' जुहू बीचवर, एका रात्री, सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं गेलं देवआनंदचं सुप्रसिद्ध गाणं… – InMarathi

जुहू बीचवर, एका रात्री, सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं गेलं देवआनंदचं सुप्रसिद्ध गाणं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

कलाकार व्यक्ती या फार लहरी असतात हे आपण सगळेच जाणतो. कला ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याला तुम्ही वेळेच्या, जागेच्या, भाषेच्या अश्या कोणत्याच बंधनात अडकून ठेवू शकत नाहीत.

विशेषतः जे लोक कवी, गीतकार किंवा लेखक असतात हे लोक दिवसातील प्रत्येक क्षण त्यांच्या कलेसाठी जगत असतात. कलेतून मिळणारा आनंद हा त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा असतो.

काही कलाकार हे करिअर च्या सुरुवातीपासूनच कलेला पूर्ण वेळ देत असतात. तर काही कलाकार हे उदरनिर्वाहासाठी इतर काम करत असतात आणि त्यातून वेळ काढून आपली कला सुद्धा जोपासत असतात.

एका ठराविक वयानंतर आणि आर्थिक स्थैर्य दिसायला लागल्यावर ते सुद्धा कलाक्षेत्राला पूर्ण वेळ देणं जाहीरपणे सुरू करतात.

 

mukhavte inmarathi

 

एखादी गोष्ट सुचणे म्हणजे नेमकं काय होतं याचं उत्तर कोणाकडेही नाहीये. एखाद्या विषयाबद्दल आपण ऐकतो, वाचतो आणि मग त्यावर एक विचारचक्र सुरू होतं.

एक कलाकृती कलाकाराच्या मनात जन्म घेते आणि नंतर ती कागदावर उतरते. खूप अद्भुत आहे ही सगळी प्रक्रिया.

आपण आजही बघतो की जे लोक १९७० च्या दशकातील सिनेमा, गाणी यांचे चाहते आहेत त्यांच्यासाठी सिनेसृष्टी चा तोच सर्वोत्तम काळ होऊन गेला आहे.

याचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला की असं लक्षात येतं की, त्या काळात एक सत्यता, ओरिजनलपणा लोकांमध्ये होता आणि त्यातूनच इतके महान कलाकार तयार झाले ज्यांच्याकडून आजही खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

त्या काळात जागतिक संगीत हे आजच्या इंटरनेट युगा इतकं सहज उपलब्ध होत नव्हतं. एकमेकांना बोलणं, काही लिहून पाठवणं हे आज इतकं सोपं नव्हतं.

तरीही लोकांनी कलेला केंद्रस्थानी ठेवून आपलं योगदान दिलं. याच श्रेणीतील एक उदाहरण म्हणजे सचिन देव बर्मन. ज्यांना लोक एस डी बर्मन या नावानेच जास्त ओळखतात.

हे ही वाचा

===

 

s d burman inmarathi

 

त्यांनी जगलेला हा प्रसंग सांगितल्यावर आपल्याला त्या काळाची जाणीव होईल.

देव आनंद यांनी ‘नवकेतन बॅनर’ या नावाने सिनेमा तयार करणारी कंपनी सुरू केली होती. या बॅनर खाली तयार होणाऱ्या ‘काला बाजार’ या सिनेमासाठी देव आनंद, वहिदा रहेमान, विजय आनंद, एस. डी. बर्मन आणि शैलेंद्र सारखे सगळे टॅलेंटेड लोक एकत्र आले होते.

त्याच वेळी कवी शैलेंद्र हे इतरही बऱ्याच प्रोजेक्ट वर एकाच वेळी काम करत होते. त्यामुळे त्यांना दिलेलं गाणं लिहायचं काम ते वेळेत पूर्ण करू शकत नव्हते.

निर्माता असलेले देव आनंद, विजय आनंद हे एका गाण्यासाठी या सर्व मंडळीच्या मागे होते. ते सतत एस. डी. बर्मन यांना त्या गाण्याबद्दल विचारायचे आणि ते पुढे शैलेंद्र यांना गाण्याचे बोल मागायचे.

निर्मात्यांकडून होणाऱ्या सतत फॉलोअप मुळे एस. डी. बर्मन हे एक दिवशी खूप त्रस्त झाले आणि त्यांनी राहुल देव बर्मन म्हणजे आर.डी. बर्मन यांना शैलेंद्र सोबतच रहायला सांगितलं आणि तोपर्यंत घरी येऊ नकोस जो पर्यंत शैलेंद्र हे तुला गाणं लिहून देणार नाहीत.

आर.डी. बर्मन हे शैलेंद्र यांच्या घरी गेले. ते दोघेही कार मध्ये फिरायला बाहेर निघाले. रस्त्यात शैलेंद्र यांना शंकर जयकिशन यांच्या घरी काही काम होतं.

ते त्यांनी पूर्ण केलं आणि आर.डी. बर्मन आणि शैलेंद्र हे दोघेही नॅशनल पार्क मध्ये गेले.

नॅशनल पार्क मध्ये पोहोचल्या नंतर शैलेंद्र हे सिगरेट वर सिगरेट पीत होते. पण, तरीही त्यांना गाणं सुचत नव्हतं. शैलेंद्र यांनी आर.डी. बर्मन यांना जुहू बीच वर गाडी नेण्यास सांगितलं.

 

shailendra inmarathi

 

रात्र झाली. आर.डी. बर्मन हे तेव्हा फक्त २० वर्षांचे होते आणि तेव्हा ते वडिलांना साथ देत होते. त्या वयात एकुणच माणसात सहनशक्ती कमी असते. तरीही ते त्यांची नाराजी शैलेंद्र यांना सांगत नव्हते आणि त्यांना ते घाई सुद्धा करू शकत नव्हते.

रात्रीचे ११ वाजले. तरीही गाणं सुचलं नव्हतं. हे दोघेच जुहू बीच वर बसून होते. त्या काळात रात्री ८ वाजेपर्यंत समुद्र किनारी लोकांची वर्दळ असायची.

त्या शांत वेळी अचानक शैलेंद्र यांनी आर.डी. बर्मन यांना सिगरेट पेटवण्यासाठी काडे पेटी मागितली. सिगरेट पेटवून शैलेंद्र यांनी काडेपेटी परत दिली आणि देतांनाच आर.डी. बर्मन यांना एस.डी.बर्मन यांनी तयार केलेली ट्यून वाजवायला सांगितली.

आर.डी.बर्मन यांनी ती ट्यून काडेपेटी बॉक्स वर वाजवून शैलेंद्र यांना ऐकवली. पूर्ण चंद्र असलेली ती रात्र होती. शैलेंद्र हे सिगरेटचा हवेत जाणारा धूर बघत होते आणि अचानक त्यांनी सिगरेट च्या पाकिटावर काहीतरी लिहिण्यास सुरुवात केली.

शैलेंद्र यांनी आर.डी. बर्मन यांना घरी जाण्यास सांगितले आणि हा निरोप दिला की बाबांना सांग की, “मी सकाळी पूर्ण गाणं तयार झालं की तुम्हाला येऊन भेटतो.”

त्या रात्री जुहू बीच वर शैलेंद्र यांना सुचलेलं सुंदर गाणं म्हणजे आपल्या सर्वांचं आवडतं गाणं होतं, “खोया खोया चांद खुला आस्मान… आखो मे सारी रात जायेगी… तुम को भी कैसे निंद आयेगी…”

हे ही वाचा

===

 

khoya khoya chaand inmarathi

 

दुसऱ्या दिवशी आर.डी. बर्मन यांनी त्या सिगरेटच्या पाकिटाच्या मागे लिहिलेल्या गाण्याच्या मुखड्याच्या ओळी ऐकवल्या. एस.डी.बर्मन यांना अर्थातच त्या ओळी खुप आवडल्या.

त्यांनी लगेच शैलेंद्र यांना गाणं पूर्ण करण्यासाठी सांगितलं. एस. डी.बर्मन हे त्यांच्या गाण्यातील शब्दांबद्दल सुद्धा खूप जाणकार होते. प्रत्येक शब्द हा त्यांच्यासाठी महत्वाचा असायचा.

त्यांच्या अपेक्षा माहीत असलेल्या शैलेंद्र यांनी गाणं तयार करतानाच योग्य शब्दच गाण्यात येतील याकडे लक्ष दिलं होतं. एका बैठकीत पूर्ण गाणं तयार झालं.

त्याच दिवशी एस.डी.बर्मन यांनी मोहम्मद रफी यांना बोलावून गाण्याचा सराव करून घेतला आणि दोन दिवसात त्या गाण्याची रेकॉर्डिंग झाली.

काही दिवसांतच झालेल्या चित्रीकरणाला सुद्धा लोकांकडून विशेष दाद मिळाली होती. विजय आनंद यांनी या गाण्याची कोरिओग्राफी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केली.

चार कडवी असलेलं हे गाणं बघताना किंवा ऐकताना कधीच फॉरवर्ड करावंसं वाटत नाही हेच त्या पूर्ण टीमचं श्रेय आहे. वार्षिक ‘बिनाका गीत माला’ मध्ये ‘खोया खोया चांद…’ हे प्रथम क्रमांकावर होतं.

 

binaca geetmala inmarathi

 

असे होते त्या काळातील कलाक्षेत्रातल्या व्यक्ती ज्या की एकमेकांवर विश्वास ठेवून चांगलं काम करवून घ्यायच्या. ‘तू नाही तर दुसरा…’ हा स्वभाव त्या काळात नव्हता.

म्हणूनच प्रत्येकाने आपलं बेस्ट देऊन इतकं चांगलं काम करून ठेवलं आहे. ७० च्या दशकात बॉलिवूड मध्ये कामाला ‘गोल्डन इरा’ हे नाव का देण्यात येतं हे आपल्याला या उदाहरणावरून नक्कीच पटलं असेल.

 

हे ही वाचा

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?