आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोनामुळे आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. लोकांच्या विचारसरणीतही त्यामुळे फरक पडलेला पाहायला मिळतोय. एक वेगळीच सामाजिक जाणीव समाजामध्ये निर्माण होताना दिसते आहे.
कुठे कुठे लोक स्वतःहून कार्यकर्ते बनून covid-19 च्या रुग्णांची काळजी घेताना दिसत आहेत. तर कुठे लॉकडाउनच्या काळात जे अनेक लोक बेरोजगार झाले त्यांना जेवण पुरवत आहेत.
कित्येक लोक, सामाजिक संस्थांनी अशा कामात स्वतःहून पुढाकार घेतला आहे. बेरोजगार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याची व्यवस्था सरकार कडून, काही व्यक्तींकडून, सेलिब्रिटीज कडून करण्यात आली होती हे आपण पाहिले आहे.
खेड्यापाड्यातील मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून अनेक लोकांनी मोबाईल देखील त्या मुलांना दिले. लॉकडाउनच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना बाहेर जावे लागू नये म्हणून सोसायटीतील अनेक तरुण मुलांनी त्यांना त्यांच्या आवश्यक गोष्टी घरापर्यंत नेऊन दिल्या.
म्हणजे प्रत्येक जण एकमेकांना मदत करत आहे असं चित्र दिसतं आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जगावरच एक संकट आलं. त्याचा सामना कसा करायचा याची काहीच कल्पना सुरुवातीला नव्हती. अनेक देश लॉकडाउनच्या अवस्थेमध्ये गेले. भारतातही कोरोनाचा शिरकाव जसा झाला तसं भारत सरकारनेही अचानक पणे लॉकडाऊन जाहीर केला.
आणि संपूर्ण देशातले सगळे व्यवहार ठप्प झाले. यामध्ये सगळ्यांमध्ये जर कोणी जास्त भरडले गेले असतील तर ते म्हणजे मजूर. त्यांच्या हाताला काम नाही, राहायची सोय नाही,
अशा वेळेस त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचीही चिंता त्यांना भेडसावत होती. कधीकधी कुठुन तरी मदत मिळून जायची, नाहीतर मग अशा लोकांना उपाशी झोपायचीही वेळ आलेली होती.
त्याच वेळेस अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतून अलोक राठोड नावाचा एक इंजिनियर मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुट्टीसाठी भारतात आलेला होता. आपल्या कुटुंबाबरोबर त्याचा सुट्टीचा वेळ चांगला चाललेला होता.
परंतु अचानकपणे लॉकडाउन लागल्यामुळे संपूर्ण विमानसेवा थांबवण्यात आली. त्यामुळे त्याला अमेरिकेला लगेच परत जाणे शक्य होणार नव्हते. भारतात राहण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायही नव्हता.
इथे राहताना त्याला इथल्या परिस्थितीची जाणीव व्हायला लागली. लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे तो पाहत होता. परप्रांतीय मजुरांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे याची त्याला कल्पना आली.
काम नसल्यामुळे त्यांच्या जेवणाचीही काहीच सोय नाही हे त्याच्या लक्षात आले. अशा अनेक मजुरांच्या कहाण्या त्याला माहीत झाल्या.
हे लोक काम मिळत नाही तर आपल्या गावी जायला निघाले होते, परंतु सगळ्याच वाहन व्यवस्था त्या वेळेस बंद होत्या. कोणतीही रेल्वे, ना कोणतीही बस त्यावेळेस धावत होती. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी देखील परवानगी नव्हती.
अशा वेळेस हे लोक जीवाची पर्वा न करता चालत आपल्या गावी निघाले होते. त्यात जाताना त्या लोकांना खायची काही व्यवस्था नाही, पाणी प्यायची व्यवस्था नाही. काहींना चालता-चालता मृत्यूही आले.
हे सर्व पाहून अलोकचे मन हेलावले. आणि मग या आपल्याच देशातील लोकांसाठी आपणही काहीतरी करावं हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना.
त्यातच त्याच्या कुटुंबाला भाजीपाला पुरवणाऱ्या उत्तर भारतीय तरुणाने देखील परत आपल्या गावी जायचा निर्णय घेतला. त्याच्याशी बोलताना त्याला या लोकांच्या वेदना कळल्या.
म्हणून मग त्याने त्या भाजीवाल्याला थोडी मदत देऊन थांबवून घेतले. भुकेल्या माणसाला अन्न मिळालं पाहिजे इतकंच त्याच्या डोक्यात त्यावेळेस येत होतं.
त्यातूनच मग जन्म झाला ‘ रोटी सब्जी ‘ या कॅम्पेनचा. मुंबईमध्ये त्याने हे कॅम्पेन सुरू केले. त्यामध्ये गरजू कुटुंबांना रेशन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
जवळ जवळ १५०० कुटुंबांना त्याने या काळात रेशन, धान्य , भाजीपाला पुरवले, आणि अजूनही ते काम सुरू आहे. अर्थातच हे काम त्याच्या एकट्याने होणे शक्य नव्हते. कारण इतक्या लोकांना धान्य आणि पाणी पुरवणे कोणा एकाचे काम नव्हे.
मग त्याने यासाठी आपल्या अमेरिकेतल्या मित्रांची मदत घेतली. त्यातून त्याने ३५ लाख रुपयांची देणगी जमा केली. पुढे मग खरोखरच अशी किती गरजू कुटुंब आहेत हे अक्षरशः शोधून शोधून त्या लोकांना मदत पुरवली.
या कुटुंबाचा तो अन्नदाता झाला असं म्हटलं तरी वावगं होणार नाही.
अलोकने जेंव्हा रोटी सब्जी या कॅम्पेन अंतर्गत काम चालू केले तेव्हा त्याला त्याच्या घरूनही पाठिंबा मिळाला. त्याच्या मदतीसाठी त्याचे वडील योगेंद्र सिंग राठोड हेदेखील तयार झाले.
तसेच २० कार्यकर्ते देखील आलोकला या कामात मदत करीत आहेत. सुरुवातीला आलोकच एकटा हे कॅम्पेन करत होता. परंतु आता सिलिकॉन व्हॅलीतील अनेक मोठ्या कंपन्यांमधील सीईओ आणि सीएफओ देखील त्याच्याबरोबर जोडले गेले आहेत.
आतापर्यंत जवळजवळ ४३० दाते या कॅम्पेनशी जोडले गेले आहेत. जमा झालेल्या 35 लाख रुपयांमधून कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी घेतल्या जातात आणि त्या गरजू कुटुंबापर्यंत पोहोचवल्या जातात.
त्यासाठी गरजू कुटुंबांचा शोध घेतला जातो. अगदी अकराशे महिलांना त्यांनी आत्तापर्यंत सॅनिटरी नॅपकिन्स देखील पोहोचवले आहेत.
अलोकचा मित्र लक्ष्मण याने या कामात आलोकला मदत केली. लक्ष्मण हा सूर्या कृष्णमूर्ती यांचा मुलगा. जे सूर्या स्टेज आणि फिल्म सोसायटीचे संस्थापक आहेत. ते म्हणतात की –
“आलोक हा या लोकांचा त्याकाळात तारणहारच झाला. जेव्हा लोकांचे जत्थेच्या जत्थे आपापल्या गावी परतत होते. उन्हाळ्याचे दिवस होते रणरणत्या उन्हात हे लोक चालत निघाले होते. त्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा समावेश होता.
तेव्हा त्यांना होणाऱ्या वेदना पाहून त्याला त्यावेळेच्या परिस्थितीचं गांभीर्य अलोकला समजलं आणि त्याने लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.”
खरंतर आलोक हा गेली १५ वर्ष अमेरिकेत आपल्या बायको व मुलीसह राहतोय. तो अशी कुठलीही कॅम्पेन न करता शांतपणे अमेरिकेला परत जाऊ शकला असता.
परंतु आपल्या देशातील लोकांचे दुःख त्याला पाहावंल नाही म्हणूनच त्याने लोकांना मदत करायचे ठरवले. आता पुढच्या काही महिन्यात आलोक अमेरिकेला परत निघणार आहे. परंतु त्याला हे चालू केलेलं काम थांबवायचं नाहीये.
कुठल्याही कुटुंबावर भीक मागायची वेळ येऊ नये असं त्याला वाटतं. आता या मजुरांच्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आलोकला काही तरी भरीव काम करायचे आहे.
ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्याला रोजगार निर्मिती करायची आहे. त्यासाठी एक चॅरिटी स्थापन करून त्याद्वारे काम करायचे आहे. त्याच्या या भावी कार्यासाठी त्याला शुभेच्छा देऊयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.