' तुमच्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ वाया घालवणाऱ्या १० दैनंदिन सवयी… – InMarathi

तुमच्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ वाया घालवणाऱ्या १० दैनंदिन सवयी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी जन्म दुर्लभ आहे. अध्यात्म सांगतं ८४ लक्ष योनीतून फिरुन एकदाच मानवी जीवन लाभतं.

आयुष्य असंही नश्वर आहे, क्षणभंगुर आहे. एका श्वासाचं अंतर ठरवतं माणूस जिवंत आहे की नाही…आणि एकदा का वेळ हातातून गेली की ती परत कधीही मिळत नाही.

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले असं करत एकंदरीत आपण फार वेळ वाया घालवत असतो. तरुण मुलं मुली तर खूप अपव्यय करताना दिसतात.

पार्ट्या कर, जंकफूड खा, दांड्या मारुन हिंडत बैस असं करुन खूप वेळ वाया घालवतात.‌ आजकाल पुस्तक वाचन कमीच झालं आहे.

 

deepika in party inmarathi
bollywoodhungama

 

चांगल्या सवयी लावून घेणं, काही कला कौशल्यं आत्मसात करणं, अशा कितीतरी गोष्टी करणं शक्य असतं. पण तसं करणारी खूप कमी मुलं मुली दिसतात.

अभ्यास करुन उत्तम मार्क मिळवणं हेच सगळं काही असतं का? नाही. पण तरीही तुम्ही तो न करता वेळ वाया घालवत असाल, तर नंतर पश्चाताप करतच रहावं लागतं.

म्हणून सावध व्हा, वेळ कधीच परत येत नाही. आजवर जगात असा कुणीही झाला नाही जो गेलेली वेळ परत आणू शकेल. म्हणून वेळ मौल्यवान आहे.

त्या वाईट सवयी कोणत्या? ज्या तुमचा अमूल्य वेळ वाया घालवतात..त्या तुम्हाला आहेत का बघा आणि जर असतील तर बदला.

कल करे सो आज..आज करे सो अब, पल में प्रलय होएरी..बहुरी करोगे कब? असं कबीरांनी सांगितलं आहे. म्हणजे उद्या करायचं ते आज कर..आज करायचं ते आत्ता..क्षणात प्रलय आला की सारं नष्ट होईल मग तू करणार कधी?

काही चांगल्या सवयी जाणीवपूर्वक लावून घ्या. एखादी गोष्ट २१ दिवस सतत करत राहिल्यास ती आपोआपच अंगवळणी पडते.

अशा चांगल्या गोष्टी कोणत्या? लवकर उठणं..ध्येयानं प्रेरीत होऊन काम करणं वगैरे, पण खालील वाईट सवयी जर तुम्हाला असतील तर तुम्ही आपल्या हातानं आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहात.

 

१) अंथरुणात लोळत पडणं

 

sleepy girl inmarathi
masterfile.com

 

लवकर उठणं ही कधीही चांगलीच सवय आहे. बहुतेक वेळा खूप जण काही काम नाही, तर कशाला लवकर उठायचं असं म्हणून लोळत राहतात. जाग आली तरीही.

त्यापेक्षा जाग आली की उठा. जर तुम्हाला सहा वाजता जाग येत असेल, तर ते झोपेतून जागं होणं असतं, उठणं नाही. अंथरुणातून बाहेर याल तर ते उठणं!!!

उठून जर तुम्ही टिचूक टिचूक करत मोबाईलवरच असाल तर असं करु नका. बाहेर या आणि आवरा. लवकर निजे, लवकर उठे त्या ज्ञान आरोग्य आणि संपत्ती भेटे हे लक्षात ठेवा.

 

२. कसलंही ध्येय न ठेवता तासचे तास वाया घालवणं

 

kids playing games inmarathi

 

आयुष्यात काहीतरी उद्देश हवा. लहानपण खेळात घालवलं ठिक आहे. त्या वयात समज नसतेच, पण मोठं झाल्यावर सुद्धा तुम्ही निरुद्देश भटकत असाल, टिंगलटवाळी करत असाल, काॅलेज चुकवून गप्पा छाटत हिंडत असाल, फेसबुकवर तासचे तास घालवत असाल, सिनेमा, टिव्ही बघत तासंतास रमत असाल, किंवा व्हिडिओ गेम खेळत असाल तर थांबा…

या बेकार सवयी तुमच्या आयुष्यातील मोठी हानी करु शकतात…चांगला अभ्यास करा. चांगले मित्र जमवा. एखादं ध्येय ठेवा.

वयाच्या सोळाव्या वर्षी शिवराय स्वराज्य स्थापनेच्या ध्येयानं झपाटले होते. त्यांनीही जर असंच काहीतरी केलं असतं, तर तेही मुघलांचे काही हजारी मनसबदार होऊन रमत गमत जगू शकले असते.

अठराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्याला तेवढं शक्य नसलं तरीही काहीतरी ध्येय ठेवा.. झपाटून कामाला लागा.

 

३. उशीरापर्यंत जागरण 

 

night sleep in harvard health InMarathi

 

जर तुम्ही काही कामच करत नसाल, तर शरीराला कष्ट काय होणार आणि तुम्हाला थकून झोप कशी लागणार? ध्येयच नाही तर काय काम करणार?

फेसबुकवर उशीरापर्यंत रेंगाळत रहायचं किंवा इतर कारणांनी सतत आॅनलाईन राहून जर तुम्ही उशीरा झोपत असाल तर आधी हे थांबवा.

स्वतःला विधायक कामात गुंतवा. दमछाक होईपर्यंत काम करा. तुम्ही ठरवलं तरी तुम्ही जागू शकणार नाही. लवकर झोपलात..तर जागही लवकर येईल. हे चक्रच होईल.

 

४. कामापेक्षा नियोजन जास्त 

 

planning Sequence InMarathi
youtube.com

 

तुम्ही नुसतं ध्येयच ठेवलं..पण काम केलं नाही किंवा कमी केलं तर त्याचा उपयोग शून्य समजा.

कोणतंही ध्येय तडीला नेण्यासाठी २०% नियोजन आणि ८०% मेहनत लागते. जर हे प्रमाण व्यस्त असेल किंवा उलट सुलट असेल म्हणजे फक्त नियोजनच असेल आणि त्यामानाने काम होतं नसेल तर विचार करा.

काम करायची पध्दत नियोजनाशिवाय घिसाडघाईची असेल तरीही हे चूकच आहे.

फक्त नियोजन करत असाल आणि कामच करत नसाल, तर ते नियोजन फोल आहे हे समजून घ्या. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वप्नरंजनापेक्षाही कठोर परिश्रम मेहनत हेच पर्याय आहेत.

 

५. लोक काय म्हणतील याची चिंता करणं 

 

overthinking inmarathi
timesofindia.com

 

तुम्ही कोणतंही काम करत असताना लोकांचा विचार जास्त करत असाल…मी हे केल्यानंतर लोक काय म्हणतील? माझ्यावर हसतील का? वगैरे वगैरे विचार करुन काम करत असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही.

तुकाराम महाराज म्हणतात, लोक जैसा ओक धरीता धरवेना…लोकांना दोन्हीकडून बोलता येतं. चांगलं झालं तरी बोलतात, वाईट झालं तरीही बोलतातच.

मग तुम्ही त्यांच्या बोलण्याचा विचार करुन तुमची स्वप्नं पायदळी तुडवून जाणार का? यशस्वी माणसं चालताना कान बंद ठेवतात.

लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा परीणाम होऊन कधी कधी आपल्या ध्येयापासून आपण भटकतो हे त्यांना माहीत असतं, म्हणून ते दुतोंडी लोकांकडे दुर्लक्ष करुनच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात.

थोडक्यात : 

 

think positive inmararthi
paradigmsanfransisco.com

 

सकारात्मकतेने विचार करा.

भरपूर मेहनत करा.

कठोर परिश्रमांना पर्याय नाही हे ध्यानात ठेवा.

नियोजनबद्ध पद्धतीने काम करा.

आळस झटकून कामाला सुरुवात करा.

आणि लोकांच्या बोलण्यापेक्षा आपल्या स्वप्नांना जपा..ती पूर्ण करायला सगळी ताकद लावा. यश तुमचेच आहे!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?