हे फोटोज् “फोटो” नाहीतच! यामागचं सत्य प्रत्येक कला-रसिकाच्या मनाचा ठाव घेईल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सणासुदीचा दिवस असला, कोणी पाहुणे येणार असले, लहान मोठा कोणता ही कार्यक्रम असला तरी सजावटीची व स्वागताची सर्वोत्तम भारतीय पद्धत म्हणजे रांगोळी.
कुठे संस्कार भारतीच्या डिझाईन्स काढल्या जातात, तर कुठे ठिपक्यांच्या रांगोळ्या, देवांच्या चिन्हांच्या, फुलांच्या -पानांच्या….इतके सगळे प्रकार रांगोळीचे आपल्याला बघायला मिळतील.
पूर्वीच्या काळी, सकाळी सडा – सारवण करून, अंगणात रांगोळी काढली की घरातील प्रत्येकालाच प्रसन्न वाटत असे. आजकाल प्लॅस्टिकच्या स्टिकरची रांगोळीही बाजारात मिळते.
हल्ली आपल्याला धावपळीमुळे, घरापुढे जागा नसल्या कारणाने, करिअर घडवण्याच्या धकाधकीत हाताने रांगोळी काढणे जरी जमत नसले, तरीही रांगोळी आजही आपल्या संस्कृतीत तितकीच महत्त्वाची आहे.
मांगल्याचे प्रतीक असलेली ही रांगोळी अनेक लोकांना रोजगारनिर्मितीचे साधन म्हणून लाभलेली एक कला आहे. आपल्याला माहीतच असेल लग्नकार्यात, सोहळ्यात, एक एक रांगोळी काढण्याचे २ हजार ते १० हजारा पर्यंत रेट असतात.
कमर्शियल ते आर्टिस्तिक हेतू पूर्ण करणारी ही रांगोळी एका कलाकाराला इतकी भावली, की आज ती त्याची ओळख बनली आहे. आज त्याने साध्याश्या रांगोळीला अंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला आहे. भारतातील 3D रांगोळी चा जनक असल्याचा मान त्याने आपल्या नावे करून घेतला आहे.
तो कलाकार म्हणजे छत्तीसगड येथील प्रमोद साहू. चला पाहूया एका अप्रतिम कलाकाराचा प्रवास.
साधारणतः ४ वर्षांचा असताना रांगोळी बघून, प्रमोदला त्या रंगांचं आकर्षण वाटू लागले. इतक्या प्रकारच्या रंगांच्या पावडरची त्याला मजा वाटू लागली व इथून सुरुवात झाली रांगोळी आणि प्रमोदच्या मैत्रीला.
लहान असताना तो त्याच्या आई व बहिणीनंसारखी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करीत असे, पण त्याला आपली कला दाखवायला कोणती संधी मिळत नव्हती. एके दिवशी एका सणाला त्याला ती गवसली.
त्याच्या बहिणीचा एक रांगोळी पूर्ण करण्यास खूप कस लागत होता. रांगोळी कठीण असल्यामुळे तिला शेवटी रांगोळी पूर्ण करण्याचा कंटाळा आला. प्रमोदसाठी ही सोन्याची संधी होती.
प्रमोदने ती रांगोळी पूर्ण केली व ती इतकी सुंदर झाली, की त्याच्या आईला आश्चर्याचा गोड धक्काच बसला. घरचे सगळेच प्रमोदचं कौतुक करू लागले व इथून प्रमोद घरातील रांगोळी काढणारा झाला. पुढे जेव्हाही सण येत, तेव्हा घरची रांगोळी प्रमोदच काढत असे.
१२ वर्षांचा असताना त्याने शेजाऱ्यांच्या घरी सुद्धा रांगोळी काढणे सुरू केले होते. सुरुवातीला फ्री, पण नंतर त्याला ५ रुपये प्रति रांगोळी असे पैसे मिळू लागले व इथून सुरू झाला प्रवास प्रोफेशनल रंगोली मेकरचा.
पण ते म्हणतात ना “तुम्ही किती ही चांगलं काम करा, तुम्ही प्रत्येकालाच खुश करू शकत नाही, प्रत्येकच जण तुम्हाला चांगलंच म्हणेल असं नाही”, त्याचप्रमाणे रांगोळी काढण्याचे काम करताना त्याला भरपूर लोकांनी “हे तर महिलांचे काम आहे, इट्स वेरी फेमीनाइन” असे म्हणून हिणवले.
प्रमोदला याचा काहीच फरक पडत नव्हता. फुलं, पानं, पक्षी, प्राणी, इतर डिझाईन्स काढून तो जी शांतता अनुभवायचा, जे समाधान त्याला मिळायचं ते या सगळ्या गोष्टींपेक्षा लाख मोलाचं होतं. ह्यामुळे रांगोळीलाच प्रमोदनं आपलं करिअर म्हणून निवडलं.
लिव्हिंग आर्ट मध्ये फारसा पैसा नाही म्हणून, परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी प्रमोदने २००५-२००८ दरम्यान ड्रॉइंग क्लास घेणे सुरू केले. याच सोबत आपल्या कलेत आणखीन प्रवीण होण्या करता त्याने अजून जोमाने सराव करणे सुरू केले.
एखादा योद्धा आपल्या तलवारीला व एखादा लेखक आपल्या पेन्सिलला ज्याप्रमाणे धारदार बनवतो, त्याचप्रमाणे प्रामोदने आपल्या हातांना वळण लावण्यासाठी कठोर परिश्रम करणे सुरू केले.
२०१३ साली लिंग्यूइस्टिक या विषयात एम. ए. पूर्ण करून प्रमोद पुन्हा रांगोळी कडे वळला. त्याने आर्ट इव्हेंट, स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरू केले.
सुरुवातीला पैसे मिळत नव्हते, पण जसेजसे लोक त्याच्या अप्रतिम कलेला दाद देऊ लागले व त्यांना त्याच्या रांगोळ्यांची स्टाईल आवडू लागली, तसतसे प्रमोदला पैसे मिळणे ही सुरू झाले.
शिक्षण घ्यायला, योग्य मार्गदर्शन मिळायला किती खटाटोप करावी लागते हे प्रमोद ओळखून होता. आपल्याला जे ज्ञान गवसले आहे, ते शिकण्यासाठी आपण किती खस्ता खाल्ल्या याची जाणीव प्रमोदला होती. याच जाणीवेपोटी इतर हौशी कलाकारांना सुद्धा सगळं शिकताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांना पैशांच्या कमतरतेमुळे कलेवर पाणी सोडावे लागायला नको, म्हणून त्याने २०१४ साली “छपाक” नावाच्या एका संस्थेची स्थापना केली.
ह्या संस्थेमार्फत गरजू व कलेची जाण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, अर्थात स्कॉलरशिप दिली जाते व प्रमोद आपल्याला अवगत असलेल्या सगळ्या ट्रिक्स आणि पद्धती सुद्धा या मुलांना शिकवतो.
त्याचे शिकवण्याचे काम फक्त त्याच्या इन्स्टिट्यूटपर्यंतच मर्यादित नसून तो इतर शहरांत ही कार्यशाळा घेतो. जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही कला पोहोचेल.
‘छपाक’ फक्त पुस्तकी ज्ञान देण्यात विश्वास ठेवत नाही. खऱ्या जगातील अनुभव सुद्धा कलाकाराला घडवण्यात अत्यंत महत्त्वाचे असतात, ह्या विचारांमुळे विविध कलाकारांशी भेटी, विविध प्रदर्शनचे दौरे या सगळ्यांमार्फत मुलांना ट्रेन केलं जातं.
एक नजर टाकूया प्रमोदच्या कलाकृतींवर :
खालील दिलेले चित्र हे कोणतेही छायाचित्र नसून प्रमोदने, १८ तासांच्या अथक परिश्रमाने काढलेली एक रांगोळी आहे. ह्या रांगोळीत वीरभद्र या पौराणिक पात्राची छवी उतरावण्यात आली आहे.
हे मोनोक्रोम ४×६ फूट आहे व यातील दाढी मिशांची चमक, डोळ्यांत असलेले प्रश्नार्थक भाव, कपाळावरील आठ्या अगदी ओरिजनल वाटतात. ही रांगोळी, काळया व पांढऱ्या स्मुद रंगांनी रेखाटण्यात आली आहे.
२०१६ च्या, रायपूर छत्तीसगढ येथील नॅशनल युथ फेस्टिवल मध्ये ही रांगोळी रेखाटण्यात आली होती.
प्रमोदच्या अशा अनेक कलाकृती तुम्ही येथे पाहू शकता.
आपल्या अफाट मेहनतीने प्रमोदने भारतीय रांगोळीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान असायला हवा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.