एका हज नोटेची किंमत ‘हज यात्रेच्या खर्चाहूनही अधिक’! कारण आहे अगदीच भन्नाट…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मध्यंतरी काही काळ एक रुपयांच्या नोटेची मागणी भलतीच वाढली होती. एक विशिष्ट सिरीज आणि सिरीयल नंबर असलेल्या एक रुपयाच्या नोटेला चांगली रक्कम मिळत होती.
७८६ हे आकडे असलेल्या नोटेला तर नेहमीच प्रचंड मागणी असते.
अनेकांना वाढदिवसाची नंबर सिरीज महत्त्वाची वाटते. वाढदिवसाच्या या नंबर सिरीजसाठी ही मंडळी रिझर्व्ह बँकेकडे धाव घेताना दिसून येतात.
त्यातही विंटेज अर्थात जुन्या काळातील नोटांना तर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यांच्यावर लाखोंची बोली लागल्याचे नेहमीच पाहायला मिळते.
रिझर्व्ह बँकेने मध्यंतरी हज यात्रेची नोट जारी केली होती. ‘हज’च्या या नोटेला लिलावात तब्बल ४१ लाख रुपये मिळाले असल्याची बातमी आली. लाखांच्या किंमतीत विकल्या गेलेल्या या नोटेची चलनी रक्कम होती केवळ १० रुपये!
१० रुपयाच्या ‘हज’ नोटेला मिळालेली किंमत बघता या हज नोटेबद्दल अजून माहिती घेतली असता कळले की हजच्या या नोटांना आज सामान्य बाजारात सुद्धा लाखोंची किंमत मिळत आहे.
आज माहिती घेऊया, या हजच्या नोटेबद्दल आणि नेमकी तिला एवढी किंमत का मिळते आहे त्याबद्दल…
जगभरातील मुस्लिमांसाठी सर्वाधिक पवित्र ठिकाण म्हणजे मक्का आणि मदिना. अरब देशात असलेल्या या ठिकाणांना जगभरातील करोडो मुस्लिम भेट देत असतात. भारतातील मुस्लिम सुद्धा याला अपवाद नाहीत.
मक्केला जायचं, म्हणजे तिथली चलन व्यवस्था वेगळी आणि आपली वेगळी. तसेच मक्केला जायचा टाइम पिरेड हा साधारणपणे सारखाच असतो.
एकाच वेळी करन्सी एक्सचेंजवर येणारा लोड टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ६० च्या दशकात हज यात्रींसाठी विशेष अशा ‘हज’ नोटा बाजारात आणल्या होत्या. या नोटा फक्त हजला जाणाऱ्या भारतीयांना मिळत असत.
५०-६० च्या दशकात अरब राष्ट्र आणि भारताच्या चलनाची किंमत ही समानच होती. त्यामुळे भारताच्या त्या हज नोटेच्या मदतीने सौदीमध्ये भारतीयांना आर्थिक व्यवहार करणे सोप्पे जात असे. सौदीला उड्डाण करण्याच्या आधी या नोटा हज यात्रींना दिल्या जात असे.
कशी होती ही हज नोट?
हज यात्रींसाठी रिझर्व्ह बँक १० आणि १०० रुपयांची चलनी हज नोट जारी करायची. निळ्या रंगाची १० ची नोट आणि लाल रंगाची १०० ची नोट.
या नोटांची बनावटच अशी होती, की ती इतर भारतीय चलनी नोटांपेक्षा नोट वेगळी दिसेल.
या नोटांच्या मध्यभागी इंग्रजी आणि हिंदीमध्ये ‘हज’ लिहिलेले असायचे. म्हणून या नोटांना ‘हज नोट’ म्हणत असत. या नोटांची सिरीजदेखीलएचए (HA) या अक्षरांनी सुरू होत असे.
एकूणच या नोटा भारतीय मार्केटमधील इतर नोटांपेक्षा वेगळ्या असतील याची पुरेपूर काळजी रिझर्व्ह बँकेने घेतली होती.
१९५९ मध्ये जारी केलेल्या या हज नोटा १९७० पर्यंत कार्यान्वित होत्या.
भारताची ही हज नोट अरब राष्ट्रांमध्ये बिन दिक्कत चालत असल्याने काही हज यात्री लपवून, ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीच्या नोटा हज यात्रेला घेऊन जात असत.
त्यामुळे जेव्हा अरब राष्ट्रतून हे पैसे एक्सचेंजसाठी भारतात येत, तेव्हा जारी केलेल्या नोटांपेक्षा त्यांची संख्या आणि किंमत जास्त असायची.
शिवाय ७०च्या दशकात अरब रियालची किंमत ही भारतीय रुपयांपेक्षा खूप जास्त होऊ लागली होती. आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी डॉलर आंतरराष्ट्रीय बाजारात उभे राहत होते.
परिणामी या हज नोटांद्वारे होणाऱ्या व्यवहारावर रोक लावली गेली. आज तर डॉलर आणि रियाल या दोघांच्या किंमती या भारतीय रुपयाच्या तुलनेने खूपच अधिक आहेत.
–
हे ही वाचा – प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा या देशात चलनात आहेत
–
हे हज चलन बंद झाल्यानंतर मात्र भारतातून हज यात्रीना एक बँक ड्राफ्ट इश्यू करून दिला जाई. ज्याच्या मदतीने ते सौदीमध्ये रियाल मिळवू बदलू शकत होते.
सध्या एका भारतीय पासपोर्ट वर २१०० रियाल घेऊन जाण्याची परवानगी भारतीय एयरपोर्टवर आहे.
आता या बंद झालेल्या हज नोटांना काही मुस्लिम भाविक आणि जुन्या गोष्टींचा संग्रह करणाऱ्यांकडून मात्र प्रचंड मागणी आहे.
मुंबईमधल्या तोडीवाला ऑक्शनचे फारुख तोडीवाला यांच्याकडे याविषयी उत्तम माहिती मिळू शकते. त्यांच्या मते १० रुपयाच्या निळ्या हज नोटेची किंमत ही कमीतकमी साडे तीन लाख एवढी आहे.
या नोटा सहज मिळत नसल्याने त्यांचा लिलाव केला जातो. लिलावात या नोटांची किमान किंमत ही ३.५ लाख एवढीच असते.
७० च्या दशकात या नोटा बाद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने काही नोटा संग्रहालयासाठी बाजूला काढून इतर नोटा या स्क्रॅप केल्या. त्यामुळे भारतात या नोटा मिळणे जवळजवळ अशक्य आहे. म्हणजेच लिलाव करण्यात येणाऱ्या नोटा या अरब राष्ट्रतूनच येतात. त्यामुळे याची किंमत ही जास्त असते.
मुळातच जास्त असलेली किंमत आणि मग त्याचा होणारा लिलाव यामुळे या नोटांच्या किंमती गगनाला भिडतात. या नोटा लिलावात अशा भावाला सुद्धा विकल्या जातात, ज्या रकमेत एखादी हज यात्रादेखील सहज होऊ शकेल.
किंमत जास्त असल्याने जुन्या गोष्टींचा संग्रह करणारी व्यक्ती आणि श्रीमंत मुस्लिम भाविक यांचा ओढा या नोटेकडे जास्त असल्याचे अगदी सहज दिसून येते.
बंद झालेल्या चलनी नोटांना असलेली मागणी बघता, ‘शौक बडी चीज होती है’ म्हटलं, तरी ते चुकीचं ठरणार नाही.
===
हे ही वाचा – विविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.