आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
मागील वर्षी विरार स्टेशनमध्ये पश्चिमेकडील बाजूंनी शिरत असताना त्या ब्रिजवर एका मुस्लीम संस्थेने मुसलमानांना तीन आवाहने केलेली वाचायला मिळाली होती. तेव्हा आयसीस जोरात होती आणि तिच्या प्रभावाखाली भारतीय मुस्लीम तरूणांनी येऊ नये म्हणून सदर आवाहन करण्यात आले होते. पहिले दोन लक्षात नाहीत पण एक पुसटसे लक्षात आहे. त्याला मराठीत सांगायचे तर –
मोमीनांनो, (मुस्लीमानांनो), आयसीस ही यहुद्यांची बनवलेली संघटना आहे…तिच्यापासून दुर रहा…!
– असे सांगता येईल. अर्थातच या विषयाचा विद्यार्थी म्हणून यात तथ्य नाही हे मला माहिती होतेच पण तरीसुद्धा मला हे आवाहन आवडले होते. यहुदी व मुस्लीम यांच्यातील वैमनस्य तर सर्वश्रूतच आहे. याचा फायदा भारतीय मुस्लीम तरूणांना ISIS पासून दुर ठेवण्यासाठी होत असेल तर यात चुकीचे काही नाही असा व्यावहारिक विचार मी तेव्हा केला होता. कारण हे वैर तर राहणारच आहे – मग त्याचा फायदा आपल्याला होत असेल तर तो करून घेतला पाहिजे असे मला वाटलेले.
===
यहुदी (म्हणजे ज्यू लोक) आणि मुस्लिम ह्यांच्यातील वैर इतकं टोकाचं का आहे हे माहिती नसेल तर नक्की वाचा :
ज्यू धर्मियांची वाताहत : इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि ज्यू धर्माचा संयुक्त इतिहास
===
पण ISIS ही खरच यहुदी लोकांनी बनवलेली आहे का? अमेरिकेचा या पाठीमागे काही हात आहे काय? असे प्रश्न मनाला पडल्यानंतर ISIS ही नेमकी काय पीडा आहे – हे जाणून घेण्यासाठी मग या विषयावरील अनेक लेख वाचले, कार्यक्रम ऐकले. विविध विश्लेषकांचे मत ऐकले. त्यावरून या दोन्ही दाव्यात वास्तविकता कमी आणि आपल्या मनातील विशिष्ट पूर्वाग्रह तेवढे असल्याचे लक्षात आले. ISIS ही संघटना काही दोन वर्षात जन्माला आलेली नाही. आजची ISIS ही पूर्वाश्रमीची अल-कायदा होती. ISIS ही अल कायदाचीच पुढील आवृत्ती आहे…
अलकायदा इन इराक याच संघटनेचे आजचे रूप म्हणजे ISIS होय – हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
अल कायदा ही कुठल्या तरी देशाच्या आश्रयाखाली राहून आपल्या कार्यवाह्या पार पाडत असे पण हे त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. यांनी बराचसा मोठा भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणलेला असून तेथून हे ऑपरेट करत आहेत. हे फारच धोकादायक आहे. कारण यांच्या नियंत्रणाखाली जमीन आली याचाच अर्थ तेथील पूर्ण संसाधने ही आली आणि ही गोष्ट यांना अजून धोकादायक बनवते.
अल कायदा धोकादायक असली तरी तिने कुठेही भूभागावर नियंत्रण मिळवले नव्हते वा मिळविण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. तसेच अलकायदा व यांच्या उद्दिष्टातही फरक आहे. अलकायदाचे मुख्य उद्दिष्ट हे पाश्चिमात्य देशावर हल्ले करणे हे होते तर यांना इस्लामिक स्टेट निर्माण करून खिलाफत स्थापन करायची आहे
ISIS नेमकी काय आहे – हे जाणून घेण्यासाठी तिचा उदय तिथेच का झाला व ती स्वतःला तिथेच स्थापित का करू शकली याची उत्तरेही आपण शोधली पाहिजेत.
अमेरिकेने इराक मध्ये हस्तक्षेप करून सद्दाम हुसेनला पदच्यूत केले होते. यानंतर त्यांचे सैन्य बराचसा काळ तिथे असले तरी इराकमधील सुन्नीबहुल भागावर त्यांचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. पण अमेरिकेने हस्तक्षेप करून तेथील सत्ता प्रामुख्याने शियांच्या हातात दिल्याने इराकातील बहुसंख्य असलेले सुन्नी बिथरले आणि याची प्रतिक्रिया म्हणून या संघटनेला इराकच्या सुन्नीबहुल भागात पसरण्याची संधी मिळाली होती. शिया-सुन्नी यांच्यातील स्थानिक व जागतिक स्तरावरील संघर्ष हाच या संघटनेच्या उदयापाठीमागील महत्त्वाचे कारण आहे.
अरबस्थानातील शिया देशाविरोधात लढण्यासाठी सौदी अरेबियाकडे एकच हुकमी एक्का आहे तो म्हणजे सलफी जिहादी मिलिशिया आणि यामुळेच ते जगात कुठेही या संघटनाना वित्त तसेच इतर अनेक मार्गाने बळ पूरवून आपला शियाविरोधी अजेंडा पुढे रेटत असतात. हाच एपिसोड सिरियातही रिपिट झाला. तो ही सुन्नीबहुल देश, पण सत्ता आसद या शियाकडे त्यामुळे तिथे गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर isis ला आपल्याला ही चांगली संधी वाटली आणि यांनी तिकडे आक्रमण करून सिरियातील बराचसा मोठा भाग ताब्यात घेतला…आता इराक व सिरिया यातील बराच मोठा भुभाग यांच्या ताब्यात आहे.
असदला पदावरून घालविण्यासाठी अमेरिकेबरोबरच, सौदी अरेबियाही उत्सुक होते. अमेरिका व इस्त्रायल हे रशियाच्या प्रभावाखालील देश म्हणून तर सौदी सुन्नीबहुल देशातील शिया असलेला राज्यकर्ता म्हणून यासाठी मग जो प्रयोग रशियाविरोधात अमेरिकेने सौदी व पाकिस्तानला हाताशी धरून अफगाणिस्तानात केला होता तोच सिरियातही करण्यात आला. तो म्हणजे सलाफी जिहादी दहशवाद्यांना मदत करून युद्धात लोटणे व आपले हित साधणे. पण या योजनेतील एक गडबड म्हणजे – दहशतवाद्यांना मदत करता येईल, ते तुमच्यासाठी लढतीलही – पण ते तुमच्या नियंत्रणात राहतीलच याची कुठल्याही प्रकारची हमी देता येत नाही. लादेन हा अमेरिकेनेच तर निर्माण केला होता…! पण नंतरचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इथेही तेच घडले.
सुरवातीला isis द्वारे सिरियात आपले हित साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सौदी व अमेरिका या दोन्हीही देशांना लवकरच हे चूक असल्याचे कळून चुकले. कारण आपण असे केल्यास तेथून सद्यसत्ताधारी यांची हाकालपट्टी जरूर होते पण मग अल कायदा व isis सारख्या संघटना या प्रबळ होतात आणि ही निर्माण झालेली पोकळी व्यापतात हे त्यांच्या लक्षात आले.
याला अजूनही एक कोन आहे.
या संघटनेने बळकावलेला भूभाग व इस्लामिक स्टेटची केलेली स्थापना यामुळे खुद्द सौदी अरेबियालाच आता मोठा धोका निर्माण झालेला आहे. कारण आज isis साठी सगळ्यात उत्तम प्रदेश व लोक कुठे असतील तर ते सौदी अरेबियात आहेत. जर या संघटनेने सौदीकडे आपला मोर्चा वळवला तर तिला तिथे आपले विचार मानणारे बहुसंख्य लोक मिळतील आणि ती सहज सौदीभर पसरेल हा धोका लक्षात आल्यामुळेच सौदी अरेबियाने मग 34 मुस्लीम देशांचे एक सैनिक संघटन बनवून आपल्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या सैन्य संघटनेचे उदिष्टे दहशतवादाविरोधात लढणे हे असले तरी त्याचा मुख्य रोख हा या सर्वांचे त्यातूनच सौदीला ISIS पासून वाचविणे हाच असणार आहे.
अर्थातच सौदी अरेबियासाखा तेलसंपन्न देश एखाद्या दहशतवादी संघटनेच्या हाती जाऊ देणे कुणालाही परवडणारे नाहीच. अमेरिका असे कधीही होऊ देणार नाही पण आता आपण जगाची चौकिदारी करणे बंद करावे या मताचे राष्ट्रपती आले असल्यामुळे परिस्थिती अजूनही गुंतागुंतीची झालेली आहे.
===
सौदी आणि ISIS मधील परस्पर गुंतागुंत आणखी नीट समजून घेण्यासाठी वाचा : सौदी अरेबिया विरुद्ध ISIS – व्हाया पाकिस्तान
===
सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सुरवातीपासूनचाच महत्त्वाचा साथीदार होता. त्यातून इराणशी अमेरिकन संबध बिघडल्यानंतर तर तिथे सौदी अरेबिया शिवाय अमेरिकेलाही पर्याय राहिलेला नव्हता. अमेरिकेने या विभागात जे काही खेळ खेळलेत त्यात सौदी अरेबिया हा त्यांचा प्रमुख साथीदार होता. पण इराक व अफगाणिस्तान युद्धातील अनुभव, तसेच जगातील वाढलेला दहशतवाद यांच्या सौदी सलफी जिहादी यांच्याशी जुळणाऱ्या तारा बघून ओबामा आल्यानंतर अमेरिकन सत्तावर्तूळात या सौदी विषयक धोरणावर गंभीरपणे पूर्नविचार करण्याची गरज त्यांना जाणवली होती. कारण सौदी बरोबर राहून दहशतवादाविरोधात लढता येत नाही. याला कारण त्यांच सौदी अरेबिया हा समस्येचे समाधान नाही – तर खुद्द एक समस्या आहे हे आकलन होय. पण आता त्याचे काही करता येत नाही. पण त्यांनी आता आपल्या धोरणात बदल केला आहे.
ओबामांनी आपल्या काळात इराणशी बोलणी करून नुकताच एक करार करण्यात यश मिळवलेले आहे. यापाठीमागे हाच विचार होता. यातून सौदीचे महत्त्व कमी तर होणार होते पण याचबरोबर इराण हा ही ISIS विरोधात लढत आहे, अमेरिका ही लढत आहे – त्यामुळे याबाबतीत त्यांची हिते परस्परविरोधी नाहीतर परस्परपूरक आहेत. आणि यामुळेच गेल्या वर्षभरात अमेरिका -इराण यांच्या संबधात थोडे माधूर्य आलेले आहे. पण सौदी अरेबिया साठी मात्र ही प्रतिकूल घडामोड आहे.
ISIS ही एक शुद्ध सुन्नी संघटना आहे. मध्यपूर्वेत तिने घातलेल्या गोंधळामुळे तिथे अनेक नवीन सत्तासमिकरणे तयार झाली आहेत. अरब राष्ट्रातील ही अस्वस्थता इस्रायलला मात्र उपकारकच आहे. रशियाने सिरियातील आपल्या कारवाईने तिकडे आपली एक चांगली छवी निर्माण केलेली असली तरी रशिया पाश्चिमात्य देशाविरोधात सिरियाला एक कार्ड म्हणूनही वापरत आहे. “तुम्ही युक्रेनपासून दुर रहा (आम्ही तिथे क्रांती आणून सरकार बदलले तरी…!) मगच आम्ही तुम्हाला इकडे मोकळीक देऊ…” असं हे धोरण आहे. पण युक्रेनवर अमेरिका,युरोपियन देश रशियाला सवलत देऊ इच्छित नाहीत. त्यामुळेच सिरियात त्यांना रशियाचे सहकार्य मिळत नाही.
सिरियात रशियाला यश मिळाले असले तरी ते त्याच्या सैन्य कारवाईपेक्षा अमेरिकेसमोरील बिकट पर्यायामुळे मिळालेले आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. असदने रासायनिक हत्यारे वापरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अमेरिकन बॉम्बर सिरियावर हल्ला करण्यासाठी तयार होते – पण – आपण हल्ला केला आणि त्यामुळे असद गेला तर असदच्या जागी कोण? – या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या जवळ नव्हते. असद जाऊन निर्माण झालेल्या पोकळीस ISIS ने व्यापले तर…?! जे की इराक आणि सिरियात घडले आहे…! ह्या भीतीमुळेच त्यांनी ते हल्ले करणे तेव्हा टाळले व रशियाला राजकीय लाभ घेऊ दिला होता.
परराष्ट्र धोरणात कोण काय देतो आणि कुठून आपल्याला काय मिळणार – हे महत्त्वाचे असते आणि त्या आधारावरच ते नियंत्रित, संचालित होत असते. मध्यपूर्वेतील या अस्थिरतेत ही हाच खेळ सुरू आहे. या खेळात प्रमुख चार खेळाडू आहेत. अमेरिका ,रशिया,इस्त्रायल व अरब राष्ट्रे. अरब राष्ट्रे ही आपल्या राजकीय व्यवस्थेमुळे नेहमीच कमजोर व पिडीत ठरलेली आहेत आणि उर्वरीत तिघे याचाच फायदा घेऊन आपले घोडे पुढे दामटणार आहेत. अमेरिकेला तिथे असद नको आहे पण ISIS ही नको आहे…! सिरियन लिबरेशन आर्मीवर दाव लावून त्यांना मध्यपुर्वेत दुसरा लिबिया नको आहे…त्यामुळेच ते तिथे पूर्णपणे गोंधळात आहेत. रशियाला आपले जिओ पॉलिटिकल वजन परत मिळवून युक्रेनमध्ये सवलती मिळवायच्या असल्यामुळे ते इथे लढत आहेत. इस्त्रायलला अरब राष्ट्रे सतत अस्थिर हवेत.
सशक्त, मजबूत आणि अमेरिकेचा सहकारी असलेला इराण हा त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे. इराण सिरियात आपल्या proxy हिजबुल्लाह सह isis विरोधात लढतोय. या आघाडीवर शांतता झाल्यानंतर या बंदूका इस्त्रायलकडेच वळणार आहेत. त्यामुळे त्यांना अनुरूप असा तोडगा निघेपर्यंत ते ही अस्थिरता संपू देणार नाहीत. राहिले अरब राष्ट्रे तर सौदी व इराण. यांच्या आपसातील हाडवैरामुळे त्यांना या खेळात अमेरिका व रशियाच्या हातातील बाहुले बनण्याशिवाय पर्याय नाही. यांच्या आधाराने आपल्या हितानुरूप तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे येवढेच यांना करता येईल.
ISIS ला संपवायचे असेल तर तिला निर्माण करणारी परिस्थिती संपवावी लागेल. ती म्हणजे शिया-सुन्नी विवाद होय. पण हा विवाद संपण्याची चिन्हे इतक्यात तरी नाहीत. त्यामुळे जर कधी लष्करी रेट्याने, मध्यपुर्वेतील ISIS संपली, तरी इराण-सौदी अरेबियातील हा सेक्टेरियन संघर्ष लवकरच तिला नवीन ठिकाण उपलब्ध करून देईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.