आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“भाषा” एक गमतीदार विषय. भाषेचा योग्य उपयोग करून संवाद साधणे ही पण कला आहे. त्यातील गंमत, मिश्किलपणा, भाव स्पष्ट व्यक्त होण्यासाठी व अजून रंजक करण्यासाठी आपण वाक्प्रचार, म्हणी हे सुद्धा वापरतो. याने भाषेचा गोडवा वाढतो.
जेवणात जशी मिठाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे हे वाक्प्रचार व म्हणी आपल्या दैनंदिन संभाषणाची चव वाढवतात.
अशीच एक खूप प्रसिद्ध म्हण आहे, जी आपण अगदी गोविंदाच्या एका गाण्यात सुद्धा ऐकली होती. ओळखली का? होय अगदी नीट ओळखलंत…. तीच ती म्हण. “कहां राजा भोज, कहां गंगू तेली.”
ही म्हण प्रथमदृष्ट्या वाचली किंवा ऐकली, तर कोणाला ही वाटेल की कोणत्या तरी भल्या मोठ्या श्रीमंत भोज राजाची, कोणा गरीब गंगू तेली नावाच्या माणसा बरोबर तुलना होते आहे.
आपणही ही म्हण, ह्याच उद्देश्याने बरेचदा वापरतो. आपण कोणापेक्षा थोर आहोत हे भासवून देण्यासाठी, त्या कमकुवत व्यक्तीला जाणीव करून देण्यासाठी ही म्हण वापरली जाते.
उदाहरणार्थ – एखादा मोठा उद्योगपती आहे. त्याची तुलना कोणा छोट्या मोठ्या व्यावसायिकाशी करायची आहे. तर तो इथे हीच म्हण वापरेल की “कहा राजा भोज, कहा गंगू तेली”.
अर्थात, कुठे माझी शक्तिशाली प्रतिमा, कुठे माझा करोडोंच्या व्यवसाय आणि कुठे याचा लहानसा उद्योग.
पण ह्या म्हणीची मूळ कथा आपल्या कोणालाच माहित नाही. बऱ्याच म्हणींची मूळ कथा फार गमतीदार असते. तर या म्हणी ची उगम कथा काय आहे ते जाणून घेऊया.
या म्हणीत दोन नावे आहेत. एक राजा भोज व एक गंगू तेली. सर्व प्रथम राजा भोज कोण होते ते पाहूया.
११ व्या शतकात, राजा भोज नावाचे एक कणखर, अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होऊन गेले. मध्यप्रदेश ची राजधानी, भोपाळ पासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर राजा भोज यांची “धार नागरी” आहे. तिला धारा नागरी सुद्धा म्हणतात.
–
हे ही वाचा – प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा आयफेल टॉवर भलत्याच कारणांसाठी बांधलाय!
–
त्या काळात हे धार शहर मालवा राज्याची राजधानी होते. राजा भोज हे मालवा व मध्य भारताचे प्रतापी, व धुरंधर राजा होते. शस्त्र विद्येबरोबरच ते शास्त्रांमध्ये ही पारंगत होते.
योग शास्त्र, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, व्याकरण, साहित्य, पुराण व अनेक धर्म वेदांचे त्यांना सखोल ज्ञान होते. त्यांनी या काळात बरीच पुस्तके व ग्रंथ लिहिले. ग्रंथावरचे आपले समीक्षण व टीका टिप्पणी ही लिहिली.
त्यांना काव्य रचनेची भारी हाऊस, त्या मुळे त्यांनी अनेक कविता संग्रह देखील लिहिले आहेत.
रणांगणात, राजा भोज सिंहासारखे लढत. कठोर परिश्रम करून त्यांनी स्वतःला अजयी राजा बनवले होते. लढवय्या हा मनाने कठोर असतो असा सगळ्यांचाच समज असतो. पण तो एक गैरसमज असतो हे राजा भोज यांनी सिद्ध केले.
त्यांच्या राज्य काळात, त्यांनी अनेक मंदिरे बांधली, प्रजेला सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी, समृध्दी, समाधानी होती. अशा ह्या दयाळू राजाचा नावलौकिक सर्व दूर पसरला होता.
त्यांच्या राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून, त्याची भूषण पाहून कित्येक राजांना राजा भोज यांचे राज्य हडपण्याची इच्छा होऊ लागली.
हे भव्य राज्य आपले असावे, आपण याचे शासक होऊन सगळ्या सुख सोयींचा उपभोग घ्यावा ही लालसा बऱ्याच राजांच्या मनात घर करू लागली.
कित्येक राज्यांनी भोज राज्यावर आक्रमण केले, चाल करून गेले पण कोणालाही राजा भोजला हरवणे शक्य झाले नाही. अशाच महत्वाकांक्षी राजांपैकी दोन राजे म्हणजेच दक्षिणेचे कलचुरी नरेश गांगेय व चालुक्य नरेश तैलंग, म्हणजेच आपल्या म्हणीतले “गंगू तेली”.
होय, गंगू तेली कोणी एक व्यक्ती नसून राजा गांगेय व राजा तैलंग यांचे एक विडंबनात्मक नाव आहे.
या दोन राजांशी राजा भोजचा कसा संबंध आला व ही म्हण प्रचलित कशी झाली आता ते पाहूया. एकदा गांगेय व तैलंग यांनी मिळून भोज राज्यावर हल्ला केला.
भले मोठे सैन्य घेऊन अगदी जिंकण्याच्या अपेक्षेने केल्या गेलेला हा हल्ला होता. पण इतके सामर्थ्य असून सुद्धा राजा भोजने त्यांना अशाप्रकारे हरवले, की कोणत्याही लढवय्यासाठी ही अत्यंत शरमेची, लाजीरवाणी बाब ठरावी.
दोघांनाही राजा भोजच्या कौशल्यापुढे व दिव्य परक्रमापुढे शस्त्र टाकावे लागले. आपले प्राण वाचण्यासाठी, अक्षरशः नाक घासून, गुडघ्यावर बसून जीवदान मागावे लागले.
दोन राजे मिळून सुद्धा एकट्या भोज राजाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकले नाहीत, या उलट आपला मान घालवून बसले.
याच लढाई नंतर धारच्या प्रजाजनांनी दोन्ही राजांची खिल्ली उडवत, त्यांना अपमानित करण्याकरिता “कहां राजा भोज, कहां गंगू तेली” असे म्हटले व तेव्हा पासून ही म्हण उदयास आली.
हिचा मूळ वापर, स्वतः ला अति हुशार समजणाऱ्या व्यक्तीला त्याचा पातळीची जाणीव करून देण्यासाठी करतात. याचे पुरावे देखील इतिहासकारांना मिळाले आहेत. आहे की नाही भाषा गमतीशीर?
याच बरोबर एक आख्यायिका अशी ही आहे की, राजा भोजच्या महाराष्ट्र राज्यातील, पन्हाळा किल्ल्याची एक भिंत सतत कोसळत होती. कित्येक वेळा बांधून, विविध प्रकारे रचना करून सुद्धा ती भिंत अजिबात टिकत नव्हती.
यामुळे त्रस्त होऊन राजाने यांनी एका मांत्रिकाला तिथे बोलावले व त्या मांत्रिकाने सांगितले, की इथे एका स्त्रीची व तिच्या बाळाचा बळी द्यावा लागेल.
त्यांनी अशा स्त्रीचा फार शोध घेतला, पण त्यांना कोणीही आपला जीव देण्यासाठी मिळत नव्हते. शेवटी एका “गंगू तेली” नावाच्या माणसाने भोज राजाला, आपल्या बायको व मुलाचे दान दिले.
राजानी त्यांचा बळी दिला व नंतर ती भिंत कधीही कोसळली नाही. “माझ्या दान दिल्यामुळे राजाचं काम भागलं.” असा गंगू तेलीला फार गर्व झाला.
त्यामुळे लोकांनी त्याला त्याच्या गर्वाची जाणीव करून देण्यासाठी ही म्हण म्हटली. पण इतिहासकारांना ह्या गोष्टी संबंधी कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ही केवळ एक कथा असून, ठोस पुरावे सापडे पर्यंत तिला केवळ एका दंतकथे प्रमाणे पहावे हे त्यांचे म्हणणे आहे.
===
हे ही वाचा – प्राचीन भारताच्या ऐतिहासिक साक्ष देणाऱ्या या अज्ञात गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.