महाराष्ट्राच्या लाडक्या ‘पुलं’ना, पहिलावहिला ‘स्टॅन्डअप कॉमेडियन’ का म्हणू नये…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – ईशान घमंडे
===
स्टॅन्डअप कॉमेडी म्हटलं की मला सगळ्यात आधी झाकीर खान आठवतो. त्याच्याआधी स्टॅन्डअप कॉमेडियन झाले नाहीत असं नाही; किंवा मी त्याआधी स्टॅन्डअप कॉमेडी पाहिली नव्हती असंही नाही. पण, या प्रकाराला स्टॅन्डअप कॉमेडी म्हणायचं असतं, हे कळलं ते झाकीर खानचं सादरीकरण पाहायला सुरुवात झाली तेव्हापासून…
‘इडियट बॉक्स’ संबोधल्या जाणाऱ्या टीव्हीवर, जेव्हा खरोखर चांगल्या दर्जाचे कार्यक्रम दाखवले जात असत, त्या काळात ‘हास्यसम्राट’, ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ वगैरे सारखे विनोदी कार्यक्रम बघत होतो. त्यावेळी अजितकुमार कोष्टी, सुनील पाल वगैरे मंडळी खूप हसवत असत. त्याला स्टॅन्डअप कॉमेडी म्हणतात हे मात्र त्यावेळी माहित नव्हतं. आता तर या स्टॅन्डअप कॉमेडीचं फारच पेव फुटलंय.
वादविवादामुळे सातत्याने चर्चेत असणारा कुणाल कामरा तर आता सगळ्यांना ठाऊक झाला आहे. स्टॅन्डअप या प्रकारचा रस नसणारे अनेकजण सुद्धा या व्यक्तीला ओळखतात. झाकीर खान, विपुल गोयल, बिस्वा कल्याण रथ, तन्मय भट, अभिषेक उपमन्यु, अदिती मित्तल अशी मोठीच्या मोठी यादीच मांडता येईल या विनोदवीरांची!
मराठीत सुद्धा भाडिपाने या स्टॅन्डअप कॉमेडीला ग्लॅमर मिळवून दिलं. सारंग साठ्ये, सुशांत घाडगे, मंदार भिडे वगैरे मंडळी स्टॅन्डअप कॉमेडी करतात आणि ती लोकांना आवडते.
पण, थोडंसं मागे जाऊन स्टॅन्डअप कॉमेडी या प्रकाराला ग्लॅमर नव्हतं तो काळ बघुयात. (माझ्यासारखी या शब्दाविषयीचं अज्ञान असणारी मंडळी, ग्लॅमर असलेला काळ आणखी उशिराने पाहू लागली, हा भाग निराळा)
त्याकाळात, एका मराठी व्यक्तीने, खऱ्या अर्थाने लाईव्ह ऑडियन्सला पोट धरून हसायला भाग पाडलं होतं. त्यांची सादरीकरणाची पद्धतच निराळी होती.
या प्रकाराला ग्लॅमर सुद्धा मिळालं नव्हतं त्याकाळातही आपले सगळ्यांचे लाडके पुलं, स्टेजवर उभं राहून समोर बसलेल्या सगळ्या मंडळींना खोखो हसवायचे.
तसं वपुंचं कथाकथन किंवा आचार्य अत्रे यांनी केलेल्या राजकीय विषयांवरील शाब्दिक कोट्या, हे सुद्धा हसवणूक करण्यासाठी पुरेसं होतं. पण, त्याला पुलंची सर नाही असं मला तरी वाटतं.
पुलंना लाईव्ह पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली नाही, त्या आमच्या आणि यापुढील काळातील नव्या पिढ्यांसाठी युट्युबसारखा उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेच.
अश्लील शब्द, शिव्या आणि आरडाओरडा यांचा वापर न करता स्टॅन्डअप कॉमेडी कशी केली जाते, हे जाणून घ्यायचं असेल तर एकदा पुलंना ऐकायलाच हवं…
व्यक्ती आणि वल्ली हे पुलंचं साहित्य वाचणं म्हणजे उत्तम मनोरंजन आहे. पण, तेच ऐकण्याची मजा काही औरच आहे. रावसाहेब, सखाराम गटणे, अंतू बर्वा, नारायण, हरितात्या, पेस्तन काका, अशा वल्लींच्या कहाण्या त्यांच्या तोंडून ऐकताना, ती किती महान व्यक्ती होती हे ध्यानात येतं.
रावसाहेब सादर करताना ‘त्यांच्या तोंडी असलेली वाक्यं जशीच्या तशी म्हणून दाखवायची म्हणजे कठीणच आहे’ असं म्हणत, ते एकही अश्लील शब्द न वापरता टाळ्या घेत असत. त्यांच्या या व्यक्तिरेखांच्या तोंडी असणाऱ्या संवादांपैकीच काही संवाद निवडायचे झाले, तर असं म्हणता येईल; “पुलं हे ‘हंड्रेड पर्सेंट’ स्टॅन्डअप कॉमेडियन होते, हे ‘पुराव्याने शाबीत करीन’ बरं का मंडळी”.
प्रत्येक व्यक्तिरेखेसाठीचा आवाज, लहेजा, शब्दांमध्ये विश्राम घेण्याचा काळ, सारं सारं काही वेगळं… त्या व्यक्तिरेखा जणू काही समोर उभ्या राहून आपल्याला हसवत आहेत असं वाटावं, इतका जिवंतपणा बोलण्यात!
‘व्यक्ती आणि वल्ली’मधील या मंडळींच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज, गांधी, नेहरू वगैरे महान व्यक्तित्वांवर सुद्धा पुलंनी विनोद केले.
पण, आजच्या स्टॅन्डअप कॉमेडीयन्ससारखं त्यांच्याकडे कुणी बोट दाखवलं नाही. कारण विनोद करत असताना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत असं सादरीकरण त्यांनी केलंय. नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या आम्हा मंडळींना सुद्धा त्यांचे हे विनोद मनापासून आवडतात.
‘ज्यांच्यापुढे ‘कर’ जोडावेत अशी फक्त हीच मंडळी’ अशी कोटी ते त्यांच्या ‘मुंबईकर, नाशिककर आणि पुणेकर’ या विनोदी सादरीकरणातून करून जातात. तरीही या तिन्ही मंडळींपैकी कुणीही “ऑफ़ेन्ड” होत नाही, हे महत्त्वाचं… याचं संपूर्ण श्रेय त्यांच्या शैलीला जातं.
त्यांचं सादरीकरण ऐकत असताना हे लक्षात येईल की, प्रेक्षक मनमुरादपणे दाद देतात, खळखळून आणि मनापासून हसतात आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मंडळींवर बाष्कळ विनोद करण्याची वेळ कधीही येत नाही.
अश्लील शब्द आणि प्रेक्षकांचा अपमान अशा कुबड्या न वापरता ऑडियन्सला पोट धरून हसायला लावणाऱ्या पुलंची महानता काय असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
त्यांच्या हावभावांमधून, त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून हे विनोद अगदी सहजपणे आपल्यापर्यंत पोचतात. प्रेक्षकांना हसण्यासाठी आणि दाद देण्यासाठी कधी, कुठे, किती वेळ द्यावा हे सुद्धा पुलं बरोब्बर ओळखून होते असं म्हणायला हवं. पुलंनी सादर केलेलं त्यांचं स्वतःचं लिखाण ऐकून पहाच, म्हणजे हेही तुमच्या सहज लक्षात येईल.
स्टॅन्डअप कॉमेडियनकडे आणखी एक महत्त्वाचा गुण असावाच लागतो, तो म्हणजे निरीक्षणशक्ती… पुलं आणि निरीक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात अशा पद्धतीने सोबत आहेत. ‘म्हैस’ या त्यांच्या कथेतून त्यांच्या या निरीक्षणशक्तीचा परमोच्च बिंदू ‘ऐकायला’ मिळतो. सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टीत सुद्धा विनोद कसा शोधावा, हे या कथेच्या सादरीकरणात ऐकायला मिळतं.
या कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला, पण पुलंनी एकट्याने, एकावेळी या कथेतून जेवढं हसवलं असेल तेवढं त्या संपूर्ण चित्रपटाने सगळ्या कारकिर्दीत सुद्धा हसवलं नसावं. (मी स्वतः हा चित्रपट पाहिलेला नाही, पण ऐकीव माहितीच्या आधारे हे एवढं बोलण्याचं धाडस करायला हरकत नाही असं मनापासून वाटतं)
असा चित्रपट येऊन गेला, हे पुलंच्या सगळ्या चाहत्यांना सुद्धा कदाचित ठाऊक नसेल. एक नितांतसुंदर कथा चित्रपट स्वरूपात टिकाव धरू शकली नाही, मात्र पुलंच्या सादरीकरणातून ती खळखळून हसवते; यातही पुलंच्या स्टॅन्डअप कॉमेडीची ताकद पाहायला मिळते.
‘मी आणि माझा शत्रूपक्ष’ या लिखाणाचं अभिवाचन सुद्धा असंच धमाल आहे. कुलकर्णी, जोशी ही आडनावं आणि वसंत हे नाव, अशा सर्वाधिक वापरात असलेल्या नावांसह केलेली कोटी असो, किंवा ‘वीट’ या शब्दाचा एकाच वाक्यात दोन अर्थाने केलेला वापर, या गोष्टी मनात एकदम फिट्ट बसल्या आहेत.
‘असा मी असामी’ हे कारकुनाचे आत्मचरित्र… एखाद्या सामान्य गोष्टीला असामान्य बनवणं, ही पुलंची खासियतच आहे. कारकुनाचं आत्मचरित्र म्हणून प्रसिद्ध असलेलं हे त्यांचं सादरीकरण, एकदा तरी ऐकायलाच हवं. (तसं पाहायला गेलं, तर त्याची पारायणं झाली पाहिजेत. पण, ते असो)
धोंडो भिकाजी जोशी म्हणून पुलं या असामीची गोष्ट सांगतात, त्यावेळी हास्याचे सगळे प्रकार आपण अनुभवतो. पुलं स्वतः किती भन्नाट असामी होती, हे यावेळी कळून येतं.
मुळात जबरदस्त आणि ओघवी शैलीत केलेलं लिखाण आणि मग तेच स्वतःच्या खुमासदार शैलीत मंचावर सादर करणं, यात पुलं प्रवीण होते. त्यांचं हे प्राविण्य वाखाणण्याजोगं आहेच. आजच्या काळातील स्टॅन्डअप कॉमेडियन जे काही करतात, त्या जवळपास सगळ्याच गोष्टी पुलं अगदी लीलया करत.
फक्त त्यावेळी या प्रकाराला स्टॅन्डअप हे गोंडस नाव मिळालं नव्हतं.
प्रेक्षकांना खिळवून ठेवणं, त्यांची उत्सुकता वाढवणं आणि त्यांना मनमुराद हसायला लावणं या गोष्टी पुलंनी लीलया साधल्या होत्या, असं म्हणूयात ना…
याच गोष्टी एका स्टॅन्डअप कॉमेडियनला जमल्या पाहिजेत. म्हणूनच, पुलं खऱ्या अर्थाने, पहिले स्टॅन्डअप कॉमेडियन होते, असं मी म्हणतो.
पुलं या दोन अक्षरांमध्ये आपलं अवघं जीवन सामावून जावं, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतोच. मी पामर त्याविषयी आणखी काय बोलणार…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.