“पुलं”कडची नोकरी, माझ्या आनंदाचा ठेवा, एक अविस्मरणीय अनुभव!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक – स्वप्नील कुंभोजकर
===
आजोबांना जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तेव्हा मी तेरा-चौदा वर्षाचा होतो. हॉस्पिटलमध्ये आजोबांना भेटायला आई घेऊन गेली, तेव्हा तिने मला शेजारची रूपाली बिल्डिंग दाखवली.
म्हणाली “हे बघ, इथे पु.ल.देशपांडे राहतात.”
नशीब ही असं होतं की आजोबांच्या खोली मधून पु . लं . चा फ्लॅट दिसायचा. रूममध्ये आजोबांची तब्येतीची काळजी करता करता सारखं लक्ष खिडकीतून पलीकडे जायचं.
पु.ल. दिसतील का असं सारखं वाटायचं. आपण कधी तिथे जाऊ आणि पु लं. शी गप्पा मारू असा विचार सारखा यायचा.
नंतर काही वर्षांनी एकदा धीर करून रुपाली मध्ये गेलोच. पु . लं च्या घराची बेल वाजवली, दार उघडण्याची वाट बघताना हृदयात इतकं धडधडत होतं, अजून आठवतं. सुनीताबाईंनी दरवाजा उघडला.
“काय हवंय “असं विचारलं.
“पु. ल. आहेत का? त्यांना भेटायचं होतं.”
“नाही भाई बाहेर गेला आहे.”
“बरं.”
मी घरी परत.
असं दोन-तीनदा झालं.
आणि मग कोणे एके दिवशी, मी त्यांच्या घराची बेल वाजवली आणि चक्क पुलंनी दार उघडलं.
“काय रे काय हवे आहे?.”
“काही नाही. तुम्हाला भेटायचं होतं. येऊ का आत?”
“हो, ये की, मी रिकामाच आहे.”
इतक्या सहजपणे म्हणाले, की मला खरंच वाटेना. माझ्या एक्साइटमेंटचा तो परमोच्च बिंदू होता. आत गेल्यावर असा उजवीकडे हॉल होता. तिथे दोन सोफे होते. काळ्या रंगाचे. समोरासमोर.
मला म्हणाले ,”बस. बोल काय काम आहे तुझं.”
पाच सेकंद मला काही बोलताच आलं नाही. मनात ठरवून ठेवलेली, रचून ठेवलेली, सगळी वाक्यं गायब झाली होती.
मी एकदम म्हणालो, “पु. ल, मला तुमच्याकडे नोकरी करायची आहे.”
हे वाक्य माझ्या तोंडून येताच पु. ल. इतके खळखळून हसले.
एकदम म्हणाले, “सुनिता, अगं बघ हा काय म्हणतोय.”
मग सुनीताबाई आतून आल्या.
“अगं हा बघ, आपल्याकडे याला नोकरी करायची आहे.”
त्यांना पण हसू आलं आणि त्या पु लं शेजारी सोफ्यावर बसल्या. मी सतरा अठरा वर्षाचा मुलगा त्यांना काय म्हणतोय हे लक्षात आल्यावर त्या दोघांनाही कमालीची उत्सुकता आणि गंमत वाटत होती.
“अरे तुझं नाव काय? काय शिकतोस ? नोकरी कशाला करायची आहे?”
मला ही जरा धीर आला.
मी म्हणलं कसलीही नोकरी द्या. मी कार चालवू शकतो, तुमची 118 NE मला अतिशय आवडते. प्रेमाने चालवेन. बँकेत चेक भरेन, घरी भाजी आणून देईन, दुकानातून किराणामाल आणून देईन, तुमची पत्रं sort करेन, आलेल्या पाहुण्यांना पाणी देईन, वहिनींना घरकामात मदत करेन, काहीही सांगा.
जास्ती जास्त तुमच्या बरोबर राहता येईल, तुमचा सहवास लाभेल, असं काहीही काम सांगा. पगार नाही दिलात तरी चालेल.
हे ऐकल्यावर त्या दोघांची हसून हसून पुरेवाट झाली.
मग त्यांनी माझी रीतसर मुलाखत घेतली (job interview !!)
“घरी कोण कोण असतं? काय करतात आई वडील ?”
“आई LIC मध्ये आहे आणि वडील बँकेत काम करतात.”
“तरीच. म्हणून हे सगळं सुचतंय. अभ्यास वगैरे करतोस का?”
“आता तुम्ही मला आई बाबां-सारखेच प्रश्न विचारताय.”
त्यावर आम्ही तिघेही खळखळून हसलो. मग त्यांनी मला extra curricular activities बद्दल विचारलं. मी धाड धाड धाड सगळं सांगून टाकलं.
तुमची सगळी पुस्तकं वाचली आहेत. शास्त्रीय संगीत ऐकतो. बालगंधर्व आवडतात. वसंतराव देशपांडे जीव की प्राण आहेत. मल्लिकार्जुन मन्सूर यांचं खूप गाणं ऐकलंय. वगैरे वगैरे.
अचानक पु. ल. जुन्या नाटकांबद्दल बोलायला लागले.
बालगंधर्व, खाडिलकर यांची नाटकं याबद्दल भरभरून बोलले. मग म्हणाले हे सगळं तुला माहिती आहे का. म्हणलं खरं सांगू का ,एवढ माहिती नाहीये पण तुमच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर मी धन्य झालो आहे.
मग सुनीताबाईंनी एकदम विचारलं ” किती वेळा बेल वाजून गेलास परत?”
आता मी हसलो आणि हाताने “चार” असा आकडा दाखवला.
“आज तुझं नशीब उत्तम आहे. माझ्या ऐवजी भाईने दरवाजा उघडला.”
“लिम्का पिशील का?”
त्या दिवशी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा soft drink प्यायलो. कारण एकच. अजून थोडा वेळ तिथे घालवता येईल आणि त्या दोघांशी भरपूर गप्पा मारता येतील !!
मग मी माझं सगळं ज्ञान-अज्ञान त्यांच्यासमोर मोकळं करून टाकलं. जवळपास तास-दीड तास आम्ही गप्पा मारत होतो.
मी भाईंना कुमार गंधर्व यांची मैफिल आपण दोघांनीच कशी ऐकली होती त्याची पण आठवण करून दिली.
माझं सगळं बोलणं ऐकून, खरंतर बडबड ऐकून, या दोघांची चांगलीच करमणूक होत होती.
मग वहिनी म्हणाल्या “घरचे थांबलेत का जेवायला ?”
” वाहिनी, कळलं मला, आता मी निघतो.”
आणि मग माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर, दीड तास, त्या आठवणी बरोबर घेऊन हवेत तरंगत मी घरी गेलो. घरच्यांनी कोपरापासून नमस्कार केला मला.
माझ्यासाठी तो दिवस अतिशय अविस्मरणीय ठरला. जोशी हॉस्पिटल मध्ये मनात ठेवलेली इच्छा इतक्या सुंदर रित्या पूर्ण होईल असं कधी वाटलं नव्हतं. पु. ल .आणि सुनीतावाहिनी यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा, टिंगल टवाळी, गंमत जंमत – आयुष्याचं सोनं झालं माझ्या.
त्यांच्याच एका लेखात John Carlisle बद्दल त्यांनी लिहिलं होतं, तसा साधा मोठा सोफा, त्यावर मी बसलोय, समोर साक्षात पु. ल. आणि सुनीता वहिनी दोघेही बसले आहेत, आणि माझ्याशी गप्पा मारत आहेत, हे चित्र मी कधीच विसरू शकणार नाही.
दोघेही इतके मोठे, इतके बिझी, परंतु माझ्यासारख्या, अतिसामान्य तरुण मुलाबरोबर इतक्या खेळीमेळीने मनमोकळेपणे गप्पा मारत होते, जणू काही त्यांची आणि माझी खूप जुनी ओळख आहे, दोस्ती आहे.
मी माझ्या अज्ञानाचा show करणारा अति उत्साही मुलगा, आणि ते दोघेही इतके प्रतिभावान , इतके मोठे, पण त्यांनी मला हे जाणवून सुद्धा दिलं नाही, आणि नोकरीही दिली नाही !!
पण माझ्यासाठी एक सुंदर आनंदाचा ठेवा मागे ठेवून गेले.
—
- पुलं ‘अपूर्वाई’ लिहीत असताना आला भूकंप आणि पुढे घडलेला किस्सा झाला चेष्टेचा विषय
- फाळणीचा काळ, जातीय दंगे.. हर हर महादेवच्या घोषणा.. पुलंच्या पत्नीचा थरारक अनुभव
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.