या किडकिडीत भारतीय खेळाडूने ओढली होती ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची मिशी!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
फॉलोऑन अर्थात सलग दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची नामुष्की आल्यानंतर, केवळ तीनवेळा एखाद्या संघाने कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. तिन्हीवेळा पराभवाची नामुष्की ऑस्ट्रलियाच्या संघावर ओढवली आहे. या तीनपैकी एकदा भारतीय संघाने ही करामत करून दाखवली आहे.
२००१ सालच्या मार्च महिन्यातील तो अनोखा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी निश्चितच अविस्मरणीय आहे. हरभजन सिंगची हॅट्रिक, लक्ष्मणच्या २८१ धावा आणि अर्थातच ‘द वॉल’ राहुल द्रविडची संयमी आणि भक्कम फलंदाजी..
हे तिघे एका ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले होते.
एका भारतीय खेळाडूला हा सामना आणखी एका कारणासाठी स्मरणात राहील. हा खेळाडू म्हणजे, भारताचा डावखुरा गोलंदाज व्यंकटपती राजू! राजूसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.
या अखेरच्या सामन्यात दोन्ही डावात मिळून, तत्कालीन ऑस्ट्रेलियन कप्तान मार्क वॉ याला एका डावात बाद करण्यापलीकडे राजू फारशी चमक दाखवू शकला नाही.
मात्र १२ वर्षांच्या कारकिर्दीत राजू यांनी अनेकदा उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे. त्यांचे काही अफलातून किस्से सुद्धा आवडीने सांगितले जातात.
अंगापिंडाने बारीक असलेले राजू ‘मसल’ या टोपणनावाने प्रसिद्ध होते.
पदार्पणातच पाडली छाप…
नव्वदच्या दशकात न्यूझीलंड विरुद्ध त्यांनी कसोटी पदार्पण केलं. त्याकाळातील न्यूझीलंड संघात, मार्टिन क्रो आणि जॉन राईट हे दोनच फलंदाज उत्तमरीत्या फिरकी गोलंदाजी खेळणारे फलंदाज म्हणून ओळखले जात असत.
पहिल्याच डावात राजू यांनी मार्टिन क्रोला बाद केलं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला.
न्यूझीलंडमध्ये वापरण्यात येणारा कुकाबुरा चेंडू भारतीयांसाठी सवयीचा नव्हता. भारतीय संघ सोनेक्स चेंडूचा वापर करत असे. या दोन्ही चेंडूच्या शिवणीमध्ये फरक होता. एखाद्या फिरकीपटूसाठी हे आव्हानात्मक होते.
मात्र कुकबुरा चेंडूचा उत्तम वापर करून समाधानकारक कामगिरी करण्यात राजू यांना यश मिळालं. न्यूझीलंडचे पाठीराखे अधिक असणाऱ्या वातावरणात पदार्पण करायला मिळालं याचा राजू यांना फायदा झाला.
भारतीय प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं, त्यामुळे येणारा दबाव याचा विचार न करता चांगली कामगिरी करणं त्यांना शक्य झालं.
नाईट वॉचमन म्हणून सुद्धा भरीव कामगिरी
राजू यांना पहिल्याच सामन्यात नाईटवॉचमन म्हणून खेळण्याचे दिव्य सुद्धा पार पाडावे लागले. भारताच्या तीन विकेट्स लवकर पडल्या. भारताचे कर्णधार अझरुद्दीन यांनी राजू यांना नाईट वॉचमन म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला.
“आता तुला नाईट वॉचमन म्हणून खेळायला जायचंय” ही कप्तानाची ऑर्डर ऐकल्यावर राजू यांनी फक्त स्मितहास्य केलं. “पहिल्याच सामन्यात नाईट वॉचमन.. ठीक आहे. हरकत नाही” असं म्हणत ते फलंदाजीला उतरले.
तब्बल १३५ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकत त्यांनी चिकाटीने फलंदाजी केली. १६४ धावांत सर्वबाद झालेल्या भारतीय संघांत राजू यांनी केलेल्या ३१ धावा तिसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक धावा होत्या.
प्रतिस्पर्ध्यांना वाटला बॉलबॉय.. पण राजूने घेतली फिरकी..
श्रीलंकेविरुद्धच्या त्या सामन्यात खरंतर राजू यांना खेळवण्यात येणार नव्हतं. बारावा खेळाडू म्हणून संघाच्या यादीत त्यांचं नाव होतं. बारकुड्या राजू यांना पाहून, श्रीलंकन संघ तर त्यांना बॉलबॉय समजला होता.
मात्र, रवी शास्त्री यांच्या एका निर्णयामुळे राजू यांना संघात स्थान मिळालं आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं.
खेळपट्टी बघितल्यावर, रवी शात्री यांनी ‘मी या सामन्यात गोलंदाजी करणार नाही’ असं अझरुद्दीन यांना सांगितलं. ‘हवं तर राजूला खेळवा’ असं सुद्धा त्यांनी सांगितलं.
यात पंचाईत अशी होती, की एक फलंदाज कमी करावा लागला असता. मात्र रवी शास्त्री यांनी सलामीला जाण्याची तयारी दाखवली. राजू यांना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतातील तो त्याचा पहिलाच सामना होता. मात्र त्यांना उत्तम लय सापडली. त्यांनी अवघ्या १२ धावांमध्ये ६ गडी बाद केले. एका स्पेलमध्ये तर त्यांनी फक्त २ धावा देताना ५ जणांना तंबूत धाडलं.
सामन्याआधी लंकेच्या संघातील मार्व्हन अटापट्टू आणि रोमेश रतनायके ज्या राजूला बॉलबॉय समजत होते, त्याने लंकेला जबरदस्त धक्का दिला. त्या सामन्यात राजू यांनी सामनावीराचा खिताब सुद्धा मिळवला होता.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने बाउन्सर टाकला म्हणून…
१९९१ सालच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्यांचा वेगवान गोलंदाज ह्युजेस याने एक सुसाट बाउन्सर टाकला. हा बाउन्सर राजू यांच्या हेल्मेटवर जाऊन आदळला.
भारदस्त मिशा आणि भेदक डोळे असणारा उंचपुरा ह्युजेस आणि त्याच्यासमोर उभा असलेला बारकुडा राजू… त्या बाउन्सरबद्दल कुठलाही राग व्यक्त करणं त्यांना शक्यच नव्हतं. त्यांनी फलंदाजी पुढे सुरु ठेवली. मात्र ही गोष्ट ते विसरले नव्हते.
त्याकाळात, दोन्ही संघ एकत्र प्रवास करत असत. ब्रिस्बेनहून पर्थला जाणाऱ्या विमानात त्या गोष्टीचा बदल घेण्याचा निर्णय राजू यांनी घेतला. सचिन आणि राजू हे तरुण खेळाडू या प्रॅन्कचा महत्त्वाचा भाग होते.
पेपर वाचणाऱ्या ह्युजेसच्या समोर जाऊन राजू उभे राहिले. ‘हॅलो बिग फेलो’ या त्यांच्या वाक्यावरील प्रतिसाद म्हणून त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकून त्यांनी पुन्हा पेपरमध्ये डोकं खुपसलं.
“तुला माहित आहे, की मी तुझ्यावर बाउन्सर फेकू शकत नाही. मग, माझ्यावर असा बॉऊन्सर्सचा हल्ला करून खुन्नस का देत होतास?” असा प्रश्न राजू यांनी विचारला.
त्यांच्या भारदस्त आवाजात, “हीच आमची खेळण्याची पद्धत आहे” असं उत्तर देऊन ह्युजेसने राजूला उडवून लावलं.
राजू मात्र मागं हटला नाही. “मला तुझ्या मिशा अजिबात आवडत नाहीत” असं म्हणत त्याने सरळ ह्युजेसची मिशी ओढली.
त्याच्या या कृत्याने सगळेजण स्तब्ध झाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्याचा खूप राग आला. मात्र, कालांतरानं ह्युजेस आणि राजू यांच्यात छान मैत्री झाली.
मिस्टर बिन सारखा हसणारा राजू
१९९४च्या विंडीज विरुद्धच्या मालिकेत राजू यांनी छाप पाडली. ३ सामन्यांच्या मालिकेत २० गडी बाद केले. या मालिकेत ब्रायन लारा याला तब्बल ४ वेळा बाद करण्यात राजू यांना यश आलं.
या मालिकेतील एक गमतीशीर किस्सा प्रसिद्ध आहे. राजू विंडीजच्या फलंदाजांना बाद करत, त्यावेळी स्माईल करत असत. ही स्माईल बघितल्यामुळे, विंडीजच्या फलंदाजांचा राग दूर पळत असे.
राजू यांचं हे हास्य, ‘मिस्टर बिन’सारखं आहे, असं विंडीजच्या खेळाडूंचं म्हणणं होतं.
असा हा राजू, संघातील एक लाडका खेळाडू होता. मात्र कामगिरीत सातत्य न राखता आल्याने त्यांना संघातील स्थान गमवावं लागलं. अर्थात, १९९९ – २०००च्या काळात त्यांनी संघात पुनरागमन केलं.
संघात कायम स्थान राखू न शकणाऱ्या राजू यांनी त्यांच्या या खास किश्यांच्या जोरावर संघसहकाऱ्यांचा आणि चाहत्यांच्या मनात मात्र दृढ स्थान निर्माण केलं आहे…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.