Site icon InMarathi

अनेक व्याधींवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीचे हे फायदे तुम्हाला बहुतेक माहीत नसतील!

Tulsi InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय संस्कृतीत तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी तुळस भारतातील घराघरात वृंदावनांमध्ये तसेच परसदारी विराजमान झालेली दिसून येते.

कृष्णतुळस आणि पांढरी किंवा रामतुळस अशा दोन प्रकारच्या तुळशी खास करून पहावयास मिळतात. कापराच्या वासाची सुद्धा तुळस आढळते जिला कर्पूर तुळस असे म्हणतात.

तुळशीच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू आणि टोकाशी शंकराचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. कार्तिकात येणाऱ्या प्रबोधिनी एकादशीनंतर त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुलसीविवाह साजरा केला जातो आणि यानंतरच विवाहांचे मुहूर्त सुरू होतात.

 

newstrack.com

 

अशाप्रकारे धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र असणारी तुळस वैज्ञानिक पातळीवरही तितकीच महत्वाची आहे. तुळशीच्या झाडाचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या प्रकारे शरीराला उपयोगी ठरतो.

भारतात प्राचीन काळापासून औषधांमध्ये तुळस वापरली जाते. आयुर्वेदात तुळशीचे अनेक उपयोग उद्धृत केलेले आहेत.

जगभर तुळशीच्या अनेक प्रजाती आढळून येतात. इटालियन पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘बेसिल लिव्हज’ म्हणजे तुळशीचीच एक प्रजाती आहे. तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसीमम सँक्टम (Ocimum Sanctum) असे आहे.

तुळशीत प्रामुख्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, लोह, जस्त आणि क्लोरोफिल ही पोषणमूल्ये आढळतात. तुळशीचे सेवन ताण तणावाच्या मुक्तीसाठी आणि चित्त प्रसन्न ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

 

blog.nurserylive.com

 

एका संशोधनानुसार, तुळशीचे नियमित सेवन करणाऱ्या लोकांमध्ये चिंता, तणाव आणि नैराश्याचे प्रमाण कमी दिसून आले.

घराच्या आसपास मोकळी हवा आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यास तुळस उत्तम प्रकारे वाढते आणि यामुळे घरातील आणि घराच्या आसपासचे वातावरण प्रसन्न राहते.

आयुर्वेदात वेगवेगळ्या आजारांवर अनेक प्रकारचे काढे सांगितलेले आहेत. यातील बहुतांश काढयांमध्ये तुळशीचा वापर केलेला दिसून येतो.

 

timesofindia.indiatimes.com

 

हल्ली बरेच आहारतज्ज्ञ ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. तुळस हा ग्रीन टी मधील एक महत्वाचा घटक आहे.

तुळशीत अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारच्या विषारी द्रव्यांपासून होणारा धोका कमी होतो.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या पेशींची वाढ रोखण्यातही तुळस महत्त्वाची भूमिका बजावते. तुळशीमधील फायटोकेमिकलसमुळे कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो.

तुळशीचा रस विविध प्रकारे गुणकारी आहे. जखम भरून येण्यासाठी तुळशीचा रसाचा वापर केला जातो. या रसातील अँटी बॅक्टरीयल आणि अँटी फंगल तत्त्वे या कामी मदत करतात.

 

.herzindagi.com

 

त्वचेची निगा राखण्यासही तुळस उपयुक्त ठरू शकते. तुळशीच्या पानांचा लेप चेहऱ्याला लावल्याने त्वचा उजळते.

मधुमेह हा भारतीय व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार आहे. रक्तातील साखर प्रमाणाबाहेर वाढल्यास नाईलाजाने इन्सुलिनचा उपाय योजवा लागतो.

तुळशीचे सेवन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तुळस शरीरातील चयापचय क्रियेसही मदत करते.  ज्यामुळे मधुमेह नियंत्रणाबरोबरच कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते.

अपचन आणि तोंडाची चव गेल्यास तुळशीची पाने खाणे उपयोगी ठरते.

 

food.ndtv.com

 

पोटदुखीवर तुळशीचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. पोटाची उत्तम निगा राखण्यासाठी तुळस महत्त्वाचा घटक आहे.

तुळशीच्या सेवनाने पोटातील आवश्यक स्राव (म्युकस) तयार होण्याचे कार्य नियमित राहते. यामुळे पेप्टीक अल्सर सारख्या रोगांचा सामना करण्याची पोटाची क्षमता वाढते.

मूत्राशयाशी संबंधित विकारावर तुळस गुणकारी आहे. तुळशीच्या सेवनाने लघवीची जळजळ, मुतखडा यांमुळे होणारा त्रास कमी होतो.

तुळशीला लहान गुच्छाप्रमाणे फुले लागतात, त्यांना मंजिरी असे म्हणतात. मंजिऱ्यांमधील लहान लहान बियांपासून तेल काढले जाते, जे अनेक औषधी द्रव्यांमध्ये, इतकेच नव्हे तर अत्तरांमध्येही वापरले जाते.

 

quora.com

 

याखेरीज तुळशीचे रोप हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते.

तुळशीच्या सानिध्यात आल्याने जंतुसंसर्गापासून शरीराचे रक्षण होते व मन प्रसन्न होते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावण्याची आणि तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.

 

thehinduportal.com

 

तुळशीमध्ये असलेल्या घटकांमुळे कीटक व इतर जंतू दूर राहतात, म्हणून नैवेद्याच्या पानावर तुळशीचे पान ठेवले जाते.

भारतीय परंपरेतील अनेक वनस्पती आणि पदार्थांप्रमाणेच केवळ धार्मिकदृष्टया महत्त्वाची न राहता तुळस तिच्या अंगभूत उपयुक्ततेमुळे आज जगभर वापरली जाते.

शरीरातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या व्याधीवर उपयुक्त असणारी तुळस म्हणजे एकप्रकारचे वरदानच आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version