अभिमानास्पद : दोन देशांच्या युद्धात “अदृश्य भारतीय हात” परिणामकारक ठरलाय…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
युद्ध म्हणजे अंगावर शहारे आणणारा विषय. अगणित मृत्यू, बेघर झालेली जनता, दयनीय झालेला समाज आणि बरेच मानवतावादी मूल्यांचे नुकसान.
शत्रू कितीही मोठा असला, तरी बसून प्रश्न सोडवता येतात आणि होणारे नुकसान टळू शकते यावर जग विश्वास ठेवायला लागलं आहे. कारण युद्धाची भीषणता मोठी असते.
तर, ख्रिश्चन बहुल आर्मेनिया आणि मुस्लिम बहुल अझरबैजान या दोन देशांवर ‘नागोरणो-काराबाख’ या भागावरून युद्धाचे ढग जमा झालेले आहेत.
पूर्वीच्या सोव्हिएत रशियाचा भाग असणाऱ्या या देशात त्या भागावरून फार आधीपासून वाद चालून आलेला आहे, पण आता तो वाद शिगेला पोहोचला आहे. एवढा की अझरबैजानचे नागरिक युद्धाच्या मागणीवरून थेट त्यांच्या संसदेत घुसले होते.
जुलैमध्ये झालेल्या छोट्या मोठ्या चकमकींमधून आता हे दोन देश आमने सामने उभे राहिले आहेत.
परिस्थिती चिघळणार वाटत असताना त्या आगीत तेल टाकायचे काम केले तुर्कीने. मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाचा ठेका उचलणाऱ्या तुर्कीने लागलीच अझरबैजानला आपला पाठिंबा जाहीर केला तर तिथे रशियाने आर्मेनियाला.
महायुद्ध सुरू होते ते अशाच परिस्थितीमुळे!
भारत हा सुरवातीपासूनच विश्व शांतीच्या बाजूने उभा राहिलेला देश आहे. शीतयुद्धाच्या काळात सुद्धा भारत तटस्थचं राहिला होता, पण स्वतःवर आक्रमण करणाऱ्याला त्याच्याच भाषेत उत्तर सुद्धा भारताने दिलेलं आहे.
आर्मेनियाने आतापर्यंत अझरबैजानचे १५ ड्रोन, ५ हेलिकॉप्टर आणि १० रणगाडे निकामी केले आहेत. कशाच्या मदतीने? भारताने दिलेल्या ‘स्वाती’ या वेपन लोकेटिंग रडारच्या सहाय्याने!
होय! भारताने दिलेल्या. भारतात निर्माण झालेल्या. स्वदेशी बनावटीच्या यंत्रणेने!
आर्मेनियाने युद्धाचे एकूण अंदाज बांधून आपल्या सुरक्षेच्या हिशोबाने साधन खरेदीसाठी करार करण्याची सुरुवात केली होती.
वर्षाच्या सुरुवातीलाच ४ करोड डॉलरची बोली लावून भारताने रशिया आणि पोलंडला धोबीपछाड देत हा करार आपल्या खिशात घातला.
एकूण चार रडार देण्याचा हा करार होता. त्यापैकी जुलै मध्ये दोन रडार हे आर्मेनियाला डिलिव्हर करण्यात आले होते आणि त्याच्याच मदतीने तुर्कीने अझरबैजानला दिलेल्या युद्ध साहित्याचा विध्वंस आर्मेनियाला करता आला.
तर बघूया ही ‘स्वाती’ नेमकी आहे तरी कोण? स्वाती-वेपन्स लोकेटिंग रडार सिस्टीम! नावातच या यंत्राचं काय काम आहे ते कळून येईल.
हे रडार ५० किलो मीटर अंतराच्या शत्रूच्या असलेल्या मोर्टर्स, तोफगोळे आणि रॉकेटचे इत्यंभूत माहिती आणि लोकेशन जलदगतीने देते.
भारत सरकारची स्वायत्त संस्था भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि डीआरडीओच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड रडार डेव्हलपमेंट इस्टेबलिशमेन्ट या दोन आस्थापनांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वाती’ ची निर्मिती झाली आहे.
या रडारची विशेषता म्हणजे हे केवळ फायर केलेली शस्त्रच दाखवत नाही, तर आपल्याकडे येत असलेल्या अनेक ठिकाणांवरून झालेल्या अनेक हल्ल्यांना सुद्धा निकामी करू शकते.
शस्त्रे दाखवण्यासोबतच हे रडार फायरिंग करण्यासाठी सुद्धा सक्षम आहे.
त्यासाठी या रडार सोबत ८१ एमएम किंवा त्यापेक्षा जास्त रेंजची मोर्टर, १०५ एमएम किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे तोफगोळे, १२० एमएम किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे फ्री फ्लाईंग रॉकेट जोडले गेले आहे.
एकूणच सेल्फ डिफेन्स आणि फायरिंग या दोन्ही बाबींमध्ये स्वाती रडार हे उजवे ठरते.
नुकतेच भारतीय सेनेने सुद्धा ४०० करोड किमतीचे सहा स्वाती रडार घेण्याचे ठरवले आहे. भारतीय सेनेला देण्यात येणारे रडार हे अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे. जे वजनाने हलके आणि डोंगराळ भागात अति सक्षमतेने काम करण्यास तत्पर असतील.
१९६२चं इंडो-चायना युद्ध आठवतं?
ऐन युध्दाच्या वेळेस कम्युनिस्ट पार्टी संलग्न कामगार संघटना संपावर गेले आणि युद्धासाठी तैनात असलेल्या जवानांना अपेक्षित युद्ध सामग्री पोहोचली नव्हती आणि झालेला परिणाम जग जाहीर आहे.
युद्ध सामग्री सोडा, साधे पायात घालायचे बूट सुद्धा उपलब्ध नव्हते. या सर्व परिस्थितीला वळण देऊन भारत आता स्वतः युद्ध समग्रीची निर्मिती करत आहे.
आज भारत माझगाव डॉकच्या बंदरात आपल्या हिमतीवर पाणबुड्या त्या सुद्धा आण्विक आणि लढाऊ जहाजांची निर्मिती करत आहे.
एके ४७ च्या गोळ्यांना अडवू शकतील असे हेल्मेट आणि बुलेट प्रूफ जॅकेटची टेस्टिंग नुकतीच आर्मीच्या आरअँडडी विभागाने केली.
रणगाडे, अँटी टँक गन यांची निर्मिती सुद्धा भारत आता मोठ्या प्रमाणात करत आहे.
स्वाती सारखे रडार, इस्त्रायल सोबतच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन, अँटी सॅटेलाईट सिस्टीम, अँटी मिसाईल सिस्टीम सारख्या नानाविध संरक्षण साहित्याची भारत स्वतंत्रपणे निर्मिती करत आहे.
एकूणच, १९६२ च्या युद्धाच्या वेळी असलेली परिस्थिती आणि आज देशात निर्माण झालेली संरक्षण यंत्रणा दुसऱ्या देशांना देणे इथपर्यंत भारताने बराच लांब पल्ला गाठलाय.
आत्मनिर्भर राहणे म्हणतात ना ते हेच!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.