आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
संगीत ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात सुरेल आणि सुरेख देणगी आहे. मानवी आयुष्यातील कितीतरी चांगले वाईट प्रसंग संगीताच्या हळूवार सोबतीने सुगंधी झाले आहेत.
शास्त्रीय संगीत ही तर भारतातील पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा. आता संगीताचे कितीही प्रकार आले तरी त्याचा पाया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे हे कधीही नाकारता येणार नाही. या संगीतानंच कितीतरी अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत.
या संगीताची परंपरा जपणारे कितीतरी कलाकार भारतात होऊन गेले. तानसेनापासून सुब्बलक्ष्मींपर्यंत..इलाईराजांपासून हृदयनाथ मंगेशकर आणि असे अनेक महारथी दिग्गजांनी गाण्याची शास्त्रीय संगीताची परंपरा जपली, फुलवली, वाढवली.
प्रत्येकाची आपली गायकी, प्रत्येकाची आपली शैली, प्रत्येक गायक अनमोल रत्न.आणि यापैकीच एक भारदस्त नांव पंडित जसराज!
शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचा मेरुमणी असलेले पंडीतजी संगीत मार्तंड या उपाधीनं त्यांना भूषविलं असं म्हणावं की त्यांनी त्या पदवीला भूषवलं हे मोठं कोडं आहे.
आज पंडितजी आपल्यातून अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांच्या आठवणींचे हे काही अमृतकण!
२८ जानेवारी १९३० मध्ये हरयाणा मधील हिसार येथे पंडितजींचा जन्म झाला. मेवाती घराण्याचा गंडा बांधलेले जसराज जवळ जवळ ८० वर्षं संगीताची साधना करत होते. त्यांच्या घराण्यातील चौथी पिढी गायनाला वाहीलेली. ते त्या पिढीत जन्मले.
संगीताचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं होतं. सुरुवातीला त्यांना तबला वादक व्हायचं होतं. त्यांचा मोठा भाऊ पंडीत मणीरामजी त्यांचे गुरु होते.
नंतर त्यांना आग्रा घराण्याचे गायक स्वामी वल्लभदास यांनी त्यांना संगीताची तालीम दिली.
लाहोरच्या रेडिओ स्टेशन वर कुमार गंधर्व एकदा कार्यक्रम सादर करायला आले आणि कुमारजींच्या गायकीनं जसराजजी भारावून गेले. त्यावेळी तबलावादक आणि सारंगी वाजवणारे साजिंदे यांना फारसा मान नसे.
मुख्य गायकच कौतुकाचा भाग असायचा. पंडीत अमरनाथ चावला यांनी छोट्या जसराजच्या तबला वादनातील चुका सांगितल्या. ते त्यांच्या जिव्हारी लागलं. आणि ते संगीताकडे वळले.
गाणं तर त्यांच्या रक्तातच होतं. ते त्यांनी इतकं आत्मसात केलं. आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री या पद्मपुरस्कारांनी त्यांचा गौरव केला होता.
हा गौरव पंडीतजींना की पुरस्कारांचा? असा प्रश्न पडावा इतकी झळझळणारी कारकीर्द पंडित जसराज यांनी गाजवली. तब्बल ८० वर्षं पंडितजींनी संगीत साधना केली. त्या संगीत साधनेमुळे त्यांना संगीत मार्तंड म्हटलं जातं.
इतकंच नव्हे तर २००६ मध्ये सौरमंडलातील एका ग्रहाला पंडित जसराज यांचं नांव दिलं गेलं. संगीत मार्तंड..मार्तंड म्हणजे सूर्य! पंडित जसराज यांना संगीत मार्तंड म्हटलं जातं.
पंडित जसराज हे खरोखरच संगीतसूर्य होते. मोझार्ट आणि बीथोवन या परदेशी संगीतकारांनंतर पंडित जसराज हेच पहिले भारतीय शास्त्रीय गायक आहेत ज्यांचं नांव सौरमंडलातील एका ग्रहाला देण्यात आलं.
ही गोष्ट भारतीयांसाठी किती भूषणावह आणि गौरवास्पद आहे. एकूण चार संगीत क्षेत्रातील दिग्गज लोकांची नावं सौरमंडलातील ग्रहाला दिली आहेत. मोझार्ट, बीथोवन, टेनर लुसिआनो यांच्या नंतर पंडित जसराज यांचं नांव एका ग्रहाला दिलं आहे.
एकंदरीत भारतीय शास्त्रीय संगीतातील राग हे विशिष्ट वेळेलाच, विशिष्ट ऋतूत गावेत असा संकेत आहे. भैरव – शिशीर ऋतूत, हिंडोल – वसंत ऋतूत, मेघ – वर्षा ऋतूत, ,दीप – ग्रीष्म ऋतूत, मालकंस -शरद ऋतूत आणि श्री – हेमंत ऋतूत.
हे सहा ऋतूंत गायले जाणारे राग. तानसेनाबाबत असं म्हटलं जातं की, त्यानं दीपराग गायल्यानंतर दिवे प्रज्वलित झाले होते. मेघमल्हार गायल्यानंतर पाऊस पडला होता.
पंडित जसराज यांनी एक फार सुंदर आठवण सांगितली आहे. १९६० साली ते नाबर या गावात गायनच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्या गावात तीन वर्षं पाऊस पडला नव्हता.
ते ज्यांच्या घरी राहीले होते त्यांचं नांव होतं श्री. आर. के. गल्ला. त्यांनी जसराजजींना विनंती केली की त्यांनी पाऊस पडावा म्हणून मेघमल्हार राग गावा. पंडीतजींना त्यांचं मन मोडवेना.
त्यांचा स्वतःचा यावर फारसा विश्र्वास नव्हता की आपण राग आळवल्यावर पाऊस पडेल. या असलेल्या गोष्टी ऐकल्या होत्या. तानसेनाच्या संदर्भात. कुणालाही त्या दंतकथा चालू वाटाव्यात, त्यांनाही तसंच वाटलं होतं.
त्यांनी देवाला नमस्कार केला आणि रात्री ९ ते २ वाजेपर्यंत ते मेघमल्हार आळवत होते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता त्यांना जाग आली ती पावसाच्या आवाजाने!
पंडीतजी म्हणाले, तेंव्हा माझा विश्वास बसला संगीतामध्ये ती ताकद आहे, या सत्यकथा आहे.
असाच आणखी एक प्रसंग त्यांनी सांगितला होता, १९९८ मध्ये त्यावेळचे महसूल मंत्री श्री. एन. के. सिंग यांच्या बंगल्यात पंडीतजींना गायनाचा कार्यक्रम सादर करण्याचे आमंत्रण होते.
बुद्ध पौर्णिमा होती. त्या रात्री तिथं असणारा भयंकर उकाडा त्रस्त करत होता. पंडीतजींनी धुलिया मल्हार सादर केला आणि कुठेही पावसाचं लक्षण नसताना पाऊस पडला.
तो इतका अचानकपणे आला की लोकांना बाहेर अंगणातल्या वस्तू आत नेण्याचीही उसंत त्यानं दिली नाही.
इतके पुरस्कार मिळवलेले पंडीतजी भारतीय संगीताचेच चाहते होते. बडे गुलाम अली खाँ, सुब्बलक्ष्मी, पंडीत ओंकारनाथ ठाकूर, उस्ताद आमीर खान हे त्यांचे आवडते शास्त्रीय संगीत गायक.
आपल्या वडीलांच्या आठवणीसाठी हैदराबाद येथे त्यांनी दरवर्षी एक संगीत महोत्सवाची सुरुवात केली. तो महोत्सव म्हणजे पंडीत मोतीराम, पंडित मणिराम संगीत महोत्सव.
पंडीतजींना भारतीय संगीताचा प्रचंड अभिमान होता. कारण या संगीताच्या ताकदीचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला होता. त्यांनी जुगलबंदीवर एक पुस्तक लिहीलं त्याचं नांव जसरंगी.
ए.आर.रहमानचं संगीत त्यांच्या पठडीतील नव्हतं तरीही त्याचंही त्यांना कौतुकच होतं. टॅलेंट हंट शो मधून सादर केलं जाणारं फ्यूजन त्यांना फारसं रुचायचं नाही. तरीही त्यांनी त्यावर विखारी टीका केली नाही.
काल या संगीतसूर्याचा अस्त झाला. तिथं स्वर्गात जाऊन पंडीतजी साजिंद्यांसह गायला मैफल सजवून बसले असतील आणि सारे त्या गायकीच्या रसात न्हाऊन निघत असतील.
इनमराठी टीमतर्फे पंडीतजींना ही विनम्र श्रद्धांजली.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.