महिला आणि पुरुषांच्या केसांना सुंदर करणारी ही गोष्ट भारताने जगाला दिली आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“अगं, सोड ना ते केस! अजून छान दिसशील”, असं अनुष्का शर्मा एका जाहिरातीत आपल्या मैत्रिणीला म्हणते. म्हणजे सुंदर दिसण्यासाठी केस हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे विचार करा हं, जर माणसाला केस नसते तर….. छे, छे काहीतरीच काय! विचारही करवत नाही, हो ना!
केस नसते तर मुलींना लांब केस सोडता नसते आले, वेणी घालता आली नसती, स्ट्रेटनिंग… कर्ली, लेयर्स आणि ब्ला ब्ला ब्ला अशा फॅशन नसत्या करता आल्या. तर मुलांना केसांचा कोंबडा काढणे, स्पाईक काढणे इत्यादी गोष्टी करता आल्या नसत्या. लसित मलिंगाने सुद्धा एक आपली स्टाइल काढली होती, तो कट मलिंगा कट म्हणून ओळखला जायचा.
नमनालाच घडाभर तेल झालेलं आहे. तुम्हाला वाटेल, की आजचा विषय हा केसांवर आहे तर… थोडं थांबा… आजचा विषय आहे केस स्वच्छ, रेशमी, चमकदार ठेवणाऱ्या शाम्पू वर…आणि हा शाम्पू भारताने जगाला दिला आहे त्यावर.
भारतात आयुर्वेदामुळे खूप पुरातन काळापासूनच अनेक औषधींची माहिती आहे. आपल्या आयुर्वेदात केसांपासून पायाच्या नखांपर्यंत कशी काळजी घ्यायची याची माहिती आहे. पूर्वापार चालत आलेल्या या गोष्टी अजूनही तशाच आहेत.
केसांच्या बाबतीतही हा नियम लागू आहे. केसांची काळजी कशी घ्यायची, त्यांची निगा कशी राखायची, केस वाढीसाठी कोणते उपाय करायचे, केस स्वच्छ करण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी सविस्तर माहिती आयुर्वेदात मिळते.
केस स्वच्छ करण्यासाठी भारतात आधीपासूनच शिकेकाई, रिठा, नागरमोथा, आवळा यांची पावडर वापरली जायची. भारतातल्या स्त्रियांना केस धुण्याच्या समस्या त्यामुळे कधीच जाणवल्या नाहीत.
परंतु युरोप खंडात अशी परिस्थिती नव्हती. एक तर तिकडे प्रचंड थंडी. तशा कडाक्याच्या थंडीत पाणी तापवण्याची पूर्वी सोयही नव्हती. तिथे पडणाऱ्या सततच्या पावसामुळे, बर्फामुळे वाळलेले लाकूड ही मिळणे कठीण, मग पाणी तापवणार कसे? त्यामुळे रोज अंघोळ करणे देखील मुश्किल.
दररोज अंघोळ करायला मिळणे ही त्या काळी त्यांच्यासाठी चैन होती. त्यात केस धुणे हा प्रकार त्यांच्यासाठी अजूनच कठीण होता. तिथे अशा कोणत्याही आयुर्वेदिक वनस्पती देखील उगवत नाहीत.
तिथे प्रत्येकाच्या घरात आंघोळीची व्यवस्था असेलच असंही नव्हतं. म्हणूनच तिथे सार्वजनिक बाथरूम उपलब्ध असायचे. या बाथरूममध्ये पैसे देऊन आंघोळ करावी लागायची. तरीही केस धुण्यासाठी विशेष काही व्यवस्था नव्हती.
सतराव्या शतकात युरोप खंडाची आशियाई देशांची ओळख होत होती. त्यावेळेस भारतात १७५९ मध्ये कलकत्ता येथील एका नाभिक कुटुंबात दीन मोहम्मद यांचा जन्म झाला. त्यांना घरातूनच आयुर्वेदिक साबण आणि शाम्पू बनवायचं शिक्षण मिळालं. त्याच बरोबर ते लोकांची चंपी ही करायचे, म्हणजेच तेल मालिश किंवा हेड मसाज. शाम्पू हा शब्द चंपी या शब्दावरूनच आला आहे.
तसं त्यांचा इथे काही बरं चाललं होतं. पण नवीन काहीतरी करायची ओढ म्हणा, नाहीतर वाढलेली स्पर्धा म्हणा, या मोहम्मद महाशयांनी १८०० साली आपला सारा बोरीबिस्तरा घेऊन लंडन गाठलं. तिथं उदरनिर्वाहासाठी त्यांना जी कला अवगत होती त्याचाच त्यांनी तिथे वापर केला.
त्यांनी तिथल्या सार्वजनिक बाथरूम जवळ लोकांची चंपी करायला सुरुवात केली. जे लोक तिकडे आंघोळीसाठी यायचे आणि जर आंघोळीसाठी वेटिंग असेल तर मोहम्मद कडून मालिश करून घ्यायचे. हळूहळू मोहम्मद यांनी आपला जम बसवला. नंतर मग आपल्याबरोबर नेलेली आयुर्वेदिक औषधांची पूड लोकांना केस धुण्यासाठी वापरायला सुरूवात केली.
मोहम्मद यांनी केलेली चंपी आणि नंतर धुतलेले केस यामुळे ते थोड्याच अवधीत लंडनमध्ये भरपूर प्रसिद्धीस आले. थोड्याच दिवसात त्यांनी स्वतःचा ‘मोहम्मद बाथ स्पा’ चालू केला आणि मग तिथूनच चंपी पासून शाम्पू प्रसिद्ध झाला. मोहम्मद इतके प्रसिद्ध झाले, की ते तिथल्या राजाचे (किंग जॉर्ज चौथा आणि किंग विल्यम चौथा यांचे) सध्याच्या भाषेत ‘हेअर ड्रेसर’ बनले.
त्यावेळेस सर्वच क्षेत्रात नवीन नवीन शोधही लागत होते. वैद्यकीय क्षेत्रातही प्रगती होत होती होती. स्वच्छतेचे महत्व समजायला लागले होते. म्हणूनच तिथले डॉक्टर्स त्यांच्या अनेक रुग्णांना मोहम्मद यांच्या बाथ स्पामध्ये जाण्याचा सल्ला द्यायचे. त्यावेळेच्या लंडनमधल्या वर्तमानपत्रात देखील मोहम्मद यांच्या बाथ स्पा चे कौतुक व्हायचं.
दीन मोहम्मद यांनी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे बाथ स्पा काढले. वेटिंगमध्ये असणाऱ्या गिर्हाईकांना वाचण्यासाठी पुस्तके वगैरे ठेवली. ज्यांना सूर्यप्रकाश हवा आहे अशा लोकांसाठी देखील एक स्वतंत्र खोली केली.
अशा रीतीने शाम्पूची ओळख जगाला झाली. तरीही त्याकाळी शाम्पू ही एक महागडी वस्तू होती. सर्वसामान्यांपर्यंत शाम्पू मिळत नव्हता. सर्वच देशातील केवळ उच्चभ्रू समाजात शाम्पू ही चैन परवडू शकत होती.
सुरुवातीला शाम्पू हा साबणाच्या रूपातच मिळायचा. डॉक्टर्सही गळणाऱ्या केसांसाठी, कोंडा झाल्यास तो साबणाचा शाम्पू वापरा असं सांगायचे.
१९२० ते १९३० या काळात शाम्पू तयार करण्याच्या पद्धतीवर अनेक रिसर्च झाले आणि शेवटी आज उपलब्ध आहे तो लिक्विड स्वरूपातील शाम्पू तयार झाला. हा लिक्विड शाम्पू तयार केला गेला तो जर्मनीमध्ये. त्यानंतर शाम्पूला जी प्रसिद्धी मिळाली ती अजूनही टिकून आहे. त्यानंतर जन्म झाला तो एका मोठ्या शाम्पू इंडस्ट्रीचा.
आता तर ऑईली केसांसाठी, कोरड्या केसांसाठी, केसात कोंडा झाल्यास, केस खाली स्प्लिट होत असल्यास वेगवेगळे शाम्पू उपलब्ध आहेत. अगदी केसांना हेअर कलर केला किंवा डाय केलं तर त्यानंतर कोणते शाम्पू वापरायचे हे ही आता बाजारात मिळतात. प्रवासात घेऊन जाण्यासाठी किंवा एका वेळच्या वापरासाठी देखील शाम्पू सॅशे मिळत आहेत.
या शाम्पूमुळे केसांना एक तजेला मिळत आहे, केस स्वच्छ राहण्यासही मदत होते. आता तर शाम्पूनंतर कंडीशनरही लावायला सांगितले जाते. ज्यामुळे केस अधिक चमकदार, रेशमी आणि तजेलदार दिसतात. म्हणजे भारतानेच ही शाम्पूची देणगी जगाला दिली आहे असं म्हटलं तरी वावगं नाही होणार.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.