Site icon InMarathi

“टाटा स्टील” वाचवण्यासाठी उपयोगात आला “ग्वाल्हेरचा खजिना”! काय आहे कनेक्शन?

tata comapny inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

खजिना, रहस्य, गूढता, जादू हे शब्द आजही आपल्या मनावर मोहिनी घालतात.

साध्या, सरळ, आनंदी, काव्यमय, ललित, विनोदी अशा सर्व प्रकारच्या गोष्टी किंवा कथा आपल्याला कितीही आवडत असल्या तरी रहस्यमय गोष्टींकडे आजही आपण चटकन आकर्षित होतो.

 

 

चित्रपटांच्याबाबतही अगदी हिच गोष्ट आहे. भयपटापेक्षा गूढ आणि रहस्यपटांकडे आपला ओढा अधिक असतो. त्याचे कारणही अगदी तसेच आहे मंडळी… कुतूहल ही आपल्या मानवी मनाला मिळालेली निसर्गाची देण!!

आज इतिहासजमा झालेल्या अनेक गोष्टी अद्यापही रहस्य बनून राहिल्या आहेत. भल्या भल्यांना त्याची उकल करता आलेली नाही किंवा अथक प्रयत्नांनंतरही ती झालेली नाही.

एकविसाव्या शतकात अतिशय पुढारलेले तंत्रज्ञान, खोलवर झालेले संशोधन, पुरातत्त्व खात्यातील उपलब्ध नोंदी, संकेतांचे मिळालेले अर्थ व त्यावरुन झालेला अभ्यास यामुळे आता काही पुरातन रहस्यांवरील धूळ साफ होऊ लागली आहे.

अशीच एक कथा आहे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली.. पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीनंतर भारतात विविध क्षेत्रांमध्ये कंपन्यांचा उदय होत असताना, वेगाने विकास करत घोडदौड करणारी कंपनी म्हणजेच टिस्को… जमशेदजी टाटा यांची टाटा स्टील कंपनी.

 

theprint.com

 

कंपन्यांच्या विस्तारवादात त्या काळी टिकून राहण्याची धडपड सुरू असतानाच, अचानकपणे प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर आता यातून बाहेर कसे पडायचे, आपल्याला या पेचप्रसंगातून कोण वाचवणार असा विचार करणाऱ्या जमशेदजी टाटा यांच्या मदतीला धावून आले ते ग्वाल्हेर संस्थानचे महाराजा माधवराव सिंदीया.

आता संस्थानिक सिंदियांच्या कोणत्या आणि कशा प्रकारच्या मदती मुळे टाटा स्टिल कंपनी वाचू शकली आणि पुढे तिची तुफान घोडदौड सुरू राहिली याची ही थोडक्यात रंजक कथा….!! 

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात ग्वाल्हेर हा, थोरले बाजीराव पेशव्यांचे सेनापती महादजी सिंदीया यांच्या कारकिर्दीत सिंदियांनी बनवलेल्या राज्याचा भाग होता.

सिंदियांनी उज्जैनहून आपली राजधानी ग्वाल्हेर येथे हलवली आणि आठव्या शतकात तोमरांनी बांधलेला या शहरातील किल्ला त्यांचे घर बनले.

अठराव्या शतकात आणि प्रामुख्याने उत्तरार्धात शिंदीया घराण्याने अनेक लढायांमध्ये लागोपाठ विजयश्री प्राप्त केल्याने त्यांना अतिप्रचंड प्रमाणात संपत्ती मिळाली होती. त्यामुळे त्या काळचे सर्वात श्रीमंत संस्थानिक अशी त्यांची ख्याती होती.

ही सर्व संपत्ती अर्थातच गंगाजली याच किल्ल्याच्या तळघरांमध्ये लपविण्याची एक योजना त्यांनी आखली. त्याप्रमाणे तळघरात अनेक चोरवाटांमार्फत विविध ठिकाणी गुप्त आणि कोणासही सहजी लक्षात येणार नाही अशा वॉल्ट्स ची योजना केली गेली.

 

 

अत्यंत किचकट व गुंतागुंतीची ही रचना एखाद्या इजिप्शियन कॅटाकॉम्ब्जवर आधारलेली होती. अशाच गुप्त वॉल्ट्स मध्ये ही प्रचंड गंगाजली लपविण्यात आली.

तेथील प्रवेशद्वाराचा मार्ग आणि ते दार उघडण्याचा गुप्त संकेत केवळ महाराजा आणि त्यांचे अगदी खास मर्जीतले हेर या दोघांनाच माहीत होते.

पुढे इ.स. १८४३ मध्ये, जेव्हा महाराज जयजीराव सिंदीया हे ग्वाल्हेरचे महाराज म्हणून गादीवर बसले, तेव्हा त्यांना किल्ल्यातील ‘चेंबर्स ऑफ सिक्रेट्स’ चे संरक्षक होण्याचाही मान मिळाला आणि त्या गुप्तद्वाराचा कोडवर्ड त्यांना मिळाला.

 

newstrack.com

 

तोपर्यंत या गंगाजलीतील संपत्ती जवळपास दुप्पट वेगानं वाढली होती.

१८५७ साली स्वतंत्र भारताचे आंदोलन उभे राहिले आणि देशभर त्याची ठिणगी पडली, मात्र एकजुटीच्या अभावामुळे ते बंड फसले आणि ब्रिटिश सरकार सावध झाले. त्यांनी विविध संस्थानांमध्ये झाडाझडती सुरू केली आणि सर्व संपत्ती तत्कालिन ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली आणण्यास सुरुवात केली.

परंतु जेव्हा त्यांनी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर छापा घातला, तेव्हा मात्र त्यांना या गंगाजलीतला एक पै देखील मिळाला नाही.

त्यावेळी महाराज जयाजीरावांवर ब्रिटिशांनी प्रचंड दबाव आणून स्वत तेथील तळघरात जाऊन संपत्तीचा शोध घेतला, मात्र त्यांना शेवटपर्यंत ते गुप्तदार आणि चोरवाटा सापडल्या नाहीत.

ब्रिटिशांनी सरकारी आदेशानुसार तो किल्ला १८८६ पर्यंत त्यांच्या ताब्यात ठेवला. अत्यंत जटील असे नेटवर्क उभारुन संपत्ती वाचवणाऱ्यास सलाम!

पुढे १८८६ मध्ये जयाजीरावांना ग्वाल्हेरच्या किल्ल्याचे हक्क परत मिळाले.

या दरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याने आणि वयही वाढल्याने त्यांनी आपला मुलगा माधवराव सिदीया यांना राज्याभिषेक करण्याचे ठरवले तसेच ‘चेंबर्स ऑफ सिक्रेट्स’ च्या संरक्षक पदासह खजिन्याच्या गुप्तद्वाराचा कोडवर्डही माधवरावांना देण्याचे ठरवले.

 

patrika.com

 

परंतु हे घडण्याआधीच जयाजीरावांचा मृत्यू झाला. माधवराव शिंदे म्हणजेच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे आजोबा.

जयाजीरावांच्या अचानक मृत्यूने राजदरबार पुरता पेचात पडला. माधवरावांचा राज्याभिषेक तर होईल, परंतु त्या गुप्त खजिन्याची दारे आणि वाटा कशा सापडणार याविषयी कोणाला काहीच सुचत नव्हते.

त्याचवेळी म्हणजे १८८७ साली ग्वाल्हेर येथील ब्रिटिश रहिवासी कर्नल बॅनरमन यांनी सिंदियांच्या राजदरबारात येऊन काही अटींवर गुप्त खजिना शोधण्यास मदतीचा हात दिला. काहीशा नाखुशीनेच माधवरावांच्या दरबाराने ही मदत स्विकारली.

माधवरावांच्या मदतीने कर्नल बॅनरमन यांनी विविध युक्त्या लढवत, ग्वाल्हेर किल्ल्याचा विस्तृत शोध घेतला.

या संदर्भात पुढे अनेक वर्षांनी राजमाता विजयाराजे शिंदीया यांनी लिहिलेल्या पुस्तकात काही नोंदी सापडतात.. त्यानुसार अनेक गुप्त वॉल्ट्स पैकी जी काही मोजकी वॉल्ट्स सापडली त्यातून सुमारे समोर आलेली संपत्ती अशी….

 

youtube.com

 

सोन्याची नाणी – ६.२ कोटी रुपये

चांदीची नाणी – ५ कोटी ६४ लाख रुपये

हिरे – १४०००

माणकं – ११२००

मोती – ३७४००

पाचू – ५०००

नीलम – ४००

टोपाझ – ४००

हा खजिना पाहिल्यानंतर अक्षरश: डोळे दिपून गेले होते असे कर्नल बॅनरमन म्हणाल्याचे राजमाता लिहितात. अल्लाउदिनचा खजिना जसा दिसेल तसेच हे काहीसे होते अशी टिपण्णी त्यांनी केली आहे.

ही केवळ काही वॉल्ट्समधील ही संपत्ती होती, कित्येक गुप्त दारे अद्यापही बंदच होती असं त्या लिहितात.

यानंतर माधवराव शिंदियांनी पुढे जाऊन अन्य चोरवाटांच्या मार्फत अजूनही न उघडलेले वॉल्ट्स शोधण्याचा खुप प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कधी ज्योतिषांची तर कधी जादुगारांचीही मदत घेतली.

अखेरीस त्यांना लपवलेला बराचसा खजिना सापडला. मात्र प्रत्येक वेळी खजिना शोधमोहीम सुरू करताना माधवरावांना राजदरबाराचे बहुमत घ्यावे लागे, ते जर मिळाले नाही तर थांबून पुन्हा काही दिवसांनी बहुमत सिद्ध करावे लागे.

या एकूण अनुभवामुळे महाराज इतके निराश झाले होते, की त्यांनी खजिना लपवण्याची ही जुनी पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण खजिनाच कॅशमध्ये म्हणजेच लिक्विड स्वरुपात आणण्याचे ठरवले.

 

daily.bhaskar.com

 

ही बाब त्यांनी त्यांचे आर्थिक सल्लागार एफ. ई. दिनशॉ यांच्या कानावर घातली. त्यावेळी दिनशॉ यांच्या सल्ल्यानुसार, माधवरावांनी भारतातील उभरणाऱ्या कंपन्यांमध्ये भागिदारी आणि समभाग घेऊन गुंतवणूक सुरू केली.

त्यापैकीच टिस्को (टाटा स्टील) या जमशेदजी टाटा यांच्या कंपनीतही माधवरावांनी पैशांची गुंतवणूक केली.

 

ipleaders.in

 

१९२४ साली अचानक टाटांपुढे मोठा आर्थिक पेचप्रसंग उभा राहिला, त्यावेळी पुन्हा एकदा दिनशॉ पुढे आले आणि त्यांनी जमिनीसाठी ग्वाल्हेरच्या महाराजांचे पैसे देऊ केले.

यानिमित्ताने त्यांच्यात झालेल्या करारानुसार सिंदिया यांची टाटा अँड सन्स मध्ये भागिदारी झाली. १९६० च्या दशकाच्या अखेरपर्यंत सिंदिया हे टाटा स्टीलमधील सर्वात मोठ्या भागिदारांपैकी एक होते.

अशाप्रकारे, ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील खजिना टाटा कंपनीच्या कामी आला आणि योग्य कामास योग्य मदत मिळाल्यामुळेच आज एकविसाव्या शतकात १०० वर्षांनंतरही टाटा यांच्या विविध कंपन्या प्रचंड नावलौकिकासह भारताचे नाव साता समुद्रापार मोठ्या दिमाखात मिरवत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version