' फुले-आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिलेले, कर्तृत्ववान महाराज सयाजीराव गायकवाड – InMarathi

फुले-आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिलेले, कर्तृत्ववान महाराज सयाजीराव गायकवाड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हलाखीची परिस्थिती असणार्‍या एका गुराख्याचा मुलगा पुढे जाऊन राजा काय होतो आणि गोरगरिबांसाठी उज्ज्वल कार्य काय करतो, सगळंच एखाद्या चित्रपटात शोभावं असं! इतकंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरी देऊन त्यांना आर्थिक स्थैर्य देतो तर ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी बहाल करतो.

गरीब गुराख्याचा पोर असणारा गोपाळ केशव गायकवाड मोठेपणी बदोदा संस्थानाचा महाराज सयाजीराव गायकवाड बनेल हे कुणाला सांगूनही खरे वाटले नसते. प्रजाहितदक्ष आणि दूरदृष्टी असणारा असा हा जनतेचा लाडका राजा!

 

sayajirao inmarathi

 

त्यांचा जन्म १० मार्च १८६३ साली नाशिक जिल्ह्यातल्या कवणाणे येथे झाला. बडोद्याचे महाराज खंडेराव यांच्या मृत्यूनंतर गोपाळचं दत्तक विधान झालं आणि ते बडोदा संस्थानाचा महाराज सयाजीराव बनले.

गोपाळच्या घराण्याचे महाराजांच्या घराण्याशी संबंध होते म्हणूनच खंडेराव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी जमनाबाई यांनी गोपाळला दत्तक घेतले. २७ मे १८७५ या दिवशी रितसर राज्याभिषेक होऊन गोपाळचा महाराज सयाजीराव बनला.

 

palace inmarathi

 

श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांना राजगादी योगायोगानं किंवा नशिबानं मिळाली असली तरिही त्यासाठी ते किती योग्य होते हे नंतर त्यांनी त्यांच्या जनहिताच्या कामांनी सिध्द केले.

इतकंच नव्हे तर पंडीत मदन मोहन मालविया यांनी मोठ्या अभिमानानं सयाजीराव महाराजांना,” हिंदुस्थानातील एकमेव आदर्श राजा” हा किताब बहाल केला.

महाराजांनी थोडीथोडकी नव्हे तर साठ वर्षं राज्य केलं आणि बडोदा संस्थानाला भरभराटीचे दिवस दाखवले. इतकी दीर्घ राजसत्ता गाजवणारा हा एकमेव राजा आहे.

आपल्या प्रदीर्घ काळात त्यांनी जी समाजपयोगी कामं केली ती नुसती वाचली तरी दमायला होईल. आपल्या छोट्याशा संस्थानात त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. खर्‍या अर्थानं हा आधुनिक विचारांचा राजा होता. त्यांची ख्याती केवळ भारतातच नव्हती तर भारताबाहेरही पसरली होती.

डॉ. बाबासाहेब घडण्यामागे महाराज सयाजीराव यांचा मोलाचा हातभार आहे. बाबासाहेबांच्यातील हुशारी हेरून महाराजांनी त्यांच्या शिक्षणासाठी दरमहा पन्नास रूपयांची शिष्यवृत्ती देऊ केली. इतकंच नव्हे तर, त्यांना पीएचडी साठी अमेरिकेत संस्थानाच्या खर्चानं पाठवलं. बाबासाहेबांचा तिथला सर्व खर्च महाराज करत होते. परदेशातून पदवी घेऊन आल्यावर आता कर्तव्य संपलं अशी भूमिका न घेता बाबासाहेबांची बडोदा सचिवालयात उच्चपदी निवडही केली.

 

sayajirao babasaheb inmarathi

 

शिकागोची सर्वधर्म परिषद ही इतिहासात नोंदवली गेलेली महत्वाची घटना आहे. स्वामी विवेकानंदांमुळे इतिहासात नोंदवल्या गेलेल्या या परिषदेचे मुख्य अतिथी होते महाराज सयाजीराव! महाराज अतिशय सफाईने इंग्रजी बोलत असत. त्यामुळेच जगभरात त्यांचं मित्रमंडळ पसरलं होतं.

इतकंच नव्हे तर राणी व्हिक्टोरियाचे ते अत्यंत लाडके राजे होते. महाराणींना सयाजीराव महाराजांविषयी विशेष आपुलकी होती. व्हिक्टोरियानं महाराजांना, “ फरजंद-ए- खास” आणि “दौलत-ए- इंग्लिशीया” हे दोन किताब दिले होते.

भारतातील सर्व उद्योगपतींशी महाराजांचा स्नेह होता. आधुनिक समाजाच्या उन्नतीमधे या उद्योगपतींचा सहभाग महत्वाचा आहे हे महाराज जाणून होते. एकिकडे राणी व्हिक्टोरियाशी स्नेहसंबंध, दुसरीकडे उद्योगपतींपासून लोकमान्यांसारख्या स्वातंत्र्य सेनानींशी स्नेह आणि गोरगरीब जनतेशी आपुलकीचे संबंध जपणारे महाराज सयाजीराव खर्‍या अर्थानं जनतेचे राजे होते. त्यांच्याशी संवाद आणि संपर्क साधणं अत्यंत सहज होतं. राजेपणाच्या भिंती त्यांनी आपल्या आजूबाजूला कधीच उभ्या केल्या नाहीत.

 

sayajirao 1 inmarathi

हे ही वाचा – ब्रिटिशांचा लाडका असूनही प्रिय गंगामैयासाठी त्यांच्याशी भिडणारा राजा: सवाई माधोसिंग!

ते बडोद्याचे महाराज असले तरिही महाराष्ट्रातही त्यांनी भरीव काम केलेलं आहे. ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक समाज चळवळीला त्यांचा पाठींबा होता. या चळवळीसाठी महाराजांनी वेळोवेळी आर्थिक मदतही केली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याविषयिही त्यांना आदर होता आणि गरज पडली की ते मदतीचा हात पुढे करत असत. मुंबईतील एका सभेत त्यांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केली आणि तिथून पुढे ज्योतिबांचा उल्लेख आदरानं आणि प्रेमानं महात्मा ज्योतिबा फ़ुले असा होऊ लागला.

जनतेच्या हिताची कामं करताना त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेत त्यात सुधारणा करत, नवनविन तंत्रज्ञान आणत बडोदा संस्थानाला आधुनिकतेचा साज चढवला.

भारतातलं पहिलं धरण सयाजीराव महाराजांनी बांधलं हे खूप कमीजणांना आज माहित आहे. १८९० साली बडोद्यापासून बारा मैलांवर असणार्‍या सुर्या नदी आणि वागली नाला हे दोन जलप्रवाह अडवून भारतातलं पहिलं धरण बांधलं. त्याकाळात हे चमत्कार, आश्चर्याहून कमी नव्हतं.

 

dam inmarathi

 

जनता अडाणी राहिली तर राजाला त्याचं राज्य चालवणं सोपं असतं. जितकी जनता अडाणी तितका राजा प्रभावी मात्र जनता शिकली तर ती समंजस होते आणि राज्याच्या प्रगतीसाठी ते महत्वाचं असतं हे केवळ सयाजीराव महाराजांनी ओळखलं. त्यांनी शिक्षणाचं महत्व ओळखून, त्याची गरज लक्षात घेऊन समाजातल्या अगदी खालच्या स्तरापर्यंत शिक्षण नेऊन पोहचविलं गावांगावात शाळा स्थापन करून प्रत्येकाला शिक्षण सक्तीचंच केलं.

गरीबांना शिक्षण घेणं परवडायचं नाही तेंव्हा त्यांना पैशांच्या मदतीच्या कुबड्या न देता कमवा आणि शिका योजना आणल्या जेणेकरून गरिबीला पैशात मोजलं जाऊ नये. या योजनेतून अनेक तरूण पुढे जाऊ उच्चशिक्षीत बनले.

घरातल्या स्त्रिया चूल आणि मूल इतकंच आयुष्य जगताना बघून महाराजांच्या जीवाला क्लेश होत. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उध्दारी हे महाराजांनी पुरतं जाणलं होतं. घरातली स्त्री शिकली की अख्खं कुटुंब आणि पुढची पिढीही शिक्षीत होते हे महाराजांनी पुरतं ओळखलं होतं आणि म्हणूनच स्त्री शिक्षणाला केवळ पाठींबा देऊन ते थांबले नाहीत तर त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले.

संपूर्ण बडोद्यात त्यांनी ३५०० गावांत शाळा सुरु केल्या. त्यांच्या स्त्रीशिक्षण मोहिमेला प्रचंड प्रतिसाद लाभला आणि तो एवढा मोठा होता की विद्येचं माहेरघर समजलं जाणार्‍या पुण्यातही इतक्या मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेत नव्हत्या.

 

old school inmarathi

 

यासह त्यांची आणखी एक मोठी देणगी म्हणजे बॅंक ऑफ बडोदा. कोणताही राजा त्यावेळी बॅंक वगैरे सुरु करण्यास उत्सुक नसायचा, मात्र संस्थानाच्याच नव्हे तर देशाच्या आर्थिक बळकटीकरणासाठी अधिकृत बॅंकेची गरज ओळखून सयाजीरावांनी काही उद्योगपतींना एकत्र केले, त्यांना याचे महत्व समजावले.

२० जुलै १९०८ रोजी बॅंक ऑफ बडोदाचा पाया रचला गेला तो केवळ महाराजांच्या नियोजनामुळेच!

 

bank of baroda

हे ही वाचा – भारतावर २०० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्भुत कथा

आपल्या छोट्याशा संस्थानात महाराजांनी अनेक सुधारणा घडवल्या. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतींचे पुनरूज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजूंना शिष्यवृत्त्या, औद्योगिक प्रशिक्षण, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण यांचा अग्रक्रमाने उल्लेख करता येईल.

संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय, ग्रंथालयांची उभारणी, स्त्री वारसाहक्क कायदे, बालविवाह बंदी, विधवा विवाह, पडदा पध्दत बंद करणे अशा अनेक सुधारणा त्यांनी समाजात घडविल्या.

महिलाही वारसदार असतात ही बाब आता पुढे येत असली तरी शेकडो वर्षांपुर्वी महाराजांनी ही बाब हेरली होती, इतकंच नव्हे तर त्याचा पाठपुरावा करून कायद्यासाठी प्रयत्न केले होते.

हा राजा खर्‍या अर्थानं नव्या भारताचा पुरोगामी राजा होता, जनतेचे हित जाणणारा, जपणारा उत्तम प्रशासक होता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?