' भीष्मांनी प्राणत्याग करण्यासाठी संक्रांतीचाच दिवस निवडण्यामागे आहे एक कारण! वाचा – InMarathi

भीष्मांनी प्राणत्याग करण्यासाठी संक्रांतीचाच दिवस निवडण्यामागे आहे एक कारण! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संक्रांतीचा सण..तीळाची उष्णता आणि गुळाचा गोडवा यांच्यामुळे थंडीचा कडाका सुसह्य व्हावा म्हणून एकंदरीत बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, लोणी वांग्याचं भरीत वगैरे भोगी दिवशी, तर संक्रांतीला गुळाची पोळी, तूप या उष्ण पदार्थांची खासियत आपल्याकडे असते. वास्तविक हे सणवार आहार -विहार या सर्वांची आखणी ऋतूमानानुसारच केलेली आहे.

सहा ऋतूंचे सहा सोहळे; असे आपल्याकडे विविधरंगी असलेले ऋतूमान. वर्षा, शरद, शिशिर, हेमंत, वसंत आणि ग्रीष्म हे सहा ऋतू. शिशिर हा थंडीचा मौसम. या दिवसात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. हे दक्षिणायन म्हणून ओळखलं जातं, पण संक्रांत झाली की दिवस रोज एक तीळ मोठा होऊ लागतो. म्हणजेच या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसाला मकर संक्रांत असं म्हणतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पंजाबमध्ये हा सण लोहरी, तर केरळमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवसानंतर उत्तरायण सुरू होते असे म्हणतात. थंडी सुसह्य व्हावी म्हणून या दिवसात खाण्याचे पदार्थ पण गरम गरम असतात. स्निग्धता असलेलं तूप लोणी, तीळ गूळ यांचा समावेश आहारात केला जातो, पण याच बरोबरीने अजून एक पौराणिक कथा या दिवसाशी संबंधित आहे.

 

tilgul inmarathi

 

कौरव- पांडव यांच्या महाभारतातील कथा आपणाला माहीत आहेतच. धृतराष्ट्र आणि पंडू यांच्या मुलांमधील वैराची कहाणी म्हणजे महाभारत. महाभारतात भीष्म पितामह यांचा सहभाग कुटुंबातील अतिशय जेष्ठ आदरणीय व्यक्ती असा होता.

देवव्रत हा शंतनु आणि गंगेचा मुलगा. जो शापित अष्टवसूंपैकी एक होता. सात वसुंना गंगेनं जन्मतः जलसमाधी देऊन मुक्ती दिली होती, पण शंतनुने आठव्या मुलाच्या वेळी गंगेला या गोष्टीचा जाब विचारला. ठरल्याप्रमाणे गंगेने‌ ते बाळ शंतनुला सोपवलं आणि ती निघून गेली. त्या बाळाचं नाव देवव्रत ठेवलं.

पुढं देवव्रत मोठा झाला आणि शंतनु मत्स्यगंधा या मुलीच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती, पण तिच्या वडीलांनी एक विचित्र अट घातली, सत्यवतीच्या मुलांनाच भरतकुलाचे वारसदार म्हणून मान्यता दिली तरच हे लग्न होईल. वडिलांच्या आनंदासाठी देवव्रताने आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्म प्रतिज्ञा केली आणि तेव्हापासून देवव्रत भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला.

 

bhishma inmarathi

सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य अशी दोन मुलं झाली. ती विवाहयोग्य झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीनही मुलींना भीष्माने भर स्वयंवरातून पळवून आणले. पैकी अंबा शाल्वनरेशाच्या प्रेमात होती. तिनं स्पष्ट सांगितलं, “मी यांच्यापैकी कुणालाही वरणार नाही. मी शाल्वनरेशाला वरले आहे.”

भीष्माने तिला सादर शाल्वनरेशाकडं पाठवलं. पण त्याने आता तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. कारण ती दुसऱ्या पुरुषाकडे राहीली होती. अंबा परत आली आणि तिने खुद्द भीष्मांनाच लग्न करण्याची विनंती केली, पण भीष्मही प्रतिज्ञाबद्ध असल्यामुळे तिच्याशी लग्न करु शकत नव्हते. संतापलेली अंबा निघून गेली. पुढे या अंबेने भीष्मावर सूड उगवण्यासाठी शिखंडी या तृतीयपंथीच्या रुपात पुनर्जन्म घेतला.

 

mahabharat inmarathi

 

जेव्हा कौरव आणि पांडव यांच्यात राज्य मिळवण्यासाठी युद्ध झाले ते युद्ध १८ दिवस चालू होते. दोन्ही बाजूची अपरिमित हानी झाली. कौरव हळूहळू पराभवाच्या छायेत सरकत होते. शेवटी भीष्म पितामह कौरव सेनेचे सेनापती म्हणून उभे राहिले. पांडवांना त्यांनी आपल्या युद्ध कौशल्याने सळो की पळो करुन सोडले.

पांडवांनी शिखंडीला त्यांच्यासमोर उभे केले. भीष्मांनी सांगितलं, “शिखंडी ना स्त्री आहे ना पुरुष.त्याच्यावर मी हत्यार उपसणार नाही.” शिखंडीला उभं करुन अर्जुनाने पितामह भीष्मांवर शरसंधान केले. भीष्म त्या बाणांच्या वर्षावाने शरपंजरी पडले.

 

mahabharat

 

पितामह भीष्मांना इच्छा मृत्यूचे वरदान होते. त्यांनी उत्तरायण सुरू झाल्यानंतरच प्राणत्याग करायचे ठरवले होते. कारण, भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा याच दिवशी भगीरथा पाठोपाठ गंगा नदी कपिल मुनींच्या आश्रमातून समुद्राला मिळाली होती. म्हणून हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. याचमुळे गंगासागर येथे संक्रांतीदिवशी पर्वकाळ मानला जातो.

आपल्याकडे अशी धार्मिक मान्यता आहे, दक्षिणायन म्हणजे चातुर्मास. चातुर्मास ही देवतांची रात्र मानली जाते. म्हणूनच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. व्यास पौर्णिमेला दक्षिणायन सुरू होतं. या चातुर्मासात स्वर्गाचे द्वार बंद असते. उत्तरायण सुरू झाले, की स्वर्गाचे दार उघडते. म्हणून भीष्मांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच प्राणत्याग करायची इच्छा बाळगली होती.

संक्रांतीला उत्तरायण सुरू झाले आणि भीष्मांनी संक्रांतीदिवशीच प्राण त्याग केला.

संक्रांतीला किती धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यता आहे.. आपले पूर्वज खरोखर धोरणी होते. धर्म आणि परंपरा यांचा सुरेख समन्वय साधून सणवार साजरे करायची पद्धत किती यथार्थ आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?