' डॉक्टरांच्या मारहाणीची सत्य बाजू – एका डॉक्टरच्या लेखणीतून! – InMarathi

डॉक्टरांच्या मारहाणीची सत्य बाजू – एका डॉक्टरच्या लेखणीतून!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मुन्नाभाई MBBS मध्ये, मुन्नाच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसाचा प्रसंग आहे. पंटर लोकांच्या हार-नारळ ला वैतागून मुन्ना हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करतो. भगव्या शर्टच्या २ गुंड्या उघड्याच ठेवून हा “भाई” चालत जात असतो आणि एका विषप्राशन केलेल्या मुलाचा तडफडणारा जीव त्याला स्ट्रेचरवर दिसतो.

मुन्ना आधी कम्पाऊंडरकडे चौकशी करतो. कम्पाऊंडर बेफिकीर, उडवाउडवीची उत्तरं देतो. तितक्यात बाजूने जाणारा डॉक्टर मुन्नाला दिसतो…आणि मुन्ना त्याला विनवण्या करतो…

 

munnabhai mbbs munna requests doctor 01 marathipizza

 

डॉक्टर नुकतीच त्याची शिफ्ट पूर्ण करून बाहेर पडतोय…तो मुन्नाला आधी आपण “ऑफ ड्युटी” असल्याचं सांगतो. नंतर ही “स्युसाईड अटेम्प्ट” असल्याने आधी पोलीस केस बनेल – ही तांत्रिक बाब देखील सांगतो. त्याचा हेतू तिथून चटकन बाहेर पडण्याचा असतो…म्हणून हे बहाणे!

 

munnabhai mbbs munna requests doctor 02 marathipizza

 

त्याच्या दुर्दैवाने, तो कुणा साध्या माणसाशी बोलत नसतो…त्याचं बोलणं मुन्ना”भाई” शी सुरू आहे हे त्याला पुढच्याच क्षणी कळतं…

 

munnabhai mbbs munna requests doctor 03 marathipizza

 

मुन्ना डॉक्टरची गचांडी पकडून त्याला विचारतो –

आत्ता, इथेच, मी तुझा अटेम्प्टेड मर्डर केला – तर तुझं हे हॉस्पिटल तुला वाचवेल, की पोलीस येण्याची वाट बघेल?

 

munnabhai mbbs munna requests doctor 04 marathipizza

 

अपेक्षित परिणाम साधला जातो…डॉक्टर लगेच रूग्णाला ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन जातो. उपचार सुरू होतात…

 

munnabhai mbbs munna requests doctor 05 marathipizza

 

चिंताक्रांत आईला शांत करत, मुन्ना “टेन्शन नई लेने का!” चा खास डायलॉग मारतो…ओके, टाटा करतो आणि आपल्या क्लाससाठी निघून जातो.

 

munnabhai mbbs munna requests doctor 06 marathipizza

 

ऑडियन्स मुन्नाच्या प्रेमात पडतं. ह्या असल्या “हलकट”, “भावनाहीन”, “निष्ठुर” डॉक्टरांना धडा शिकवायला आमचा मुन्नाभाई आलाय…ह्याची खात्री पटते. पुढे चित्रपट भर मुन्ना असेच चित्रविचित्र प्रकार करून हॉस्पिटल ला “ताळ्यावर” आणतो. सर्वांचा लाडका होऊन जातो.

प्रेक्षक चित्रपटगृहातून भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडतात.

पण शांतपणे विचार केल्यास…त्या डॉक्टरचं खरंच चूक होतं का? आपलं काम करून बाहेर पडताना, त्याच्या डोक्यात काय विचार सुरू असतील? घरी बायको वाट बघत असेल…मुलगी पिक्चरचा हट्ट धरून असेल…आई-वडिलांची कामं करायची असतील…काही ना काही व्याप असतीलच ना!

त्या तंद्रीत असताना, जे चित्र त्याला रोज दिसतं – ते परत दिसलं, तर त्याचं त्यातून अंग काढून घेणं “स्वाभाविक नाही का?” – हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. त्या डॉक्टर ने एवढं निष्ठुर होऊ नये, ही भावना योग्यच.

परंतु रोज रोज तेच ते चित्र बघून, शारीरिक क्षमतेच्या बाहेर काम करून कदाचित डॉक्टर असे होत असतील का? – हा विचार अनेकदा मनात येऊन जातो.

सध्या सर्वत्र घडत असलेल्या डॉक्टरांच्या मारहाणीमुळे “डॉक्टर विरुद्ध रूग्ण” असं युद्ध रंगल्यासारखं झालंय. त्यावर भाष्य करणारा, InMarathi.com चे वाचक, डॉ राकेश हसबे, ह्यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलेला लेख पाठवला आहे. तो लेख पुढे देत आहोत.

वाचकांनी — डॉक्टर असलेले आणि नसलेले — सर्वांनीच त्यावर विचार करावा. सदर विषयावर, लेखावर प्रतिसाद आमच्या फेसबुक पेजवर पाठवावेत. निवडक, अभ्यासपूर्ण प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल.

===

लेखक : डाॅ.राकेश हसबे, DNB Obstetrics and Gynecology, स्रीरोगतज्ञ

“तू निषेध का नाही करत डाॅक्टरांच्या मारहाणीचा…? का नाही लिहीत यावर…? का नाही बोलत यावर..?” हे मला लोक विचारत असतात, म्हणून लिहायला घेतलंय. अर्थात, तटस्थपणे लिहिणं अपेक्षित आहे. पण तसं न करता मुद्दाम डाॅक्टर म्हणून आत्मपरीक्षण करून लिहितोय…

सामान्य जन हो आणि डॉक्टर मित्रांनो – बघा पटतंय का…!

स्वतः डाॅक्टर असूनदेखील मी या मारहाणीच्या गोष्टी गांभीर्याने घेत आलेलो नाही. कारणे अनेक आहेत. पहिलं म्हणजे सरकारलेखी कुचकामी असलेले आपले कायदे – प्रत्येक कायद्याला असलेली पळवाट आणि दुसरं म्हणजे या सगळ्या घटना म्हणजे लोकांच्या मनात डाॅक्टरांविरोधात असलेला संताप.

ह्या संतापातून ऊद्भवलेला हा हिंसक परंतु प्रतिकात्मक विरोध असल्याने केवळ मोर्चे काढून, निषेध व्यक्त करून, कायदे कडक करून हा विषय सुटण्यातला नाही याचं मला ऊशीराने का होईना पण झालेलं आकलन, हे ह्या मारहाणीचा विरोध नं करण्याचं कारण आहे.

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचं कामकाज माहिती नसणार्‍यांनी एकदा त्याला अवश्य भेट द्या. MBBS करून पुढील शिक्षण घेणारा डाॅक्टर तिथे गाढवासारखं काम करत असतो. त्याला त्याबदल्यात क्षुल्लक मोबदला दिला जातो.

एका खोलीत दहा दहा, पंधरा पंधरा डाॅक्टर कोंबले जातात, कित्येकांना झोपायला बेड देखील पुरवले जात नाहीत. कामाच्या तासांबद्दल तर नं बोललेलंच बरं. चार चार दिवस यांना झोपायला वेळ मिळत नाही, सकस आहार मिळत नाही, आंघोळीला पाणी मिळत नाही…!

प्रत्येक डाॅक्टरला करावं लागणारं वैयक्तिक काम हे त्याच्या कमाल शारीरिक आणि मानसिक मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असतं. कामाच्या या बोजात इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारा डाॅक्टर शारिरीक व मानसिक द्रुष्ट्या स्वतः मात्र खंगून जातो.

आणि अशा डाॅक्टरकडून आपण एखाद्या superhero सारखं चोवीस तास दूध देणार्‍या गाईसारखं कामाची अपेक्षा करतो…जे कागदावरदेखील शक्य नाही…!

 

recident doctors violence strike marathipizza
indianexpress.com

 

आता दुसरी बाजू बघूया.

वीस वर्षांपुर्वी डाॅक्टर म्हणजे निर्विवाद देव होता. त्याच्यावर लोकांचा विश्वास होता. डाॅक्टरचा शब्द प्रमाण मानला जात होता. मग मागील वीस वर्षात डाॅक्टरची पत इतकी कशी घसरली? कारण स्पष्ट आहे – डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा बाजार मांडलाय.

रूग्ण आणि डाॅक्टर यांमधे पैसे सोडून दुसरं नातंच तयार होणं बंद झालं. भाव- भावना, विचारपूस, आपुलकी या गोष्टी केंव्हाच मागे पडल्या आणि या सगळ्या गोष्टींची जागा घेतली पैशाने.

यातून नवीन नवीन मोठमोठाले दवाखाने निघू लागले. दवाखाने कुठले…लोकांच्या आजाराची, त्यांच्या भीतीची कुचंबणा करणारे अशक्य असे कत्तलखाने निघू लागले. लोकांना छोट्यामोठ्या गोष्टींसाठी घाबरवून त्यांच्याकडून पैसे ऊकळले जाऊ लागले.

अर्थात लोकांसाठी निस्वार्थिपणे झटणारी चांगल्या डाॅक्टरांची एक सुपीक जमात आजही अस्तित्वात आहे. पण या इतर व्यापार्‍यांच्या झगमगाटात ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

मग झालं काय की इतके पैसे ओतूनदेखील परिणामकारक ऊपचार मिळेनासे झाले. रोग बरा झाला तरी मानसिक समाधान मिळेनासं झालं. यातून येणारं नैराष्य, अगतिकता यातून डाॅक्टरांचं जनमानसातलं चित्र बिघडू लागलं…मग हा वर्षानुवर्षे दबलेला असंतोष कसा बाहेर पडणार?

एव्हाना डाॅक्टर आपलं देवपण गमावून बसला होता…मोठमोठाले डाॅक्टर असंतोष बोलून दाखवायला, शंका निरसन करायला ऊपलब्ध नसल्याने, सरकारी दवाखान्यात ऊपलब्ध होणार्‍या त्या गरीब बिचार्‍या junior डाॅक्टरांवर सगळा राग बाहेर पडू लागला.

राग व्यक्त करायची प्रत्येकाची कुवत आणि ताकद वेगवेगळी असल्याने अस्रुजनशील लोकांकडून मारहाणीचे प्रकार घडू लागले.

खरी समस्या इथे आहे. एकीकडे खाजगी डॉक्टरांचा असहिष्णू धंदेवाईकपणा दुसरीकडे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील junior डॉक्टर्सची कुचंबणा.

 

govt hospital
the day after

 

पण नुसते प्रश्न निर्माण करून उपयोग नाही. त्यामुळे त्यांची ऊत्तरं देखील सुचवतो.

१) सरकारी आणि खाजगी रूग्णालयं दोघांमधली तफावत कमी केली गेली पाहिजे. खाजगी रूग्णालयांच्या मनमानी कारभारावर सरकारने चाप लावला पाहिजे.

२) अत्यावश्यक सेवा – जसं की बाळंतपण, काही अत्यावश्यक शस्त्रक्रिया यांच्या किंमती सरकारने नियमित करून द्याव्यात आणि त्या स्वतःच्या नियंत्रणात ठेवाव्यात. जेणेकरून सरकारी दवाखान्यांमधील अनावश्यक गर्दी कमी होईल आणि गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा पोचवता येतील.

३) वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्यात यावी. जास्तीत जास्त डाॅक्टर तयार करून डाॅक्टर-पेशंट तफावत कमी होण्याच्या द्रुष्टीने पावले ऊचलावीत.

४) सरकारी डाॅक्टरांना योग्य वेतन व इतर सुविधा पुरविण्यात याव्यात. प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला तरी डाॅक्टरांच्या संपूर्ण सुरक्षेची हमी सरकारने घ्यावी.

५) शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं…डाॅक्टरांच्या अभ्यासक्रमात लोकांशी कसं बोलावं, त्यांना कसं हाताळावं, एखादी अप्रिय घटना त्यांना कोणत्या भाषेत, कोणत्या वेळी, कश्याप्रकारे सांगावी – या सगळ्या बाबींचा समावेश केला गेला पाहिजे.

 

MUMBAI DOCTORS
rediff.com

 

नुसतेच पुस्तकी किडे बनून निघणारे डाॅक्टर सामाजिक आरोग्य कधीच सुधारू शकणार नाहीत. त्यांचा जबाबदारीचा, सामाजिक आत्मियतेचा पैलू पाडणारं वैद्यकीय शिक्षण आपल्याला तयार करावं लागेल.

डॉक्टरांवरील हल्ल्यांचा निषेध करणार्‍यांनी नक्कीच निषेध करावा. पण त्यामागील मूळ कारण जाणून नं घेता नुसतीच स्वतःची बाजू ऊचलून धरणं डाॅक्टरांसारख्या वैचारीक जमातीला शोभून दिसतं का – याचा कुठेतरी विचार होण गरजेचं आहे.

कित्येक डाॅक्टरांच्या भावना दुखावतीलही कदाचित…त्यांना एवढंच सांगतो…prevention is better than cure हा मूलमंत्र आपणंच दिलाय ना जगाला…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?