कोविड लसीबद्दलचे “हे” हानिकारक गैरसमज मुळापासून दूर होणं अत्यावश्यक आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : मुकूल टिळक
लेखक क्लिनिकल रिसर्च क्षेत्रात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.
===
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड लसीकरण मोहिमेचा श्री गणेशा केला. त्या निमित्ताने या लसीसंदर्भात असलेले समज गैरसमज आणि त्यामागचे शास्त्र या विषयी थोडेसे….!
सध्या सोशल मीडिया, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, टीव्ही इत्यादींवर कोवीड लसीसंदर्भात बरीच उलट सुलट चर्चा माहिती येत आहे. त्यातला मुख्य मुद्दा हा भारतीय बनावटीच्या covaxin या लसीच्या परिणामकारकता(Efficacy) आणि निर्धोकता (Safety) या संदर्भातला आहे!
मुळात कुठल्याही लसीची चाचणी कशी होते आणि या चाचणीत व इतर औषधांच्या चाचणी मध्ये काय आणि कसा फरक आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
कुठल्याही रोगावरील औषधांच्या चाचणीत ते औषध विशिष्ट रोगावर किती परिणामकारक आहे हे बघणे महत्त्वाचे असते. यात इतर बऱ्याच गोष्टी असतात जसे चाचणीत भाग घेणाऱ्यांचे वय, लिंग, इतर व्याधी इत्यादी. त्या खोलात न शिरता मूळ मुद्दा औषधाची परिणामकारकता कशी मोजतात याकडे वळू.
जसे उच्च रक्तदाबाच्या औषधांच्या चाचणीमध्ये ते औषध निर्धोक (safe) असावेच लागते, पण किती परिणामकारक आहे ते ही महत्त्वाचे असते. म्हणजेच एक गोळी घेतल्यावर तुमचा रक्तदाब १५०-९० वरून १३०-८० अथवा १४०-८५ असा खाली येतोय की नाही हे सिद्ध व्हावे लागते तर आणि तरच त्या औषधाला परवानगी मिळते.
लसीच्या बाबतीत तसे मोजमाप नसते. इकडे मुळात तुम्हाला तो आजार झालेला नसतो आणि तो होऊ नये म्हणून लस असते. कोरोना लसीची परिणामकारकता मोजण्यासाठी लस घेतलेल्या व्यक्तीला १ mg कोरोना विषाणू नाही टोचता येत. ती व्यक्ती नॉर्मल आयुष्य जगताना किती काळ कोरोनामुक्त राहू शकते हे बघितले जाते.
लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या व्यक्तीचा संक्रमण दर (इन्फेक्शन रेट) बघितला जातो. समजा लस घेतलेल्या १००० जणात १ व्यक्ती संक्रमित झाली आणि न घेतलेल्या १००० जनात १०० व्यक्तींना कोरोना झाला तर लसीची परिणामकारकता ९९% आहे असे समजले जाते.
लसीच्या मानवी चाचण्या या भिन्न लिंग, वय, व्याधींच्या लोकामध्ये करणे गरजेचे असते आणि त्या निदान काही वर्षे चालतात. त्यामुळे सध्या ज्या काही लसी मान्यता मिळवण्यात यशस्वी झाल्यात त्या सगळ्यांना एमर्जन्सी वापराच्या अंतर्गत मान्यता मिळाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
अशी मान्यता तेव्हाच दिली जाते जेव्हा एखाद्या औषधाला किंवा लसीला दुसरा मान्यता प्राप्त पर्याय उपलब्ध नसतो आणि/किंवा महामारी सारखी परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणजे सारांशाने सगळ्याच मान्यता मिळालेल्या लसी या अजून मानवी चाचण्यांच्या फेज मध्येच आहेत!
आता मुद्दा covaxin चा. या लसीची फेज १ आणि २ चाचणी झाली आहे आणि त्यामुळे सेफ्टी सिद्ध झाली आहे व ही लस शरीरात antibodies तयार करते हे ही सिद्ध झाले आहे. राहिला मुद्दा परिणामकारकता. ही अजून सिद्ध होणे कागदोपत्री बाकी आहे…हे खरंच आहे, पण या लसीला क्लिनिकल ट्रायलच्या अंतर्गत इमर्जन्सी वापराला परवानगी मिळाली आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
याचा अर्थ जी व्यक्ती ही लस घेईल ती वैद्यकीय देखरेखीत राहील आणि काही परिणाम दिसल्यास त्या व्यक्तीला वैद्यकीय सेवा पुरवली जाईल.
दुसरा मुद्दा या चाचण्यांचा नियमावलीचा आणि ज्या पद्धतीने लोकांना चाचणीत भरती केले जाते त्याचा.
भारत आणि इतर विकसनशील, मागास देशात या चाचण्यांच्या बाबतीत जागतिक नियम आणि सूचनांचे नेहमीच उल्लंघन केले जाते आणि हे गेले कित्येक वर्षे चालू आहे. गेल्या काही वर्षात यात नक्कीच सुधारणा आहे मात्र अजूनही बरीच अनियमितता आहे!
चाचणीत सहभागी करण्यासाठी आवश्यक संमती पत्र (consent form) हे तर जुनंच दुखणे आहे. हे आत्ताच घडतंय असं काही नाही. फक्त सध्या या कोविडमुळे सगळ्या प्रसार माध्यमांचे लक्ष इकडे आहे व त्यामुळे हे प्रकाश झोतात आले आहे.
तेव्हा या सगळ्या गोष्टींचा अनावश्यक बाऊ न करता शासनाच्या नियमानुसार आणि प्रणालीनुसार लस टोचून घेणे हे इष्ट. यानिमित्ताने का होईना मानवी चाचण्यांच्या नियोजनात आणि राबवण्यात सुधारणा झाली तर ते चांगलंच!
एकंदरीतच आपलं ते वाईट आणि पाश्चात्य ते चांगलं या बऱ्याच लोकांच्या विचारसरणीमुळे परदेशी लशी सुरक्षित व आपली असुरक्षित ही भावना निर्माण होत आहे.
प्रत्येक देश आपली लस कशी सुरक्षित व प्रभावी आहे हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे, पण फायझर सारख्या नावाजलेल्या कंपनीच्या लसीच्या वापरानंतर सुद्धा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अर्थात या मृत्यूंचं प्रमाण हे अगदीच कमी आहे आणि हे मृत्यू लसीमुळे झालेत हे ही सिद्ध झालेले नाही…पण तरीही शंका घेण्यास वाव आहे.
या सगळ्यात सरकार चुकतंय का? तर उत्तर आहे .. हो नक्कीच…निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यात आणि पुरेशी माहिती देण्यात सरकार नेहमीप्रमाणेच चूक करतंय. योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहचत नाही आणि मग त्यातून गैरसमज निर्माण होत आहेत.
covaxin चा नक्की वापर चाचणी रुपात कसा होणार हे लोकांपर्यंत पोचलेले नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण करायला वाव मिळाला आहे! मुळातच कोवीडचा मृत्युदर कमी असल्यामुळे लस कशाला हवी असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे.
त्यात वैद्यकीय अनास्था, अपुऱ्या सुविधा आणि निर्माण झालेला गोंधळ यामुळे हा लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यात परत आपल्या कोवीड वॉरियर्सना महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.
अशा परिस्थितीत जास्तीत जास्त पारदर्शकपणे निर्णय घेणे आणि ते योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि लस उपलब्ध झाल्यावर क्रमवारीनुसार आपला नंबर आल्यावर ती घेणे ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.