' रोबोट्स हे “भविष्य” नाहीत. आपलं वर्तमान आहेत. मी बिझनेसमध्ये रोज रोबोट वापरतोय – InMarathi

रोबोट्स हे “भविष्य” नाहीत. आपलं वर्तमान आहेत. मी बिझनेसमध्ये रोज रोबोट वापरतोय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : ओमकार दाभाडकर

===

प्रोग्रामिंग म्हटलं की कोडिंग करून काही सॉफ्टवेअर्स तयार करायचे असंच वाटतं आपल्याला.

ही कोडिंग खूप मोठ्या प्रमाणावर झाली की सुपरकम्युटर तयार होतं – भविष्यात आपल्या गरजेपोटी त्या सुपरकम्प्युटरला जगभरातल्या सिस्टीम्सशी जोडावं लागेल, मग त्याला “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स” सारखं काहीतरी पुरवून स्वतंत्र बुद्धिमत्तेची शक्ती दिली – की मानवाचा कर्दनकाळ ठरू शकेल असा एक राक्षस निर्माण होईल – असं हे भयावह स्वप्न.

 

artificial intelligence inmarathi

 

पण आपल्या आजूबाजूला असे अनेक छोटेमोठे अगदीच सुपरडुपर नसले तरी मानवी मर्यादा ओलांडणारे बऱ्यापैकी सुपर असणारे अदृश्य यंत्र आजच कार्यरत आहेत. आपण फक्त त्यांना तसं बघत नाही.

२००६ मध्ये इंटरनेट नावाच्या जादूच्या दिव्यातून क्लाऊड कम्प्युटिंग नावाचा जिन बाहेर आला आणि अनेक अदृश्य रोबोट्स जन्माला येण्याची प्रक्रिया सुरु झाली.

क्लाऊड कम्प्युटिंगचा थोडक्यात अर्थ असा की एखादं सॉफ्टवेअर, एखादी मेमरी स्पेस इ वापरण्यासाठी मला ते सॉफ्टवेअर, ती मेमरी डिस्क इ माझ्या सिस्टीमवरच असावं नं लागणं. म्हणजेच मला हव्या त्या सर्व्हिसेस मला रिमोटली वापरता येतात.

“फक्त” (वरील व्याख्या अगदीच साधी आहे म्हणून हे सगळं “फक्त” वाटतं.) एवढ्या सोयीमुळे जग बदललं. आपल्या आऊटसोर्सिंग इंडस्ट्रीला खूप मोठा आधार देत क्लाऊड कम्प्युटिंग भारतात मोठ्या प्रमाणात रुजलं.

 

cloud inmarathi

 

अर्थात, तेव्हा काय, अगदी आजही बहुतेकांना क्लाऊड कम्प्युटिंगद्वारे मोठ्या कंपनीजच्या मोठ्या गरजा भागवल्या जातात असं वाटतं. वास्तवात हा समज अगदी चुकीचा आहे.

क्लाऊड कम्प्युटिंगमुळे आज कोणतीही डिजिटल यंत्रणा एन्ड-टू-एन्ड ऑटोमेटेड करता येते.

म्हणजेच कित्येक किचकट कामं करत एक एक पायरी पुढे जाणारा १००% स्वयंचलित असलेला आराखडा फक्त कागदावरच (word, ppt, excel इत्यादीवर!) नव्हे, प्रत्यक्षात ही उतरवता येतो.

===

हे ही वाचावाय-फाय पेक्षा शंभर पट वेगवान असलेले तंत्रज्ञान ‘लाय-फाय’ नक्की काय आहे? जाणून घ्या..

===

आपल्या सर्वांच्या परिचयाचं उदाहरण :

फेसबुक जाहिराती – जाहिरात बघून तुम्ही वस्तू विकत घेणं – ती वस्तू तुमच्याकडे पोहोचणं – ती रिटर्न होणं – पैसे तुमच्या अकाऊंटला परत येणं.

 

facebook ads inmarathi

 

या अख्या इकोसिस्टीममध्ये, फेसबुक हा “इंटरनेट बेस्ड प्लॅटफॉर्म” सोडून द्या. पण इतरही व्यवहार करण्यासाठी – प्रत्येक स्टेपमध्ये १० वर्षांपूर्वी किती लोक लागले असते – आणि आज किती लागत असतील – याचा अंदाज घेतला तर या अदृश्य रोबोट्सची व्याप्ती कळेल.

थोडं खोलात जाऊ :

गृहीत धरा तुमचा डिजिटल प्रोडक्टस आधारित काहीतरी बिझनेस आहे. म्हणजे ई-बुक्स, फोटोज, व्हिडीओज, सॉफ्टवेअर्स असं काहीपण. हा बिझनेस १००% ऑटोमेट कसा करता येतो बघा.

तुमची वस्तू विकायची कशी? – डिजिटल मार्केटिंग. त्यासाठी जाहिरातींचं डिझाईन घरबसल्या. बजेटची आखणी घरबसल्या. जाहिराती देणं घरबसल्या.

ग्राहकांनी ऑनलाईनऑर्डर द्यायची. ती ऑर्डर तुमच्या सिस्टीममध्ये नोंदवली जाणं, त्यानुसार तुम्हाला योग्य ते डिजिटल प्रोडक्ट तुमच्या ईमेलवर येणं – सगळं आपोआप होतं.

बिझनेस ऑटोमेशन त्या पुढे जातं. तुम्ही कोणतं, कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट घेतलं यानुसार माझ्या डेटाबेसमध्ये तुमच्या कस्टमर आयडीसमोर स्पेसिफिक टॅग देणं, त्या टॅग्जनुसार वेगवेगळे ईमेल्स, वेगवेगळे प्रोडक्टस दाखवणं, त्या ईमेल्सला तुमचा प्रतिसाद कसा येतोय यावरून वेगळं टॅगिंग, त्यानुसार पुढील कम्युनिकेशन…!

 

digital marketing inmarathi

 

माझ्या कोणत्या जाहिरातीवर क्लिक करून तुम्ही नेमकी कोणती अॅक्शन घेतली – यावरून तुम्हाला पुढे कोणता ईमेल यावा, कोणती जाहिरात दिसावी; तुम्ही माझं कोणतं प्रोडक्ट घेतलं – यावरून तुम्हाला इतर कुठले प्रोडक्ट्स किंवा पोस्ट-सेल-सर्व्हिस ऑफर करावेत – हे सगळं “आपोआप” ठरतं.

या “आपोआप” चं महत्व कोणत्याही स्टार्टअपसाठी केवढं मोठं आहे हे शब्दांत सांगता येणार नाही.

वरील सगळं जाळं घडवून आणण्यासाठी माझ्यासारख्या एखाद्या स्टार्टअप फाऊंडरला ५ लोक कामावर ठेवणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, त्यांचे अटेन्डन्स – त्यांचे वैयक्तिक हेतू वगैरे मॅनेज करणं अशक्य असतं.

===

हे ही वाचाटेक्नोसॅव्ही युगात ‘या’ ७ सवयी ठरू शकतात तुमच्या मेंदुसाठी अत्यंत घातक

===

फक्त हे जमलं नाही म्हणून बिझनेस वाढू शकला नाही, ती ग्रोथ नाही म्हणून प्रॉफिटॅबिलिटी नाही, प्रोफिट्स नाहीत म्हणून धंदा बंद करावा लागला…इतकं दाहक आहे हे.

मला ते होऊ नं देण्याचा मार्ग ऑटोमेशनमध्ये दिसतो. म्हणून मग मी महिना ८-१०-२५,००० रुपये खर्च करून वरील ऑटोमेशन्स सेट करून ठेवतो. सगळं आपोआप घडत जातं. स्मूदली. फ्लॉलेसली.

ते होत असलं की मग मला माझ्या कोअर बिझनेसवर लक्ष केंद्रित करता येतं. मार्केटिंग स्ट्रॅटजीज आखण्यासाठी शांत डोक्याने वेळ काढता येतो.

 

marketing strategy inmarathi

 

ही सगळी क्लाऊड कम्प्युटिंगची कमाल! हे आपल्या आजूबाजूला रोज घडतंय.

याकडे “रोजगार गेला” म्हणून भीतीने बघण्यात अर्थ नाही. याकडे एक एम्पावरिंग टूल म्हणून म्हणून बघायला हवं. आणि हे समजून घेऊन मगच आपलं करिअर कोणत्या क्षेत्रात घडवायचं आहे, कोणत्या स्किल्स डेव्हलप करायच्या आहेत – हे ठरवता यायला हवं.

रिपोर्टींग, अनॅलिटीक्स या गोष्टी कधीच ऑटोमेट झाल्या आहेत. कन्झ्युमर बिहेवियर समजून घेणं आणि त्यावरून निष्कर्ष काढणं यंत्राला जमायला लागलंय. वेबसाईट चालवण्यासाठी ऑफिसमध्ये सर्व्हर ठेवावं लागतं वगैरे गोष्टी तर विस्मरणात गेल्यात.

हे बदल घडल्यामुळे जग बदललं आहे. जग बदलल्यामुळे हे बदल घडले आहेत. आपण त्यानुसार घडायला हवं. बदलायला हवं!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?