ओळखलंत? तुम्ही मारलेला गवा बोलतोय मी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
लेखक : व्यंकटेश कल्याणकर
===
समस्त माणसांनो आणि विशेषत: पुणेकरांनो
खूप नमस्कार,
ओळखलतं का मला? इतक्यात विसरणार नाहीत, अशी आशा आहे. मी आज तुमच्या माणसांच्या जगात सकाळी सकाळी ‘चुकून’ आलेला गवा बोलतोय. माणसं प्राण्यांच्या जंगलात सहजपणे शिरतात. पण प्राण्यांना माणसांच्या जंगलात शिरल्यावर काय सोसावं लागतं, हे मी आज अनुभवलं. दुर्दैवाने तो माझा शेवटचा अनुभव ठरला.
मेलेले सजीव पुन्हा बोलतात का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण सजीव प्राणी विशेषत: माणसं ज्यावेळी निर्जिवासारखं वागतात ना तेव्हा मेलेल्या सजीवांना बोलावं लागतं. म्हणूनच मी तुम्हाला आज लिहित आहे.
आधी मला माझ्याबद्दल तुम्हाला सांगावं लागेल. कारण गुगलवर, युट्युबवर किंवा फेसबुकवर स्क्रोल करता करता कधी तरी तुम्ही फक्त माझा चेहरा पाहिला असेल. मी जंगलातील सर्वांत उंच जंगली गाय आहे. गायीची दूरची नातेवाईकच म्हणा ना. भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगढ, ओरिसा व ईशान्य भारत हा आमचा प्रमुख प्रदेश. म्हणजे इथं आम्ही कळपाकळपाने राहतो. विशेष म्हणजे आम्ही शाकाहारी आहोत. आम्ही मांसाहार करत नाही. हत्ती, गेंडा, पानघोडा आणि जिराफ यांच्यानंतर जमिनीवरील सर्वांत वजनदार प्राणी म्हणून आमची गणना होते.
आम्ही स्वत:हून कधीही कोणाला हानी पोहोचवित नाही. पण आम्हाला एखाद्यापासून मग तो प्राणी असो अथवा माणूस; धोका आहे, असं वाटतं, त्यावेळी आम्ही त्यांच्यावर हल्ला चढवतो. पण ते ही कळपाने. कारण आमचा मूळ स्वभाव हा अतिशय भित्रा, घाबरट आहे.
आता, पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये मी कसा आलो, ते सांगतो. मागील अनेक दिवसांपासून आमच्या कळपासोबत पुढे पुढे जात होतो. पण एकाएकी मला एकटेपण जाणवू लागलं. मी कळपाच्या मागे राहू लागलो. माझा उत्साह अचानक कमी झाला. मला असं वाटू लागलं की मी एकाकी पडलो आहे. आमच्या कळपातील एकाने मला धीर दिला. पण त्याने माझा उत्साह पुन्हा परत येऊ शकला नाही. मला वाटलं आता आपल्या कळपातच आपल्याला कोणी विचारत नाही, तर या कळपात कशाला रहायचं?
मला एकटेपणा जाणवला. आता जगायचंच नको, असं वाटू लागलं. तुम्ही माणसं आत्महत्या करता. पण आम्हा प्राण्यात तरी अशी काही प्रथा नाही. आम्ही मरण येत नाही, तोवर धीराने काही असो किंवा नसो स्वत:च्या हिंमतीवर जगत राहतो.
मग मोठ्या धीराने मी स्वत:चा मार्ग स्वत:च शोधला. कळपाची नजर चुकवून काल रात्रीच्या अंधारात मी माझा मार्ग बदलला. ती अंधारी रात्र माझ्या आयुष्यातील शेवटची होती, हे कुठं मला ठाऊक होतं.
सकाळी सूर्य उगवला तेव्हा मी तुम्हा माणसांच्या वस्तीत आणि सिमेंटच्या जंगलात होतो. ते पुणे नावाचं शहर होतं. तो कोथरुड परिसर होता आणि मी उच्चभ्रू वस्ती असलेल्या महात्मा सोसाटीत होतो, हे मला आता मेल्यावर समजलं. मग मला प्रचंड भीती वाटली. कारण तुम्ही माणसं दिवसाढवळ्या माणसांना मारता असं मी ऐकलं होतं, तिथं आम्हा प्राण्यांची विशेषत: गव्याची काय गय? म्हणून माझा थरकाप उडाला.
सकाळ पूर्ण उजाडायच्या आतच बघता बघता, मला बघायला शेकडो माणसं आली. एकाचवेळी एवढी माणसं बघायची मला सवय नव्हती. शिवाय माणसांबद्दल आधीच आम्हा प्राण्यांच्या मनात अनेक पूर्वग्रह आहेत. म्हणून आणखीच भीती वाटली. त्यातच आमचा मूळ स्वभावच भित्रा. त्यामुळे एका अर्थाने तिथेच माझे प्राण निघून गेले होते. पण तुमच्यापैकी काही माणसं कनवाळू असतात आणि ते आम्हा प्राण्यांवर दया दाखवतात असंही मला माहिती होतं. म्हणून थोडासा धीर उरला होता.
माणूस बघून मला काय करावं सुचेना. आजूबाजूला फक्त सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती. मग मी सैरभैर झालो. पुन्हा माझ्या कळपात जावं. त्यांच्या सोबत आनंदानं रहावं, तिथेच आपण सुरक्षित आहोत, हे समजलं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
मी इकडे तिकडे धावू लागलो. खूप धावलो. एकाकी आणि स्वतंत्र जगण्याच्या स्वप्नापायी मी रात्रीपासून पाण्याचा थेंबही घेतला नव्हता. घशाला कोरड पडली. पोटात अन्नाचा कण नाही. पण तरीही एवढा मोठा देह घेऊन मी धावत राहिलो. धावत राहिलो. जवळपास मी सलग पाच तास धावत होतो. कोणीतरी मला पकडायला आल्याचे समजले. मी आणखी घाबरलो. शिवाय माझ्यामागं काही माणसं लागली.
सलग पाच तास धावणं, सैरभैर होणं, एवढा मोठा देह घेऊन पुढे पळणं, शिवाय मागे माणसांची मोठी गर्दी धावत येणं हे सगळं मला अनाकलनीय होतं. त्यामुळे मी जोपर्यंत जगता येईल, तोपर्यंत जगलो. अखेर माझ्या मनाची इच्छा असली तरी माझ्या शरीरानं साथ दिली नाही. शेवटी मला रक्तदाब वाढला, प्रचंड धाप लागली. दम लागला. आता मी धावूच शकत नव्हतो. जिथं होतो तिथचं धावता धावता कोसळलो. आणि पुन्हा कधीच उठलो नाही. कारण माझं हृदय बंद पडलं. आणि माझा श्वासही बंद झाला. हळूहळू माझ्या जड देहातील प्राण बाहेर पडला आणि कोणत्याही चिंतेविना माझा अनंताकडील प्रवास सुरु झाला.
ज्या जगात माणूस मेल्यावरही फार काही फरत पडत नाही. त्या जगात एक गवा मेल्यानं तुम्हाला काय फरक पडेल, मला माहिती नाही. पण तुम्हा माणसांच्या जगात माझ्या निमित्ताने आम्हा प्राण्यांना आता स्थान नाही, हे मला आणि माझ्या कळपाला, बंधु-भगिनींना नक्कीच समजलं असेल.
मी फक्त शेवटची एक प्रार्थना करतो, तुमच्या जगात आम्हा प्राण्यांना स्थान नसू द्यात. पण तुमच्या जगात माणसांना आणि माणसांच्या हृदयात माणसांच्या हृदयांना स्थान असू द्यात. ते संपलं की हे जग म्हणजे केवळ एक निर्वात पोकळी बनेल, यात शंका नाही. ती नका बनू देऊ एवढ्यासाठीच हा पत्र प्रपंच!
तुमचा कधीच नसलेला
गवा
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.