जग कोरोनासमोर हताश असताना एका सरपंचाने गावात घडवून आणलाय न भूतो न भविष्यती बदल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
स्वदेस चित्रपट आठवतो? नासामध्ये मोठ्या पदावर काम करणारा तरुण आपल्या मातीच्या ओढीने गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथ मारून गावी येतो आणि आपल्या शिक्षणाचा वापर आपल्या गावाच्या उत्कर्षासाठी करतो.
काहीशी अशीच कथा आहे रंगास्वामी एलांगो यांची. सरकारी नोकरीचे सुखासीन आयुष्य नाकारून त्यांनी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले.
कोरोना संक्रमणाच्या काळातही आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचा पुरेपूर वापर करत सौरऊर्जेवर चालणारे जंतुनाशक निर्मिती संयंत्र तयार केले आहे.
कुटंबक्कम या चेन्नई जवळील लहानशा गावात जन्मलेले रंगास्वामी एलांगो शिक्षणाने केमिकल इंजिनीअर आहेत. ऑइल इंडिया मध्ये उत्तम सरकारी नोकरी असूनही आपल्या गावाची ओढ रंगास्वामींना स्वस्थ बसू देत नव्हती.
१० वर्षे गावापासून दूर नोकरी केल्यावर त्यांनी १९९२ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला व चेन्नई येथे Council of Scientific and Industrial Research (CSIR) मध्ये रुजू झाले. यामुळे पुन्हा त्यांची आपल्या गावाशी जवळीक वाढली.
१९९२ च्या संविधानिक दुरुस्तीअंतर्गत भारतात पंचायती राज व्यवस्था लागू झाली आणि ग्रामीण भागांसाठी विकासाचे नवे पर्व सुरु झाले.
शाश्वत विकासाचे ध्येय बाळगलेल्या रंगास्वामींनी सरकारी नोकरीचा त्याग करून १९९६ मध्ये प्रथमच ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि त्यात विजयी देखील झाले. त्यानंतर २००६ पर्यंत सलग १० वर्षे ते गावाच्या सरपंच पदावर होते.
रंगस्वामींनी ज्या काळात गावाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांच्यासमोर गावातील अवैध दारू, सामाजिक कलह, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था असे अनेक प्रश्न उभे होते. ग्रामसभांच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नांचे निराकरण करण्यास प्रारंभ केला.
पक्के रस्ते तयार करणे आणि गटारे बंदिस्त करून स्वच्छता राखण्यावर त्यांनी सुरुवातीच्या काळात भर दिला. पण रंगास्वामीच्या कार्यातील सर्वात उल्लेखनीय गोष्ट ठरली ती म्हणजे “समतुवापूरम” हि सामाजिक सुधारणेची संकल्पना.
भारतात अनेक ठिकाणी आजही दलित समाज मूळ प्रवाहापासून दुरावलेला दिसतो. कुटुंबक्कम मध्येही ही सामाजिक विषमता होतीच.
रंगास्वामींनी समतुवापूरम नावाने ५० घरांची वसाहत उभारली, ज्यात दोन बाजूच्या घरांमध्ये एक दलित आणि एक दलितेतर कुटुंब राहू लागले.
या अभिनव संकल्पनेमुळे गावातील जातीय सलोखा वृद्धिंगत झाला आणि परिणामतः गावाला भेडसावणाऱ्या बऱ्याचशा समस्या कमी होऊ लागल्या. आपापसातील दरी कमी होऊन ग्रामस्थ एकजुटीने गावाच्या विकासासाठी कार्यरत झाले.
याच बरोबर अवैध दारूवर आणलेल्या नियंत्रणामुळे घरगुती हिंसाचाराच्या घटनाही आटोक्यात आल्या.
रंगस्वामींनी आपली सरपंच पदाच्या कार्यकाळात केवळ आपल्या गावाचाच विचार केला असे नाही. पंचायती राज व्यवस्थेत अधिकाधिक चांगल्या दर्जाचे प्रशासक तयार व्हावेत या हेतूने त्यांनी “पंचायत अकादमी” या नावाचे एक नेटवर्क प्रस्थापित केले.
यात त्यांनी इतर सरपंचांशी संपर्क साधून त्या योगे प्रत्येकाच्या अनुभवांचे आदान प्रदान सुरु केले, तसेच नवीन लोकांना प्रशासनाचे प्रशिक्षण देण्याला सुरुवात केली.
१० वर्षात देशभरातील जवळपास ७०० सरपंचांना रंगास्वामींनी या नेटवर्कच्या माध्यमातून प्रशिक्षित केले.
१३ वर्षांच्या खंडानंतर रंगास्वामींनी २०१९ साली पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यावेळेस त्यांनी “१७ शाश्वत विकास उद्दिष्टे” डोळ्यासमोर ठेवली.
ज्यात दारिद्र्य निर्मूलन, शून्य सामाजिक असमानता, वातावरणीय बदल अशा घटकांचा समावेश होता. प्रत्येक कुटुंबाकडून या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे हे त्यांचे ध्येय होते.
कोरोना संक्रमणाने जगभर कहर माजवलेला असताना या निमित्ताने काही नवीन उत्पादने तयार होताना दिसत आहेत. पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर डिस्पेन्सर, वेगवेगळी जंतुनाशके, ही त्याची काही उदाहरणे.
रंगास्वामी यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोडियम हायपोक्लोराइट जंतुनाशक निर्मिती संयंत्राची निर्मिती केली आहे.
सोडियम हायपोक्लोराइट हे एक उत्तम जंतुनाशक असून सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने ४ ते ५ टक्के मिठाच्या द्रावणातून विद्युतप्रवाह सोडून याची निर्मिती करता येते. यासाठी पारंपरिक पद्धतीने वीज न वापरता सौर ऊर्जेचा वापर रंगस्वामींनी केला आहे.
यात सोलर पॅनल द्वारा १२ व्होल्टचा डीसी विद्युतप्रवाह मिठाच्या द्रावणातून सोडला जातो. १२ व्होल्ट एवढेच विभवांतर असल्याने हे संयंत्र वापरण्यास अत्यंत सुरक्षित आहे.
८० हजार रूपयात तयार होणारे एक संयंत्र साधारणपणे २०० घरांसाठी जंतुनाशक पुरवू शकते. खासकरून ग्रामीण भागातील गरजू महिलांसाठी यातून चांगला रोजगार निर्माण होऊ शकतो.
आपल्या आजवरच्या वाटचालीतून रंगास्वामींनी शाश्वत विकासाची संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन काम केलेले दिसते.
कोरोनामुळे उद्भवलेल्या अडचणीच्या काळातही त्यांनी या संयंत्राची निर्मिती करून आपले शिक्षण समाजाच्या भल्यासाठी कशा प्रकारे वापरता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.