पाकिस्तानच्या सीमापार कुरापती सुरूच… भारताने सावध रहायलाच हवं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : स्वप्निल श्रोत्री
===
“ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून भारतीय सीमेवर उखळी तोफांचा मारा सुरू आहे, त्याचा जर विचार केला तर भारतावर पुढील काही दिवसात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ”
कोणताही देश विकसित तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा त्याच्या आजूबाजूचे देश विकासाच्या वाटेवर असतील. जर शेजारील देशात अशांतता, अनागोंदी आणि अस्थैर्य असेल तर साहजिकच त्याचे फटके आपल्या देशालाही बसणार आहेत.
त्यामुळे जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू पाहणारी आणि विकसित होऊ इच्छिणारी राष्ट्रे आपल्या शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध ठेवतात.
त्यांच्या समस्या ह्या आपल्या समस्या असे समजून त्या निवारणासाठी प्रयत्न करतात. परंतु, ह्याला अपवाद असणारी अनेक राष्ट्रे आज पृथ्वीतलावर असून त्यात पाकिस्तान चे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले पाहिजे.
भारत, पाकिस्तान सह संपूर्ण जग आज कोरोना महामारी आणि आर्थिक संकटाशी झुंजत असतानाही पाकिस्तानने आपला मूळ स्वभाव काही सोडला नाही.
मागील दहा दिवसात पाकिस्तान कडून भारतीय सीमेवर गोळीबाराच्या इतक्या घटना घडल्या आहेत की, त्याची सरासरी गेल्या सहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त भरते. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी कराराच्या भंगामुळे दोन्हीकडील जवान, सामान्य नागरिक, पाळीव जनावरे आणि संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
परंतु, तरीही पाकिस्तानची खोड काही जात नाही. त्यामुळे पाकिस्तान सतत करत असलेल्या शस्त्रसंधी कराराच्या उल्लंघनामागे मूळ कारण काय आहे? हे समजणे आवश्यक आहे.
हिमालयातील भौगोलिक परिस्थिती
सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून हिमालयात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होण्यास लवकर सुरुवात होईल.
एकदा हिमालयासह काश्मीर खोर्यात बर्फवृष्टी सुरू झाली की, तेथील रस्ते, महामार्ग दळणवळणाचे साधने पुढील तीन ते साडेतीन महिन्यासाठी ठप्प होतात. जनजीवन विस्कळीत होते.
परिणामी काश्मीर खोऱ्यात बर्फ जमा होण्याच्या आगोदर भारतात दहशतवादी पाठविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो.
भारतासोबत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर ( एल. ओ. सी ) मोठ्या प्रमाणावर गोळीबार व उखळी तोफांचा मारा करायचा जेणेकरून भारतीय जवानांचे लक्ष विचलित होईल आणि दहशतवादी दुसऱ्या मार्गाने पाकिस्तानातून भारतात प्रवेश करतील ही साधारण पाकिस्तानची योजना असते.
भारताला सतर्क राहणे गरजेचे :
पाकिस्तान किंवा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा अभ्यास केला तर साधारणपणे हे हल्ले ऑक्टोबर – नोव्हेंबर ते फेब्रुवारी – मार्च दरम्यान झालेले दिसतात.
आधी सांगितल्याप्रमाणे हिमालय आणि काश्मीर खोऱ्यात बर्फ जमा होण्याच्या अगोदर पाकिस्तानचे दहशतवादी भारतात येतात, परिस्थितीची माहिती घेवून हल्ला करतात. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर …
१) श्रीनगर हल्ला – १३ मार्च २०१३
२) जम्मू हल्ला – २० मार्च २०१५
३) पठाणकोट हल्ला – २ फेब्रुवारी २०१६
४) उरी हल्ला – १८ सप्टेंबर २०१६
५) बारामुल्ला हल्ला – ३ ऑक्टोबर २०१६
६) हांडवारा हल्ला – ६ ऑक्टोबर २०१६
७) नागोर्टा हल्ला – २९ नोव्हेंबर २०१६
८) सुंजूवन हल्ला – १० फेब्रुवारी २०१८
९) अवंतीपुरा हल्ला – १४ फेब्रुवारी २०१९
ह्या शिवाय इतर अनेक. त्यामुळे ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून भारतीय सीमेवर उखळी तोफांचा मारा सुरू आहे, त्याचा जर विचार केला तर भारतावर पुढील काही दिवसात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारताचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न :
येत्या वर्षापासून पुढील दोन वर्षांसाठी भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होत आहे. सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्याची भारताची फार जुनी इच्छा असून भारताच्या ह्या मागणीला जगातील अनेक राष्ट्रांचा विशिष्ट आफ्रिकेतील देशांच्या वाढता पाठिंबा आहे.
मागील वर्षी जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या सदस्यत्वाला जर्मनीचा पाठिंबा असल्याचे म्हणले होते.
थोडक्यात भारतीय उपखंडाचा नेता ते जागतीक नेता असा भारताचा प्रवास सुरू असून भारत जागतिक राजकारणात निर्णायक भूमिका निभावू नये म्हणून पाकिस्तान शस्त्रसंधीचा नियमांचे उल्लंघन करताना दिसतो.
शस्त्रसंधीचा भंग करून पाकिस्तान जागतिक समुदायाला असा संदेश देऊ इच्छितो की “भारत हा आपल्या शेजारील राष्ट्रांशी असलेल्या समस्यांमध्येच गुंतला असून तो जागतिक राजकारणात भूमिका घेऊ शकत नाही.” असो.
पाकिस्तान पेक्षा चीनची कोंडी करणे अधिक आवश्यक :
पाकिस्तान समस्येवर गेल्या सत्तर वर्षात भारताने हरतह्रेचे उपाय करून पहिले. चार वेळा युद्ध केले, मैत्री प्रस्ताव करून पाहिले, बहिष्कार टाकला, आर्थिक कोंडी केली, आंतरराष्ट्रीय दबाव टाकून पाहिला.
परंतु, आजही पाकची समस्या आहे तशीच आहे. पाकिस्तान हा पायापासून डोक्यापर्यंत कर्जात बुडालेला देश असून राजकीय अनागोंदी तेथे मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यामुळे स्वतःच्या बळावर असले ‘ उद्योग ‘ करणे शक्य पाकला नाही. परंतु, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे चीन भारताला नामोहरम करण्यासाठी पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करीतअसतो.
चीनची अर्थव्यवस्था मोठी आहे. शिवाय लष्करी ताकद ही अफाट आहे. त्यामुळे पाकिस्तानसह चीनशी एकाचवेळी पंगा घेणे भारताला परवडण्यासारखे नाही.
परंतु, भारतात होणाऱ्या दहशतवादी घटनांचा थेट संबंध चीनशी आहे हे आंतरराष्ट्रीय समुदायाला पटवून देणे भारताला सहज शक्य आहे.
मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांकडून जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या वेळेस चीनवर मोठा आंतरराष्ट्रीय दबाव भारत आणि अमेरिकेकडून टाकण्यात आला होता आणि चीन त्या दबावासमोर झूकला सुद्धा होता.
त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचा दबाव चीनवर टाकणे गरजेचे आहे. पाकिस्तान हे अपयशी ठरलेले राष्ट्र असून पाकिस्तान समोर भारत द्वेशाशिवाय कोणताही दृष्टिकोन नाही.
ज्या दहशतवादाच्या बळावर पाकिस्तान आज भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, तोच दहशतवाद पाकिस्तानचा भविष्यात घात करणार हे निश्चित आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.