' विराटची ही “अनोखी कामगिरी” तुम्हाला चकित करेल, हे नक्की! – InMarathi

विराटची ही “अनोखी कामगिरी” तुम्हाला चकित करेल, हे नक्की!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

नुकतीच भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसरी कसोटी जिंकली. ऑस्ट्रेलियाने ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ हरणं हा तर चर्चेचा विषय ठरलाच आहे. पण, खरी चर्चा आहे ती तर अजिंक्य रहाणेच्या कप्तानीची!

 

ajinkya-rahane-captain-inmarathi

 

विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघ अधिकच अडचणीत जाईल असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. अगदी ४-० अशा फरकाने भारताला व्हाईटवॉशचा सामना करावा लागेल असंही ही मंडळी म्हणत होती.

मायकल वॉन, रिकी पॉन्टिंग, मायकल क्लार्कसारख्या अनेक दिग्गजांनी केलेली ही भविष्यवाणी अगदीच सपशेल फोल ठरली आहे.

भारताचा हा विजय पॉन्टिंग आणि क्लार्क या ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारांना फारच झोम्बलेला असणार…

अर्थात, या विजयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय संघाचा कर्णधार हा विषय चर्चेत आला. ‘विराटकडे कप्तानपद ठेवावं की नाही?’, ‘रोहितला टी-२० संघाचा कर्णधार का करू नये?’  हे प्रश्न गल्लीबोळातील क्रिकेट एक्सपर्ट्सना आता पडू लागले आहेत. अजिंक्यचं शांत मनाने विचार करणं, रोहितची आयपीएलमधील उत्तम कामगिरी या सगळ्या गोष्टी पुन्हा चघळल्या जात आहेत.

खरं तर माझ्याही मनात हे असे विचार येऊन गेलेच आहेत. भारतीय संघव्यवस्थापनाने सुद्धा, इतरांप्रमाणेच Multiple Captains चा फंडा वापरायला हवा. (मला सुद्धा त्या स्वघोषित experts च्या यादीत ढकलायचं असेल, तर खुशाल ढकला) पण, माझं कारण थोडं वेगळंय.

अजिंक्यला कसोटी कर्णधार केलं की त्याचं संघातील स्थान निश्चित होईल. जे अत्यंत आवश्यक आहे. रोहितला टी-२० चा कर्णधार म्हणून पाहण्याची संधी मिळेल, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, विराटवरचा भार कमी होईल.

 

ajinkya-rahane-inmarathi

 

म्हणजे मग अनेक दमदार विक्रम रचायला तोही मोकळा. या तिघांचा एक फॅन मल्टिपल कॅप्टन्स मागतोय, हे आता तरी कळलं का?

तसं पाहायला गेलं तर, विराट सचिनचे अनेक विक्रम मोडीत काढेल असं सध्यातरी वाटतंय. त्याची एकंदर आकडेवारी आणि वनडे क्रिकेटमधील शतकांचा ४३ हा आकडा हे पुरावे या वक्तव्यासाठी पुरेसे आहेत. फलंदाजीतील विक्रमांची मोठी यादी स्वतःच्या नावावर करून घेऊ पाहणारा हा विराट, गोलंदाजीमधील एका अनोख्या विक्रमच धनी आहे, हे तुम्हाला माहित्ये का?

 

virat-bowling-inmarathi

 

ही गोष्ट आहे २०११ च्या ऑगस्ट महिन्यामधली… त्यावेळी भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. कसोटी मालिकेत दारुण पराभव पत्करल्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असलेला भारतीय संघ मालिकेतील एकमेव टी-२० सामना ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३१ तारखेला तारखेला खेळला.

 

young-virat-bowling-inmarathi

 

कसोटी संघाचा भाग नसलेला, तरुण, तडफदार विराट कोहली मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी नुकताच संघात दाखल झाला होता. तो इतिहास घडवणार आहे, हे त्यावेळी कुणालाही ठाऊक नव्हतं.

या एकमेव टी-२० सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या प्रत्येकी २ खेळाडूंनी पदार्पण केलं. इंग्लंडचे ऍलेक्स हेल्स आणि जोस बटलर, तर भारताकडून सध्याचा बदली कर्णधार अजिंक्य रहाणे आणि ‘द ग्रेट इंडियन वॉल’ राहुल द्रविड!

होय, ते द्रविडचं टी-२० सामन्यांमधील पदार्पण ठरलं. गमतीची गोष्ट अशी, की त्यापूर्वीच त्याने मर्यादित षटकांच्या सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली होती. म्हणजे, निवृत्तीनंतर पदार्पण अशी एक आगळीच किमया या सामन्यात घडून आली.

पदार्पण करणारा अजिंक्य रहाणे तुफान खेळला. ३९ चेंडूत खणखणीत ६१ धावा ठोकत त्याने भारताला चांगली धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

 

ajinkya-inmarathi

 

सुरेश रैनाच्या, १९ चेंडूंमधील धमाकेदार ३३ धावा आणि द्रविडची २१ चेंडूंमधील ३१ धावांची वेगवान खेळी, असा सगळा लेखाजोखा जमा करून भारताने १९.४ षटकांत सर्वबाद १६५ धावांची मजल मारली.

ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात आता खरी कसोटी होती ती गोलंदाजांची. म्हटलं तर आव्हान फार मोठं नव्हतं, आणि म्हटलं तर फार लहानही नव्हतं. इंग्लंडचे फलंदाज सज्ज होते. पहिल्या ७ षटकांमध्ये ६० धावांची मजल सुद्धा मारलेली होती.

मग नेहमीप्रमाणे माहीच्या सुपीक डोक्यातून नवी कल्पना जन्माला आली. त्याने विराटच्या हाती चेंडू ठेवला.

त्यावेळी विराट स्वतःला क्विक बॉलर म्हणून घेत असे, असं कुठेतरी वाचनात आलंय. त्याचा रनअप आणि गोलंदाजी पाहता, हा आता गमतीचा विषयच ठरतो. असो. पण, एक गोष्ट मात्र होती; त्याची गोलंदाजीची शैली नावाजलेला अष्टपैलू क्रिस हॅरिससारखी आहे, असं अनेकांचं म्हणणं होतं.

 

virat-kohli-bowling-inmarathi

 

तोच विराट कोहली आपल्या कारकिर्दीमधील पहिला चेंडू टाकत होता. त्याने चक्क वाईड बॉल टाकला. पण, त्यानंतर जे झालं ते ऐतिहासिक होतं. एकही चेंडू टाकला नाही आणि विराटला विकेट मिळाली. कारण, त्याने केविन पीटरसनला वाईड बॉलवर बाद केलं होतं. वाईड चेंडू असल्याने तो मोजला गेला नाही. पण, विराटच्या नावावर विकेट मात्र लागली.

माजी यष्टीरक्षक आणि एकमेवाद्वितीय एमएस धोनीची, नेहमीसारखी अवाक करणारी अफलातून कामगिरी सुद्धा यष्ट्यांमागे पाहायला मिळाली होती. वायुवेगाने त्याने यष्ट्या उडवणं आणि इतरांनी (फलंदाजाने सुद्धा) नुसतंच पाहत राहणं ही गोष्ट काही नवी नव्हती.

 

m-s-dhoni-stumping-inmarathi

 

वाईड बॉलवर वेळ न दवडता त्याने पीटरसनला तंबूत पाठवलं. हा चेंडू मुद्दाम वाईड टाकला होता, की चुकून पडला होता, यावर अनेक तर्कवितर्क करण्यात आले. सत्य कधीच बाहेर आलं नाही, पण धोनीच्या चलाख यष्टिरक्षणामुळे विराटच्या नावावर एक विश्वविक्रम लिहिला गेला.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटने आजवर अवघे ८ गडी बाद केले आहेत. त्यातही कारकिर्दीच्या ‘शून्य’ चेंडूवर पहिला गडी बाद करणारा एकमेव खेळाडू होण्याचा मान मात्र त्याला मिळालाय.

बाकी, कुणाच्या नावावर काय विक्रम असावा हे खरंच सांगता येत नाही. लेगस्पिनचा जादूगार शेन वॉर्नने वनडे सामन्यात फक्त एकदाच ५ गडी बाद केले आहेत, तर आपल्या लाडक्या सचिनच्या नावावर २ वेळा ही कामगिरी नोंदवली गेली आहे.

सांगायचा मुद्दा हा, की विक्रमाच्या बाबतीत विराटचं नशीब कधी उजळेल ते सांगता येत नाही. तर मग त्याच्यावरील कर्णधारपदाचा भार कमी झाला, तर तो अधिक उत्तम कामगिरी करून नव्या विक्रमांना गवसणी घालेल, ही शक्यता नाकारता येत नाही; नाही का!!!

 

virat-featured-inmarathi

 

बाकी कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली आहे की नाही, आणि त्याच्याच हाती संघाची धुरा राहील की नाही, हे येणारा काळ ठरवेलच…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?