ही भाजी आहे तब्बल ३००हून अधिक विकारांवर गुणकारी! तुमच्याही आहारात हवीच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतीय आहारात अनेक फळभाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश केला जातो. भारतासारख्या खंडप्राय देशात प्रांतागणिक संपन्न जैवविविधता पहावयास मिळते आणि म्हणूनच विविध प्रांतात वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि धान्ये आढळून येतात.
त्या त्या प्रांतातील भाज्या व इतर वस्तूंचा तेथील खाद्यसंस्कृतीत वापर केला जातो. शेवगा ही या भाज्यांपैकीच एक. इंग्लिशमध्ये drumstick (ड्रम स्टिक) या नावाने शेवग्याला ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव मॉरिंगा ऑलिफेरा (Moringa Oleifera) असे आहे.
सर्वसाधारणपणे उष्ण कटिबंधीय प्रदेशात शेवग्याची लागवड केली जाते. शेवग्याचे झाड १० मीटरपर्यंत वाढू शकते. त्यामुळे आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये शेवगा मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतो.
हल्ली आपल्याकडे अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून शेवग्याची लागवड करतात. शेवगा ही एक अशी वनस्पती आहे, की जिचे जवळपास सगळे भाग म्हणजे बिया, फुले, पाने आणि शेंगा हे सगळेच खाण्यायोग्य असते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शरीराला अत्यंत पोषक असते.
शेवग्याची पाने आणि शेंगा तर थेट वापरल्या जातातच, याशिवाय शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते, जे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वंगण म्हणून वापरले जाते. शेवग्याच्या वाळलेल्या बियांचे चूर्ण तुरटीप्रमाणे पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरता येते.
भारतातील विविध प्रांतांमधील खाद्यपदार्थांमध्ये शेवग्याचा वापर केला जातो. शेवग्याच्या शेंगा या सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जातात. काही ठिकाणी शेवग्याच्या पानांची भाजीदेखील केली जाते. आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा घालून पिठले, आमटी यांसारखे पदार्थ केले जातात.
शेंगा शिजण्याआधी काहीशा तुरट लागल्या, तरी शिजल्यावर मात्र त्यातील गर चवदार लागतो. दाक्षिणात्य पदार्थांमध्ये शेवगा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
शेवगा ही वनस्पती म्हणजे शरीराला आवश्यक पोषणमूल्यांचे आगर आहे. जवळपास सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये शेवग्यात आढळतात. शेवग्यात कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, ए, बी आणि सी जीवनसत्वे असतात.
आयुर्वेदात शेवग्याचे अनेक औषधी उपयोग उद्धृत केलेले आहेत. जवळपास ३०० पेक्षा जास्त विकारांवर शेवगा गुणकारी आहे. सध्या रक्तदाब आणि मधुमेह हे दोन विकार मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.
शेवग्यातील जीवनसत्वे रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, तसेच ती रक्त शुद्ध करण्याचेही काम करतात. यासाठी मधुमेह असलेल्या व्यक्तींना आहारात शेवग्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
शेवगा रक्त शुद्ध ठेवत असल्याने त्याच्याशी निगडित इतर विकारांवरही गुणकारी आहे. तारुण्यपिटिका किंवा चेहऱ्यावरील इतर डागांवर शेवग्याच्या सेवनाने फरक पडतो.
शेवग्यात अ आणि ब जीवनसत्वांबरोबर फॉलीक अॅसिड असते. यामुळे केस त्वचेची चांगली निगा राखली जाते. शरीरातील फॉलिक अॅसिडचे प्रमाण कमी झाल्यास तोंड येते. यासाठी शेवग्याच्या पानाचा रस घेतल्यास किंवा गुळण्या केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.
शेवग्यात ब जीवनसत्वांपैकी नियासीन, रायबोफ्लॅविन आणि बी१२ आढळतात. ही जीवनसत्त्वे खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यात मोलाची भूमिका बजावतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
शेवग्याचा आणखी एक मोठा गुण म्हणजे यामध्ये असणारे कॅल्शिअम आणि लोह. शेवग्यातील कॅल्शियमचे प्रमाण दुधापेक्षाही फार जास्त असते. कॅल्शिअमची मात्रा हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. याबरोबरच हाडांची घनता कायम राहून हाडे ठिसूळ होण्याला प्रतिबंध केला जातो. यामुळे शरीराचा स्टॅमिना कायम राहतो.
शेवग्याच्या नियमित सेवनामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते. शेवग्यातील क जीवनसत्व आणि अँटी-इन्फ्लॅमेटरी गुण श्वसन मार्गात कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होऊ देत नाहीत. यामुळे श्वासनलिकेत कोणताही अडथळा येत नाही आणि श्वसनक्रिया सुरळीत चालू राहते.
शेवग्यात आढळणारे घटकपदार्थ शरीराची एकूण प्रतिकारशक्ती वाढवतात. एप्रिल – मे महिन्यात उष्णतेमुळे कांजिण्यांसारखे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस शेवग्याचे जास्त सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहून कांजिण्यांसारख्या आजारांपासून बचाव करता येतो.
शेवग्यात अँटी-बॅक्टरीयल गुणही आढळून येतात. यामुळे ऋतुबदल होत असताना होणाऱ्या सर्दी-पडसे यांसारख्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते.
वात विकारावरही शेवगा उपयुक्त आहे. शेवग्याच्या पानाच्या रसात खडीसाखर मिसळून खाणे वातावर गुणकारी आहे. कविळीसारख्या आजारातही शेवग्याचा रस घेणे फायदेशीर ठरते.
आपल्या खाद्यसंस्कृतीत पदार्थाच्या चवीबरोबरच त्यातील पोषणमूल्यांचाही विचार केल्याचे दिसून येते. जेवणात विविध भाज्यांचा पुरेपूर वापर हे त्याचेच द्योतक आहे.
शेवग्याचे हे आरोग्यदायी फायदे वाचून आपली शेवग्याबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढेल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.