Site icon InMarathi

आपल्या सावित्रीला जगवण्यासाठी धडपडणारा आधुनिक सत्यवान; प्रेमाची ही ताकद बघाच

kuroki couple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

डिप्रेशन म्हणजे नैराश्य.. कोणत्याही कारणांनी ते येतंच. चोरपावलांनी येतं.. नकळत येतं. माणूस त्या दुःखालाच कवटाळून बसतो…

तुमची माझी जुनीच ओळख

तुमचे माझे जुनेच नाते,

कुणी न मजला म्हटले आपुले..

तुम्हीच होता एक चहाते!!!

असं जेव्हा दुःखाबद्दल वाटू लागतं तेव्हा माणूस फार खचून गेला आहे हे समजावं. हतबल करणारी परिस्थिती, एकाकीपणा या सर्वांनी एखाद्या माणसाला इतकं निराश वाटू लागतं, की त्या भरात आत्महत्येचा मार्ग पण माणसं निवडतात.

वरवर वाटणारा हा भेकडपणा.. पण जग सोडून द्यायलाही मागं पुढं न पाहता नैराश्याचे बळी जग सहजावारी सोडून देतात.

कधीतरी होणारे मोठे शारीरिक अपघात, मानसिक आघात यांनी माणसाचं मन खचून जातं. शारीरिक अपघातांनी शरीराची जितकी मोडतोड होते त्याहून जास्त मनाची नासधूस होते.

 

 

औषधांनी शारीरिक अपघाताच्या जखमा भरुन येतात. बऱ्याही होतात, पण मनाच्या जखमा फार कठीण असतात भरुन यायला. त्यासाठी फार पैसा अडका लागतो असं नाही. आपल्या माणसाने साधी मायेची प्रेमाची हळूवारपणे घातलेली फुंकर, पण त्या भरुन आणायला मदत करते.

आपल्या माणसांना ते समजणं फार गरजेचं असतं. अशीच मायेची फुंकर आपल्या दृष्टी गमावलेल्या पत्नीसाठी घालणारा हा जगावेगळा नवरा.. ही जगावेगळी कहाणी!!!

आपल्याकडं सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणणाऱ्या सावित्रीची कथा मोठ्या कौतुकाने, श्रद्धेनं सांगितली जाते, पण आपल्या उदास सावित्रीला माणसात आणणाऱ्या या आधुनिक जपानी सत्यवानाची ही आगळीवेगळी कहाणी.

जपानमधील एका खेड्यात राहणारं हे दांपत्य. श्री. व सौ. कुरोकी. आपल्या छोट्याशा शेतात गायी गुरं सांभाळत दोन मुलांसह रहात होतं.

 

हे ही वाचा – घरातलं तुळशीचं रोप सारखं मरतंय? काय आहेत यामागची कारणं आणि टिप्स!

चारचौघांसारखा संसार, दोन मुलं .. सामान्य माणसाच्या सुखाच्या ज्या छोट्याशा कल्पना असतात त्यात फिट्ट बसेल असं हे त्यांचं जग. सगळं आलबेल होतं आणि सौ. कुरोकींना मधुमेह झाला.

मधुमेह कुणाला होत नाही का? पण सौ. कुरोकींना झालेला मधुमेह त्यांची दृष्टी घेऊन गेला. आजवर सुखानं जगणारं हे जोडपं.. या एका आघातानं थोडंसं खचलंच होतं, पण संसाराचा गाडा चालताना एक चाक कुरकुरलं म्हणून दुसरं चाक साथ सोडून देत नाही.

कुरोकींचं वैवाहिक जीवन या अचानक आलेल्या अंधत्वानं बिघडून गेलं. स्वतःला कोसत त्या तासनतास घरात कोंडून राहू लागल्या. आता आपण निरुपयोगी आहोत या विचाराने त्या खचून गेल्या होत्या.

कुरोकींनी असं ढासळून जाणं त्यांच्या पतीला सहन होत नव्हतं. त्यांनी विविध प्रकार करुन आपल्या पत्नीचं मन आनंदी ठेवायचा प्रयत्न सुरू ठेवला.

 

 

साधारणपणे निसर्गाचा एक नियम आहे.. जेव्हा एखाद्या ज्ञानेंद्रियाची ताकद जाते, तेव्हा दुसरं ज्ञानेंद्रिय आपली ताकद एकदम प्रबळ करतं.

उदाहरणार्थ दृष्टी गेली, की कान तिखट होतात. बारीक सारीक आवाजही फार स्पष्ट ऐकू येऊ लागतात. किंवा मेंदू फारच तल्लख होतो वगैरे.

कुरोकींच्या समोर हे नवं आव्हान होतं. आपल्या आंधळ्या झालेल्या आणि मनानं कोसळलेल्या पत्नीला पुन्हा एकदा उभं करायचं. तिच्या मनात जगण्याची जिद्द, उमेद जागी करायची. जिथं इच्छा असते तिथं मार्गही असतातच.

एके दिवशी अचानक त्यांच्या लक्षात आलं, फुलांच्या सुगंधाने आपली पत्नी थोडीशी प्रसन्न झाली होती आणि त्यांना तो मार्ग दिसला. मनात एक आशेचा किरण जागा झाला आणि त्यांनी पत्नीसाठी वेगवेगळ्या सुगंधी फुलांची लागवड करायचं ठरवलं.

 

 

आपल्या घराबाहेरील मोकळ्या जागेत त्यांनी सुगंधी फुलांची झाडं लावली. त्यांची व्यवस्थित देखभाल करुन जगवली आणि दोन वर्षांत तो परिसर सुगंधाने भरुन गेला.

हजारो फुलं फुलली होती त्यांच्या आजुबाजुला. कुरोकी बघू शकत नसल्या, तरी वास घेऊ शकत होत्या. असा अवचिता परिमळू दरवळू लागला आणि कुरोकींना जगण्याची नवी आशा नवी उमेद देऊन गेला.

अंधत्वानं निराश झालेल्या कुरोकींना जे जग नकोसं झालं होतं तेच या फुलांच्या गंधाने भारुन गेलं. कुरोकींचं हरवलेलं हसू हळूहळू फुलांसारखं फुलू लागलं. 

 

 

निराश झालेल्या कुरोकींनी निराशा झटकून टाकली. आता कुरोकी निराश होऊन अंधत्वाचं दुःख करत नाहीत, तर आपल्या पतीनं आपल्यासाठी फुलवलेल्या सुगंधानं‌ परत एकदा सकारात्मकतेने जगायला लागल्या आहेत.

घरासमोरील टेकडीवर फुललेली सुगंधी फुले त्या बघू शकत नसल्या, तरी सुगंधाची अनुभूती घेऊन आनंदी होतात. येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा सुगंध घेऊन येतो आणि कुरोकी तो भरभरुन जगतात आणि त्यांचा आनंद पाहून त्यांचे पतीपण आनंदाने भरुन‌ पावतात.

म्हणूनच प्रेमात खरोखर ताकद असते. प्रेमाची भाषा बहिऱ्यांना ऐकू येते, आंधळ्यांनाही जाणवते आणि मुक्यालाही समजते आणि ती मृतप्राय माणसाला जगायची संजीवनी देते. हे कुरोकी दांपत्याने दाखवून दिलं आहे.

===

हे ही वाचा – खुद्द ब्रह्मदेव जेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्णाची परीक्षा घेतात…!

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version