आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हिंदू संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती मानली जाते. काही जुन्या पद्धती, प्रथा यांचा आजही हिंदू संस्कृतीत समावेश आढळून येतो.
आपल्या संस्कृतीत वर्षानुवर्षे कालानुरूप अनेक बदल होत गेले. नव्या आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार हिंदू संस्कृतीने नेहमीच केला आहे. संस्कृतीच्या नावाखाली केवळ जुनाट गोष्टींनाच चिकटून राहणे, ही हिंदू संस्कृतीची परंपरा नाही.
अनेक संतमहंतांनी दिलेली शिकवण, त्यातून घडून आलेले बदल आपण वेळोवेळी पाहिले आहेत. अगदी हिंदू संस्कृतीचा मूळ गाभा असलेल्या देवदेवता, मंदिरं, पूजाअर्चा या गोष्टींमध्ये सुद्धा हे असे बदल पाहायला मिळाले आहेत.
याच संस्कृतीत जातीभेदाची सुद्धा उदाहरणं पाहायला मिळतात. धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी म्हणजे मंदिरं, पूजापाठ! या बाबींवर बराच काळ केवळ ब्राह्मण समाजाचं वर्चस्व असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं.
पूजापाठ ही केवळ याच समाजाची मक्तेदारी आहे असा काळ पाहायला मिळाला.
मात्र, यात कालांतराने योग्य ते बदल होत गेले. महाराष्ट्राची संतपरंपरा सुद्धा फार मोठी आहे. अगदी आधुनिक संत गाडगे बाबांपर्यंत ही परंपरा पाहायला मिळते.
‘देव मानवाच्या मनात आहे’ ही शिकवण त्यांनी सातत्याने दिलेली आहे. आधुनिकतेची शिकवण देणारे संत आणि ती आत्मसात करणारा समाज हा आजच्या हिंदू संस्कृतीचा पाया म्हणता येईल.
परंपरागत सुरु असणाऱ्या बाबी चुकीच्या असल्यास, त्यात बदल करण्याची सहिष्णुता हिंदू संस्कृतीमध्ये पाहायला मिळते. याचा प्रत्यय आजवर अनेकवेळा आलेला आहे.
हिंदू संस्कृतीत घडून आलेला असाच एक मोठा बदल सध्या पाहायला मिळत आहे. तो म्हणजे, दलित वर्गातील व्यक्तींना पुजारी म्हणून देण्यात आलेला मान!
एकेकाळी अस्पृश्य मानला जाणारा दलित समाज, आज सगळ्यांचा खांद्याला खांदा लावून उभा असलेला दिसून येतो. ज्या समाजावर अनेक वर्षं अन्याय झाला, त्यांच्यासाठी हा फार मोठा न्याय ठरणार आहे.
विश्व हिंदू परिषदेने हे मोठे पाऊल उचलले आहे. संपूर्ण भारतातून दलित समाजातील ५००० व्यक्तींना मंदिरातील पुजारीपदासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यासाठी आवश्यक असलेला पूजापाठ आणि धार्मिक गोष्टींचे अध्यापन करण्यात आलं आहे.
समाजातील जातीभेद आणि उरलीसुरली अस्पृश्यता नष्ट करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. दलित समाजाला दुय्यम दर्जा दिला जाऊ नये आणि त्यांनाही योग्य तो मान मिळावा असा प्रयत्न यातून केला जात आहे.
विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अनेक मंदिरांमध्ये या पुजाऱ्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
विशेषतः दाक्षिणात्य राज्यांमध्ये विश्व हिंदू परिषदेनं केलेलं काम अधोरेखित झालेलं दिसून येतंय. निव्वळ तामिळनाडू राज्यामध्ये तब्बल २५०० दलितांना पुजारीपदाचा सन्मान देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश राज्यातही अनेक दलितांना हा सन्मान दिला गेला आहे.
विश्व हिंदू परिषदेने मिळवलेलं हे मोठं यश आहे, असं बन्सल यांचं मत आहे.
पूजापाठ आणि धार्मिक कार्य शिकून घेण्याची इच्छा असणाऱ्या अनेक दलितांना मार्गदर्शन करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे दोन गट कार्यरत आहेत. त्यामार्फत त्यांना संपूर्ण ज्ञान आणि माहिती देण्यात येते. त्यांचे हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येते.
एवढेच नाही, तर दक्षिणेतील तिरुमला तिरुपती देवस्थानतर्फे त्यांना विशेष प्रमापत्र देण्यात येणार आहेत. विविध धार्मिक कार्य व्यवस्थित पार पडल्यानंतर ही प्रमाणपत्र त्या त्या पुजाऱ्यांना देण्यात येत आहेत.
१९६४ साली अस्तित्वात आलेली विश्व हिंदू परिषद ही संस्था १९६९ सालापासून जातीभेद निर्मूलनासाठी कार्यरत आहे. विहिपच्या कर्नाटक राज्यातील गटाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
एवढेच नाही, तर विश्व हिंदू परिषदेतर्फे १९८९ साली राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. यातील प्रथम शिळा पुजण्याचा मान एका दलित व्यक्तीला देण्यात आला होता.
जातीभेद निर्मूलनाच्या कार्याचाच एक भाग म्हणून १९९४ साली विश्व हिंदू परिषेदेचे महत्त्वाचे नेते डोम-राजाच्या घरी गेले होते. वाराणसीला आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म संसदे’चे आमंत्रण त्यांना देण्यात आले.
याच विश्व हिंदू परिषदेने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय, नव्या परंपरांची नांदी ठरणार आहे. दलित समाज म्हणजे दुर्लक्षित आणि मंदिरापासून दूर ठेवला गेलेला समाज, हा विचार पुसून टाकण्यास यामुळे मदत होईल.
कलेश्वर भैरव मंदिर, किंवा महाराष्ट्रातील पंढरपूर, तुळजापूर अशा मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर व्यक्ती पुजारी म्हणून कार्यरत असल्याचं याआधी सुद्धा पाहिलं गेलं आहे. या पुजाऱ्यांच्या हस्ते होणारी पूजा भक्तगण त्याच भक्तिभावाने स्वीकारतात.
विश्व हिंदू परिषदेने दलित समाजातील व्यक्तींना पुजाऱ्याचा मान देण्याचं टाकलेलं हे पाऊल अशा गोष्टींना अधिक प्रमाणात समाजमान्यता देण्यासाठी उपयोगी ठरेल.
आपण आज एकविसाव्या शतकात जगत आहोत. या आधुनिक जगात बरेच सकारात्मक बदल घडलेले पाहत आहोत. मात्र दुर्दैवाने आजही जातीभेद आणि स्पृश्यास्पृश्यतेच्या प्रथा काही अंशी शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं.
अगदी, खालच्या जातीतील व्यक्तीला स्वयंपाकघरात प्रवेश न देणं किंवा त्यांच्यासाठी वेगळी भांडी वापरणं अशा प्रथा काही गावांमध्ये पाहायला मिळतात.
ब्राह्मणेतर समाजाला मंदिरात प्रवेश न देण्याची कृत्ये सुद्धा दुर्दैवाने काही गावांमध्ये घडतात. मंदिरात प्रवेश केल्याबद्दल मारहाण करण्याचे प्रकार कधीतरी कानावर येतात.
स्त्रियांना मंदिर प्रवेश मिळावा याकरिता तृप्ती देसाईंसारख्या महिलांना लढा द्यावा लागत आहे, अशा बातम्याही ऐकायला मिळतात.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, जातीभेदाचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे, हे अजूनही जाणवते. यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे.
विश्व हिंदू परिषदेने दलितांना दिलेले हे प्रशिक्षण, ही अशीच एक बाब आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. या निर्णयामुळे समाजातील अनिष्ट व अयोग्य प्रथा मोडून काढण्यात नक्कीच मोठे यश मिळेल, यात शंकाच नाही…!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.