायला तितकाच भक्कम आर्थिक पाया लागतो.
मग तुम्हाला प्रश्न पडेल की आज भारतात ज्या डाव्या आणि उजव्या ह्या दोन भक्कम विचारसरणी आहेत त्यांना ‘इकोसिस्टम’ म्हणता येईल का?? उत्तर नाही हेच मिळेल.
विचारसरणी भक्कम असली तरी तिला वेगाने समाजाभिमुख करायला किंवा विचारसरणीयुक्त समाज, राष्ट्र, व्यवस्था ह्या उभ्या झाल्या तरच त्याला ‘इकोसिस्टम’ म्हणतात. डावी असो वा उजवी ह्या दोन्ही विचारसरणींना हे आतापर्यंत शक्य झालेले नाही. जगात आतापर्यंत अनेक विचारसरणी येऊन गेल्या, कालौघात नष्ट झाल्या.
पण आधुनिक जगात ‘इकोसिस्टम’ म्हणता येईल अशी व्यवस्था ज्या एका व्यक्तीने उभी केली आणि राबवली कदाचित त्याच्याखेरीज दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीने इतक्या प्रभावीरीत्या ‘इकोसिस्टम’ कुणीच राबवली नसेल!!
होय मी ‘जॉर्ज सोरोस’ बद्दल बोलतोय!!
–
हे ही वाचा – जेव्हा शिवसेना “फारच” वादग्रस्त आहे म्हणून भाजपने साधली होती पवारांशी जवळीक…!
–
जॉर्जबद्दल लिहायला बसलो तर कदाचित एक लेखमाला होईल इतकं त्याच्यावर लिहिण्यासारखे आहे. पण आजच्या लेखाचा विषय सोरोस नाहीय, तो आहे ‘इकोसिस्टम’ त्यामुळे त्या अनुषंगाने थोडी उदा देतो.
जॉर्जबद्दल विस्तृत वाचायला आवडणार असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढील लेख त्यावरच लिहेन.
तर वरकरणी जॉर्ज जरी एक दानशूर गर्भश्रीमंत ज्युईश अमेरिकन बिलेनियर व्यावसायिक असला तरीही जगात राजकीयदृष्ट्या कुठेही उलथापालथ झाली तरी बहुतांश उलथापालथीत जॉर्जचा अप्रत्यक्षरीत्या उल्लेख येतच असतो. त्याची स्वतःची एक विचारसरणी आहे जी बहुतांशी ‘डाव्या’ विचारसरणीकडे झुकते. मुक्त सामाजिक जीवन हा त्याच्या विचारसरणीचा गाभा आहे. त्याची ही विचारसरणी सूक्ष्मरीत्या अभ्यासली तर अद्वैत हिंदुत्व सांगणाऱ्या योगी अरविंदांच्या विचारसरणीशी समांतर सोरोस जातो की काय इतपत कुणाला शंका येईल इतक्या भक्कम स्तराचा वैचारिक विचार हा सोरोसचा आहे. फक्त तो अंमलात आणण्याचा सोरोस आणि योगी अरविंद ह्यांचा मार्ग ‘कमालीचा विरुद्धार्थी’ आहे.
सोरोस त्याची विचारसरणी ही जगावर लादू बघतो. त्यासाठी देश, काल, परंपरा ह्या सगळ्या व्यवस्थेला तो बंधन मानतो. मग त्याची मुक्त विचारसरणी प्रस्थापित करायला सध्याच्या प्रस्थापित सगळ्या व्यवस्थांवर तो साम दाम दंड भेद ह्या हरप्रकारे तो आघात करतो. रशिया, ब्रिटन सारख्या बलाढ्य देशांची करन्सी तो इतक्या जबरदस्तरीत्या खाली आणतो की ते देश सरळ गुडघ्यावर यावेत. त्याच्याकडील अमाप पैसा ह्याचा तो जबरदस्त उपयोग करून शासन/न्याय, समाजव्यवस्था ह्या सगळ्या प्रकाराला समांतर एक व्यवस्था उभी करतो. त्यासाठी त्याच्याच ताटाखालचे मांजर असलेली माध्यमं, एनजीओ, राजकीय पक्ष, उद्योजक, आंदोलनकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, युवकांच्या संघटना, स्वयंसेवी संघटना, शेतकरी संघटना, मजदूर संघटना एकूणच समाजावर ज्या ज्या संघटना प्रभाव पाडतात त्या सगळ्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन सतत काम करतात.
कालांतराने इतक्या मोठ्या प्रयत्नामुळे प्रस्थापित व्यवस्था कोलमडून पडते आणि जी नवीन व्यवस्था उभी राहते ती संपूर्णपणे सोरोसच्या विचारसरणीला अनुसरून काम करते त्याला ‘इकोसिस्टम’ म्हणतात!!
आता ह्या परिपेक्षतेवर शरद पवार ह्यांच्या राजकारणाचा विचार करण्याआधी पवारसाहेबांनी राजकीय विचारधारा आणि त्यांच्यावर झालेले राजकीय संस्कार बघुयात.
शरद पवार ह्यांच्यावर सोशॅलिस्ट विचारांचा प्रभाव आहे पण त्यांच्यावर राजकीय संस्कार मात्र काँग्रेसचे झाले आहेत. काँग्रेसचे राजकीय संस्कार म्हणजे काय?? तर काँग्रेसच्या व्यवस्थेचे संस्कार!! काँग्रेसमध्ये आजही केंद्रीय नेतृत्व किंवा घराणं आणि त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला पूर्ण करणारे त्यांचे भाट, सरदार आणि त्या सरदारांच्या इशाऱ्यावर काम करणारी व्यवस्था हीच राजकीय उतरण आहे. म्हणजे काय?? तर काँग्रेसमध्ये स्थानिक नेतृत्व हे कायम स्थानिक असतं, त्याचं काम स्थानिक निवडणुका जिंकणे आणि पक्षनिधी म्हणून विशिष्ट निधी पक्षाच्या केंद्रीय ठेवीत देणे. ह्यामुळे त्याला केंद्रीय नेतृत्वाकडून अभय मिळते आणि केंदीय नेतृत्वाला राजमान्यता!! हेच संस्कार पवार ह्यांच्यावर झाले, त्यामुळे भलेही त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी काँग्रेसची साथ दोन वेळा सोडूनही परत त्यांच्याशी घरोबा केला, नुसता घरोबाच केला नाही तर काँग्रेसमधील सरदार-भाट ही व्यवस्था देखील उत्तमरीत्या राबवली.
पण इतके होऊनही पवारांना सोरोस ह्यांनी उभी केली तशी राज्यापुरती का असेना ‘इकोसिस्टम’ उभी करता आली का?? त्याचं उत्तर नाही असेच मिळेल. त्याला ‘इकोसिस्टम’ उभी करण्यास कारणीभूत असणारे आणि वर लेखात उद्धृत केले दोन मुद्दे ह्याचा पवारांच्या ठायी असलेला अभाव!! त्यामुळे पवारांनी जी व्यवस्था उभी केली तीच व्यवस्था कोणे एकेकाळी नेहरू, इंदिरा गांधींनी अत्यंत सफलरीत्या भारतात राबवली होती.
पवारांनी देखील महाराष्ट्रातल्या ३-४ जिल्ह्यात ही व्यवस्था अतिशय यशस्वीरीत्या राबविली.
त्यांचा लोकसंग्रह, त्यांची विकासाची दृष्टी, हे सगळं वादातीतच आहे पण तरीही ३-४ जिल्हे सोडलेत तर पवारसाहेब त्यांच्या गृहराज्यातही ही व्यवस्था पूर्णपणे राबवू शकलेले नाहीत. ह्याला कारण त्यांचं बेभरवश्याच राजकारण असेल किंवा अजुन काही. त्यात मी शिरणार नाही. पण त्यांच्याच समक्ष भाजपमधील एका तरुण नेत्याने त्यांनाही न जमलेले काम करून दाखविले, ५ वर्ष मुख्यमंत्री म्हणून सत्ता राबवून दाखविली. त्यांच्याच नाकावर टिच्चून त्यांचे सहकारी फोडले, नोकरशाहीत त्याचे असे विश्वासू उभे केले, सत्ता नसतांनाही सरकारविरोधी माहितीचा स्रोत जागता ठेवला.
दिल्लीत इतर आणि पवारसाहेबांच्याच पक्षातील त्यांच्याच भरवशाच्या माणसांनी त्यांना साथ न दिल्याने पवारसाहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत. ह्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?? पवारसाहेबांनी जर खरंच वर उल्लेख केला तशी ‘इकोसिस्टम’ उभी केली असती तर पवारसाहेबांवर ही वेळ आली असती?? भाट-सरदार व्यवस्थेच्या जोरावर जितकी मजल मारता येते त्याच्यापेक्षा थोडी अधिक मजल पवारसाहेबांनी मारली कारण ते चाणाक्ष राजकारणी आहेत. पण तरीही त्यांनी ‘इकोसिस्टम’ म्हणता येईल अशी व्यवस्था खरंच उभी केली??
किंबहुना ‘इकोसिस्टम’ भारतात कुठल्याही राजकीय नेता किंवा विचारसरणीला उभे करणे हे प्रचंड कठीण म्हणजे जवळजवळ अशक्यप्राय काम आहे. विचार करा मोदींना दोन दोन टर्म पूर्ण बहुमत मिळून अगदी वैचारिक अधिष्ठान आणि पुरेसे आर्थिक पाठबळ असूनही ‘इकोसिस्टम’ उभी करता आलेली नाही.
उजव्या विचारसरणीचा विचार केला तर संघाची म्हणून ‘इकोसिस्टम’ उभी करायला आजही संघाला पूर्ण यश आलंय असं म्हणता येणार नाही. संघाची व्यवस्था बहुतांशी सामाजिक स्तरावर आहे त्यामुळे त्याचा वेगही बराच संथ आहे. त्यामुळे सर्वंकष ‘इकोसिस्टम’ साठी संघ जेंव्हा पूर्णशक्तीने प्रयत्न करेल तेव्हाच त्याचं एफर्ट एस्टिमेशन काढता येईल.
डाव्यांनी नेहरूंच्या काळातील भाट-सरदार प्रणालीवर एक ‘परजीवी’ व्यवस्था उभी केली होती. पण मुळात ती परजीवी असल्याने २-३ दशकाने ती मोडकळीस निघाली. जॉर्ज सोरोस देखील भारतात त्याची ‘इकोसिस्टम’ उभी करायला त्याच्या ‘ओपन सोर्स फाऊंडेशन’ सारख्या एनजीओ कडून आणि १ बिलियन डॉलर्सचे फंड ओतुन प्रयत्न करतोय. पण तोही पूर्णपणे यशस्वी झालाय असे म्हणता येणार नाही.
ह्या सगळ्याला कारणीभूत भारत देशाचा खंडप्राय इतिहास आणि भारताची हिंदुबहुल व्यवस्था आहे.
त्यावर पुन्हा कधीतरी सविस्तर लिहेन. तूर्तास ‘इकोसिस्टम’ आणि ‘भाट-सरदार’ व्यवस्था ह्या विषयांची तोंडओळख आणि त्यातला फरक स्पष्ट झाला असेल. आता पवारांनी इकोसिस्टम खरंच उभी केली की नाही हे वाचकांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने तपासावे.
===
हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.