जेव्हा परवीन बाबीने केले होते अमिताभवर “अतिशय गंभीर” स्वरूपाचे आरोप
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘प्रेम आंधळं असतं’ असं नेहमीच म्हटलं जातं. प्रेमात पडलेली व्यक्ती ही चूक काय किंवा बरोबर काय हा विचार करत नसते. आपण कित्येक अशा प्रेमकथा ऐकल्या, वाचल्या किंवा मोठ्या पडद्यावर बघितल्या आहेत ज्यामध्ये प्रियकर हा प्रेयसीला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होत असतो.
सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांच्या प्रेमकथा सुद्धा सिनेमाला साजेश्या असतात हे आपण नेहमीच बघितलं आहे. दोन कलाकारांच्या प्रेमकथेत प्रेक्षकांना खूप रस असतो.
अमिताभ बच्चन हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ७० च्या दशकात पूर्ण सिनेसृष्टीला भुरळ घातली होती. प्रेक्षकांना तर अमिताभ हे आवडायचेच आणि आवडतातच, पण त्यांच्यासोबत काम करणारी प्रत्येकअभिनेत्री सुद्धा त्यांच्या प्रेमात पडायची असं म्हटलं जातं.
रेखा आणि जया भादुरी यांची नावं अमिताभ सोबत जोडली गेली होती. हे आपल्याला माहीत आहे, पण परवीन बाबीसुद्धा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात होत्या आणि त्यांना मिळवण्यासाठी ‘काहीही’ करायची त्यांची तयारी होती.
हे ही वाचा –
===
१९७४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मजबूर’ मध्ये पहिल्यांदा अमिताभ-परवीन बाबी हे एकत्र काम करत होते. प्रेक्षकांना ही जोडी आवडत होती. दिवार, कालिया, नमक हलाल, डॉन, शान, अमर अकबर अँथनी असे सुपर हिट्स या जोडीच्या नावावर आहेत. दोघांमध्ये चांगली मैत्री होती, ज्याचं रूपांतर हे काही दिवसात एकतर्फी प्रेमात झालं.
मानसिक रित्या स्थिर नसलेल्या परवीन बाबी यांचं बॉलीवूड करिअर हे यशस्वी होतं. त्यांचं आजारपण हे त्यांच्या करिअरच्या आड कधीच आलं नाही, पण अमिताभ यांच्यासाठी अक्षरशः वेड्या होत्या.
अमिताभ-परवीन बाबी या जोडीबद्दल प्रत्येक बातमी तेव्हा मासिकात छापून यायची. बॉलीवूड स्टार्सबद्दल जाणून घेण्यासाठी तेव्हा मासिक हे एकच माध्यम होतं. ‘मायापुरी’ या मासिकाने गाजवलेल्या त्या काळात या जोडीबद्दल नेहमीच लिहिलं जाऊ लागलं. अमिताभ यांचं १९७३ मध्येच जया भादुरी यांच्याशी लग्न झालेलं होतं.
आपल्या प्रेमाला न मिळवू शकलेल्या परवीन बाबी यांनी अमिताभ यांच्यावर ‘जीवे मारण्याचा’ आरोप केला होता. फक्त आरोपच नाही, तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली होती. अर्थातच, त्यात काही तथ्य नव्हतं. पोलिसांनी पूर्ण प्रकाराची चौकशी केल्यावर असं लक्षात आलं, की हे सगळं परवीन बाबी यांच्या मानसिक आजारातून घडलं होतं.
स्क्रीझोफ्रेनिया या मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या परवीन बाबी यांनी कधी त्यावर इलाज केलाच नाही. हा आजार त्यांना आधीपासूनच होता असं डॉक्टर सांगतात, पण कधीच उपचार न पूर्ण केल्याने तो आजार कधी नियंत्रणात आलाच नाही.
२००५ मध्ये गूढ मृत्यू झालेल्या परवीन बाबी यांच्याबद्दल दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं, की “परवीन बाबी यांच्या मानसिक आजाराचं प्रमाण असं होतं की, त्यांना कोणीही मारायला आल्यासारखा भास व्हायचा. आम्ही खूप चांगले मित्र होतो. लोकांना आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच आवडली. परवीन या सेट वर नेहमीच शांत असायच्या. फार कधी कोणाशी जास्तीचं बोलणं नाही, आवाज नाही. त्यांच्या अचानक जाण्याने मी खूप दुःखी झालो आहे.”
परवीन बाबी या त्यांच्या वेस्टर्न लुकमुळे प्रेक्षकांना नेहमीच आवडल्या. १९७० च्या दशकातील सर्वात ‘ग्लॅमरस’ अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. ‘सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री’ म्हणून परवीन बाबी यांचं नाव घेतलं जायचं. प्रतिष्ठित ‘टाईम्स’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या त्या पहिल्या बॉलीवूड अभिनेत्री होत्या.
हे ही वाचा –
===
१९८५ मध्ये बॉलीवूड मध्ये काम करणं बंद केल्यानंतर त्या ‘इंटेरिअर डिझायनर’ म्हणून काम करायच्या. जुनागढ मध्ये एका मुस्लिम परिवारात जन्मलेल्या परवीन बाबी यांनी १९७२ मध्ये मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती.
१९७३ मध्ये ‘चरित्र’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा काम केलं जो की फ्लॉप होता, पण परवीन बाबी यांना निर्मात्यांनी नोटीस केलं होतं आणि त्यांना अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करायची संधी मिळाली होती.
झीनत अमान आणि परवीन बाबी यांचं नाव ७० च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री म्हणून घेतलं जाई. हेमा मालिनी, रिना रॉय, राखी, नीतू सिंग यांच्यासोबत स्पर्धा असतांना आपलं स्थान निर्माण करणं हे परवीन बाबी यांच्यासाठी सोपं नव्हतं.
स्क्रीझोफ्रेनियामुळे त्यांनी अमिताभ बच्चन, रॉबर्ट रेडफोर्ड, बिल क्लिंटन यांच्या विरुद्ध सुद्धा त्यानी तक्रार दाखल केली होती. एका मासिकाला मुलाखत देतांना त्यांनी अमिताभ यांचा उल्लेख एक ‘आंतरराष्ट्रीय गँगस्टर’ म्हणून केला होता.
मानसिक आजार हे बरे होऊ शकतात. जर परवीन बाबी यांनी वेळीच उपचार घेतले असते तर आज त्यासुद्धा त्यांच्या करिअरच्या सेकंड इनिंग मध्ये यशस्वी असल्या असत्या. गरज होती ती एक सत्य मान्य करायची आणि आपल्या कामाकडे लक्ष देण्याची. स्वतःला त्रास करून घेणाऱ्या आणि इतरांना त्यात सहभागी करुन घेणाऱ्या व्यक्तींपेक्षा आजची ‘मुव्ह ऑन’ करणारी पिढी चांगलीच म्हणावी लागेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.