सलाम : पाकिस्तानातला जन्म असूनही भारतासाठी “सियाचीन राखणारा” अपरिचित वीर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी किती ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे याची गणनाच नाही. म्हणूनच पंधरा आॅगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस आपल्याकडे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात
दिडशे वर्ष इंग्रजांच्या ताब्यात असलेला आपला भारत देश स्वतंत्र झाला. हे दोन्ही दिवस आले, की टीव्हीवर देशभक्तीपर गाणी, देशभक्तीपर सिनेमे लागतात. ती गाणी ऐकताना, ते सिनेमे बघताना आपण खरोखर भारावून जातो. नुकताच आपण हा अनुभव घेतला आहे.
लहान वयात हसत हसत फासावर गेलेले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ‘मेरा रंग दे बसंती चोला’ म्हणत जाताना पाहिलं, की असं वाटतं आपण काय करतो देशासाठी?
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी! म्हणजे जन्म देणारी माता आणि जन्मभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ आहेत. ही जन्मभूमी मुक्त करण्यासाठी कितीजणांना काय काय सोसावं लागलं आहे याची कल्पनाही आपण करु शकत नाही.
कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार या कवितेत अशा स्वातंत्र्याची चळवळ उभी करुन झपाटलेल्या क्रांतिकारकांची मनस्थिती इतकी छान लिहीली आहे. असे अनेक लोक आहेत..ज्यांनी हसत हसत देशासाठी प्राण दिले.
—
हे ही वाचा : भगतसिंगची फाशी महात्मा गांधी रोखू शकत होते का? सत्य जाणून घ्या!
—
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशासमोर नवीन आव्हानं उभी होती. अजूनही आहेत. परकीय आक्रमणाचा धोका, अंतर्गत बंडाळी, गरिबी, बेकारी अशा आव्हानांचा मुकाबला करत करत आपल्या देशाचं स्वातंत्र्य आता पंच्याहत्तरी ओलांडून पुढं आलंय.
देशप्रेम दाखवायला काही पंधरा आॅगस्ट आणि सव्वीस जानेवारी यांचीच गरज नाही. बारा महिने ते मनात हवं. जगात कुठंही असा..आपल्या मनात आपल्या देशाचा विचार हवा.
देशानं माझ्यासाठी काय केलं? यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करता? काय करु शकता याचा विचार करा.. मग त्यासाठी तुम्ही भारतात असायलाच हवे असं नाही.. परदेशात जाऊन पण तुम्ही देशासाठी खूप काही करु शकता.
कर्नल नरेंद्र बुल कुमार यांची ही जीवनकहाणी हे दाखवून देते, तुमचा जन्म कुठेही झाला तरी देशावरचं प्रेम, निष्ठा ही हृदयात असावी लागते. नुकतंच त्यांचं ८७ व्या वर्षी निधन झालं. भारतीय सैन्यात कर्नल पदापर्यंत पोहोचलेले नरेंद्र कुमार यांनी खूप मोठी कामगिरी बजावली होती. त्यासाठी त्यांना गौरविण्यात आले होते.
रावळपिंडी येथे १९३३ साली जन्मलेले नरेंद्र कुमार यांच्या कुटुंबातच लष्करी सेवेची परंपरा होती. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय सिमल्यात रहायला आले. १९५० साली नरेंद्र कुमार यांनी लष्करात प्रवेश घेतला.
तिथेच बाॅक्सिंग खेळत असताना त्यांच्या कामगिरीवर खुश होऊन वरिष्ठांनी त्यांना बुल हे नांव दिलं. पुढे १९५४ मध्ये ते कुंमाऊ रेजिमेंट मध्ये कमिशन मिळवून दाखल झाले आणि त्यांना गिर्यारोहक म्हणून पण ओळखलं जाऊ लागलं.
कांचनजंगा, जंबोरी ही हिमालयातील शिखरं पादाक्रांत करुन त्यांनी सियाचीन ग्लेशियर वर गिर्यारोहण करायचं ठरवलं. त्या गिर्यारोहण मोहीमेवेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली..सियाचीन ग्लेशियरवर भारत पाकिस्तान यांची सीमा आखली होती.
जगाचा न्याय करायची हौस असलेल्या अमेरिकन समीटनं ती सीमारेषा आखली होती, पण ती चूक होती. ठरवलेल्या मोजमापापेक्षाही वेगळी. पाकिस्तानला जास्त झुकतं माप देऊन त्यांना जास्त भूभाग देणारी..
प्रत्यक्षात ही रेषा ठरलेली होती त्यानुसार नव्हतीच. याचा परिणाम असा होणार होता, की पाकिस्तान आणि चीन सरळ सरळ एकत्र येऊ शकणार होते.
नकाशावरुन कुमार यांना हा परिसर कसा पाकिस्तानच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात आलं. मग त्यांनी तीन आठवड्यांच्या मोहिमेत त्याचा बारकाईने अभ्यास केला.
आपल्या मोहीमेचा लेखाजोखा फोटोग्राफ, नकाशा, तयार केलेला व्हिडिओ हे सारं त्यावेळी असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर मांडलं. त्याचबरोबर आपल्या मोहीमेला इल्स्ट्रेटेड वीकली, हिमालयीन जर्नल मध्ये पण प्रसिद्धी दिली.
एक एक इंच भूभाग रक्षणारे आपले जवान जीवाची बाजी लावत थंडी, वारा, पाऊस यांची पर्वा न करता तिथे असताना अमेरिकेची ही खेळी केवळ आणि केवळ नरेंद्र कुमार यांच्यामुळे समजली.
इंदिरा गांधी यांनी तातडीने आॅपरेशन मेघदूत ही मोहीम आखली आणि आपला भूभाग आपल्या ताब्यात घेतला. लेफ्टनंट जनरल व्ही.आर. राघवन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते झाली.
लष्करी लोकांची खासियत म्हणजे ते श्रेयस प्रेयस यांच्या पलिकडे जाऊन फक्त आणि फक्त देशाची काळजी करतात. देशासाठी जगतात. देशासाठी आनंदाने मरतात.
ही मोहीम सुरू झाली ती नरेंद्र कुमार यांच्या अफाट निरिक्षणातून. म्हणून त्यांनी कौतुकाने नरेंद कुमार यांना माउंटन आॅफ इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा पर्वत अशी उपमा दिली.
—
हे ही वाचा : लडाखमध्ये चीनला धोबीपछाड देणाऱ्या “स्पेशल फ्रंटियर फोर्स” बद्दल वाचायलाचं हवं!
—
या कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार प्रदान केला. परम विशिष्ट सेवा मेडल मिळवणारे नरेंद्र कुमार हे एकमेव कर्नल होते. कीर्ती चक्र, अतिविशिष्ट सेवा मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अर्जुन अॅवाॅर्ड देऊन त्यांचा गौरव केला होता.
दुर्गम भागातील लष्करी सीमारेषांचा अभ्यास करून लष्कराला खूप मोठा हातभार लावला म्हणून त्यांना राॅयल जिआॅग्राफीकल सोसायटीची फेलोशिप दिली होती.
इतकंच नव्हे, तर सियाचीन ग्लेशियर वर भारतीय लष्कराचं जे हेड क्वार्टर आहे त्यालाही कुमार बेस असं नांव दिलं आहे. स्कीईंग शिकवण्यासाठी त्यांना युनायटेड नेशनने फेलोशिप दिली होती.
त्यांचा जन्म रावळपिंडी येथे झाला होता. रावळपिंडी आता पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर ते भारतात आले. जन्माने आपण पाकिस्तानी आहोत असं काहीही मनात न ठेवता नरेंद्र कुमार यांनी देशाची सेवा केली. देशाच्या उपयोगी पडेल अशी महान कामगिरी बजावली. याहून देशप्रेम वेगळं काय असू शकतं?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.