दृष्टिहीन असूनही ‘अखियों के झरोखों से’ सौंदर्य अनुभवायला लावणारा शब्दांचा जादूगार…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मनोरंजन क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ही व्यवहार चतुर असावी आणि ‘भाबडी’ असू नये ही एक सर्वसाधारण धारणा आहे. रविंद्र जैन, रामानंद सागर सारख्या व्यक्तींनी या क्षेत्रात यश मिळवून ‘साधी माणसं’ सुद्धा इथे काम करू शकतात हे सिद्ध केलं आहे.
रविंद्र जैन यांच्या प्रत्येक गाण्यातून नेहमीच एक निर्मळ भाव आपल्याला अनुभवायला मिळतो. रामायण मधील “मंगल भवन अमंगल हारी” हे गाणं आपल्या सर्वांच्या नेहमीच लक्षात राहील.
रविंद्र जैन यांनी रामायणातील सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत आणि बरीच गाणी शब्दबद्ध सुद्धा त्यांनीच केली आहेत. रामायणच्या सादरीकरणात कथेसोबत सुरू असलेल्या गाण्यांचा खूप मोठा वाटा आहे.
कथेतील बारकावे सांगणारे सोपे शब्द, मधुर चाल यामुळे आजच्या टेक्नो पिढीला सुद्धा रामायण आवडलं होतं हे २०२० मधल्या पुनःप्रसारणाच्या विश्वविक्रमी प्रतिसादामुळे सिद्ध झालं आहे.
रामायण व्यतिरिक्त त्यांचे हिंदी सिनेमासाठी संगीतबद्ध केलेली गाणी सांगायची तर, ‘आखियो के झरोको से, मैने देखा जो सावरे…’, ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा’, ‘मै हूं खुशरंग हिना…’, ‘सुन सायबा सुन’, ‘ले जाएंगे, ले जाएंगे..’ ही प्रमुख गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत.
राजश्री प्रॉडक्शन आणि रामानंद सागर प्रॉडक्शन या दोन बॅनरचे सिनेमे हे नेहमी रविंद्र जैन यांच्या संगीतानेच सजलेले असायचे.
रविंद्र जैन यांच्या प्रत्येक गाण्यात जास्तीत जास्त भारतीय वाद्यांचा वापर असल्याने, ती गाणी लोकांना लगेच आपली गाणी वाटली. ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये पाश्चात्य संगीताचा वापर वाढत असतांनादेखील रविंद्र जैन हे असे एकमेव संगीतकार होते ज्यांनी झटपट लोकप्रियता मिळवण्यासाठी आपल्या संगीत शैलीत काही फरक पडू दिला नाही.
–
हे ही वाचा – लतादीदींसोबत काम न करता संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणारा ‘अनोखा’ संगीतकार!
–
आधीपासूनच धार्मिक गाणी ही त्यांची विशेषता होती आणि ती शेवटपर्यंत कायम राहिली. रामायणमधील कथा स्वरूपातील ‘हम कथा सुनाए…’ हे गाणं असो किंवा ‘श्रीकृष्ण’ या मालिकेतील कृष्णाच्या बासरीचा स्वर असो, धार्मिक संगीत हे रविंद्र जैन यांचंच असावं ही सर्व निर्मात्यांची मागणी असायची.
कोणत्याही कलाकाराच्या कलाकृतीत धार्मिकपणा तेव्हाच दिसू शकतो, जेव्हा ती व्यक्ती मनाने तशी आहे. ताल, सुर हे शिकले किंवा शिकवले जाऊ शकतात. पण, भाव हे उपजतच असावे लागतात.
रविंद्र जैन यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल माहिती घेऊन त्यांच्यात हे भाव कुठून आले असावेत? याचा अंदाज घेऊया.
रविंद्र जैन यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४४ रोजी उत्तरप्रदेशच्या अलिगढमध्ये झाला होता. जन्मापासूनच अंध असलेल्या रविंद्र जैन यांचे वडील इंद्रमणी जैन हे संस्कृत शिक्षक होते.
सहा भाऊ आणि एक बहीण असा मोठा परिवार लाभलेले रविंद्र जैन यांच्या गाण्याची सुरुवात ही मंदिरातील ‘भजन’ गायनापासून झाली. वडिलांनी घेऊन दिलेली एक हार्मोनियम ते भजनासाठी जातांना सोबत घेऊन जायचे.
इंद्रमणी जैन यांनी रविंद्र यांची गाण्याची आवड हेरली आणि रविंद्र जैन यांना आपल्या भावासोबत कोलकत्तामध्ये पाठवलं. पंडित जनार्दन शर्मा आणि पंडित जी एल जैन यांच्याकडे संगीत शिक्षण घेण्याचं ठरवण्यात आलं. आधी गायन आणि मग वाद्य वादन असं त्या शिक्षणाचं स्वरूप असायचं.
या प्रशिक्षणामुळे संगीतकार होण्याची इच्छा रविंद्र जैन यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी गाणी लिहायला आणि त्यांना संगीतबद्ध करण्यास सुरुवात केली. १९६९ मध्ये रविंद्र जैन हे संगीतकार बनण्यासाठी राकेश झुनझुनवाला यांच्यासोबत ते मुंबईत दाखल झाले होते.
–
हे ही वाचा – बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!
–
बॉलीवूड मधील करिअर
रविंद्र जैन यांनी मोहम्मद रफी यांच्यासोबत आपलं पहिलं बॉलीवूडचं गाणं रेकॉर्ड केलं होतं. पण, काही कारणास्तव ते गाणं आणि तो सिनेमा रिलीज झाला नव्हता.
रविंद्र जैन यांच्या बॉलीवूड करिअरची सुरुवात १९७४ मध्ये रिलीज झालेल्या ‘चोर मचाये शोर’ या सिनेमा पासून झाली. किशोर कुमार यांनी गायलेलं ‘घुंगरू की तरहा…’ हे रविंद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेलं पहिलं बॉलीवूडचं गाणं होतं. हे गाणं लोकांना प्रचंड आवडलं होतं आणि त्यामुळे रविंद्र जैन हे नाव चर्चेत आलं होतं.
आपल्या कामाशी प्रामाणिक आणि संगीतावर प्रचंड निष्ठा असलेली व्यक्ती म्हणून रविंद्र जैन यांची ओळख सुरुवातीपासूनच होती. एखादं गाणं तयार करायला सुरुवात केली, की ते गाणं पूर्ण व्हायच्या आत रविंद्रजी स्टुडिओमधून कधीच घरी जायचे नाहीत.
१९७३ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ-नुतन यांच्या ‘सौदागर’ या सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी रविंद्र जैन यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. ही बातमी कळल्यानंतर सुद्धा त्यांनी ‘सजना है मुझे, सजना के लिये…’ हे गाणं मनासारखं रेकॉर्ड करून घेतलं आणि मगच स्टुडिओच्या बाहेर पडले होते.
गायक, संगीतकार येसू दास आणि रविंद्र जैन यांची जोडी ८० च्या दशकात खूप लोकप्रिय झाली होती. ‘चितचोर’ (१९७६) मधील ‘गोरी तेरा गाव बडा प्यारा…’, ‘जब दीप जले आना’, ‘अखियो के झरोको से’ ही गाणी या जोडीने एकत्रितपणे संगीतबद्ध केली होती.
या दोघांमध्ये इतकी घनिष्ठ मैत्री होती, की एकदा रविंद्र जैन म्हणाले होते, “जर मला कधी, काही क्षणांसाठी जरी दृष्टी मिळाली तर मला येसू दास यांना बघायला आवडेल.”
रविंद्र जैन यांच्या बॉलीवूडमधील सर्वोत्तम गीतांमध्ये ‘राम ‘तेरी गंगा मैली’ (१९८५) आणि ‘हिना’ (१९९२) या सिनेमातील गाण्यांचा नक्कीच समावेश करावा लागेल. वेगवेगळे सिनेमा विषय आणि त्यानुसार आपल्या गाण्यांचा बदललेला प्रकार हा लोकांना कायम त्यांच्या गाण्यांच्या प्रेमात पाडणरा होता.
“रविंद्र जैन यांची गाणी आवडतात” हे सांगतांना कोणालाही त्या गाण्यातील शब्द, चाल याबद्दल कोणतीही तक्रार नसायची.
राम ‘तेरी गंगा मैली’ या सिनेमाच्या नावाबद्दल संभ्रम असतांना राज कपूर यांना “… पापियो के पाप धोते धोते” ही दुसरी ओळ रविंद्र जैन यांनी दिली आणि राज कपूर यांनी हा सिनेमा करायचं ठरवलं हा किस्सा त्या काळात खूप लोकप्रिय झाला होता.
बॉलीवूडमध्ये करिअरच्या उच्च स्थानावर असतांना रविंद्र जैन यांनी त्यांचा मोर्चा प्रादेशिक भाषेतील धार्मिक गाण्यांकडे वळवला होता. मल्याळम आणि बंगाली भाषेत त्यांनी तयार केलेली गाणी लोकांना खूप आवडत होती.
त्या गाण्यांमुळेच रामानंद सागर यांनी रामायण आणि इतर सर्व धार्मिक मालिकांसाठी रविंद्र जैन यांच्यासोबतच काम करायचं ठरवलं. ही जोडी सुद्धा त्या काळातील सर्वात ‘सात्विक’ जोडी म्हणून त्या काळात ओळखली जायची. दोघेही असे होते, की आपल्या तत्वांवर कधीच तडजोड करायचे नाहीत.
रविंद्र जैन हे कोणत्याही नवीन निर्मात्यांना पहिल्यांदा भेटल्यावर त्यांच्या आवाजातील स्पष्टता आणि सच्चेपणा यावरून त्या निर्मात्यासोबत काम करायचे की नाही हे ठरवायचे.
त्यावेळी एखाद्या व्यक्तीची माहिती काढण्यासाठी आजच्या इतके पर्याय उपलब्ध नव्हते. तरीही, रविंद्र जैन यांना कोणीही कधीच फसवू शकलं नाही याचं श्रेय त्यांनी नेहमीच आपल्या देवावर असलेल्या श्रद्धेला दिलं आहे.
रविंद्र जैन यांनी त्यांच्या अंधपणाचा कधीच न्यूनगंड बाळगला नाही. शिवाय त्यांच्या शब्दातून सुद्धा ते कधीच जाणवलं नाही. त्यांनी लिहिलेल्या या ओळी हे ते कलाकार म्हणून किती डोळस होते हे लक्षात येईल.
उंचे महल के झरोको से तुम, अंबर की शोभा निहारो जरा
रंगो से रंगो का ये मेल जो, आंखो से मन मे उतारो जरा
सुनयना, दूर आसमानो को तुम देखो, और मै तुम्हे देखते हुए देखू
मै बस देखते हुए देखू
सुंदर जग बघण्यासाठी डोळे असावेच लागतात हा समज रविंद्र जैन यांनी खोटा ठरवला होता.
रविंद्र जैन यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
रविंद्र जैन यांचा वयाच्या ७१ व्या वर्षी ९ ऑक्टोबर २०१५ रोजी किडनीच्या आजाराने मुंबईत निधन झालं. अवीट गोडी असलेल्या गाण्यांच्या रुपात रविंद्र जैन हे नेहमीच आपल्या सोबत असतील हे नक्की.
===
हे ही वाचा – स्वतः गायलेल्या गाण्यांचीसुद्धा रॉयल्टी न घेणारा नव्या पिढीतील ‘फकीर गवैया’!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.