' रॉयल लोकांची रॉयल बिर्याणी… जिची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल…! – InMarathi

रॉयल लोकांची रॉयल बिर्याणी… जिची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०२० पासून प्रत्येक घरात स्वयंपाकाची आवड असलेले लोक वाढले आहेत. सामाजिक मुद्द्यांवर संवाद साधणारा सोशल मीडियासुद्धा सध्या ‘वन डिश मील’, ‘रेसिपी’ या शब्दांनी भरून वाहतोय. कोणताही पदार्थ आता घरापुरता मर्यादित नसून त्यात जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्यात आपल्याला सध्या खूप आनंद वाटतोय.

‘बिर्याणी’ हा असाच खवय्यांचा एक आवडता पदार्थ. प्रकार कोणताही असो, जागा कोणतीही असो. बासमती तांदूळाने तयार होणारी, विविधरंगी अशी ही बिर्याणी तयार होताना आपल्या सुगंधाने ‘आपलं वेगळेपण’ जाहीर करत असते आणि न बोलावता सर्वांना जेवण्याच्या ठिकाणी एकत्र आणत असते.

 

biryani in inmarathi

 

दक्षिण भारताने जगाला भाताच्या कितीतरी प्रकारांची भेट दिली आहे. या सर्व प्रकारांमध्ये ‘हैद्राबादी बिर्याणी’ ही इतकी लोकप्रिय आहे, की अगदी विमानाने प्रवास करणारे लोक सुद्धा एअरपोर्ट जवळ असलेल्या काही ठराविक हॉटेलमधून बिर्याणी ‘पार्सल’ घेऊनच विमानात बसतात.

 

hb inmarathi

 

हे ही वाचा – दिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय !

बिर्याणीला नाही म्हणणारे लोक फार कमी असतील. खाण्याचं प्रमाण कमी जास्त असेल. पण, बिर्याणी हा भारतीयांच्या आवडीच्या पदार्थांपैकी एक नेहमीच असेल. आजच्या फास्ट फुडकडे झुकलेल्या आणि ‘भात खाल्ल्याने झोप येते’ असं मानणाऱ्या लोकांना कदाचित बिर्याणीची तितकी आवड नसेलही.

“बिर्याणी – त्यात काय एवढं? भाताचाच एक प्रकार, आहे तर भातच ना” असं म्हणणारे पण काही अरसिक लोक असतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही जर त्यांच्या पंगतीत बसणारे नसाल तर तुम्हाला हा बिर्याणीचा इतिहास आणि जगातील सर्वात महाग बिर्याणीबद्दलची ही माहिती नक्कीच वाचायला आवडेल.

बिर्याणी’ हा शब्द ‘बिरीयन’ या पर्शियन शब्दापासून तयार झाला आहे ज्याचा अर्थ ‘शिजवण्या आधी तळलेलं’ असा होतो.

‘बिरिंज’ हा शब्द पर्शियन भाषेत भातासाठी वापरला जातो. पहिली बिर्याणी कुठे तयार झाली होती? याबद्दल दोन तीन वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. काही इतिहासकारांच्या मते, बिर्याणी ही पर्शिया (इराण) मध्ये सर्वात पहिल्यांदा बनवण्यात आली होती आणि मुघलांनी त्याला भारतात आणलं होतं. ‘मुघल रॉयल किचन’मध्ये सर्वांसाठी ही डिश बनवली जायची अशी माहिती आहे.

बिर्याणीच्या शोधाबद्दल अजून एक प्रचलित माहिती अशी आहे, की शहाजहानच्या पत्नीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘मुमताज महल’मधून बिर्याणीची सुरुवात झाली आहे. मुमताज ही एकदा सैनिकांची स्थिती बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी बघितलं, की काही सैनिक हे फारच कुपोषित आहेत.

 

mum inmarathi

 

हे ही वाचा – हॉटेलमध्ये तुम्हाला बिर्याणी म्हणून पुलावच दिला जात नाही ना? दोन्हीत फरक आहे, जाणून घ्या..

सैनिकांना पोटभर खाता यावं म्हणून मुमताज राणीने आपल्या खानसमाला सांगितलं, की एक अशी डिश बनवा ज्याद्वारे सैनिकांना मांसाहार आणि भात हे दोन्ही एकत्र खाता येईल. या डिशमध्ये केशर, मसाला यांचा वापर करण्यात आला होता आणि जंगलातील लाकडांवर या भाताला शिजवण्यात आलं होतं आणि तेव्हा या भाताच्या प्रकाराला ‘बिर्याणी’ हे नाव देण्यात आलं होतं.

बिर्याणीबद्दल अजून एक अशी कथा ऐकिवात आहे, की तुर्क-मुघल राजा ‘तैमुर’ने १३९८ मध्ये हा पदार्थ भारतात घेऊन आला होता. हैद्राबादचे निजाम आणि लखनऊचे नवाब यांना सुद्धा बिर्याणीची खूप आवड होती आणि त्यामुळेच या दोन्ही भागातून बिर्याणीची आवड लोकांमध्ये आली आणि ती आजपर्यंत लोकांनी टिकवून ठेवली आहे.

आज ही आवड इतकी वाढली आहे की, लोक एका बिर्याणीच्या डिशसाठी चक्क २०,००० रुपये सुद्धा द्यायला तयार होत आहेत हे वाचल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. दुबईमधील ‘दुबई इंटरनॅशनल फायनान्स सेंटर’ मधील ‘बॉम्बे बुरुघ’मध्ये तुम्हाला जर बिर्याणी खायची असेल तर २ हजार च्या दहा नोटा मोजाव्या लागतील इतकी त्याची किंमत आहे.

“काय आहे त्यात इतकं? सोन्याची आहे का?” असं आपण नेहमीच म्हणतो. ही बिर्याणी तुम्हाला सोन्याच्या ताटात वाढली जाते, हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. काही वस्तू, पदार्थांचे भाव हे त्या जागेवरून सुद्धा ठरतात हे आपल्याला माहीत आहेच. ‘बॉम्बे बुरुघ’ या दुबईतील हॉटेलमध्ये ब्रिटिश कालीन पद्धतीने हॉटेलच्या भिंतीची रचना आहे.

 

b biryani inmarathi

 

‘रॉयल गोल्ड बिर्याणी’ ही डिश तयार करायला हॉटेलच्या शेफला ४५ मिनिटं लागतात. सोन्याच्या ताटात दिली जाणाऱ्या ह्या बिर्याणीमध्ये ३ प्रकार असतात. चिकन बिर्याणी, खिमा भात आणि पांढरा, केशरी भात आणि त्यावर बारीक बटाटा, बॉईल अंडी इतक्या गोष्टींचा या डिशमध्ये समावेश आहे.

चिकनमध्ये सुद्धा ३ प्रकारचे म्हणजेच चिकन ग्रील, मलाई चिकन, चिकन मीटबॉल्स हे एका डिशमध्ये वाढले जातात.

‘रॉयल गोल्ड बिर्याणी’मध्ये वापरण्यात येणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे लँब चॉप्स, लँब कबाब, काजू, शेंगदाणे आणि तळलेले कांदे इतकी मोठी ही खाद्यजत्रा असते. बिर्याणीच्या सोबत खाण्यासाठी रायता, निहारी सलन, जोधपुरी सलन, बदामी सॉस हे पदार्थ या डिशचा भाग असतात.

२३ कॅरेट सोन्याचं ताट वापरल्या जाणाऱ्या बिर्याणीची दुबई करन्सीमध्ये १००० दिराम इतकी किंमत आहे, जी भारतीय रुपयात २०,००० च्या जवळपास आहे.

‘तुमच्यासाठी हा आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव असेल’ असं ‘बॉम्बे बुरुघ’ या हॉटेलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लोकांना सांगण्यात आलं आहे. “घरून निघायच्या आधी ऑर्डर करा आणि ४५ मिनिटांत इथे पोहोचल्यावर रॉयल गोल्ड बिर्याणी चा आस्वाद घ्या” अशी जाहिरात या हॉटेल ने केली आहे.

‘रॉयल गोल्ड बिर्याणी’मध्ये वापरला जाणारा फक्त तांदूळ हा ३ किलो इतका असतो. त्यानंतर इतर सामुग्री मिळून ही डिश साधारणपणे ५ किलो इतक्या वजनाची ही डिश तुमच्या समोर आणून ठेवली जाईल. या डिशमधील काही खाद्यपदार्थांवर सोन्याचा वर्ख असेल जे की दुबईचं वैशिष्ट्य आहे.

 

biryani inmarathi

 

“शौक बडी चीज है” हे मान्य करणाऱ्या आणि तसं जगू शकणाऱ्या लोकांसाठी ‘रॉयल गोल्ड बिर्याणी’ ही एक पर्वणी सध्या ठरत आहे. तुम्ही जर बिर्याणी चे चाहते असाल, दुबई ला जाणार असाल तर ‘रॉयल गोल्ड बिर्याणी’ ची चव घेण्याचं नियोजन करू शकता.

इंटरनेटवर या डिशमध्ये काही सुधारणा व्हायला हव्यात, असे ट्विट्ससुद्धा येत आहेत. हॉटेल प्रशासनाने या सुधारणांची दखल घेण्याचं मान्य केलं आहे. मेनू कार्डच्या उजव्या बाजूला न बघता तुम्ही या किंवा जगातील कोणत्याही महागड्या डिशचा नक्कीच आनंद घेऊ शकता.

===

हे ही वाचा – बिर्याणीतल्या अळ्या नि चिकन सोडा! हे लोक जे खातात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?