' हरणाऱ्याला जिंकून देणारा, कृष्णाच्या परीक्षेत अकल्पित गोष्टी घडवणारा अज्ञात योद्धा! – InMarathi

हरणाऱ्याला जिंकून देणारा, कृष्णाच्या परीक्षेत अकल्पित गोष्टी घडवणारा अज्ञात योद्धा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रामायण, महाभारत ही अजरामर महाकाव्ये! आजही गीतेचा उपदेश, श्रीकृष्णाचं चरित्र, कौरवांची कारस्थानं, पांडवांनी दिलेलं प्रत्युत्तर, द्रौपदीचं वस्त्रहरण..ते हाणून पाडणारा कृष्ण, भीष्मांची प्रतिज्ञा..अठरा दिवस चाललेलं महायुद्ध, अशा कितीतरी गोष्टींचा समावेश असलेलं महाभारत अभ्यासाचा विषय आहे.

आजही त्यातील अश्वत्थामा जिवंत आहे असं म्हणतात.‌ नर्मदा परिक्रमेत कुणाकुणाला दिसतो म्हणे तो..त्याच्या शापाची जखम कपाळावर वागवत अमरत्वाचा शाप घेऊन चिरंजीव झाला आहे..कुठं घटोत्कचाचा सांगाडा सापडला म्हणून समजतं.

 

ashwathama-InMarathi

 

एकंदरीत काय तर महाभारत अतिशय चित्रविचित्र गोष्टींनी भरलेली कौरव कुळाची कहाणी आहे. यात त्याग आहे, प्रेम आहे, सूड आहे, भांडण आहे. भाऊबंदकी आहे, धर्म आहे आणि अधर्मही आहे.

या कहाणीत हजारो उपकथानके आहेत. कर्णाची दुर्योधनाशी असलेली अभंग मैत्री, त्याचं दानशूर असणं, अर्जुनाचं शौर्य, भीमाचा पराक्रम हे सगळं सगळं जगासमोर आलं आहे. पण कधी कधी या सर्वांची गाथा सांगत असताना काही लोक पराक्रमी असूनही कधीच लोकांना माहिती झाले नाहीत.

इंग्लिश मध्ये एक म्हण आहे soldiers wins the battle and mejor gets the meddle म्हणजे युद्ध सैनिक जिंकतात पण कौतुक सेनापतीचं होतं.

या महाभारतात पण काही पराक्रमी वीर लढले पण लोकांना माहिती नाही आहेत.

युधिष्ठिर सत्यवादी होता, अर्जुन धनुर्धर होता. तो दोन्ही हातांनी धनुष्य चालवू शकायचा म्हणून त्याला सव्यसाची म्हणत. भीम उत्तम द्वंद्व युद्ध खेळायचा. ही तिन्ही कुंतीची मुले. नकुल सहदेव ही माद्रीची मुले. पण या तिघांच्या पराक्रमामागे नकुल सहदेव थोडे झाकोळले गेले आहेत. त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती लोकांना आहे.

नकुल अश्वपरीक्षा उत्तम करायचा तर सहदेवाला आयुर्वेदाचे उत्तम ज्ञान होते.

 

pandav inmarathi

 

या सर्वांची मुलं, नातवंडं पण कुरुक्षेत्रावर झालेल्या धर्मयुद्धात सहभागी झाली होती. त्यापैकी अभिमन्यू चक्रव्यूहात मारला गेला हे सर्वांना माहीत आहे. पण अजून एक वीर योद्धा पांडवांकडे होता, त्याच्याबद्दल लोक आजही अनभिज्ञ आहेत. कोण होता तो पराक्रमी वीर योद्धा?

त्याचं नांव होतं बार्बरीक! बार्बारीक हा भीमाचा मुलगा. भीम जेव्हा नागलोकात गेला होता तेव्हा त्याने नागकन्या अहिलावतीशी विवाह केला होता. त्या अहिलावती व भीम यांचा मुलगा बार्बारीक! तोही जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता.

 

barbarik inmarathi

हे ही वाचा – महाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार असलेला राक्षस माहीत नसेल तर नक्की वाचा

आणखी एका आख्यायिकेनुसार घटोत्कचपुत्र बर्बरीकाने श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार महीसागरसंगमावरील गुप्तक्षेत्री देवी चंडिकेला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केला. याच काळात तेथे तंत्रमार्गाने साधना करणाऱ्या विजय नामक मुनींना, बर्बरीकाने गुरू मानून त्यालाही सहाय्य केले.

साधनेमध्ये विघ्न आणणाऱ्या महाजिह्वा राक्षसी; तसेच रेपलेंद्र, पलाशी इ. राक्षसांचा बिमोड केला. बर्बरीकाची तप आणि निष्ठा यांमुळे विजयमुनींसह देवी चंडिका त्याच्यावर प्रसन्न झाले.

देवीने त्याला वरदान म्हणून तीन अमोघ बाण दिले. या बाणांचे वैशिष्ट्य असे होते, की यातील पहिला बाण सोडून ज्यांचा वेध घ्यायचा आहे असे कितीही संख्येने असलेले लक्ष्य साधता येईल. दुसऱ्या बाणाद्वारे ते बांधले जात आणि तिसऱ्या बाणाद्वारे ते पूर्णपणे नष्ट होत असत. शिवाय या बाणांचा पुनःप्रयोगही करता येत.

 

barbarik 1 inmarathi

 

विजयमुनींनी बर्बरीकाला आपल्या हवनकुंडातील दिव्य असे लाल भस्म प्रदान केले. हे भस्म ज्यांवर पडेल, त्याच्या शरीरातील प्राणांतिक मर्मस्थानाला ते उघड करीत असे.

कौरव पांडवांच्या दरम्यान जे महायुद्ध झाले त्यात दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजूने सैन्य, अतिरथी, महारथी यांची जमवाजमव केली. कौरवांनी कृष्णाचं अठरा अक्षौहिणी सैन्य घेतलं तर एकटा कृष्ण पांडवांना मिळाला. कृष्णाने आधीच सांगितलं होतं, मी हातात शस्त्र घेणार नाही पण तुला युक्तीच्या चार गोष्टी सांगेन. ही गोष्ट पांडवांच्या फायद्याचीच ठरली.

कृष्णाने कितीतरी ठिकाणी हातात शस्त्र न घेता कौरवांचे महायोद्धे गारद केले होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण यांना साम दाम दंड भेद या सगळ्या नीतीचा वापर‌ करुन आपल्या वाटेतून बाजूला केले.

 

mahabharat-krishna-inmarathi

हे ही वाचा – कौरव असूनही महाभारतात पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या ‘अज्ञात कौरवा’ची गोष्ट!

बार्बरीक हा पण त्यांच्या तोडीचाच योद्धा होता. त्यांची धनुर्विद्या अर्जुनाच्या इतकीच उत्तम होती. त्याला जेव्हा युद्धाची माहिती सांगितली तेव्हा युद्धभूमीवर मधोमध असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली उभा राहून बार्बरीकाने घोषणा केली की, जो हारणारा पक्ष असेल मी त्याच्या बाजूने लढणार.

बार्बरीकाचे केवळ तीन बाण कौरव आणि पांडवाची संपूर्ण सेना गारद करु शकतील इतके शक्तिशाली होते. त्यांच्या वीरतेची परीक्षा घेण्यासाठी कृष्णाने त्याला सांगितले, केवळ तीन बाण मारुन या पिंपळाची सगळी पानं तोडून दाखव. बार्बरीकाने बाण सोडला, तो बाण पिंपळाचे एकूण एक पान चिरत चालला. त्याचवेळी एक पान कृष्णाच्या पायापाशी पडलं. कृष्णाने ते पान हळूच पायाखाली घेतलं.

बार्बारीकाच्या बाणानं साऱ्या पानांचा वेध घेतला आणि शेवटचं पान कृष्णाच्या पायाखाली होतं तिथं येऊन बाण थांबला. बार्बारीकानं सांगितले, “प्रभू, तुमचा पाय बाजूला घ्या. मी माझ्या बाणाला पिंपळाची पानं कापायची आज्ञा दिली आहे. तुमचा पाय नाही”

कृष्ण थक्क झाला. त्याला लक्षात आलं, बार्बरीक आपल्या वचनानूसार हारणाऱ्या पक्षाच्या बाजूने लढेल. जर कौरव हारायला लागले तर कौरवांच्या बाजूने आणि जर पांडवांचं पारडं पराभवाकडं झुकलं तर पांडवांच्या बाजूने आणि ते भलतंच अवघड होईल. केवळ तीन बाणात तो दोन्ही सेना नष्ट करु शकेल इतका उत्तम धनुर्धर आहे.

 

barbarik 2 inmarathi

 

कृष्णाचं वचनच होतं यतो धर्मः स्ततो जयः.. आणि कौरव हे अधर्मानं वागणारेच होते. त्यांनी पांडवांचं हडप केलेलं राज्य, द्यूतात केलेलं कपट आणि त्याद्वारे पांडवांना घडवलेल्या वनवास व अज्ञातवास हे त्यांच्या कपटी आणि अधर्मी वृत्तीचेच द्योतक होते. या युध्दात पांडवांचा पर्यायाने धर्माचा जय होणं अत्यावश्यक होतं.

पण जर बार्बरीक कौरवांच्या बाजूने लढला तर ते अशक्य आहे हे लक्षात येताच कृष्णाने आपली नीती वापरली.

दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णाने ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि तो बार्बरीकाच्या शिबीरात गेला.

बार्बरीकाने विचारलं, “हे ब्राह्मणा, काय हवं आहे तुला?’ ब्राम्हणाचं रुप धारण केलेला कृष्ण म्हणाला, “हवं आहे ते तू देऊ शकणार नाहीस.” मग त्याच्या जाळ्यात बार्बरीक बरोबर अडकला. कृष्णाने त्याच्याकडं त्याचं मस्तक मागितलं. आपल्या वडीलांच्या बाजूने यशश्री मिळावी म्हणून बार्बरीकाने आपलं मस्तक कृष्णाला देऊन टाकलं. बार्बरीकानं‌ केलेलं हे बलिदान कृष्णाला पण हेलावून गेलं. कारण कितीही झालं तरी भीम कृष्णाचा आतेभाऊ होता आणि बार्बारीक त्याचाच मुलगा.

 

barbarik head inmarathi

 

त्याच्या बलिदानानंतर कृष्णाने‌ त्याला वरदान दिले की यानंतर कलियुगात त्याच्या बरोबरीने बार्बरीकाची पण पूजा केली जाईल. ज्या ठिकाणी कृष्णानं बार्बरीकाचं मस्तक ठेवलं त्या जागेचं नांव खाटू असे असून राजस्थानमध्ये हे मुख्य मंदिर आहे आणि बार्बरीकाची पूजा करताना खाटू शाम असं म्हणूनच ओळखलं जातं.

 

barbarik temple inmarathi

 

राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध प्रांतांत तो पूजला जातो. नेपाळमध्ये किरातराजा यालांबर अथवा आकाशभैरव म्हणून त्याची आराधना केली जाते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?