' “चतुर बिरबल” या पलीकडे फार माहिती नसलेल्या बिरबलाच्या या गोष्टी प्रत्येकाने वाचायलाच हव्यात! – InMarathi

“चतुर बिरबल” या पलीकडे फार माहिती नसलेल्या बिरबलाच्या या गोष्टी प्रत्येकाने वाचायलाच हव्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बिरबलाच्या चतुराईपेक्षा आज बिरबल हा शब्द ऐकला की सहाजिकच आपले मन बालपणीच्या आठवणींकडे वळते. नुसते वळत नाही तर रमते सुद्धा. राजा अकबर आणि चतुर बिरबलाच्या गोष्टी न ऐकलेला किंवा वाचलेला आत्ताच्या काळात सापडणार नाही असा माणूस विरळाच.

पण हल्लीच्या लहान मुलांना मात्र या गोष्टी वाचायला मिळत नसतील कदाचित.

बिरबलाची चतुराई, प्रसंगावधानता, हजरजबाबीपणा, एक काम सांगितलेले असताना त्यासोबतच अन्य १० कामे उरकून चोख हिशोब देणारा आणि मुद्देसुद मांडणी करणारा एक हुशार आणि कर्तबगार सहाय्यक किंवा सल्लागार अशी बिरबलाची ओळख.

या बिरबलाच्या गोष्टींमध्ये बोधकथा असते. ती केवळ वाचायची आणि सोडून द्यायची असे नाही तर एकूणच जीवनाच्या विविध टप्प्यांवर या बोधकथांचा आता कसा उपयोग होतो ते वेळोवेळी लक्षांत येते.

 

akbar birbal inmarathi

 

एखादे काम स्वत:चे असो कि दुसऱ्याचे, ऑफिसचे काम असो की घरचे ते बिरबलाच्या पद्धतीने झाले पाहिजे अशी सवयच मनाला जडली आहे.

जर त्या पद्धतीने काम झाले नाही तर, “तुला बिरबलासारखे काम शिकावे लागेल…” असा सल्ला अगदी सहजपणे समोरच्या मोठ्या माणसाकडून मिळतो. तुमच्यापैकी अनेकांच्या बाबतीत हे घडले असेल ना दोस्तांनो!

असो, तर या बिरबलाविषयी काही वेगळ्या आणि आजवर कधी समोर न आलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

बिरबल याचे खरे नाव होते महेश दास. त्याचा जन्म १५२८ साली उत्तर भारतात यमुना नदीच्या तीरावर वसलेल्या कल्पी नामक एका गावाजवळील लहानशा खेड्यात झाला होता.

काही इतिहासकारांच्या मते सध्याच्या उत्तर प्रदेश राज्यात हा परिसर येतो, जो त्या काळी त्रिविक्रमपूर नावाने ओळखला जाई.

त्यांच्या वडिलांचे नाव गंगा दास तर आईचे नाव अनभादेवी होते. या हिंदू ब्राम्हण परिवारातील महेश उर्फ बिरबल हे तिसरे अपत्य.

महेश दासच्या लहानपणीच त्यांचे वडिल वारले. त्यानंतर महेशला पुढील शिक्षणासाठी त्यांच्या आजोबांकडे पाठवण्यात आले. तेथेच महेशने हिंदी, संस्कृत आणि उर्दू भाषांचे अतिशय सखोल अध्ययन केले.

 

akbar 3 inmarathi

 

 

महेशला संगिताविषयी खुपच तळमळ होती तसेच कविता करण्याची एक उपजतच देणगी त्यांना लाभली होती. महेश यांच्या काव्य रचना पुढे ब्रम्ह कवी या टोपणनावाने लिहिल्या गेल्या.

त्यानंतर त्यांचे मूळ नाव जणू काही सर्वच जण विसरले आणि राजा अकबराच्या दरबारातील चतूर सल्लागार बिरबल आणि कवितेच्या विश्वातील ब्रम्ह कवी याच नावाने महेश पुढे खुप प्रसिद्ध झाले.

हेच महेश दास उर्फ बिरबल अकबराच्या दरबारातील नवरत्न म्हणून अतिशय प्रसिद्ध होते. त्यांचे नाव बिरबल कसे पडले याची ही गमतीशीर कथा!

सम्राट अकबर हा खुपच संयमी आणि प्रजेचे हित पाहणारा आणि जपणारा राजा म्हणून प्रसिद्ध होता. अकबर नेहमीच इस्लाम धर्माव्यतिरिक्तही इतर धर्मांचा आणि त्यांच्या परंपरांचा मान-सन्मान व आदर करत असे.

याचे अनेक दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. अशाच एका मोहिमेवर शौर्य गाजवल्यामुळे अकबराने बिरबलाला सन्मानपुर्वक ‘वीरवार’ ही पदवी बहाल केली होती.

पुढे कालैघात वीरवार या शब्दाचा अपभ्रंश होत गेला आणि वीर बाळ, बीर बाल त्यानंतर मग बीरबल हा शब्द प्रचलित झाला. त्याच नावाने गेली ५ शतकं महेश दास यांना प्रसिद्धी मिळाली आहे.

बिरबलाची विनोदबुद्धी आणि वाक्चातुर्य इतके लोकप्रिय होते की, सम्राटांचा राग शांत करताना अनेकदा बिरबलाने विनोद आणि बुद्धीमत्ता यांचा योग्य पद्धतीने उपयोग केला आहे.

कोलकाता येथील प्रसिद्ध व्हिक्टोरिया हॉलमध्ये एक चित्र आहे त्यात राजा अकबराच्या अगदी बाजुलाच बिरबल उभा असल्याचे दर्शवले आहे. त्यावरुन अकबराच्या नवरत्नांमध्ये बिरबलाचे स्थान हे किती जवळचे होते ते स्पष्ट होते.

आग्रा शहराजवळील फतेहपूर सिक्री येथील अकबराच्या महालाला अगदी लागून दोन मजली महाल हा बिरबलाला राहण्यासाठी देण्यात आला होता.

अकबर पॅलेसच्या आवारात राहणारा त्याच्या दरबारातील बिरबल हा एकमेव व्यक्ती होय. यावरुन हे स्पष्ट दिसते की, बिरबल आणि सम्राटांची किती जवळीक होती.

 

akbar birbal 2 inmarathi

 

 

सुरुवातीला केवळ मनोरंजन करणारा, दरबाराचे आणि प्रजेचे प्रश्न सोडवणारा, सल्लागार अशा पदांवर काम करणारा बिरबल पुढे मग राजासोबत मोहिमांवरही जाऊ लागला. तेथेही त्याने गनिमिकाव्याने शौर्य गाजवले.

अशाच एका अफगाणी जमातींच्या विरोधातील मोहिमेवर असताना झैन खान याने बिरबलाला कोंडीत पकडले. सम्राट अकबराशी आणि त्याच्या साम्राज्याशी जवळीक करू पाहणाऱ्या खानचा पहिल्यापासूनच बिरबलावर राग होता.

त्याला कठिण प्रसंगात अडकवण्याची संधी झैन खानाला त्या निमित्ताने मिळाली. अकबराने बिरबरला हुकूम केला की त्याने सैन्यासह झैन खानच्या सोबत जावे आणि शत्रुवर हल्ला करावा.

त्याच मोहिमेत खानाने बिरबलाला कैचित पकडले. चुकीच्या पद्धतीने आणि मार्गाने शत्रुसमोर जाण्यास सांगितले. एका अत्यंत चिंचोळ्या खिंडीत बिरबलाला शत्रुसैन्याने असे गाठले की एका बेसावध क्षणी घात झाला आणि बिरबलाचे सैन्य माघार घेऊ लागले.

त्यातच समोरुन प्रचंड हल्ला होत होता, त्यात बिरबल धारातीर्थी पडला. शत्रू सैन्याने बिरबलाच्या सैन्याची अशी दाणादाण उडवली की कित्येकांचे मृतदेहसुद्धा सापडले नाहीत.

पुढे बिरबलाचाही मत्यू झाल्याचे समजल्यानंतर सम्राट अकबराला शोक अनावर झाला. इतका की त्याने तीन दिवस अन्न-पाणी त्यागले होते.

 

birbal 2 inmarathi

 

असे म्हणतात की, त्यापूर्वीच्या अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाचे साथिदार गमावले किंवा ज्या मोहिमांमध्ये हार पत्करावी लागली होती, तेव्हा सुद्धा अकबराला इतके दु:ख कधी झाले नव्हते जितके बिरबलाच्या मत्यूने झाले होते.

तर असा हा महेश दास उर्फ बिरबल ज्याने सम्राटाच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि पुढे ५ शतके आपल्याही सर्वाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?