' स्वतः पिकवलेल्या कॉफीची चव निराळीच असते, पण घरी कॉफीचं रोप लावायचं कसं? वाचा – InMarathi

स्वतः पिकवलेल्या कॉफीची चव निराळीच असते, पण घरी कॉफीचं रोप लावायचं कसं? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कॉफी हे जगात सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे. जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या चवींच्या कॉफीचे उत्पादन होते. कॉफीमध्ये कॅफिन नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आढळून येतो, जो कॉफीला तिची बहुतांश वैशिष्ट्ये प्रदान करतो.

कॅफिनमुळे चयापचय क्रियेचा दर अंदाजे ३ ते १३% पर्यंत वाढल्याचे काही अभ्यासाअंती स्पष्ट झालेले आहे. अतिरिक्त चरबी जाळण्यात कॅफिन मोलाची भूमिका बजावते. कॅफिन उत्तेजक द्रव्याप्रमाणे कार्य करते. म्हणूनच कॉफी प्यायल्याने तरतरी येते व उत्साह वाढतो.

 

coffee inmarathi

 

आसपास गारवा असताना गरमागरम कॉफीचा घोट जसा हवाहवासा वाटतो, तशीच इतर वेळी “कोल्ड कॉफी”सुद्धा आवडीने प्यायली जाते.

कॉफी हे उष्ण कटिबंधीय प्रदेशांत घेतले जाणारे पीक आहे. जगभरात ब्राझील, मेक्सिको, आफ्रिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेश, भारत, जावा-सुमात्रा बेटे इत्यादी ठिकाणी कॉफीची अधिक प्रमाणात लागवड केलेली दिसून येते.

आपण जी कॉफी वापरतो, ती मुळात कॉफीच्या फळांतील बियांची भुकटी असते. कॉफीचे मूळ स्थान आफ्रिका असून, पंधराव्या शतकात ती अरबस्तानात पोचली. तिथून युरोपात तिचा प्रसार व्हायला सतरावे शतक उजाडले. भारतातही त्याच सुमारास कॉफी आणली गेली. भारतात दक्षिणेकडील तमिळनाडू, केरळ व कर्नाटक व आंध्र प्रदेश ही राज्ये कॉफीची लागवड करतात.

कॉफीचे झाड हे साधारणतः ४ मीटर उंच असते. कॉफीची हिरवी फळे पिकल्यावर पिवळ्या रंगाची होतात. प्रत्येक फळात २ बिया असून त्या भाजून दळल्या जातात व आपल्याला कॉफी पावडर मिळते, पण अशी ही कॉफी आपण आपल्या बागेत तयार ठरू शकतो!

 

coffee plant inmarathi1

 

होय! अशक्य वाटत असले तरी आपल्या घराजवळ कॉफीची लागवड करणे शक्य आहे आणि यातून आपल्या वापरासाठी लागणारी कॉफी नक्कीच तयार होऊ शकते.

कॉफीच्या लागवडीची सुरुवात होते लागवडीयोग्य बियाणे मिळण्यापासून. यासाठी कॉफीची ताजी फळे मिळाल्यास ती फार उपयुक्त ठरतात.

सर्वप्रथम कॉफीची ताजी फळे निवडून त्यातील बी वेगळी काढून घ्यावी. अशा बिया पाण्यात भिजत ठेवून त्यांवरील गर पूर्णपणे काढून टाकावा.

या बिया स्वच्छ धुवून घेऊन एक चाळणीवर काढून घ्याव्या आणि कोरड्या जागी ठेवून वाळवून घ्याव्यात. या बिया बाहेरून कोरड्या आणि आतून किंचित दमट असाव्या. याखेरीज कॉफीचे बी विकतही मिळते. अशा तयार बियासुद्धा लागवडीसाठी वापरता येतात.

कॉफीच्या बिया जर फळे काढल्यापासून ४ महिन्यात लागवडीसाठी वापरल्या, तर त्या रुजून येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काढणीनंतर ४ महिन्यांत अशा बिया लागवडीसाठी वापरणे इष्ट ठरते.

या पूर्वतयारीनंतर वेळ येते बिया रुजत घालण्याची. यासाठी बागेतील माती आणि गांडूळखत यांचे मिश्रण वापरावे. याबरोबरच कोकोपीटचाही वापर केला जाऊ शकतो. बिया रुजत घालण्यासाठी ६०मिली क्षमतेचे लहानसे भांडे वापरता येईल.

तयार मिश्रणात एक बी हलकेच टोचून त्यावर पाणी शिंपडावे. यामुळे माती आणि खताचे मिश्रण ओलसर राहून बी रुजण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण होते, पण याबरोबरच पाण्याचा निचरा होईल आणि पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

साधारणपणे अडीच महिन्यात ताज्या बियांना कोंब येण्यास सुरुवात होते. जर बिया जुन्या असतील तर कदाचित ४ ते ६ महिनेही लागू शकतात. कोंब आल्यावर या बिया थोड्या मोठ्या भांड्यात लावाव्या.

 

coffee plant inmarathi2

 

कोंब आलेल्या बियांना या काळात व्यवस्थित पोषण मिळणे गरजेचे असते. यासाठी बिया मोठ्या भांड्यात लावल्यावर त्यात उत्तम कस असलेली माती, कुथीतमृदा (ह्युमस) असणे गरजेचे असते. ही माती पाण्याचा निचरा होणारी, पण त्याच वेळेस योग्य प्रमाणात दमटपणा धरून ठेवणारी असावी लागते. हा टप्पा तसा नाजूक असून यात कोंब आलेल्या बियांची विशेष निगा राखणे गरजेचे असते.

यानंतर साधारणपणे ३ ते ४ महिन्यात बियांचे हळूहळू रोपात रूपांतर होताना दिसून येईल. या दरम्यान आसपासची माती दमट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. अजून एक-दीड महिन्यानंतर रोपाला फुटवा आलेला दिसून येईल.

साधारणपणे बी रुजत घातल्यापासून नवव्या महिन्यापर्यंत कॉफीचे रोप तयार झालेले दिसून येईल. यानंतर हे रोप एखाद्या कुंडीत किंवा बागेत लागवड करण्यायोग्य झालेले असेल.

रोप जर बागेत लावायचे असेल, तर त्यासाठी मातीचा सामू (pH) ६ एवढा, म्हणजे काहीसा आम्लधर्मी असणे गरजेचे आहे.

कॉफीचे रोप हे नाजूक असल्याने आसपास मोठी झाडे पाहून, त्यांच्या आसऱ्याने लागवड केल्यास त्याला आधार मिळू शकतो. एकापेक्षा अधिक रोपे लावायची असल्यास साधारणतः ३ मीटरच्या अंतरावर लागवड करावी.

रोप लावल्यावर आसपासच्या मातीत दमटपणा टिकून राहण्यासाठी त्यावर गवत पसरावे. त्याबरोबरच जमिनीचा कस कायम राखण्यासाठी आसपास कडधान्येसुद्धा लावता येतील.

जर रोपाची लागवड कुंडीत किंवा एखाद्या अन्य भांड्यात करायची असल्यास ते पुरेसे खोलगट असावे जेणेकरुन मुळांची वाढ नीट होईल. घरात सहज सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ती कुंडी ठेवावी.

 

coffee plant inmarathi

 

पावसाळ्यात शक्यतो कॉफीच्या झाडाला पाण्याची गरज पडत नाही. एरवी आठवड्यातून २ वेळा झाडाला पाणी देणे गरजेचे आहे. रोप लावल्यापासून सहा आठवड्यांपर्यंत त्याला कोणतेही खत घालू नये. त्यानंतर जमिनीचा कस पाहून सहा आठवड्यांच्या अंतराने आवश्यक तेवढेच खत घालावे.

यानंतर महत्त्वाचे म्हणजे प्रूनिंग, म्हणजेच झाडाची छाटणी. झाडाच्या फांद्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी नियमितपणे छाटणी केली जाते. झाड अर्ध्या मीटर उंचीपर्यंत वाढल्यावर छाटणी करावी, पण जास्त प्रमाणात छाटणी केल्यास झाड कमजोर होऊ शकते.

कॉफीचे झाड आपल्या संयमाची परीक्षा बघणारे झाड आहे. लागवड केल्यापासून साधारणपणे ९ वर्षांनंतर हे झाड आपल्याला अपेक्षित फळे देऊ शकते. सुरुवातीला २-३ वर्षांनंतर याला फुले आणि क्वचित फळे लागलेली दिसतात.

 

coffee plant inmarathi3

 

महिनाभर झाडाला फुले आलेली दिसतात, पण ती लगेचच गळून पडतात. यानंतर सात आठ महिन्यांनी फळधारणा हळू हळू सुरू होते. हिरवट दिसणारी फळे लालसर होताच गळून पडतात. याचा अर्थ झाड अजूनही फळधारणा करण्यास सक्षम झालेले नाही असा होतो.

कॉफीची फळे लाल झाल्यावर काढण्यायोग्य होतात. कॉफी पावडर बनवण्यासाठी या फळांचा गर काढून फळातील दोन बिया स्वच्छ धुवून, वाळवल्या जातात. या हिरव्या बिया १० मिनिटे भाजून दळल्यावर कॉफी पावडर तयार होते.

भारतात तामिळनाडू मधील कूर्ग हे कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हवामान आणि मातीच्या बंधनामुळे सगळीकडे कॉफीची मोठ्या प्रमाणात लागवड शक्य नाही, पण तरीही आपण आपल्या बागेत, टेरेस गार्डन मध्ये आपल्या हौसेखातर कॉफी नक्कीच लावू शकतो.

सीसीडी-स्टारबक्स मधील कॉफीपेक्षा स्वतः पिकवलेल्या कॉफीची चव नक्कीच जास्त आनंददायक असेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?