गंभीर जखमी असतांना ३ दिवस झाडावर जीवन-संघर्ष करणारी गुप्तहेर; वाचा शौर्यगाथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी योगदान दिले आहे, परंतु त्या सगळ्यांचीच नावं माहीत नाहीत. भारतासाठी लढणारे हे अनामवीर.
कोणत्याही परिस्थितीत भारत स्वतंत्र व्हावा आणि भारतातून इंग्रजांना हाकलून लावावे यासाठी कित्येक लोकांनी आपले जीवन बहाल केले. त्याचा फायदा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी या लोकांनी करून घेतला नाही.
भारत स्वतंत्र व्हावा ह्या ध्यासापोटी लहान थोर, स्त्री-पुरुष, छोटी मुले देखील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होती. त्या काळात सगळ्यात लहान गुप्तहेर म्हणून ज्यांनी काम केलं, त्यांच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
राजमणी यांचा जन्म १९२७ साली ब्रह्मदेशातील म्यानमार येथे झाला. त्यांचं घर तसं श्रीमंत, परंतु देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं.
त्यांचे वडील भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी मदत करायला नेहमीच तत्पर असत. घरातलं वातावरणही एकदम मोकळं होतं. केवळ मुलगी आहे, म्हणून त्या काळातही त्यांना कुठलंही बंधन घरातून नव्हतं.
घरामध्ये चाललेल्या स्वातंत्र्याविषयीच्या चर्चा त्या नेहमीच ऐकायच्या, त्यात सहभागी व्हायच्या. त्यामुळेच त्यांच्याही मनात इंग्रजांविषयी चीड निर्माण झाली होती.
त्यांच्या घरामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक नेहमी यायचे. त्यांच्या मिटिंग तिथे चालायच्या. हे सगळंच राजमणी लहानपणापासून बघत होती.
१९३७ मध्ये महात्मा गांधींनी म्यानमारला भेट दिली होती. त्यावेळेस ते राजमणी यांच्या घरी देखील गेले होते. त्यावेळेस गांधीजी काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते.
संपूर्ण देशभर गांधीजींच्या चळवळी सुरू होत्या. त्यावेळेस स्वातंत्र्याच्या चर्चा सुरू होत्या. घरातली सगळी मंडळी त्यात सहभागी होती, पण बराच वेळ झाला तरी राजमणी त्यांना तिथे दिसली नाही.
मग तिची शोधाशोध सुरू झाली तर त्यांना दिसलं, की राजमणी बंदूक चालवायची प्रॅक्टिस करते आहे. गांधीजींनी तिच्या जवळ जाऊन विचारलं की,
“बाळा, तू हे कशासाठी करत आहेस?” त्यावेळेस राजमणी म्हणाल्या की,” मला मोठी झाल्यावर माझ्या आयुष्यात एका तरी ब्रिटीश व्यक्तीला याने मारायचे आहे.”
गांधीजी अहिंसेचे पुजारी, ते म्हणाले की, “हिंसेनेचे प्रत्येक गोष्ट मिळते असे नाही.” परंतु त्यांच्या समोरही या छोट्याशा दहा वर्षांच्या राजमणीने न घाबरता आपला इरादा सांगितला होता.
अहिंसेने स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही असा त्यांचा विश्वास होता. “जे भारत देशाचे लुटेरे आहेत त्यांना मारायलाच हवं, नाही का?” असा प्रतिसवाल त्यांनी गांधीजींना केला होता.
ब्रिटिश भारताला लुटत आहेत म्हणून मी एका तरी ब्रिटिशाला ठार मारणार असा त्यांचा निर्धार त्यांनी गांधीजींना सांगितला होता.
लहानपणापासूनच इतक्या प्रखर जहालवादी विचारसरणीची राजमणी पुढे सुभाषचंद्र बोस यांच्या “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा” या घोषणेकडे आकर्षिली गेली नसती तरच नवल होतं.
सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणांनी त्या प्रभावित झाल्या होत्या.
१९४२-४३ चा काळ असेल. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. सुभाष बाबू या युद्धाचा भारताच्या स्वातंत्र्यासाठी उपयोग करून घेण्याचा विचार करत होते. या युद्धात आझाद हिंद सेना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सज्ज होती.
आझाद हिंद सेनेच्या उभारणीत सुभाषचंद्र बोस यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि ही मदत मिळवण्यासाठी सुभाषचंद्र बोस अनेक ठिकाणी भेटी द्यायचे. तिथे त्यांची भाषणे व्हायची. ते जिथे ही जायचे तिथे लोक त्यांना आर्थिक मदत करायचे.
अशीच मदत मिळवण्यासाठी सुभाषबाबू म्यानमारला गेले होते. तिथे त्यांनी भाषण दिलं. राजमणी यांनी त्यांचं भाषण ऐकलं, आणि त्यांच्या अंगावर जितके दागिने होते, ते त्यांनी काढून सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेने साठी दिले.
राजमणी तेव्हा साधारण पंधरा -सोळा वर्षांची असेल. राजमणी यांच्या वडिलांनीही सुभाषबाबूंना सढळ हाताने आर्थिक मदत केली.
परंतु जेव्हा हा सुभाषबाबूंना राजमणीने दिलेल्या दागिन्यांनी बद्दल समजले, तेव्हा ते तिच्या घरी दागिने परत करण्यासाठी गेले. ते तिच्या वडिलांना म्हणाले,
“निरागसपणे तुमच्या मुलीने सगळे दागिने मला दिले आहेत, परंतु हे तिचे दागिने आहेत. तिला परत देण्यासाठी मी आलो आहे”.
जेव्हा राजमणीला त्यांच्या येण्याचे कारण कळाले तेव्हा त्या बाणेदार मुलीने, “मला हे दागिने परत नकोयत”, असं सांगितलं. तिच्या वडिलांनीही अर्थातच हे दागिने परत घेण्यास नकार दिला.
तिचं हे योगदान पाहून सुभाषबाबूंनी तिचं नाव ‘सरस्वती’ असं ठेवलं. तेव्हापासून ती सरस्वती राजमणी म्हणून ओळखली जाते.
सरस्वतीची ब्रिटिशांबद्दलची चीड पाहून सुभाषबाबूंनी सरस्वतीला आझाद हिंद सेनेच्या इंडियन नॅशनल आर्मी मध्ये घेतलं. आझाद हिंद सेनेत सामील होणारी ती सगळ्यात तरुण महिला होती.
सुभाषबाबू इथेच थांबले नाहीत, त्यांनी तिला आझाद हिंद सेनेतील इंटलिजन्स विंग्स मधील गुप्तहेर बनवलं. तिच्याबरोबर तिच्या चार मैत्रिणी देखील गुप्तहेर बनल्या.
त्यांनी ब्रिटिश मिलिटरी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरात काम सुरू केलं, पण त्यांनी हे काम एक मुलगा म्हणून सुरु केले. तिथून त्या हेरगिरी करायच्या. स्वतःचा स्त्रीवेष त्यांनी बदलला आणि मुलाचा वेष धारण केला. त्यांनी स्वतःचे नाव देखील मणी असं ठेवलं.
ब्रिटिश मिलिटरीकडे येणाऱ्या पत्रांमधील माहिती त्या आझाद हिंद सेनेला द्यायच्या. ब्रिटिश मिलिटरीच्या हालचालींवर ही त्यांचं लक्ष असायचं. ब्रिटिश सैन्यदलाच्या योजना हाणून पाडायचं काम त्या करायच्या.
ब्रिटीश सैन्याची बित्तबातमी त्या आझाद हिंद सेनेपर्यंत द्यायच्या. जवळजवळ दोन वर्ष त्यांनी हे काम निर्धोकपणे केलं.
एके दिवशी तिच्या मैत्रिणीला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पत्रांची चोरी करताना रंगेहात पकडले. ती मुलगी आहे हे देखील ब्रिटिश सैन्याला तेव्हा कळलं.
त्यावेळेस राजमणीला आपल्या मैत्रिणीला कोणतीही मदत करता आली नाही. उलट आपण त्या गावचेच नाही असं वर्तन तिला करावं लागलं. तिची ओळख आहे हे देखील त्यांनी त्या वेळेस सांगितलं नाही.
तिच्या मैत्रिणीला ब्रिटिश अधिकाऱ्याने अटक करून तुरुंगात टाकलं. मैत्रिणीला तसंच तुरुंगात सोडणं राजमणी यांना योग्य वाटलं नाही, मग सरस्वती राजमणीने एका नाचणाऱ्या खेडूत मुलीचा वेष परिधान केला आणि ती ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर नाच करू लागली.
नाच करता करता तिने ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुंगीचे औषध दिले आणि आपल्या मैत्रिणीची कैदेतून सुटका केली.
त्या दोघी पळत असताना त्यांना दुसऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने पाहिलं आणि त्यांच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी राजमणीच्या पायाला लागली. तरीही ती तशीच पळत होती.
अधिकाऱ्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्या दोघी एका झाडावर चढल्या. तो दुखरा पाय तसाच घेऊन त्या झाडावर त्यांनी तीन दिवस काढले.
अधिकाऱ्यांनी त्यांची शोध मोहीम चालू केली होती. परंतु त्या दोघीही झाडावर लपूनच राहिल्या. ब्रिटिशांची शोध मोहीम थांबल्यावर त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली.
या सगळ्यांमध्ये राजमणी यांचा पाय दुखावला गेला तो कायमचाच, परंतु त्यांनी तो जखमी पाय एखाद्या दागिन्याप्रमाणे मिरवला. त्याचा त्यांना अभिमान वाटायचा. नंतरही त्यांनी आझाद हिंद सेनेसाठी आपली सेवा दिली.
भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर त्या एकट्याच राहिल्या. त्या चेन्नई मधल्या त्यांच्या कुटुंबाच्या घरामध्ये राहत होत्या. त्यांनी त्यांच्या जवळचे सगळे पैसे लोकांसाठीच खर्च केले.
त्यांच्या या कार्याचा गौरव २००५ मध्ये जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांनी केला. जयललिता यांनी सरस्वती राजमणी यांना स्वतंत्र घर देऊ केले. ते घर राजमणी यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या फोटोंनी भरून टाकले आणि ते त्यानेच सुशोभित केले.
वयोवृद्ध अवस्थेतही त्यांची आपल्या राष्ट्रावरची भक्ती कमी झाली नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे भान त्यांनी कधीही विसरू दिलं नाही.
अगदी शिंपी लोकांकडे जाऊन त्यांच्याकडून शिवलेल्या कपड्यातून उरलेले कापड त्या जमा करायच्या आणि त्या कपड्यांचे स्वतःच्या हाताने नवीन कपडे त्या शिवायच्या.
ते कपडे त्या अनाथाश्रमातील मुलांना नेऊन द्यायच्या. २००६ मध्ये आलेल्या त्सुनामीने तामिळनाडूचे अत्यंत नुकसान केले. त्यावेळेस देखील सरस्वती राजमणी यांनी आपली सगळी पेन्शन त्सुनामी ग्रस्तांसाठी दिली होती.
खरोखरच काही लोकांचे जीवन हे आदर्श असते. कोणत्याही पदाची किंवा सत्काराची अभिलाषा या लोकांनी बाळगली नाही. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी देशासाठी बहाल केलं.
समाजामध्ये असे लोक खरंतर दीपस्तंभाचे काम करतात. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. भारताच्या या पहिल्या लहान अनाम गुप्तहेराला प्रणाम.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.