Site icon InMarathi

मराठी मालिका निर्माते मराठी दर्शकांना कधीपर्यंत “बिनडोक” समजत रहाणार आहेत?

rasika sunil inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मालिका हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा विषय असतो. दिवसभराच्या कामाच्या व्यापानंतर विरंगुळा म्हणून मालिका पाहणं हा छंद आबालवृद्धांना असलेला पाहायला मिळतो. घरात असणाऱ्या अनेक आजीआजोबांसाठी तर तो विरंगुळ्याचा एकमेव पर्याय असतो. मग त्यांच्या सोबतीने नातवंडांनी सुद्धा टीव्ही पाहण्याचे किस्से घडतात.

 

macleans.ca

 

दिवसभर ऑफिसच्या कामात असलेली मंडळी, किंवा घरकामात व्यस्त असणारी घरातील स्त्री संध्याकाळचा विरंगुळा म्हणून टीव्हीवरील मालिका लावून बसते. रात्रीचं जेवण एकत्र येऊन करायचं आणि जेवताना हमखास टीव्हीसमोर बसायचं, ही प्रथा सुद्धा अनेक घरांमध्ये पाहायला मिळते.

थोडक्यात काय, तर मनोरंजन करणाऱ्या मालिका, अर्थात ‘डेली सोप्स’ हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झालेला आहे.

सह्याद्री वाहिनीवरील काही भागांची मालिका ते आज अनेक चॅनेल्सवर सोमवार ते शनिवार रोज दिसणाऱ्या मालिका हा मालिकेच्या निर्मात्यांसाठी एक स्पर्धात्मक प्रवास ठरला आहे. मात्र या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, ‘टीआरपी’च्या खेळात आपली छाप पाडण्यासाठी मालिकांमध्ये ‘काय वाट्टेल ते दाखवा’ हा फंडा वापरला जात असल्याचं आता पाहायला मिळतंय.

 

 

आजचा प्रेक्षक सुज्ञ आहे. ओटीटीसारखे इतर पर्याय सुद्धा त्याला उपलब्ध आहेत. ‘या गोष्टींचा निर्मात्यांना विसर पडलाय का?’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

लिबर्टी हा सुद्धा यानिमित्ताने मोठा चर्चेचा विषय ठरतो. कथानकाची गरज आहे म्हणून लिबर्टी घेणं वेगळं आणि केवळ टीआरपीच्या हट्टासाठी हवं ते दाखवणं वेगळं! तुम्ही दाखवताय आणि प्रेक्षक पाहतोय म्हणून त्याला गृहीत धरणं योग्य नाही.

याच प्रेक्षकवर्गाने श्रीयुत गंगाधर टिपरे, मालगुडी डेज, घडलंय बिघडलंय, असंभव, अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा मालिका पाहिल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. हल्लीच्या मालिकांमध्ये मात्र असं निखळ मनोरंजन होताना दिसत नाही.

 

maharashtratimes.com

 

उदाहरणच घ्यायचं झालं तर सगळ्यात आधी बबड्या, त्याची आई, सावत्र बाबा अभिजित राजे या कुटुंबाचं घेऊया. सध्या मालिकेत जे काही सुरु आहे, ते बघून फक्त आणि फक्त हसूच येतं. ‘आईची माया’ या नावाखाली त्यांनी काहीही माथी मारायचं आणि प्रेक्षकांनी ते पाहायचं.

‘कुठली आई अशी असते?’ हा प्रश्न विचारावासा वाटतो. ‘बबड्याची आई’ यापलीकडे त्याचं दुसरं उत्तर मिळेल असं वाटत नाही.

 

zee5.com

 

सोहमने सातत्याने कसंही वागायचं आणि प्रत्येकवेळी ‘अहो तो लहान आहे नं’, ‘मेहनत घेतोय ना’ असं म्हणत त्याच्या आईने त्याला पाठीशी घालायचं. वा रे वा!! उत्तम खेळ चाललाय…

त्याची डिग्री खोटी आहे, हे अनेक वर्षं कुणालाही ठाऊक नव्हतं. (तो चांगल्या मोठ्या पोस्टवर काम करत असूनही!!) हा असाच एक मोठा स्कॅम आहे.

अगदी या आठवड्यातील काही भागांमध्ये, एका दिवसासाठी सोहमने अभिज किचन चालवायला घेतलेलं आपण पाहिलं. मग त्या एका दिवसाकरिता त्याने रेस्टोरंटचं नाव ‘बबड्याज किचन’ असं ठेवलं काय, त्यानंतर गोंधळ होणं काय हा सगळाच ‘कधीच घडू शकत नाही असा’ थिल्लरपणा वाटला.

बरं, सोहमच्या वागण्यात बदल व्हावा यासाठी अभिजित राजे यांनी मुद्दाम सोहमला हॉटेल चालवायला दिलं. हा मुलगा नक्कीच आपलं नुकसान करणार, हे ठाऊक असूनही लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर एक मुरलेला बिझनेसमन हा धोका पत्करतोय. हेदेखील एकवेळ प्रेक्षक खपवून घेतील.

पण, हे सगळं असं घडणार याची जाणीव आसावरीला असू नये? वडिलांच्या पश्चात आपल्या मुलाला खंबीरपणे सांभाळणाऱ्या या आईला घडला प्रकार धक्कादायक वाटावा, हाच मोठा धक्का आहे. आता त्यावरून आसावरी आणि अभिजित यांच्यात पुन्हा अबोला सुरु झालाय.

बबड्याला नाही ओ, त्याच्या आईला आधी आवरा, असं म्हणायची वेळ आली आहे. असो…

अंजलीबाई आणि राणा दा यांची प्रेमकहाणी, अर्थात ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची कहाणी सुद्धा फार वेगळी नाही.  सातत्याने टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या मालिकेकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होत्या. मात्र ही मालिका सुद्धा एकाच माळेतील मणी या प्रकारातील ठरली.

 

imdb.com

 

मधेच राणाचं गायब होणं असो, अचानक परत येणं असो किंवा तिच्याच घरात आजूबाजूला सुरु असणाऱ्या कटकारस्थानांची साधी कुणकुण सुद्धा अंजलीला न लागणं असो.

सुशिक्षित, सुज्ञ अंजलीचं हे वागणं सुज्ञ प्रेक्षकांच्या पचनी पडतंय का? याचा विचार निर्मात्यांनी केलेला दिसत नाही…

आता जरा गुरुनाथ सुभेदारांकडे बघूया. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका ‘माझ्या बायकोचा नवरा’ हा प्रवास करून ‘माझ्या नवऱ्याचा नवरा’ या वळणावर पोचली आहे, ही ओरड तुम्ही ऐकलीच असेल. पण, त्या मुद्द्याकडे जरा नंतर वळूया.

मुळात, सतत विश्वासघातकी वागणारा आणि स्वार्थी गुरुनाथ अजूनही लोकांच्या विश्वासास पात्र ठरतोय. सगळं सत्य समजून घेतल्यावर सुद्धा मुली त्याच्यावर फिदा होतच आहेत. मुलींना वश करण्याची अशी कोणती जादू त्याला अवगत आहे, त्याने जरा इतरांना सुद्धा सांगावं. झालाच तर लग्नाळू तरुणांचा फायदाच होईल, नाही का!!

आता ‘नवऱ्याचा नवरा’ काय प्रकरण आहे ते बघूया. राधिकाचा नवरा सौमित्र, पिंकी बनून गुरुसमोर उभा राहतो.

 

www.zee5.com

 

एक विग, मुलीसारखा वेष आणि क्लीन शेव्ह या एवढ्या वेषांतरावर जर एखाद्या व्यक्तीला ओळखणं अगदी अशक्य असेल; तर जगातील अनेक मंडळी वेषांतर करण्यात माहीर आहेत, असंच म्हणायला हवं. सौमित्रकडून सुद्धा ही कला शिकून घ्यायलाच हवी.

अशीच आणखी एक मालिका.. ‘माझा होशील ना’!!

 

airtelxstream.in

 

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या भागात, मालिकेचा नायक नायिकेवर रागावला आहे हे पाहायला मिळालं. त्याला मनवण्यासाठी एका भल्याथोरल्या नामवंत कंपनीत थेट आतपर्यंत शिरून ती कात्रणं काय लावते.

सई थेट आदित्यच्या केबिनमध्ये पोचते. तिला कुणीही हटकत नाही. ‘मिस्टर इंडिया’ची अदृश्य होण्याची कला तिच्याकडेही असावी बहुतेक..

livemint.com

 

बरं, या कंपनीची आणखी एक गम्मत आहे. ‘आदित्य’ नावाच्या ज्या कंपनीत आपण काम करतो, तिचे आपण मालक आहोत, हे बिचाऱ्या नायकाला ठाऊकच नाही. त्याच्या दिवंगत आई-वडिलांची ही कंपनी सध्या त्याचे चार मामा ट्रस्टी म्हणून सांभाळत आहेत.

एमबीएचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या या लाडक्या भाच्याला, मामांनी अद्याप तो कोट्यधीश असल्याची जाणीवच करून दिलेली नाही. स्वतःच्याच कंपनीत नोकरी करणारा आदित्य, सायकलवरून आपलं ऑफिस गाठतोय.

आदित्यला सत्य कळेल तेव्हा कळेल, मात्र मालिका निर्मत्यांची चापलुसी प्रेक्षकांना समजत नाही, असं त्यांनी अजिबात समजू नये.

प्रेक्षक आहेत म्हणून तुम्ही आहात, ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा.. बाकी, मनोरंजन वगैरे तर तुम्ही आमचं करताच…

प्रेक्षक सुज्ञ आहेत; मूर्ख नाहीत ही गोष्ट मात्र निर्मात्यांनी ध्यानात ठेवायलाच हवी….!!!!!!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version