' बेळगावातील चौकीदार ते अमेरिकन संसद सदस्य, एका भारतीयाचा सॉलिड प्रवास! – InMarathi

बेळगावातील चौकीदार ते अमेरिकन संसद सदस्य, एका भारतीयाचा सॉलिड प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यावर्षीची अमेरिकेतील निवडणूक हा एक चर्चेचा विषय होता. तसंही अमेरिकेतील निवडणूक ही जगभरातील लोकांसाठी कुतूहलाचा विषय असतो. अमेरिका ही एक जागतिक महासत्ता असल्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकांकडे असतं.

भारतासाठी ही निवडणूक महत्त्वाची यासाठीच ठरली, की भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या.

महाराष्ट्रीयन लोकांसाठीही ही निवडणूक महत्त्वाची ठरली, ती ही अमेरिकास्थित महाराष्ट्रीयन माणूस या निवडणुकीत विजयी झाला म्हणून. त्यांचे नाव श्रीधर ठाणेकर. ‘श्री ठाणेकर’ या नावाने ते ओळखले जातात. मिशिगन राज्यात ते बहुसंख्य मताने निवडून आले. श्री ठाणेदार हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत.

 

shree thanekar inmarathi

 

सगळ्यांना याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं, की बाहेरून आलेला माणूस अमेरिकेतल्या निवडणुकीत विजयी कसा होईल? कारण कमला हॅरीस या जन्माने अमेरिकनच आहेत. त्यांची आई भारतीय आहे. परंतु ठाणेदार यांचं तसं नाही, त्यांचा जन्म भारतातला बेळगाव मधला. १९७९ साली ते अमेरिकेला गेले.

व्यवसायाने शास्त्रज्ञ आणि बिझनेसमन असलेले श्री ठाणेदार हे २०१८ मध्ये मिशिगनचे गव्हर्नर झाले आणि या निवडणुकीत ते अमेरिकेन संसदेचे सदस्य बनले आहेत. त्यांना ९३ टक्के मते मिळाली.

श्री ठाणेदार यांनी एक पुस्तक लिहिले आहे. ज्याचं नाव आहे, “ही श्री ची इच्छा!” हे त्यांचे आत्मचरित्र म्हणूनही पाहिलं जाईल. त्यात त्यांनी आपला लहानपणापासूनचा सगळा प्रवास मांडला आहे. एका गरीब घरातला जन्म ते अमेरिकेतील यशस्वी उद्योजक हा प्रवास त्यांनी त्यात मांडला आहे.

 

shree thanekar inmarathi3

 

१९५५ साली त्यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव येथे एका मराठी कुटुंबात झाला. वडील सरकारी नोकरीत क्लार्क म्हणून काम करायचे, परंतु मोठं कुटुंब असल्यामुळे त्यांच्या पगारामध्ये जेमतेम घरखर्च भागायचा. पुढे मात्र दिवस फिरले आणि वडिलांची नोकरीही गेली आणि त्यांच्या समोर आले ते वाईट दिवस.

ठाणेदार लिहितात, की “वडील फारच दयाळू आणि गरीब स्वभावाचे होते, परंतु नोकरी मिळवण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी आईने आपले दागिने विकून घर जपून ठेवलं. आई खंबीरपणे कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली.”

येणार्‍या परिस्थितीला धीराने तोंड कसं द्यायचं हे आईनेच त्यांना शिकवलं. शिक्षण घ्यायलाच हवं हे आईनेच त्यांना सांगितलं होतं. तरीही आईने विकलेल्या दागिन्यांवर काही भागणार नव्हतं. शेवटी ठाणेदार यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पार्ट टाइम चौकीदाराची नोकरी केली.

या सगळ्या परिस्थितीत ठाणेदारांची दहावी झाली. त्यावेळेस त्यांना दहावीत ५५ टक्के मिळाले. तसंच त्यांच्या शिक्षण चालू होतं. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना विजापूरच्या एसबीआय बँकेत नोकरी लागली, परंतु शिक्षणाचं महत्त्व समजलेल्या ठाणेदार यांनी शिक्षण मात्र सोडलं नाही.

वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी कर्नाटक युनिव्हर्सिटीमधून केमिस्ट्री या विषयात डिग्री मिळवली. पुढे १९७७ साली मुंबई युनिव्हर्सिटीतून एम.एस. सी केलं. त्यानंतर काही काळ मुंबईच्या भाभा अणूसंशोधन केंद्रात संशोधक म्हणून कामही केलं. पुढे पीएचडी करण्यासाठी ते १९७९ मध्ये अमेरिकेला गेले.

 

shree thanedar inmarathi3

 

अमेरिकेला गेले त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त एक निळ्या रंगाची सुटकेस आणि खिशात वीस डॉलर्स होते. तिथेही काम करतच त्यांनी शिक्षण घेतलं आणि हळूहळू आपला जम बसवला. अमेरिकेचे रहिवासी झाले. दहा वर्षानंतर त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व ही मिळाले. ज्या कंपनीत काम केलं तीच कंपनी विकतही घेतली.

 

shree thanekar inmarathi2

 

आता ते एक व्यावसायिक आहेत. राजकारणात जाण्याची त्यांची इच्छा होती तीही त्यांनी पूर्ण केली. २०१८मध्ये ते डेमॉक्रॅटिक पक्षाकडून मिशगनच्या संसदेचे सदस्य बनले आणि आता त्यांनी मिशिगन प्रांतातील थर्ड डिस्ट्रिक्ट या मतदारसंघातून स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून थेट अमेरिकेच्या संसदेत प्रवेश केला आहे.

यावेळेस त्यांनी प्रचार देखील लोकांच्या भेटीगाठी घेऊन करण्यावर दिला. एकतर कोरोनामुळे जाहीर सभा घेण्यावर मर्यादा होत्या. लॉकडाऊन सुरू होते. म्हणून मग सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर करून ते लोकांना भेटत होते.

एक भारतीय माणूस अमेरिकेत जातो, निवडणूक लढवतो हे तसं जरा पचायला कठीण आहे. कारण अमेरिकी लोकांना डॉक्टर , इंजिनिअर हे इतर कोणीही असलं तरी चालतं,  परंतु राजकारणी मात्र अमेरिकन असावा यावर त्यांचा कटाक्ष असतो म्हणूनच, श्री ठाणेदार यांचा विजय महत्त्वाचा ठरतो.

 

shree thanekar inmarathi1

 

याविषयी सांगताना श्री ठाणेदार म्हणतात, की “या निवडणुकीची तयारी त्यांनी एक-दोन वर्षांपूर्वीच चालू केली होती. जास्तीत जास्त लोकसंपर्क ठेवण्यावर त्यांचा भर होता. “अमेरिकेत वाढलेली गुन्हेगारी, शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन” असं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं आहे.

केवळ सांगण्यावर लोक कसा विश्वास ठेवतील? म्हणून मग त्यांनी स्वतःची गोष्टही लोकांना सांगितली. भारतात त्यांनी काढलेले गरिबीचे दिवस सांगितले. मिळालेले संस्कारही सांगितले आणि लोकांना हे पटवून दिलं, की सगळीकडच्या समस्या सारख्याच असतात. तुम्ही त्या कशा हाताळता हे महत्त्वाचं असतं.

 

shree thanedar inmarathi4

 

म्हणूनच, अमेरिकेतील लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि ठाणेदार यांचा विजय झाला. ही खरोखरच एक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?