IAS चं स्वप्नं, वृत्तपत्रात नोकरी ते हिरॉईन्सचा कर्दनकाळ – एका भन्नाट व्हिलनचा प्रवास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा” हा डायलॉग माहीत नाही असं कोणीच नसेल. मोठया पडद्यावर बॉलीवूडच्या हिरोइन्सना सर्वात जास्त त्रास दिलेला कोणी व्हिलन असेल तर प्रेम चोप्राचं नाव हे सर्वप्रथम समोर येतं.
बॉलीवूड मध्ये कामाची सुरुवात करताना प्रेम चोप्रा यांनी नायक होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.
पण, त्यांच्या नशिबात खलनायक होणं ठरलेलं असावं म्हणून एक दिसायला देखणा पण तरीही वाममार्गाने चालणारा खलनायक बॉलीवूड मध्ये दाखल झाला. प्रेम चोप्रा यांनी तब्बल ३२० चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
प्रेम चोप्रा ज्या उद्देशाने बॉलीवूड मध्ये आले आणि झालं वेगळंच, हेच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा झालं.
मोठ्या पडद्यावर लोकांना त्रास देणाऱ्या प्रेम चोप्रा यांना सुरुवातीच्या काळात किती संघर्ष करावा लागला याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे.
आपल्या करिअरची नुकतीच ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या या अभिनेत्याच्या प्रवासाबद्दल ही रंजक माहिती खास बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
२३ सप्टेंबर १९३५ रोजी तत्कालीन पंजाब राज्यातील लाहोर मध्ये प्रेम चोप्रा यांचा जन्म झाला होता. लहानपणी प्रेम हे अत्यंत मितभाषी होते. रणबीरलाल आणि रुपराणी चोपडा यांचे ते तिसरे चिरंजीव आहेत.
भारताच्या फाळणी नंतर चोप्रा कुटुंब हे लाहोर वरून सिमला येथे स्थलांतरित झालं होतं. मुलाने डॉक्टर किंवा IAS ऑफिसर व्हावं अशी प्रेम चोप्रा यांच्या वडिलांची खूप इच्छा होती.
सिमला येथे शाळा आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवीचं शिक्षण प्रेम चोप्रा यांनी पंजाब विद्यापीठातून पूर्ण केलं. पदवीचं शिक्षण घेत असतांना प्रेम चोप्रा यांनी खूप उत्साहाने नाटकांमध्ये काम केलं.
आपल्या वडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पण, अभिनयाची आवड त्यांना पंजाबमध्ये स्वस्थ बसू देत नव्हती, त्यांनी त्वरित मुंबई गाठली.
प्रेम चोप्रा यांना सिनेमात पहिला ब्रेक मिळाला आणि त्यांच्या आईचे तोंडाच्या कॅन्सरने निधन झाले. आपल्या चार भाऊ, वडील आणि नऊ वर्षाच्या लहान बहिणीची जबाबदारी प्रेम चोपडा यांच्यावर आली होती.
आपल्या एकुलत्या एक लहान बहिणीचा प्रेम चोप्रा यांनी नेहमीच स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला.
===
हे ही वाचा – बॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे?
===
प्रेम चोप्रा यांचं राजेंद्रनाथ यांची बहीण उमा सोबत लग्न झालं, त्यांना तीन मुली आहेत. रकिता नंदा या प्रेम चोप्रा यांच्या मुलीने २०१४ मध्ये त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं होतं. या पुस्तकाचं नाव ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ हेच ठेवण्यात आलं होतं.
दिल्लीत स्वतःचा बंगला आणि मुंबईत दोन फ्लॅट असताना त्यांच्या दोन भावांनी त्यांना कसं दिल्लीच्या बंगल्यासाठी फसवलं आणि इतर दोन भावांनी त्यांचे मुंबईचे फ्लॅट परस्पर विकून टाकले याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
प्रेम चोप्रा आणि संघर्ष हे नातं फार जुनं आहे. आईवडिलांचा विरोध पत्करून मुंबईत आलेल्या प्रेम चोप्रा यांनी सुरुवातीचे काही दिवस कुलाबा येथील अतिथी गृहात काढले, स्टुडिओच्या वाऱ्या केल्या. पण, त्यावेळच्या दिगदर्शक, निर्मात्यांकडून प्रतिसाद फारच थंड होता.
आपल्या उपजीविकेसाठी प्रेम चोप्रा यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया‘ या वर्तमानपत्रात राज्यनिहाय पेपरच्या वाटपाच्या कामाची जवाबदारी त्यांनी स्वीकारली.
बंगाल, ओरिसा आणि बिहार या राज्यात महिन्यातील २० दिवस फिरण्याची नोकरी प्रेम चोप्रा यांना मिळाली. ज्या स्टुडिओ मध्ये काम करायची इच्छा होती त्या स्टुडिओज च्या फक्त बाहेरून भिंती बघून प्रेम चोप्रा हे उद्याचे स्वप्न रंगवत होते.
एका दिवशी ट्रेन मधून प्रवास करतांना एका अनोळखी व्यक्तीने प्रेम चोप्रा यांना विचारलं की, “सिनेमात काम करणार का ?” ध्यास असला की, गोष्टी घडतात ते अगदी खरं म्हणावं लागेल.
दुसऱ्या दिवशी प्रेम चोप्रा हे रणजित स्टुडिओज मध्ये होते. जगजीत सेठी या पंजाबी सिनेमाच्या निर्मात्याने प्रेम चोप्रा यांना हिरो म्हणून ‘चौधरी कर्नेल सिंग’ या सिनेमासाठी २५०० रुपयांच्या मानधनावर पहिला ब्रेक दिला होता.
हा सिनेमा पूर्ण होण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागला होता. १९६० च्या दशकापर्यंत प्रेम चोप्रा हे टाईम्स ऑफ इंडियाची नोकरी आणि सिनेमात काम असे दोन्ही रोल निभावत होते.
या दरम्यान त्यांनी पंजाबी सिनेमा ‘सपने’ आणि हिंदी सिनेमा ‘वो कौन थी?’ मध्ये सुद्धा काम केलं. मनोज कुमार यांनी वो कौन थीच्या शुटिंग दरम्यान प्रेम चोप्रा यांना शाहिद या सिनेमात ‘सुखदेव’ च्या भूमिकेसाठी विचारणा केली.
हा प्रेम चोप्रा यांचा एकमेव सकारात्मक रोल होता. ‘मै शादी करने चला..’ या सिनेमाच्या दरम्यान प्रेम चोप्रा यांना व्हिलनचे रोल करण्याचा सल्ला मिळाला आणि त्यांनी तो लगेच मान्य केला.
१९६६ मधील ‘मेरा साया’, ‘तिसरी मंजिल’ आणि ‘उपकार’ या सिनेमा नंतर प्रेम चोप्रा हे एक सशक्त व्हीलन म्हणून लोकप्रिय झाले आणि १९६७ मध्ये त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाची नोकरी सोडली.
१९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘बॉबी’ मध्ये “प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा ” हा डायलॉग त्यांना देण्यात आला होता. जी त्यांची नंतर ओळखच झाली.
यासोबतच, प्रेम चोप्रा यांचा सौतन या सिनेमातील “मै वो बला हूं जो शिशे से पत्थर को तोडता हूं…” हा डायलॉग सुद्धा खूप लोकप्रिय झाला होता.
राजेश खन्ना सोबत प्रेम चोप्रा यांनी १९ सिनेमात काम केलं होतं. त्यापैकी १५ सिनेमे हे खूप मोठे हिट ठरले होते. निर्मात्यांना ही जोडी आपल्या सिनेमात असणं म्हणजे सिनेमा चालणार हे समीकरण वाटत होतं.
१९९० च्या दशकांत प्रेम चोप्रा यांनी आज का गुंडाराज, खिलाडी, राजाबाबू, दुल्हेराजा या सिनेमात काम केलं. डायलॉग डिलिव्हरीनंतर त्यांचं एक विशिष्ट हास्य आहे ते सुद्धा लोकांना खूप लक्षात राहिलं आहे.
===
हे ही वाचा – ‘विमा एजंट’ ते ‘मोगॅम्बो’ – वाचा बॉलिवूडच्या आयकॉनिक ‘व्हिलन’ चा रंजक प्रवास!
===
९० च्या दशकात त्यांची लोकप्रिय झालेले डायलॉग म्हणजे, “कर भला तो हो भला”, आणि “नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या ?” हे प्रत्येकाच्या लक्षात असणार हे नक्की.
१९९६ नंतर आजपर्यंत प्रेम चोप्रा हे आता सकारात्मक आणि चरित्र अभिनेता म्हणून लोकांसमोर येत आहेत. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ हा मोठा रोल आणि त्यासोबतच धमाल, गोलमाल ३ हे त्यांचे लक्षात राहिलेले छोटे रोल म्हणता येतील.
नायक, सहकलाकार, खलनायक असा प्रवास करणारे प्रेम चोप्रा हे एकमेव कलाकार म्हणता येतील. खलनायकाचे काम करत असताना ‘व्हॅसलिन’ सारख्या जाहिरातीत काम करणारा हा एकमेव कलाकार आहे.
व्यक्तिगत आयुष्यात त्यांचा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या टोप्या गोळा करणं हा एक छंद आहे.
कोणत्याही रोलला “नाही” म्हणायचं नाही आणि सतत प्रयोग करत राहणे हे प्रेम चोप्रा यांच्या यशस्वी करिअरच्या यशाचं गमक म्हणता येईल.
बॉलीवुडमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या कित्येक नवोदित लोकांसाठी प्रेम चोप्रा यांच्या करिअरचा मार्ग, चिकाटी, स्वतःवरील विश्वास या गोष्टी नक्कीच प्रेरणादायी आहेत.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.