जाणून घ्या स्त्री सौंदर्य खुलविणाऱ्या काजळाबद्दलची अतिशय रंजक व उपयुक्त माहिती!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘डोळे हे जुलमी गडे’ हे ज्या डोळ्यांकडे पाहून म्हटलं जातं, त्या डोळ्यांची आकर्षकता वाढते ती काजळ लावल्यामुळे. आजकाल तर डोळ्यांना स्मोकी लूक देण्यावर भर दिला जातो.
हे आपल्याला बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिका करीना कपूर, ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, आलिया भट यांचे काही लूक्स बघितल्यावर लक्षात येईलच.
आता डोळे स्मोकी करणे देखील एक स्टाइल स्टेटमेंट झाली आहे. या नायिकांनी आपला हा लूक अगदी कान्स फेस्टिवल पर्यंत नेला आहे. केवळ त्या डोळ्यांवरून त्यांची ओळख पटते.
अनेक सिनेस्टार डोळ्यांमध्ये काजळ घालतात. आणि सिनेस्टार जी फॅशन करतात तिचं अनुकरण इतर लोकही करतात. एकूण काय, तर काजळ आता परत एकदा ट्रेंडमध्ये आलेलं आहे.
आज कालच्या तरुणींच्या मेकअप किट मधील काजळ हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तसंही भारतात जवळ जवळ सर्वच प्रांतातील स्त्रिया डोळ्यात काजळ घालतात. तर लहान बाळांच्या डोळ्यातही काजळ घातलं जातं.
बाळांना कुणाचीही नजर लागू नये म्हणून काजळाचा तीटही लावला जातो. मुख्यतः काजळाचा वापर डोळे आकर्षक दिसावे याकरिता केला जातो.
खरंतर डोळे हे बाहेरचे जग आपल्याला दाखवणारा आरसा आहे. म्हणजे आपल्याला बाहेरच्या जगाशी जोडणारा दुवा म्हणून आपण डोळ्यांकडे बघू शकतो. पण ते तितकेच नाजूक देखील आहेत, त्यामुळेच त्यांची देखभाल करणे देखील तितकेच आवश्यक आहे.
कारण दिवसेंदिवस होत असलेल्या हवेतल्या प्रदूषणामुळे, सतत मोबाईलचा वापर केल्यामुळे, स्क्रीन समोर राहिल्यामुळे डोळ्यांवर एक प्रकारचा ताण येतोय.
म्हणूनच डोळे ताजेतवाने, पाणीदार राहण्यासाठी घरी बनवलेले उत्कृष्ट काजळ केव्हाही चांगले. काजळ लावल्यामुळे डोळ्यांचे बाहेरच्या धुळीपासून संरक्षण होते. डोळे चमकदार होतात डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
भारतात तरी काजळ लावण्याची परंपरा आजीकडून आईकडे, आईकडून मुलीकडे असं होत होत पिढ्यानपिढ्या आली आहे. त्याकाळी प्रदूषणाचा इतका त्रास नसेल, पण तरीही डोळे आकर्षक दिसावेत याच करिता काजळ घातलं जात असावं.
शिवाय काजळ घातलं की स्त्रियांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून येतं. चारचौघींमधे काजळ घातलेली स्त्री उठून दिसते.
काजळामुळे डोळ्यांची क्षमता देखील वाढते. म्हणूनच बाळ जन्माला आल्यापासून त्याचे डोळे चांगले व्हावेत याकरिता काजळ घातलं जातं.
तसंच ते काजळ काळं असल्यामुळे, आपल्या बाळाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही असाही विश्वास भारतीय मातांमध्ये आहे. बाहेरची कुठलीही इडापिडा त्या काजळामुळे आपल्या बाळाला शिवणार नाही, अशी एक सर्वमान्यता आहे.
आपण पाहिलं असेल की भारतीय पारंपारिक नृत्यामध्ये नर्तक किंवा नर्तकी या काजळाचा वापर करताना दिसतात. म्हणजे कथकली असेल किंवा भरतनाट्यम. त्यातील कलाकार चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसण्याकरिता आपल्या डोळ्यांचा खूप छान वापर करतात.
त्यांच्या डोळ्यातील ते भाव लोकांना समजावेत याकरिता हे कलाकार डोळ्यात काजळ घालतात. भारतात जवळजवळ पाच हजार वर्षांपूर्वीपासून काजळ वापरले जात असल्याचे उल्लेख आहेत.
परंतु भारतात मुख्यतः स्त्रियाच काजळ लावताना दिसतात. याचा विचार करताना असं लक्षात येतं की पूर्वी स्वयंपाक हा केवळ चुलीवर केला जायचा. आणि तो करताना चुलीमध्ये धूर निर्माण व्हायचा.
त्या धुराचा त्रास स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला नक्कीच व्हायचा. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता होती, ते टाळण्यासाठीच स्त्रिया डोळ्यात काजळ घालत असाव्यात. अर्थात याबद्दल फारशी माहिती नाही.
काजळाचे फायदे :
तसे काजळाचे फायदे देखील पुष्कळ आहेत. जर तुम्ही शुद्ध आयुर्वेदिक काजळ वापरत असाल तर डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, डोळ्यांचे आजार शक्यतो होत नाहीत.
आयुर्वेदिक काजळतही प्रकार आहेत. एक काजळ मेणासारखे असते. त्याला “सौविरांजन” असे म्हणतात. हे काजळ दिवसा लावायचे असते.
तर दुसरे जे मधासारखे काजळ असते त्याला “रसंजना” असे म्हणतात. हे काजळ रात्री झोपताना डोळ्यात एखादा थेंब टाकायचे असते.
काजळ टाकल्यावर डोळ्यातून लगेच पाणी येते. आणि डोळ्यात दिवसभरात गेलेली धूळ किंवा बाहेरील बारीक कचरा गेला असेल तो वाहून जातो. डोळ्यांचा लालसरपणा कमी होतो.
परंतु हे काजळ महिन्यातून केवळ ५ – ६ रात्रीच घालावे. याचा अति वापर करू नये. हे काजळ घातल्यानंतर मोबाईल, टीव्ही किंवा इतर कोणताही इलेक्ट्रॉनिक प्रकाश बघू नये, त्याचा त्रास होऊ शकतो.
काजळ घातल्यानंतर लगेच झोपी जावे. त्यामुळे शांत झोप लागेल आणि सकाळी उठल्यावर डोळे स्वच्छ झाल्यासारखे वाटेल.
आयुर्वेदात वात-पित्त-कफ हे त्रिदोष सांगितलेले आहेत, यांचे जे उपदोष आहेत म्हणजे आलोचक पित्त, तर्क कफ आणि प्राण वात हे दोष डोळ्यांशी निगडीत आहेत. जर डोळ्यांचे आरोग्य चांगले असेल तर या उपदोषांचा त्रास होत नाही.
डोळ्यातील धूळ कचरा हा काजळ लावल्यामुळे येणाऱ्या पाण्यामुळे वाहून जातो, डोळे स्वच्छ होतात.
काजळ लावताना खालच्या पापणीला मसाज केला जातो, त्यामुळे त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे दृष्टी सुधारते.
काजळ लावल्यामुळे सूर्याच्या तीव्र किरणांपासून डोळ्यांचा बचाव होतो. डोळ्यांना थंडावा मिळतो. डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो.
नियमितपणे काजळ लावल्यास मोतीबिंदू देखील लवकर होत नाही. तर असे हे बहुगुणी काजळ. भारतात प्रत्येक राज्यात काजळ वापरलं जातं. अर्थात त्याला वेगवेगळी नावं आहेत.
म्हणजे पंजाबी आणि उर्दू मध्ये काजळला सुरमा म्हणतात, तर हिंदी बंगाली आणि गुजरातीमध्ये काजल असं म्हटलं जातं. संस्कृत मध्ये याला अंजन असे म्हणतात. तर कन्नड मध्ये काडीगे, मल्याळम मध्ये कानमशी, तेलुगूमध्ये काटूका, तमिळमध्ये कानमई म्हटलं जातं.
बरं, काजळ हे फक्त भारतातच वापरलं जातं असं नाही तर जगभरातही त्याचा वापर होतो हे दिसून येते. अगदी मुस्लिम समाजातील लोकही, म्हणजे पुरुषही काजळ घालताना दिसतात.
याचं कारण म्हणजे प्रेषित महंमद हे स्वतः काजळ घालायचे. काजळामुळे डोळे निरोगी राहतात याला त्यांचीही मान्यता होती.
आशिया खंडात प्रत्येक देशात हे काजळ वापरले जाते. इजिप्तमध्येही पुरातन काळापासून काजळ वापरले जाते. आफ्रिका खंडातही अनेक जमाती मध्ये काजळाचा वापर केलेला दिसतो.
म्हणजे अगदी डोळ्यांसाठी काजळ वापरत नसतील पण शरीराच्या इतर भागावर ते काजळ लावतात.
आजकाल तर कुठल्याही सौंदर्यप्रसाधनेचा सामानातील काजळ हा महत्त्वाचा घटक झाला आहे. त्याला आता नवं रूपही आलंय…आता हे काजळ कोहल पेन्सिलीच्या स्वरूपात मिळते!
पण काजळ हे लहान असो किंवा मोठं कुणीही जास्त प्रमाणात वापरणं योग्य नाही. गावाकडच्या घरात लहान मुलांच्या डोळ्यात काजळ घालण्याचं प्रमाण आणि त्या काजळाची क्वालिटी याचा त्राससुद्धा लहान मुलांना होतो!
डोळ्याची जळजळ किंवा अलर्जी असा त्रास ज्यांना आहे त्यांनी काजळाचा काळजीपूर्वक वापर करायला हवा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.