आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अनेक दशके मराठी मनावर अनभिषिक्त राज्य करणारे अष्टपैलू, पु.ल. देशपांडे. जितके कलासक्त, तितकेच दिलखुलासपणे जगणारे.
साहित्य आणि संगीत हाच आयुष्याचा आत्मा आहे असं समजून पुलंनी मनोभावे कलेची साधना केली. संगीतावर असणारं पुलंचं प्रेम, माणसं जोडण्याची कला, हे सर्व सांगणारा एक किस्सा स्वप्निल कुंभोजकर यांच्या शब्दांत…!
===
लेखक – स्वप्निल कुंभोजकर
===
“मी पु. ल. देशपांडे यांच्या घरून बोलतोय, स्वप्नील कुंभोजकर इथेच राहतो का?”
या प्रश्नाने आमच्या घरी धावपळ उडाली. आई स्वयंपाक घरात होती ती धावत येऊन फोन घेऊन म्हणाली, “हो, इथेच राहतो”. “आहे का तो घरी? भाईंना त्याच्याशी बोलायचे आहे.”
या एका वाक्याने आमच्या घरच्या फोनचे सार्थक झाले !! या फोन मुळे घरचं वातावरण पार बदलून गेलं.
पु.लं. च्या घरून फोन रविवारी सकाळी आला, पण बहार तर शनिवारीच उडाली होती.
शनिवार दुपार होती. साधारण चार वाजले होते. मी कॉलेजमधून येऊन झोप काढून, उठून, निवांत चहा पिऊन कुमार गंधर्वांचा भूपाली ऐकत बसलो होतो.
एक अप्रतिम live मैफिल चालू होती. खूप दिवसांनी ही कॅसेट ऐकताना मला अतिशय भरून आलं होतं, इतका सुंदर गायला होता कुमारांनी.
कुणाला तरी या बद्दल सांगावं, शेअर करावं इतकं प्रकर्षाने वाटत होतं, की काय विचारू नका. पण कोणाला सांगणार? त्या काळी मोबाईलही नव्हते आणि माझ्यासारखे रिकामटेकडे लोक अतिशय कमी होते!!
एक भन्नाट idea डोक्यामध्ये आली. डायरेक्ट पु.लं. ना फोन केला. पु.लं. नीच फोन घेतला. फोनवर पु.लं. चा आवाज ऐकल्यावर मी प्रचंड एक्साईट झालो.
म्हणालो- “पु.ल. , कुमारांचा एक solid भूपाली आहे, तुम्हाला ऐकायला आवडेल का?”
ते म्हणाले “हो, आवडेल की”
मी : “तुम्ही तिकडून ऐकत रहा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा बंद करून टाका फोन.”
असं म्हणून मी टेप रेकॉर्डर वर भूपाली लावला. फोन स्पीकर पाशी धरला आणि आम्ही दोघे भूपाली ऐकू लागलो. कल्पना करा, मी या बाजूला आणि त्या बाजूला साक्षात “पु.ल.” माझ्याबरोबर कुमारांचा भूपाली ऐकत आहेत.
अशी पंधरा ते वीस मिनिटे गेली. मला वाटले पु.लं.नी तिकडून फोन ठेवून दिला असेल. मी “हॅलो” म्हणालो आणि आश्चर्याचा धक्का बसला. पु .ल. अजूनही फोन वर होते. ते सुद्धा माझ्या इतकेच, किंबहुना माझ्यापेक्षा जास्तच excite झाले होते.
अतिशय आनंदाने त्यांनी कुमारांच्या भूपाली बद्दल बोलायला सुरुवात केली. कुमारांचे गाणे, तो भूपाली, त्यांना किती आनंद झाला हा ऐकून, याबद्दल जवळपास पाच मिनिटे ते माझ्याशी बोलले.
Imagine करा, पु .ल. कुमार गंधर्वांबद्दल बोलत आहेत, त्यांच्या गाण्याबद्दल बोलत आहेत आणि ते सुद्धा फक्त माझ्याशी!!
कमाल रोमांचकारी अनुभव होता तो.
त्यांचं बोलून झाल्यावर अर्धा मिनिटांची नीरव शांतता.
“सुंदर” मी म्हणालो . “भाई, मी हा भूपाली तुमच्याबरोबर ऐकला, तुम्हाला कल्पना येणार नाही माझी इकडे काय अवस्था झाली आहे” यावर ते मस्त पैकी हसले.
“काय नाव तुझं ?”
“स्वप्नील कुंभोजकर”
“वा, आता सुनीताला मस्त पैकी चहा करायला सांगतो”
मी पण म्हणलं “ओके, टाटा”
फोन ठेवून दिला. हवेत तरंगत उरलेली संध्याकाळ “रुपाली” मध्ये दोस्तांना treat आणि रात्री सिंहगडावर चक्कर. झोपच येत नव्हती.
आणि मग रविवारी सकाळी हा फोन.
परमोच्च क्षण, म्हणजे रविवारी दुपारी पु.ल. आणि सुनीताबाईं बरोबर “१, रूपाली” इथे चहा आणि गप्पा.
पु.लं. सारखा संगीतातला जाणकार, रसिक, कुमारांचा जिवलग आणि मी एक सामान्य संगीतप्रेमी. परंतु त्यांनी केलेल्या या कौतुकामुळे हरखून गेलो.
माझं आयुष्य उजळून गेलं!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.