वय बदललं तरी व्यायाम तोच? सावधान, तुमची ही सवय सर्वात मोठी चूक ठरू शकते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘फिटनेस’- सध्याचा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. आज प्रत्येकाला ‘फिट’ रहायचं आहे, दिसायचं आहे. वय कोणतंही असो, फिटनेससाठी सध्या सगळेच जागरूक असतात.
काही वर्षांपर्यंत तरुणांमध्ये लोकप्रिय असणारा फिटनेसचा विषय कधी आपल्या घरात शिरला आणि घरचाच होवून गेला हे कळलंही नाही.
व्यायाम करण्याचे प्रकार, गरज वेगळी असेल; पण, आज कोणालाही फिटनेसचं महत्व सांगायची गरज नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
मागच्या काही वर्षांपासून सेल्फी, विडिओ, फिटनेस मोबाईल app या गोष्टी आल्याने पासून फिटनेससाठी आपल्यावर एक सोशल प्रेशर सुद्धा आहे असं म्हणता येईल. कारण, कोणताही फोटो बघितल्यावर किंवा भेट झाल्यावर “जाड झालास…” किंवा “तब्येत सुधरली… लग्न, जागा बदल मानवलं” अशा प्रतिक्रिया आधी येतात.
काही लोक यामुळे फक्त नाराज होतात. पण, काही लोक यातून प्रेरणा घेतात, स्वतःला पूर्ण आरश्यात बघायला लागतात आणि दुसऱ्या दिवशी पासून सुरू होणारा फिटनेस कार्यक्रम जाहीर करतात.
नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे, त्यानिमित्ताने कित्येक लोकांनी बरेच संकल्प केले असतील आणि कामाला सुद्धा लागले असतील.
फिटनेस अॅपच्या आकडेवारीचे फोटो जेव्हा पासून अपलोड व्हायला सुरुवात झाली, तेव्हा पासून एखादी स्पर्धा सुरू आहे असा फार भास होतो. ‘हेल्दी स्पर्धा’ जर आपल्या फिटनेससाठी होत असेल तर चांगली गोष्ट आहे. फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यावी की, आपलं वय काय आहे? कोणता व्यायाम आपल्यासाठी योग्य आहे, हे बघणं यासाठी गरजेचं आहे.
कित्येक लोकांना मनाने केलेल्या व्यायामाचे साईड इफेक्ट्स सुद्धा बघायला मिळत आहेत. आपल्यालापैकी अनेकांना ही बाब ठाऊक नसणं स्वाभिवाक आहे कारण अशा गोष्टी कोणी अपलोड करून सांगत नाही. आपणच सतर्क राहणं आवश्यक आहे.
घरात तरुण नातवाकडून प्रेरणा घेत आजोबांनी त्याच्यासारखाच व्यायाम करणं, किंवा मॉर्निंग वॉकला गेल्यावर ओपन जीममध्ये मिळेल त्या साधनांवर प्रयोग करणं ही बाब अत्यंत चुकीची आहे. यामध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकचं नव्हे तर तरुण, मध्यमवयीन, महिला या सगळ्यांचाच समावेश होतो.
तुम्ही योगा प्रशिक्षक किंवा जीम ट्रेनरचा सल्ला घेत असला तर योग्यच! मात्र जर स्वतःच्या मनाला वाटेल तो व्यायाम, वाटेल तेवढा आणि जमेल त्या वेळेत करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.
यातून केवळ हाडांची दुखणीच नव्हे तर ह्रदयविकारापासून थेट रक्तदाब वाढीपर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
सकाळी फिरायला जाणे, आहारावर नियंत्रण ठेवणे या सर्वांना उपयोगी गोष्टींसोबत वयानुसार कोणता व्यायाम योग्य? याबद्दल काही काही आरोग्यविषय संस्था आणि वेबसाईट्स यांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आलेली माहिती जाणून घेऊयात.
१. वयोगट – १३ ते २० वर्ष
साधारणपणे ते वय जेव्हा मुलांना एका ठिकाणी बसून अभ्यास करावा लागतो, या वयात प्रत्येकाने निदान १ तास तरी व्यायाम करण्यासाठी दिला पाहिजे असं ‘फिजिओथेअरपी’ सांगते.
या वयात हाडांची मजबुती वाढेल याकडे लक्ष देऊन मुलामुलींना पोहायला शिकणे, मैदानी खेळ जसं की फुटबॉल खेळणे यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
स्मार्ट टीव्हीमुळे मुलं स्मार्ट तर होत आहेत. पण, त्यांना भविष्यासाठी ‘फिट’ करणं ही जबाबदारी या वयात पालकांकडे असते. सांघिक खेळांमध्ये भाग घेतल्यास या वयात काही मुलांमध्ये होणारी चिडचीड कमी होऊ शकते.
२. वयोगट – २० ते ३० वर्ष:
कॉलेज, नवीन नोकरीच्या या वयोगटात प्रत्येकजण हा बरीच धावपळ करत असतो. बरीच स्वप्न बघितलेली असतात, त्यामागे धावणं सुरू असतं. तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर तुमचा अर्धा व्यायाम हा स्टेशनवर चालण्यात आणि लोकल पकडण्यातच खरं तर होऊन जातो.
तो फिटनेस, स्टॅमिना कायम ठेवण्यासाठी ‘कार्डिओ – हृदयाशी निगडित’ व्यायाम करावेत हे डॉक्टर्स सांगतात. दोरीवरच्या उड्या, सूर्यनमस्कार, मसल्स हे या वयासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे.
साधारणपणे ३० ते ४५ मिनीटे व्यायाम करण्यासाठी या वयात द्यावेत असं तज्ञ सांगतात. वातावरणातील ऑक्सिजन आपलं शरीर हे या वयात शोषून घेत असतं.
व्यायाम तर करावाच. पण, आठवड्यातून एक दिवस शरीराला आराम सुद्धा द्यावा असं फिटनेस तज्ञ सांगतात.
–
हे देखील वाचा – जिममध्ये व्यायाम करताना लोक ह्या १५ चुका करतात आणि तब्येतीचे नुकसान करून घेतात
–
३. वयोगट – ३० ते ४०:
करिअर आणि कुटुंब यासाठी सर्वात महत्वाचा हा काळ असतो. स्वतःचं घर घेणे, नव्यानेच सुरू झालेले कर्जाचे हफ्ते यामुळे या वयात आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकतं.
जर तुमची नोकरी ही जास्त ‘बैठक’ असणारी असेल तर तुम्ही या वयात ‘पायऱ्या चढून जाणे, मोबाईलवर बोलतांना चालणे, अधून मधून ब्रेक घेणे या सवयी लावणं आवश्यक आहे.
नुकत्याच ‘आई’ झालेल्या मुलींनी या वयात योगासन करणे हे इष्ट मानलं जातं. अधूनमधून ट्रेकिंग, रोज व्यायामासाठी १ तास हा दिनक्रम या वयात असावा.
कार्डिओ व्यायामावर या वयात सुद्धा भर द्यावा आणि आठवड्यातून एक दिवस विश्रांती नक्की घ्यावी.
४. वयोगट- ४० ते ५०
कौटुंबिक जबाबदारीतून थोडी मोकळीक मिळायला या वयात सुरुवात होत असते. आयुष्यात थोडा ‘ठेहराव’ येणाऱ्या, समाधानी वृत्ती असणाऱ्या या वयात वजन नियंत्रणात ठेवणं हे एक आव्हान असतं.
पाठदुःखीचा त्रास सुरू होऊ शकणाऱ्या या वयात धावणे हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. डंबेल्स उचलणे हा सुद्धा या वयात चांगला व्यायाम मानला जातो.
व्यायामाचे प्रकार वाढवण्यापेक्षा ‘व्यायाम करण्यात सातत्य राखणे’ हे या वयात जास्त अपेक्षित आहे. अर्थात हे करताना केवळ फिटनेसच्या वेडापायी अतिरिक्त ताण येत नाही ना? हे पाहणं गरजेचं आहे.
–
हे देखील वाचा – व्यायामाशिवाय वजन आटोक्यात ठेऊन ‘सुपर फिट’ राहण्यासाठी या १० टिप्स वाचाच!
५. वयोगट – ५० ते ६०:
आजारांपासून स्वतःला लांब ठेवणे हे या वयाचं प्राधान्य असतं. डायबेटिस, छातीत दुखणे, हृदयविकार हे या वयात जास्त प्रकर्षाने जाणवत असतं.
या वयात ‘जास्तीत जास्त चालणे’ हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. चालतांना गती जास्त असावी जेणेकरून घाम येईल याची काळजी घ्यायला हवी.
शरीराच्या हालचाली मंदावण्याची सुरुवात झालेल्या या वयात योगासन करून स्वतःला फिट ठेवावं.
६. वयोगट – ६० ते ७०
‘ज्येष्ठ नागरिक’ या प्रकारात मोडायला सुरुवात झालेल्या या वयोगटात ‘कॅन्सर’ सारख्या आजारांचा धोका जास्त असतो. जास्तीत जास्त शारीरिक कामं वाढवून स्वतःला या वयात ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं असतं.
न पटणाऱ्या गोष्टी सोडून देऊन आनंदी राहणे हा सुद्धा या वयातील एक व्यायाम म्हणता येईल.
आठवड्यातून दोन वेळेस तरी स्ट्रेचिंग करावं असं डॉक्टर सांगतात. चालणे हा वयाचा उपयुक्त व्यायाम आहे. अर्थात या वयात कोणता आणि किती व्यायाम करायचा यासाठी तज्ञांची मदत सर्वोत्तम ठरेल, कारण केवळ एखादा चुकीचा व्यायाम तुमच्या निरोगी आयुष्याला ब्रेक लावू शकतो.
७. वयोगट- ७० पासून पुढे
घसरून पडणे हा वयाचा सर्वात मोठा धोका समजला जातो. शरीर जितकं चलनात राहील तितकं ते निरोगी राहील हे या वयाचं गणित आहे.
जास्तीत जास्त कुटुंब, मित्रांसोबत वेळ घालवणे, आनंदी राहणे हा या वयातील सर्वोत्तम व्यायाम म्हणता येईल. कोणताही व्यायाम हा डॉक्टरला विचारल्याशिवाय करू नये हे वयातील सर्वात मोठं पथ्य म्हणता येईल.
‘फिटनेस’ म्हणजे तंदुरुस्त राहणे, निरोगी आयुष्य जगणे, जास्तीत जास्त कामात राहून स्वतःला मग्न ठेवणे हे एकदा लक्षात आलं की, कुठे थांबायचं? हे प्रत्येकाच्या लक्षात येतं. वयानुसार सातत्याने व्यायाम करा, सुंदर जीवनाचा आनंद घ्या.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.