हिंदू संस्कृतीत विड्याच्या पानांशिवाय एकही पूजा संपन्न होत नाही, का बरं? जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
चातुर्मास म्हणजे सणावारांची, व्रतवैकल्यांची रेलचेल. या चातुर्मासात चार महिने देव झोपलेले असतात म्हणे. म्हणून तर आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.
एकदा का श्रावण महिना सुरू झाला, की सगळं वातावरण पार धार्मिक होऊन जातं.
सत्यनारायणाची पूजा, मंगळागौर, बुध बृहस्पती पूजन, शुक्रवारी गौरीची, जरा जिवंतिकेची पूजा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, हरतालिका, गौरी गणपती, नवरात्री, दिवाळी ही चार महिने असणाऱ्या विविध पूजांची यादी.

याशिवाय एखादं शुभकार्य करताना आधी देवाची पूजा करुनच काम सुरू केलं जातं. असेही आपण भारतीय उत्सवप्रिय लोक. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण छोटेखानी पूजा करुन समाधानी होणारे.
पूजा करताना षोडशोपचारे केली जाते. म्हणजे १६ उपचार असतात त्यात. पण ती पूजा मांडताना नीट बघितलं, तर चौरंगावर किंवा पाटावर विड्याची पानं ठेवून त्यावर केळी किंवा इतर फळं, सुपारी असं ठेवलेलं असतं.
कोणतीही पूजा असूद्या विड्याची पानं ही अत्यावश्यक असतात. इतकंच नव्हे तर पूजा झाल्यावर गुरुजींना दक्षिणा देताना विड्याच्या पानावरचा दक्षिणा ठेवून दिली जाते.
जेवणं झाल्यावर यजमान जेवायला बोलावलेल्या अतिथीला तांबूल म्हणजे विडा देतात. पूजेची सुरुवात आणि शेवट दोन्ही वेळी विड्याचं पानच वापरलं जातं.

जेवणं झाल्यावर यजमान जेवायला बोलावलेल्या अतिथीला तांबूल म्हणजे विडा देतात. पूजेची सुरुवात आणि शेवट दोन्ही वेळी विड्याचं पानच वापरलं जातं.
का आवश्यक असतात बरं ही पानं? तोरणाला आंब्याची पानं आणि पूजेसाठी विड्याची पानं ही धार्मिक विधीमध्ये असतातच असतात. पण याचं कारण ठाऊक आहे का?
विड्याचं पान/खाऊचं पान-

विड्याच्या पानाची वेल असते आणि ती सदाहरीत असते. याला नागवेल असंही म्हणतात. याचं मूळ जन्मस्थान दक्षिण आणि पूर्व आशियात आहे. भारत, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथे ही वनस्पती आढळते.
एक अशी धारणा आहे की, स्वतः शंकर पार्वती या दोघांनी नागवेल पेरली होती. पूर्वेकडील काही लोकगीतं असं सांगतात की, नागवेलीचं जन्मस्थान हिमालय आहे आणि कैलास पर्वत तर शंकर पार्वती यांचं निवासस्थान!!!
आपल्या पूजा साहित्यात दूर्वा, बेल तुळस हे जितकं पवित्र मानलं जातं, आवश्यक मानलं जातं तितकंच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानतात. कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडली जातच नाही.

विड्याची पानं संस्कृतमध्ये तांबूल म्हणून ओळखली जातात. भारतातील इतर भाषांमध्ये विड्याचं पान वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. आपण त्याला पान म्हणतो. तर कुठे त्याला वेट्टा किंवा वेट्टीला म्हणतात.
पूजेत विड्याचं पान दोन्ही हेतूने ठेवलेलं असतं. एक तर ते पवित्र आहे शिवाय आरोग्याचाही त्यात विचार केलेला आहे. जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो, तेव्हा शेवटी त्यालाही विडा अर्पण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे.
जसं आपण जेवायला बोलावलेल्या पाहुण्याला जेवणानंतर विडा देतो. ‘विडा घ्या हो नारायणा’…. हे त्यामुळंच तर लिहीलं आहे ना!!!
विड्याचं पान हे ताजेपणा टवटवीतपणाचे व भरभराटीचे चिन्ह मानले जाते. म्हणजे नागवेल सरसर वाढत जाते, ती वेल सदाहरित असते. म्हणून असाच तुमचा उत्कर्ष व्हावा आणि तो टिकून रहावा ही त्यातील भावना असते.

हे ही वाचा –
===
स्कंद पुराणात सांगितले आहे की, देव दानवांनी जेव्हा अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा समुद्र मंथनातून हे पान निघालं होतं.
आपल्या धर्मशास्त्रात असं मानलं जातं, की अनेक देवतांचा वास या विड्याच्या पानात असतो आणि या मुख्य कारणाने विड्याचं पान पूजास्थानात अव्वल स्थानावर ठेवलं जातं.
विड्याच्या पानावर देवतांची स्थानंही कशी असतात ते पहा-
पानाच्या टोकावर इंद्र आणि शुक्र असतात.
सरस्वती ही विद्येची देवता पानाच्या मध्यावर असते.
महालक्ष्मी पानाच्या शेवटी टोकावर असते.
ज्येष्ठा लक्ष्मी पानाच्या देठावर वसते. याच कारणासाठी पूजेतील पानं देठासकट असतात. देठ कापलेली पानं पूजेसाठी निषिद्ध मानली जातात. ती केवळ खाण्यासाठी वापरतात.
भगवान विष्णू विड्याच्या पानातच वास करतात.
पानाच्या बाहेरील बाजूस भगवान शंकर आणि कामदेव असतात.
पानाच्या डावीकडे पार्वती आणि मांगल्यादेवीचा वास असतो. तर उजवीकडे भूमाता असते.
सूर्यनारायण पानामधून वास करतात.
थोडक्यात एका पानात इतक्या देवांचा वास असतो त्यामुळे ते पूजनीय मानले जाते. म्हणूनच बिन देठाची किंवा फाटलेली कापलेली, भोक पडलेली, वाळलेली पानं आपल्याकडे पूजेत वापरली जात नाहीत.
अष्टमांगल्यांपैकी एक असं विड्याच्या पानाला मानलं जातं.
दक्षिण भारतात गुरुजींना दक्षिणा देताना विड्याच्या पानावर सुपारी, रुपयाचं नाणं ठेवून दिली जाते.
आपल्याकडं कलशाला आंब्याची पानं लावतात तशीच दक्षिणेकडे सुपारीची पानं कलश सजवायला वापरतात. कारण त्यात पाणी शुद्ध करण्याचा गुणधर्म असतो.

नागवेलीच्या पानांबाबत काही दंतकथा रामायण- महाभारतात आहेत.
महाभारतात एक अशीही कथा आहे, युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला, तेव्हा त्याच्या पूजनासाठी सुपारीची पाने हवी होती. पण ती मिळाली नाहीत. मग अर्जुन ती पानं आणायला नागलोकात गेला.
नागलोक म्हणजे सापांची राजधानी होती. तेथील राजा वासुकी हा नाग होता. त्याच्या राणीने ही पानं अर्जुनाला दिली. म्हणूनच याला नागवेल असं म्हटलं जातं.
त्यातील एक हनुमंत जेव्हा सीतेच्या शोधार्थ लंकेला गेला होता सीतामाईला भेटला. रामाचा निरोप ऐकून सीता अतिशय आनंदीत झाली.
अशोकवाटीकेत दुसरी कसलीही फुलं नव्हती. मग या पानांचा हार बनवून तिने मारुतीरायाला दिला. मारुतीने अतिशय भक्तीभावाने ती माळ गळ्यात घातली. आजही कितीतरी लोक मारुतीला विड्याच्या पानांचा हार घालतात.
विड्याचं पान विविध भागात विविध नावांनी ओळखलं जातं. तेलुगूत याला तमालपाकू म्हणतात तर कानडीत वीलेया म्हणतात. बंगालीत पान म्हणतात.
आहारशास्त्रात विड्याच्या पानांचे महत्त्व सांगितले आहे ते असं :
या पानात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पोटॅशियम, आयर्न , कॅल्शियम आणि आयोडीन असतं.

आयुर्वेदात पण या पानाचा वापर औषधांसाठी केला जातो कारण,
१. यात कफ रोखण्याची क्षमता आहे.
२. ही पाने श्वासाचा दुर्गंध नाहीसा करतात.
३. दातांची कीड नियंत्रण ठेवण्यासाठी ही पाने उपयुक्त आहेत.
म्हणूनच जेवण झालं की पान खाण्याची पध्दत आपल्याकडे होती.
थोडक्यात आपल्याकडं जे जे धार्मिक रिवाज आहेत त्या प्रत्येक रिवाजामागं शास्त्र आहे. फक्त ते समजून घेतलं पाहिजे.
हे ही वाचा –
===
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.